Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
वाचन वेळ: 4 मिनिटे
देशभरात गाजलेल्या निठारी हत्या प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेल्या सुरिंदर कोलीचा मृत्यू झाला आहे. कोलीचे वकील सिद्धार्थ यांनी बीबीसीशी बोलताना याबाबत दुजोरा दिला आहे.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोली गेल्या काही महिन्यांपासून हरिद्वारमध्ये वेगळ्या नावाने राहत होता. तो तिथे एका छोट्या टपरीवर चहाचा व्यवसाय करत होता. याच ठिकाणी तो मृत अवस्थेत आढळून आला.
या प्रकरणात अद्याप कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही.
हरिद्वार शहराचे सीओ शिशुपाल सिंह नेगी यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी बीबीसी हिंदीचे सहयोगी पत्रकार आसिफ अली यांच्याशी बोलताना याबाबत माहिती दिली.
“सप्तऋषी परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. मृत व्यक्ती सुरिंदर कोली असल्याचे समजते.
प्राथमिकदृष्ट्या हे स्वतःच जीवन संपवल्याचे प्रकरण दिसत आहे. घटनास्थळी एफएसएलचे पथक तपास करत आहे. डॉक्टरांच्या पॅनेलकडून मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाईल,” असं त्यानी सांगितलं.
13 प्रकरणांत झाली होती फाशीची शिक्षा
सुरिंदर कोलीला डिसेंबर 2006 मध्ये अटक करण्यात आली होती. नोयडामधील निठारी परिसरात 13 मुलांच्या हत्येप्रकरणी त्याच्यावर खटले चालवण्यात आले.
या 13 स्वतंत्र प्रकरणांमध्ये कोलीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, तुरुंगात त्याला झालेल्या त्रासाचा दाखला देत अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2015 मध्ये त्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती.
त्यानंतर 2023 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने 13 पैकी एका प्रकरणात कोलीची निर्दोष मुक्तता केली होती.
फोटो स्रोत, Asif Ali
निठारी प्रकरणातील उर्वरित प्रकरणांमध्येही कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने कोलीला सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले आणि त्याची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले.
यानंतर कोली हरिद्वारमध्ये वेगळ्या नावाने राहत असल्याची माहिती आता समोर आली आहे.
त्याच्या मृत्यूच्या घटनेचा तपास सुरू असून शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक तपासणीनंतर मृत्यूबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
निठारी प्रकरण काय होतं?
गाझियाबादच्या एका सीबीआय न्यायालयाने दोन्ही आरोपींना बलात्कार, हत्या, पुरावे नष्ट करणं आणि इतर आरोपांमुळे फाशीची शिक्षा सुनावली होती.
दरम्यान, अलाहाबाद उच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2023 मध्ये सुरिंदर कोलीला 2006 च्या हत्येशी संबंधित 12 प्रकरणांत निर्दोष ठरवलं होतं. मोनिंदर सिंह पंढेरविरुद्ध दोन प्रकरणं होती. दोन्ही प्रकरणात त्याला निर्दोष मुक्त केलं होतं.
कोली हा 10 प्रकरणांमध्ये एकटा आरोपी होता. तर दोन प्रकरणांत त्याला पंढेरसोबत सहआरोपी करण्यात आलं होतं.
फोटो स्रोत, Getty Images
नोएडा येथे मोनिंदर सिंह पंढेरच्या घरासमोरील नाल्यात 2006 मध्ये मानवी अवयव आणि मुलांचे कपडे सापडले. तेव्हा हे प्रकरण उजेडात आले होते.
किमान 19 मुली आणि लहान मुलांवर बलात्कार, त्यांची हत्या आणि नंतर त्यांच्या अवयवांचे तुकडे करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
या हत्या पंढेरच्या घरात घडल्या. कोली तिथे नोकर म्हणून काम करत होता, असा आरोप पोलिसांनी त्यावेळी केला होता.
दरम्यान निठारी हत्याकांडाच्या तपासाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती.
हे संपूर्ण प्रकरण सुरिंदर कोलीच्या कबुलीजबाबावर आधारित होतं. कोलीने 29 डिसेंबर 2006 रोजी उत्तर प्रदेश पोलिसांसमोर कबुलीजबाब दिला होता.
प्रसारमाध्यमांनी पंढेरच्या घराला म्हटलं होतं ‘हॉरर हाऊस’
कोलीने मुलांना मिठाई आणि चॉकलेट देऊन आपल्याकडे आकर्षित करून त्यांची हत्या केली, त्याचबरोबर मुलांचे अवशेष पिशव्यांमध्ये त्याने लपवून ठेवल्याचे आढळून आल्याचा आरोप पोलिसांनी केला होता.
कोलीने तो नरभक्षक आणि नेक्रोफिलियाची कबुली दिली होती. पण नंतर न्यायालयात त्याने कबुलीजबाब मागे घेतला आणि याबाबत आपल्याला मारहाण झाल्याचं त्यानं म्हटलं होतं.
निठारी हत्याकांडानंतर झालेल्या तपास आणि न्यायालयीन कामकाजादरम्यान, हे प्रकरण अवयवांच्या व्यापाराशीही संबंधित असू शकते, अशी चिंता अनेकवेळा व्यक्त करण्यात आली होती.
तपास संस्थांच्या म्हणण्यानुसार, आरोपी सुरिंदर कोलीला 29 डिसेंबर 2006 रोजी अटक करण्यात आली.
त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार नोएडातील सेक्टर-31 मधील डी-5 घराजवळील एका खुल्या जागेत कवटी, हाडं आणि सांगाडे सापडले होते.
फोटो स्रोत, Getty Images
कोलीला अटक करण्याच्या तारखेवरूनही 2023 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपलं मत नोंदवलं होतं.
कारण कोलीला 29 डिसेंबरला अटक करण्यात आल्याचा फिर्यादीचा दावा होता. तर त्याला 27 डिसेंबर रोजी अटक केल्याचे बचाव पक्षाने म्हटलं होतं.
ह्या हत्येमुळे संपूर्ण देशात संताप निर्माण झाला होता. अनेकांनी पोलिसांवर दुर्लक्षाचा आरोप केला होता. या गुन्ह्यांच्या भयानक स्वरूपामुळे प्रसारमाध्यमांनी या घराला ‘हॉरर हाऊस’ असं नाव दिलं होतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC




