Source :- BBC INDIA NEWS

दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये बुधवारी (3 जून) भीषण आग लागण्याची घटना घडली. या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला. त्यातील 11 जण परदेशी नागरिक होते. यापैकी बहुतांशजण त्यांच्या नातेवाईकांच्या उपचारासाठी इथे वास्तव्यास होते.
या घटनेच्या वेळेस एका गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यात रस्त्यावर आंथरलेल्या गाद्यांवर उड्या मारून जवळपास 12 ते 15 जणांनी त्यांचे जीव वाचवले.
हे प्रसंगावधान दाखवणारं काम हॉटेलच्या अगदी समोरच गाद्यांचं दुकान असणाऱ्या रियाजुद्दीन आणि त्यांचा मुलगा अरमान मन्सुरी यांनी केलं होतं.
त्यांनी जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत तर केलीच. त्याशिवाय अनेक लोकांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यासाठी चादरी आणि आवश्यक ते कपडेदेखील दिले.
मात्र या बचाव कार्यामध्ये त्यांच्या दुकानातील बरचसं सामान नष्ट झालं. त्यांचं जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई करून देण्यासाठी सध्या प्रशासनातून कोणीही पुढाकार घेतलेला नाही.
असं असूनही, लोकांचा जीव वाचवण्याच्या कामात योगदान देता आलं याचं त्यांना समाधान आहे.
त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की जर हॉटेलमधून बाहेर पडण्याचा दुसरा दरवाजा उघडा असता तर आणखी लोकांचे जीव वाचवता आले असते.
गाद्यांवर उड्या मारून वाचले जीव, अशी केली व्यवस्था
हौजरानी मार्केटमध्ये अरमान मन्सुरी यांचं रजई-चादर-गादीचं दुकान आहे.
त्यांनी सांगितलं की सकाळचे साधारण सव्वा आठ वाजले होते. त्यावेळेस कोणीतरी सांगितलं की, माझ्या दुकानासमोर आग लागली आहे.
ते म्हणाले की साडे आठ वाजता ते तिथे पोहोचले. त्यांनी पाहिलं की समोरच्या हॉटेलच्या तळमजल्यावर सर्वत्र आग लागलेली होती. तिथे गोंधळाचं वातावरण होतं. मात्र तोपर्यंत आग वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचलेली नव्हती.
यादरम्यान अचानक हॉटेलमधून एकजण पळत बाहेर आला. मग त्यानं बाहेरूनच हॉटेलच्या काचा फोडल्या. मात्र तो पुन्हा आत जाऊ शकला नाही. कारण आग खूपच वाढलेली होती.
फोटो स्रोत, UGC
सकाळची वेळ असल्यामुळे हॉटेलमध्ये असणारे सर्व ग्राहक झोपलेले होते. काही कर्मचारीच तिथे उपस्थित होते.
ते म्हणाले की आग इतकी पसरली की कोणीही तिथून बाहेर पडू शकत नव्हतं. तसंच कोणीही वाचवण्यासाठी आतही जाऊ शकत नव्हतं.
पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत धूर पसरताच, तिथे असलेले लोक हेल्प… हेल्प म्हणत ओरडू लागले.

अरमान मन्सुरी म्हणाले, “यादरम्यान मी आमच्या दुकानातून जाडजूड गाद्या काढून सोबतच्या लोकांच्या मदतीनं रस्त्यावर अंथरण्यास सुरुवात केली. मग पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरून अनेक जणांनी जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या. गाद्यांवर उडी मारल्यामुळे भलेही त्यांना थोडीफार दुखापत झाली असेल, मात्र त्यांचा जीव वाचला.”
त्यांचे वडील रियाजुद्दीन मन्सुरी म्हणाले, “आम्ही पाहिलं की लोकांचा जीव वाचणार नाही. मग आम्ही आमच्या गाद्या अंथरल्या. एका वेळेस त्यावर 7-8 जणांनी उड्या मारल्या. मग त्यांची संख्या वाढून 12 ते 15 झाली. यापैकी कोणाचाही मृत्यू झाला नाही.”
घटनास्थळी काय घडलं?
अरमान म्हणाले, “त्यानंतर अर्ध्या तासानं अग्निशमन दल आलं आणि त्यांनी आग विझवली. मग अग्निशमन दलाच्या जवानांबरोबर जवळपास दहा जण आत गेले. त्यामध्ये मीदेखील होतो.
मात्र आत खूप धूर असल्यामुळे मी जास्त आत जाण्याची हिंमत करू शकलो नाही. फक्त तळमजल्यावरच गेलो. मात्र तिथेदेखील श्वास घेणं कठीण होत होतं. तिथे मला सर्वत्र मृत-जखमी दिसले. अनेकजण बेशुद्ध पडलेले होते.”
ते हॉटेलच्या बाहेर आले आणि लोकांबद्दल सांगत म्हणाले, “आम्ही जवळपास 12-15 जणांना बाहेर काढलं. त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी आम्ही गालांवर थोपटूनही पाहिलं. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मग आम्ही ॲम्ब्युलन्सनं त्यांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवलं.”

ते म्हणाले की अचानक वेगानं आगीचा भडका उडाला. हॉटेलच्या जवळपास राहणारे लोक जर मदतीसाठी आले नसते तर कदाचित खूप जास्त नुकसान झालं असतं. जितक्या लोकांचा जीव वाचवता आला, तेदेखील कदाचित शक्य झालं नसतं.
त्यांचे वडील रियाजुद्दीन म्हणाले की मृतदेहांना नेण्यासाठी देखील त्यांनी त्यांच्या दुकानातून रजईचे कव्हर, चादरी आणि इतर आवश्यक कपडे दिले.
‘जीव वाचवल्याचं समाधान’
अरमान म्हणाले की आगीपासून माझ्या दुकानातील सामान वाचवण्याऐवजी मी तिथे अडकलेल्या लोकांना मदत करण्याचा विचार केला, या गोष्टीचा मला अभिमान आहे.
ते म्हणाले, “माल तर सहा महिने, एक वर्षात रिकव्हर होईल. माझं जवळपास दीड-दोन लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. मात्र जितके जीव वाचले, त्याच्यासमोर याचं मूल्य काहीही नाही.”
आगीमुळे अरमान यांच्या दुकानाचं बरंच नुकसान झालं आहे. बचाव कार्यामध्ये त्यांच्या दुकानातील मालाचा वापर झाला. तो आता विकण्यायोग्य राहिलेला नाही.

अरमान यांना विचारण्यात आलं की आग विझवण्यात त्यांच्या मालाचं जे नुकसान झालं आहे, त्याची नुकसान भरपाई देण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून कोणी त्यांना संपर्क केला आहे का?
त्यावर ते म्हणाले, “मला भेटण्यासाठी स्थानिक आमदार सतीश उपाध्याय आले होते. त्यांनी कौतुक केलं. ते म्हणाले की आम्ही तुम्हाला मदत करण्याचे प्रयत्न करू. जर काही शक्य होणार असेल तर तुम्हाला सांगू.”
तर अरमान यांचे वडील रियाजुद्दीन म्हणाले की युद्धामुळे आधीच बाजारात मंदी आहे. त्यात त्यांच्या दुकानाचं नुकसान झालं आहे. त्यांच्या मुलीचं लग्न ठरलं आहे.
ते म्हणतात की लोकांचा जीव वाचवल्याचं समाधान त्यांना आहे. मात्र दुकानातील मालाचं नुकसान झाल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.
फोटो स्रोत, Arman Mansoori
ते म्हणाले, “आमचं दीड-दोन लाखांचं नुकसान झालं आहे. जर मदत मिळाली तर आम्हाला पुन्हा उभं राहता येईल. नाहीतर अडचण येईल हे तर उघडच आहे.”
“दोन महिन्यांनी घरात मुलीचं लग्न आहे. तिच्यासाठी मी कशी काय व्यवस्था करू. मालच नष्ट झाला. आम्ही तर छोटे व्यावसायिक आहोत. आमच्यासाठी ही मोठी रक्कम आहे. यावरच आमचं काम चालतं. फक्त एकच मुलगा आहे आणि 6 मुली आहेत.”
शेवटी ते म्हणाले की जर हॉटेलच्या खालच्या भागात आग लागली नसती तर जास्त लोकांचे जीव वाचवता आले असते. कारण मुख्य रस्ता खालीच होता.
आणखी एक चॅनलचं गेट होतं. मात्र त्याला कुलुप लावण्यात आलेलं होतं. नंतर अग्निशमन दल आल्यावर त्यांनी ते तोडलं. त्यानंतर त्यांनी काही मृतदेह बाहेर काढले आणि काही जिवंत लोकांना देखील बाहेर काढण्यात आलं.
रियाजुद्दीन म्हणाले – तो मार्ग उघडा असता तर कदाचित जास्त लोकांचे जीव वाचू शकले असते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC







