Home LATEST NEWS ताजी बातमी दुबई ते इस्रायल: वैमानिकांमध्ये हाणामारी, हायजॅकचा सिग्नल अन् पायलटला प्रवाशांनी बांधून ठेवलं

दुबई ते इस्रायल: वैमानिकांमध्ये हाणामारी, हायजॅकचा सिग्नल अन् पायलटला प्रवाशांनी बांधून ठेवलं

6
0

Source :- BBC INDIA NEWS

सुरुवातीला या विमानाचं अपहरण करण्यात (हायजॅक) आल्याचं मानलं जात होतं. (प्रतिकात्मक फोटो)

दुबईहून तेल अवीवकडे जाणारं ‘फ्लाय दुबई’चं प्रवासी विमान बुधवारी (30 सप्टेंबर) सकाळी अचानक सौदी अरेबियाच्या दिशेने वळवण्यात आलं. त्यानंतर विमानाला तिथेच उतरावं (लँडिंग) लागलं.

फ्लाइटमध्ये असलेल्या एका इस्रायली प्रवाशाने पत्रकारांना सांगितले की क्रू ने प्रवाशांकडून मदत मागितली आणि त्यानंतर प्रवाशांनी पायलटवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याला बांधून ठेवण्यास मदत केली.

इस्रायली प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, विमान उड्डाणादरम्यान पायलट आणि को-पायलटमध्ये वाद झाला. त्यानंतर विमानातून आपत्कालीन संदेश (इमर्जन्सी सिग्नल) पाठवण्यात आला. त्यामुळे काही काळ विमानाचे अपहरण (हायजॅक) झाल्याची भीती निर्माण झाली.

फ्लाइट FZ1073 ने संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं. या विमानात सुमारे 150 ते 180 प्रवासी होते. यातील बहुतांश प्रवासी हे इस्रायली नागरिक होते.

फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट ‘फ्लाइटरडार24’ नुसार, उड्डाणानंतर साधारण 2 तासांनी विमानाने आधी ‘स्क्वॉक कोड 7700’ हा कोड पाठवला. हा सामान्य आपत्कालीन स्थितीचा संकेत असतो. काही मिनिटांनी विमानाने 7500 कोड पाठवला. हा विमान हायजॅक झाल्याचा किंवा त्यात बेकायदेशीर हस्तक्षेप झाल्याचा संकेत असतो. त्यानंतर विमानाने पुन्हा 7700 कोड पाठवला.

फ्लाइटरडार24च्या माहितीनुसार, सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीमध्ये विमानाने अचानक दिशा बदलली आणि ते वेगाने खाली येऊ लागलं. दोन मिनिटांपेक्षा कमी वेळात विमान 17 हजार फूट म्हणजेच 5 हजार मीटरपेक्षा जास्त खाली आलं.

यानंतर विमानाने सुमारे 7 मिनिटे आपत्कालीन सिग्नल पाठवला. सकाळी 5.40 वाजता विमान काही वेळासाठी जॉर्डनच्या हवाई हद्दीत गेलं. काही मिनिटांनी ते पुन्हा सौदी अरेबियाच्या दिशेने वळलं आणि खाली उतरण्यास सुरूवात केली.

विमानाला तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावर उतरायचं होतं. पण, ते उत्तर-पूर्व (ईशान्य) सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर उतरलं.

प्रवाशांनी नंतर स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितलं की, विमान अचानक खाली येऊ लागल्याने त्यांना जीवाची भीती वाटू लागली होती.

फ्लाय दुबईच्या विमानाने बुधवारी सकाळी उड्डाण केलं होतं. (संग्रहित फोटो)

एका इस्रायली अधिकाऱ्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, पायलटांमध्ये हाणामारी झाल्यानंतर दोघांनीही आपत्कालीन सिग्नल पाठवले होते. पण, हा सिग्नल दोघांपैकी कोणत्या पायलटने जाणूनबुजून पाठवला होता की नाही, हे लगेचच स्पष्ट झालेलं नाही.

इस्रायली वृत्तवाहिनी एन12 न्यूजचे मुख्य राजकीय विश्लेषक अमित सेगल यांनी ‘एक्स’वर लिहिलं की, उड्डाणादरम्यान दोन्ही पायलटांमध्ये हाणामारी झाल्याचं दिसून येतं. यानंतर संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला.

सेगल यांची पोस्ट रिपोस्ट करताना इस्रायलमधील अमेरिकेचे राजदूत माइक हकबी यांनी म्हटलं की, या घटनेमुळे संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये, विशेषतः इस्रायलमध्ये, लोक आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. पण, ही घटना यापेक्षा गंभीर निघाली नाही, हे चांगलं झालं, असंही त्यांनी म्हटलं.

‘जेरुसलेम पोस्ट’च्या वृत्तानुसार, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी इस्रायली हवाई दलाने सतर्कतेचा आपला स्तर वाढवला होता.

या घटनेकडे विमान हायजॅक झाल्याचं म्हणून पाहिलं जात नाही, असं इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.

याआधी इस्रायलच्या 3 सुरक्षा अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितलं होतं की, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या विमानाच्या घटनेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

इस्रायली लष्कराने सांगितलं की, लष्करप्रमुख अयाल जमीर यांनी हवाई दलाचे कमांडर आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांसह परिस्थितीचा आढावा घेतला.

फ्लाय दुबईच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, “विमानाला प्रवासादरम्यान एका घटनेला सामोरं जावं लागलं. याबाबत आणखी माहिती मिळताच ती दिली जाईल.”

“आमच्या टीम्स संबंधित अधिकाऱ्यांसोबत मिळून काम करत आहेत,” असं प्रवक्त्यांनी सांगितलं.

फ्लाय दुबई, दुबई आणि तेल अवीवदरम्यान दररोज विमानसेवा चालवते. हा मार्ग इस्रायली नागरिकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC