Home LATEST NEWS ताजी बातमी पिवळा बलक खाल्ल्याने हार्ट अटॅक येतो का? दिवसाला किती अंडी खावीत? महत्त्वाचे...

पिवळा बलक खाल्ल्याने हार्ट अटॅक येतो का? दिवसाला किती अंडी खावीत? महत्त्वाचे 7 मुद्दे

6
0

Source :- BBC INDIA NEWS

अंड्याचा पिवळा बलक

फोटो स्रोत, Getty Images

जगभरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला सांगितले जाणारे एक पौष्टिक अन्न म्हणजे अंडी. पण तरीही अंड्यांबद्दल लोकांमध्ये आजही बरेच गैरसमज आणि प्रश्न पाहायला मिळतात.

  • अंडी खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढते का?
  • दिवसाला किती अंडी खाणे सुरक्षित आहे?
  • गावरान कोंबडीचे अंडे चांगले की ब्रॉयलर कोंबडीचे?
  • अंडे कच्चे खावे की शिजवून?

अशा अनेक शंका लोकांच्या मनात असतात.

लोकांच्या या सर्व प्रश्नांवर आहार सल्लागार डॉ. अरुण कुमार यांनी दिलेली उत्तरे या लेखात दिली आहेत.

1. अंड्यातून नेमके कोणते पोषण मिळते?

एका अंड्यातून साधारण 60 कॅलरीज मिळतात, असे सांगत डॉ. अरुण कुमार म्हणतात की, यामध्ये सुमारे 6 ग्रॅम उत्तम दर्जाचे प्रोटिन असते.

ते पुढे सांगतात, “अंड्यातील प्रोटिनला ‘उच्च दर्जाचे’ म्हटले जाते, कारण त्याची बायोअव्हेलेबिलिटी म्हणजे शरीराला शोषून घेण्याची क्षमता 100% असते. आपले शरीर यातील पोषण सहज पचवून लगेच वापरू शकते. यामुळेच इतर पदार्थांमधील प्रोटीन्सची उपयुक्तता तपासताना अंड्यातील प्रोटिनशीच त्याची तुलना केली जाते. म्हणूनच अंड्यातील प्रोटिनला ‘गोल्ड स्टँडर्ड’ मानले जाते.”

डॉ. अरुण कुमार

2. अंड्याचा पिवळा बलक आरोग्यासाठी घातक आहे का?

अंड्याचा फक्त पांढरा भागच शरीरासाठी चांगला असतो असा एक मोठा गैरसमज लोकांमध्ये पसरलेला दिसतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की, पांढऱ्या भागासोबतच पिवळ्या भागातही भरपूर प्रोटिन असते. प्रोटिन केवळ पांढऱ्या भागातच असते हा विचार चुकीचा आहे.

अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये मज्जासंस्थेसाठी अत्यंत आवश्यक असणारे ‘कोलीन’ हे पोषक तत्त्व असते. गरोदर महिलांसाठी आणि पोटातील गर्भाच्या योग्य वाढीसाठी हे घटक खूप महत्त्वाचे आहे. एवढेच नाही तर नसा बळकट ठेवण्यासाठी आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आवश्यक असलेले ल्युटीन आणि झिअ‍ॅक्सॅन्थिन हे घटकही पिवळ्या भागात असतात. याशिवाय अंड्यामधून व्हिटॅमिन डीसारखी इतरही अनेक पोषक द्रव्ये मिळतात.

अंड्याच्या पिवळ्या बलकात मज्जासंस्थेला बळकटी देणारे 'कोलीन' हे पोषण असते.

फोटो स्रोत, Getty Images

‘NCBI’च्या एका संशोधन अहवालानुसार, अंड्यांमध्ये कोलीन, फोलेट, व्हिटॅमिन D, आयोडीन, B जीवनसत्त्वे आणि उत्कृष्ट दर्जाचे प्रोटिन असते. शिवाय राष्ट्रीय पातळीवरील आरोग्य संघटनासुद्धा आता अंडी खाण्यामुळे कोलेस्टेरॉल वाढते किंवा हृदयाचे आजार होतात, हा धोका मानत नाहीत.

3. दिवसाला किती अंडी खाणे योग्य ठरते?

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, बाळ 6 महिन्यांचे झाल्यावर त्याला थोडे थोडे अंडे खायला द्यायला हरकत नाही.

  • लहान मुलांसाठी रोज 1 ते 2 अंडी
  • गरोदर महिलांसाठी जास्तीत जास्त 2 अंडी
  • वयोवृद्धांसाठी नर्व्हस सिस्टीम चांगली राहण्यासाठी (कोलीनसाठी) साधारण 2 अंडी
  • व्यायाम करणारे आणि अतिरिक्त प्रथिनांची गरज असते ते दिवसाला 3 ते 4 अंडी खाऊ शकतात.

बहुतांश लोक दररोज बिनधास्तपणे 1 ते 2 अंडी खाऊ शकतात. येथे ‘दोन अंडी’ म्हणजे पिवळ्या बलकासह खाल्ली जाणारी अख्खी अंडी, हे इथे लक्षात घेतले पाहिजे.

4. अंड्यातला पिवळा भाग खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो का?

पिवळ्या भागात कोलेस्टेरॉल भरपूर असते आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन हार्ट अटॅक येऊ शकतो, असे बऱ्याच लोकांना वाटते. पण या समजात नेमके किती तथ्य आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे डॉ. अरुण कुमार यांचे म्हणणे आहे.

डॉ. अरुण कुमार सांगतात, “एका अंड्याच्या पिवळ्या भागात सुमारे 200 मिग्रॅ कोलेस्टेरॉल असते ही वस्तुस्थिती आहे. मात्र आहारात मिळणारे कोलेस्टेरॉल आणि आपल्या रक्तात असणारे कोलेस्टेरॉल यातील फरक लक्षात घेतला पाहिजे. रक्तात आढळणारे सगळेच कोलेस्टेरॉल फक्त खाल्लेल्या अन्नातूनच येते हा चुकीचा समज आहे.”

डॉ. अरुण कुमार सांगतात, “आपल्या शरीराचे काम सुरळीत चालण्यासाठी रोज साधारण 2000 मिग्रॅ कोलेस्टेरॉल लागते. म्हणजे जवळपास 10 अंड्यांइतके. शरीराला लागणारे हे आवश्यक कोलेस्टेरॉल आपले लिव्हर स्वतःच तयार करत असते.

त्यामुळे एखाद्याने रोज 2 अंडी खाल्ली आणि त्यातून शरीराला 400 मिग्रॅ कोलेस्टेरॉल मिळाले, तर लिव्हर स्वतःहून 400 मिग्रॅ कोलेस्टेरॉलचे उत्पादन कमी करते. कोलेस्टेरॉल केवळ अंड्यांमध्येच नसते, तर ते दूध, दुधाचे पदार्थ आणि मांसाहारातूनही मिळते.”

एका अंड्याच्या पिवळ्या बलकात जवळपास 200 मिग्रॅ कोलेस्टेरॉल असते.

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. अरुण कुमार सांगतात, “रक्तातील अतिरिक्त कोलेस्टेरॉल म्हणजेच एलडीएल (LDL) वाढल्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो, असे म्हटले जात असले तरी यावर अजूनही तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहेत. जर आपण हा मुद्दा काही प्रमाणात खरा मानला तरी अंड्यांतून पोटात जाणाऱ्या कोलेस्टेरॉलमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी फारशी वाढत नाही. यामुळेच अंड्याचा पिवळा बलक खाऊ नका हा पूर्वीचा नियम आता मागे घेण्यात आला आहे किंवा शिथिल करण्यात आला आहे. त्यामुळे हृदयविकार असलेले लोकसुद्धा न घाबरता रोज 1 ते 2 अंडी खाऊ शकतात.”

डॉ. अरुण कुमार सांगतात, “फक्त ‘फॅमिलीअल हायपरकोलेस्टेरोलेमिया’ हा अतिशय दुर्मिळ आनुवंशिक आजार असलेल्या व्यक्तींमध्येच कोलेस्टेरॉल पचवण्याची किंवा त्यावर प्रक्रिया करण्याची शरीराची क्षमता नैसर्गिकरीत्या खूप कमी असते. परिणामी त्यांच्या रक्तात एलडीएल कोलेस्टेरॉलचे प्रमाण खूप वाढते. अशा लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने पिवळा भाग खाणे कमी करावे किंवा तो पूर्णपणे टाळावा. या व्यक्तींचा अपवाद वगळता बाकी सर्वजण कसलीही भीती न बाळगता अंड्याचा पिवळा भाग खाऊ शकतात.”

त्याचप्रमाणे अंड्याचा पिवळा बलक खाल्ल्याने कावीळ होते किंवा किडनी खराब होते या निव्वळ अफवा आणि गैरसमज आहेत, असे डॉ. अरुण कुमार यांनी सांगितले.

अमेरिकेच्या ‘NCBI’ या संस्थेचा अभ्यासही हेच स्पष्ट करतो. जानेवारी 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, “अंड्यातून मिळणारे कोलेस्टेरॉल भरपूर प्रमाणात मिळत असल्याने रक्तातील कोलेस्टेरॉल वाढू नये यासाठी अंडी कमी खाण्याचा सल्ला अनेक वर्षांपासून दिला जात होता.

पण प्रत्यक्षात अन्नातून मिळणाऱ्या कोलेस्टेरॉलमुळे रक्तातील कोलेस्टेरॉल फारसे वाढत नाही. तसेच यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचण्याचा धोकाही अगदी कमी असतो, असे विविध अभ्यासांवरून स्पष्ट झाले आहे,” असे यात म्हटले आहे.

4. गावरान कोंबडीचे अंडे चांगले की ब्रॉयलर कोंबडीचे?

डॉ. अरुण कुमार यांच्या मते, “खरं तर दोन्ही प्रकारच्या अंड्यांमध्ये प्रोटिन आणि इतर पोषक तत्त्वे जवळपास सारखीच असतात. गावरान कोंबड्या नैसर्गिक अन्न खाऊन वाढतात. त्यामुळे त्यांच्या अंड्यात कॅरोटीनॉइड्सचे प्रमाण थोडे जास्त असू शकते. म्हणूनच गावरान अंड्यातील पिवळा भाग जास्त गडद पिवळा आणि दाट दिसतो. तर पोल्ट्रीचे खाद्य खाणाऱ्या ब्रॉयलर कोंबड्यांच्या अंड्यातील पिवळा भाग फिकट रंगाचा असतो. तसेच नैसर्गिकरीत्या किडे आणि गवत खाल्ल्याने गावरान अंड्यांत ओमेगा-3 चे प्रमाण किंचित जास्त असू शकते. हे दोन छोटे फरक सोडले तर दोन्ही अंड्यांमध्ये कोणताही मोठा फरक नसतो. प्रोटिनचे प्रमाण तर दोन्हीमध्ये पूर्णपणे सारखेच असते.”

गावरान आणि ब्रॉयलर या दोन्ही प्रकारच्या अंड्यांतून मिळणारे प्रोटिन आणि इतर पोषण अगदी एकाच पातळीचे असते.

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. अरुण कुमार म्हणतात, “जर तुम्ही फक्त प्रोटिन मिळवण्यासाठी अंडी खात असाल तर ब्रॉयलर कोंबडीची अंडी खाण्यास कसलीच हरकत नाही. 2 ते 3 पट जास्त पैसे खर्च करून गावरान अंडीच विकत घेतली पाहिजे असे काहीही गरजेचे नाही.”

5. कोंबड्यांना हार्मोन्सचे इंजेक्शन दिले जाते का? काय आहे सत्य?

डॉ. अरुण कुमार स्पष्ट करतात, “पोल्ट्रीच्या कोंबड्यांना हार्मोन्सची इंजेक्शने टोचली जातात, अशी चर्चा खूप दिवसांपासून ऐकायला मिळते. पण याबद्दल घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही. हा निव्वळ एक गैरसमज आहे. कोणत्याही कोंबडीला हार्मोन्स देऊन वाढवता येत नाही. असा प्रयोग करायचा ठरवला तरी त्याचा खर्च न परवडणारा असेल. प्रत्यक्षात कोंबड्यांना आजार होऊ नयेत म्हणून केवळ प्रतिबंधक लसी दिल्या जातात. लोक या लसींनाच हार्मोन्सचे इंजेक्शन समजून गोंधळात पडतात.”

अंडी किंवा चिकन खाल्ल्यामुळे मुली लवकर वयात येतात, या समजुतीला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही, असे डॉ. अरुण कुमार सांगतात. आजकाल मुलांना मिळणारा पोषक आहार आणि उत्तम दर्जाचे प्रोटिन यामुळे त्यांची नैसर्गिक वाढ जलद गतीने होते. म्हणूनच मुली लवकर वयात येतात असे त्यांचे म्हणणे आहे.

डॉ. अरुण कुमार म्हणतात, “केवळ शाकाहार घेणाऱ्या कुटुंबांमधील मुली वयात येण्याचे सरासरी वयही गेल्या 100 वर्षांत कमी झाले आहे, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. त्यामुळे मुली लवकर वयात येण्याशी गावरान किंवा ब्रॉयलर अंड्यांचा काडीमात्र संबंध नाही.”

6. अंडी खाल्ल्यामुळे पोटात गॅस होतो का?

अंडी खाल्ल्याने गॅसचा फार मोठा त्रास होतो असे काही नाही, असे डॉ. अरुण कुमार सांगतात. पिवळा भाग खाल्ल्यावर सुरुवातीला काहींना थोडे अस्वस्थ वाटू शकते. पण अंडी खाण्याची सवय झाली की हा त्रास हळूहळू पूर्णपणे कमी होतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

7. कच्चे अंडे खावे की नाही?

कच्चे अंडे खाणे टाळणेच नेहमी योग्य ठरते. कच्च्या अंड्यात ‘साल्मोनेला’ बॅक्टेरिया असू शकतात, ज्यामुळे जुलाबासारखा पोटाचा गंभीर त्रास होऊ शकतो. याव्यतिरिक्त कच्च्या अंड्यात असणारे ‘अव्हिडिन’ शरीराला ‘बायोटिन’ हे आवश्यक व्हिटॅमिन शोषून घेण्यापासून रोखते. यामुळे शरीरात पोषणाची कमतरता भासू शकते. म्हणूनच कच्चे अंडे खाणे पूर्णपणे टाळावे, असा सल्ला डॉ. अरुण कुमार देतात.

कच्च्या अंड्यामुळे 'साल्मोनेला' इन्फेक्शनचा धोका असतो, म्हणूनच कच्चे अंडे खाऊ नये, असे डॉ. अरुण कुमार सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

अंडी उकडवून खा, हाफ फ्राय करा, ऑम्लेट बनवा किंवा तळून खा; कोणत्याही पद्धतीने खाल्ले तरी त्यात फारसा काही बदल होत नाही.

अंड्यांबद्दल उगाच कसलाही संशय किंवा भीती बाळगू नका, असा सल्ला डॉ. अरुण कुमार देतात.

वजन वाढलेले असणाऱ्या किंवा मधुमेह असलेल्या लोकांसाठीही अंडी खूप फायदेशीर अन्न आहे. त्यामुळे सर्वांनीच कोणताही संकोच न बाळगता रोजच्या खाण्यात अंडी समाविष्ट करावीत, असे ते सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC