Home LATEST NEWS ताजी बातमी नेपाळला आणखी एका ग्लेशियल लेक फुटण्याचा धोका; तज्ज्ञ म्हणतात, ‘ते सरोवर भरलेलं...

नेपाळला आणखी एका ग्लेशियल लेक फुटण्याचा धोका; तज्ज्ञ म्हणतात, ‘ते सरोवर भरलेलं आहे’

5
0

Source :- BBC INDIA NEWS

नेपाळला आणखी एका ग्लेशियल लेक फुटण्याचा धोका; तज्ज्ञ म्हणतात 'ते सरोवर भरत चाललंय'

फोटो स्रोत, Guoxiong Zheng Via FFD Nepal

नेपाळच्या अधिकाऱ्यांनी चीनच्या जलसंपदा मंत्रालयाचा संदर्भ देत बीबीसीला सांगितलं की, रसुवा भागातील ‘लेक टू’ या ग्लेशियल लेकमध्ये सातत पाणी साठत आहे.

पुराचा अंदाज वर्तवणाऱ्या विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ जलवैज्ञानिक बिनोद पराजुली यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, चिनी आकडेवारीनुसार या ग्लेशियल लेकमध्ये 31 ऑगस्टपर्यंत अंदाजे 650,000 घनमीटर पाणी साठले होते.

ते बीबीसी न्यूज नेपाळीशी बोलताना म्हणाले, “हे ग्लेशियल लेक भरलेलं आहे. त्यामुळे ते फुटण्याचा धोका आहे.”

पराजुली यांनी मदतकार्य करणाऱ्या पथकांना, विशेषतः जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यांमध्ये तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना, हे सरोवर फुटू शकतं या शक्यतेचा विचार करून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

हे ग्लेशियल लेक पूर्णपणे भरून कधी फुटेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

हे सरोवर कुठे आहे आणि ते कसे आहे?

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 30 ऑगस्ट रोजी जी ग्लेशियर तुटली होती ती नेपाळ-चीन सीमेवर होती, तर हे सरोवर नेपाळच्या हद्दीत आहे.

30 ऑगस्टला सरोवर फुटल्यानंतर आलेल्या पुरामुळे कृष्णभीर परिसरात धूप झाल्याचं मानलं जात आहे.

वरिष्ठ जलवैज्ञानिक पराजुली यांच्या मते, हे नवे ग्लेशियल लेक रसुवामधील लांगटांग लिरुंग हिमालयाच्या पश्चिम उतारावर, तेनजिंग नावाच्या ठिकाणासमोर आहे.

ते म्हणाले, “हे सरोवर रविवारी, 30 ऑगस्टच्या सकाळी फुटलेल्या सरोवरापेक्षा सुमारे तीनपट लहान आहे. ते तीन बाजूंनी खडकांनी वेढलेले असून एका बाजूनं थोडेसं खुलं दिसतंय.”

त्यांनी सांगितले की, पर्वतांच्या मधोमध असलेल्या ‘लेक टू’ची उंची अंदाजे 4,000 मीटर आहे.

पराजुली म्हणाले, “हे 26 ऑगस्टला हिमस्खलन झाले त्या भागापेक्षा खाली आणि नदीपेक्षा खूप वर आहे. त्यामुळे ते वेगानं भरत नाही. ग्लेशियरमधून वितळणारं पाणी हळूहळू त्यात जमा होत आहे.”

त्यांनी सांगितलं की, या गोलाकार ग्लेशियल लेकचे क्षेत्रफळ 0.3 चौरस किलोमीटर आहे.

पराजुली यांच्या मते, त्याची खोली किती आहे, याचा अंदाज लावणे कठीण आहे.

ते म्हणाले, “खोली महत्त्वाची असते, कारण त्यामुळे केवळ क्षेत्रफळ नव्हे तर पाण्याचं एकूण प्रमाण वाढतं. घनमीटरमध्ये पाण्याचा हिशोब केला तर त्याची खोली सुमारे 10 मीटर असू शकते.”

हे सरोवर किती धोकादायक आहे?

अधिकाऱ्यांच्या मते, 26 ऑगस्टला आलेल्या पुरामुळे नेपाळच्या दिशेने 20 लाख घनमीटर पाणी वाहून आलं होतं.

पराजुली यांनी सांगितलं, त्याच्या तुलनेत सध्याच्या ग्लेशियल लेकमधील पाण्याचं प्रमाण खूपच कमी आहे.

ते म्हणाले, “तरीसुद्धा, खालच्या भागात लहान भूस्खलनं, नदीपात्रातील गाळ आणि विविध ओढे असल्यामुळे, हे सरोवर फुटल्यास त्या सर्व ओढ्यांचं मोठ्या प्रवाहात रूपांतर होण्याचा धोका आहे.”

त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. विशेषतः बोगद्यांमध्ये सुरू असलेल्या मदतकार्यात गुंतलेल्या लोकांनी तसंच खालच्या भागात मृत आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणाऱ्या पथकांनी अधिक दक्ष राहणं गरजेचं आहे.

त्यांनी सांगितलं की, हे ग्लेशियल लेक फुटलं तरी त्याचा परिणाम 26 ऑगस्टच्या पुरामुळे प्रभावित झालेल्या भागांच्या पुढे जाण्याची शक्यता नाही.

नेपाळ

फोटो स्रोत, Getty Images

पराजुली यांच्या मते, 26 ऑगस्टला ज्या भागात हिमस्खलन सुरू झालं, त्या परिसरात त्यानंतर अनेक भूस्खलनं झाली आहेत.

धोक्याबाबत इशारा देताना ते म्हणाले, “फुटण्याचा धोका असलेले एकमेव सरोवर म्हणजे अलीकडेच तयार झालेले ‘लेक टू’ हे आहे. याशिवाय आणखी एक धोका म्हणजे कधीही भूस्खलन होऊ शकतं आणि त्याचा अनेक स्तरांवर परिणाम होऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे.”

पराजुली यांच्या म्हणण्यानुसार, साधारणपणे जेव्हा सरोवरं भरतात तेव्हा त्यामध्ये दाब वाढतो आणि ती फुटण्याचा धोका निर्माण होतो.

ते म्हणाले, “गळतीमुळे काही ग्लेशियल लेक एक-दोन दिवसांत फुटतात. ‘लेक टू’ सध्या भरत आहे, त्यामुळे ते फुटण्याचा धोका कायम आहे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC