Home LATEST NEWS ताजी बातमी ‘ब्लूटूथिंग’मुळे HIV चा धोका; अमली पदार्थांसाठी रक्त शेअर करण्याची ही पद्धत ठरतेय...

‘ब्लूटूथिंग’मुळे HIV चा धोका; अमली पदार्थांसाठी रक्त शेअर करण्याची ही पद्धत ठरतेय जीवघेणी

3
0

Source :- BBC INDIA NEWS

'ब्लूटूथिंग' या पद्धतीचा उद्देश शिरेवाटे दिल्या जाणाऱ्या औषधांचा वापर अधिक प्रभावीपणे किंवा अधिक काळासाठी करणे हा आहे.

फोटो स्रोत, Getty/BBC

मागील आठवड्यात फिजीमध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या HIV संसर्गाच्या संकटाचं केंद्र म्हणून फिजीकडे पाहिलं जात आहे.

जागतिक स्तरावर HIV आणि एड्सवर नियंत्रण मिळवण्यात लक्षणीय प्रगती झाली असली, तरी काही भागांमध्ये त्यांचा धोका अजूनही मोठा आहे. एखाद्या भागात संसर्गाची साथ सुरू झाली तर ती झपाट्याने गंभीर रूप धारण करू शकते, याचीही यावरून आठवण झाली.

पॅसिफिक महासागरातील या द्वीपसमूहात आता सुमारे 60 प्रौढांपैकी एका व्यक्तीला HIV ची लागण झाली आहे. पाच वर्षांपूर्वी हेच प्रमाण 167 प्रौढांमागे एक असे होते.

संयुक्त राष्ट्रांची HIV-AIDS विषयक संस्था यूएनएड्सच्या अंदाजानुसार, जगभरात सुमारे 4 कोटी 10 लाख लोक एचआयव्ही ग्रस्त आहेत.

या नव्या संकटाची तीव्रता वाढवणारी एक चिंताजनक बाब म्हणजे काही अमली पदार्थ घेणारे लोक ‘ब्लूटूथिंग’ नावाची सुई (नीडल्स) शेअर करण्याची पद्धत वापरत आहेत.

यामध्ये अमली पदार्थाचे सेवन केलेल्या व्यक्तीच्या शरीरातून रक्त काढून ते दुसऱ्या व्यक्तीला टोचले जाते. यामुळे दुसऱ्या व्यक्तीलाही अमली पदार्थांची नशा होतो. शिरेवाटे दिले जाणारे अमली पदार्थ कमी खर्चात जास्त लोकांना वापरता यावे, हा यामागचा उद्देश असल्याचे सांगितले जाते.

अशी पद्धत आफ्रिकेतील लेसोथो, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्येही दिसून आली आहे.

ही पद्धत किती मोठ्या प्रमाणावर आहे आणि फिजीतील एचआयव्ही संकटासाठी तिला कितपत जबाबदार धरता येईल, यावरून मतभेद आहेत. परंतु, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते ही खरोखरच एक गंभीर समस्या आहे. त्यामुळे जगभरातील सरकारे आणि आरोग्य संस्थांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहन ते करत आहेत.

“आपण आणखी किती लोकांचे जीव जाण्याची वाट पाहणार आहोत?” असा सवाल ड्रग फ्री फिजी या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारी संचालक कलेसी व्होलाताबू यांनी केला आहे.

‘ब्लूटूथिंग’ इतकं धोकादायक का आहे?

एचआयव्ही हा रक्तातून पसरणारा आजार आहे. त्यामुळे अमली पदार्थ घेतलेल्या व्यक्तीचे रक्त दुसऱ्याच्या शरीरात गेल्यास, सुई म्हणजेच नीडल्स शेअर करणाऱ्या व्यक्तीलाही एचआयव्हीचा संसर्ग होण्याचा धोका असतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, या पद्धतीमुळे हिपॅटायटिस बी आणि सीसह इतर संसर्ग होण्याचा धोका खूपच जास्त असतो. याशिवाय गंभीर स्वरूपाचे बॅक्टेरियाचे संसर्गही होऊ शकतात.

फिजीमध्ये अमली पदार्थ घेणारे लोक नीडल्स शेअर करतात, हे पूर्वीपासूनच दिसून येतं. कारण त्यांना स्वच्छ आणि सुरक्षित म्हणजेच निर्जंतुक सुई सहज मिळत नाहीत. पण, ‘ब्लूटूथिंग’चा वाढता वापर पाहता गरिबी हा या धोकादायक पद्धतीमागचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं.

व्होलाताबू सांगतात की, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा हे पाहिलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला.

“ते इंजेक्शन घेण्यासाठी 5 ते 6 जण तिथे तयार उभे होते,” असं त्यांनी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसला सांगितलं.

“यामुळे त्या व्यक्तीकडून आणखी 5 जणांना संसर्ग होऊ शकतो. म्हणजे 5 जणांपासून हा संसर्ग 25 ते 30 लोकांपर्यंत पोहोचू शकतो. हे इतकं सहज पसरू शकतं.”

फिजीमध्ये लोक समुद्राच्या काठावर बसले आहेत. त्यांच्या मागे गवत आणि झाडांनी भरलेला किनारा आहे. दूरवर इतर बेटांची रूपरेषाही दिसत आहे.

फिजीमध्ये एचआयव्हीच्या रुग्णांची संख्या वाढत असण्यामागे, चाचणीसाठी पुढे येणाऱ्या लोकांची वाढती संख्या हे देखील एक कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

फोटो स्रोत, Getty Images

तज्ज्ञांच्या मते, फिजीमध्ये एचआयव्ही चाचणी करून घेणाऱ्या लोकांची संख्या वाढल्यामुळेही एचआयव्हीचे रुग्ण जास्त आढळून येत आहेत.

फिजीच्या आरोग्य मंत्रालयाने 2024 मध्ये ‘ब्लूटूथिंग’सारख्या पद्धतींना एचआयव्ही रुग्णसंख्या वाढ होण्यामागचं एक कारण मानलं होतं. यावर्षी जानेवारीत मंत्रालयाने एचआयव्हीचा वाढता संसर्ग ‘राष्ट्रीय संकट’ असल्याचे म्हटले. त्यावर उपाय म्हणून ‘सिरिंज आणि नीडल्स’ कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केलेल्या पाहणीनंतर ‘ब्लूटूथिंग’ फिजीमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे फारसे पुरावे नाहीत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं.

या पाहणीत इंजेक्शनद्वारे अमली पदार्थ घेणाऱ्या 56 लोकांची मुलाखत घेण्यात आली. त्यापैकी केवळ दोघांनी ‘ब्लूटूथिंग’ केल्याचे सांगितले, तर 4 जणांनी ही पद्धत प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितलं, असे अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

परंतु, व्होलाताबू सांगतात की जोपर्यंत त्यांनी स्वतः ही पद्धत पाहिली नव्हती, तोपर्यंत त्यांचाही त्यावर विश्वास बसत नव्हता.

इंजेक्शनद्वारे अमली पदार्थ घेणाऱ्या लोकांकडे पाहण्याचा समाजातील नकारात्मक दृष्टिकोन आणि त्याबद्दलची लाज यामुळे फिजी सरकारही या समस्येवर ठोस पावले उचलण्यास टाळाटाळ करत आहे, असं त्यांचं मत आहे.

त्या म्हणतात, “त्सुनामी येणार आहे, हे मला माहिती होतं. त्यामुळे आपण सध्या जिथे बसलो आहोत, तिथे येणं टाळायला हवं होतं.”

जगभरातील एचआयव्हीची स्थिती

एचआयव्ही हा एक असा विषाणू आहे, जो शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच्या पेशींना नुकसान पोहोचवतो. त्यामुळे शरीराची संसर्ग आणि आजारांशी लढण्याची क्षमता कमी होते.

एचआयव्हीचा संसर्ग शरीरातील द्रवांमधून होतो. असुरक्षित लैंगिक संबंध, जखमेतून रक्ताचा संपर्क किंवा दुसऱ्याची सुई वापरून अमली पदार्थ घेणे, यामुळे एचआयव्हीचा संसर्ग होऊ शकतो. गर्भधारणा, बाळंतपण किंवा स्तनपानाच्या वेळीही आईकडून मुलाला एचआयव्हीचा संसर्ग होऊ शकतो.

एड्स (अक्वायर्ड इम्युन डेफिशियन्सी सिंड्रोम) ही एचआयव्ही संसर्गाची गंभीर अवस्था आहे. एचआयव्हीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमकुवत झाल्यावर गंभीर आणि जीवघेणे आजार होऊ लागतात.

गेल्या काही दशकांत उपचारांमध्ये मोठी प्रगती झाली आहे. त्यामुळे एचआयव्हीचे निदान झालेल्या लोकांचं आयुष्य किवा आयुर्मान आता अधिक वाढलं आहे.

एचआयव्हीची लागण माता आणि त्यांची मुले यांच्यातही होऊ शकते.

फोटो स्रोत, Getty Images

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, 2025 मध्ये जगभरात सुमारे 5 लाख 70 हजार लोकांचा एचआयव्हीशी संबंधित कारणांमुळे मृत्यू झाला. 2004 मधील सर्वाधिक आकडेवारीच्या तुलनेत हे प्रमाण 73 टक्क्यांनी कमी झाले आहे.

आता एचआयव्हीसाठी अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) हा उपचार सुचवला जातो. या उपचारामुळे शरीरातील एचआयव्ही विषाणूंची संख्या इतकी कमी होते की ती चाचणीतही दिसून येत नाही. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुरक्षित राहते आणि लैंगिक संबंधातून एचआयव्हीचा संसर्ग होण्याचा धोका टळतो.

परंतु, गेल्या वर्षी यूएनएड्सच्या प्रमुख विनी बियान्यिमा यांनी म्हटलं होतं की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परदेशी मदत थांबवण्याचा निर्णय घेतल्यामुळे दररोज आणखी सुमारे 2 हजार लोकांना एचआयव्हीची लागण होऊ शकते. तसेच, पुढील 4 वर्षांत एचआयव्हीमुळे आणखी 60 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

युएनएड्सच्या मते, 2025 मध्ये 3 प्रदेशांमध्ये आणि 21 देशांमध्ये एचआयव्हीच्या नवीन संसर्गाच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. यात अफगाणिस्तान, श्रीलंका, नेपाळ, केनिया, सुदान, ब्राझील, पाकिस्तान, येमेन, इजिप्त, सेनेगल आणि फिलिपिन्स या देशांचा समावेश आहे.

Mokhosi oa Mangoana गटाचे सदस्य लेसोथोमध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनाचा सामना करण्यासाठी लढा देत आहेत

फोटो स्रोत, Ponto Tumisi

‘ब्लूटूथिंग’ आणखी कुठे-कुठे होतं?

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगात एचआयव्हीचा सर्वाधिक प्रसार असलेल्या देशांमध्ये लेसोथोचा दुसरा क्रमांक आहे. तसेच, लेसोथोमध्ये महिलांच्या मृत्यूचे एचआयव्ही हे एक प्रमुख कारण आहे.

लेसोथोमध्ये ‘ब्लूटूथिंग’ची समस्या रोखण्यासाठी ‘मोखोसी ओआ मँगोआना’ म्हणजेच ‘अ मदर्स क्राय’ ही संस्था काम करत आहे. या संस्थेतील महिला अमली पदार्थांच्या व्यसनाच्या समस्येत अडकलेल्या आपल्या मुलांबद्दलचे अनुभव एकमेकींसोबत शेअर करतात.

दक्षिण आफ्रिकेत ‘ब्लूटूथिंग’ होत असल्याचे त्यांच्या ऐकण्यात आल होतं. परंतु, 2024 मध्ये त्यांच्या लक्षात आलं की, असा प्रकार त्यांच्या घराजवळही सुरू आहे. विशेषतः ‘ट्रॅप हाऊस’मध्ये ही पद्धत आढळते.

‘ट्रॅप हाऊस’ म्हणजे सोडून दिलेल्या पडक्या किंवा खासगी इमारती, जिथे अमली पदार्थ घेणारे लोक एकत्र येऊन त्यांची खरेदी-विक्री आणि सेवन करतात.

पोंटो तुमिसी यांची मुलगी क्रिस्टल ही मेथॅम्फेटामाइन घेण्यास सुरुवात करण्यापूर्वी अभ्यासात खूप हुशार होती. ती नेहमी चांगले गुण मिळवत असत. पोंटो सांगतात की, थोड्या प्रमाणात अमली पदार्थ मिळाल्यावर ते एकमेकांसोबत वाटून घेण्यासाठी ‘ब्लूटूथिंग’ करतात.

तुमिसी म्हणतात की, लोकांना अमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून रोखण्यासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे.

फोटो स्रोत, Ponto Tumisi

त्या म्हणतात, “त्यांना एकमेकांचा रक्तगट जुळतो की नाही, हे माहीत असो किंवा नसो, तसेच त्यांच्या रक्तातून कोणते आजार पसरू शकतात, याची माहिती असो किंवा नसो, त्यांना त्याची कुठलीच पर्वा नसते.”

तुमिसी सांगतात की, आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना ‘ब्लूटूथिंग’सारखी पद्धत शक्यच नसल्याचे सांगितलं. त्यांच्या मते, अशा प्रकारे एकमेकांना रक्त दिल्यास कोणीही जिवंत राहू शकणार नाही.

तुमिसी म्हणतात की, लोकांना अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचं आहे.

यूएनएड्सचे प्रादेशिक संचालक इमॉन मर्फी सांगतात की, अशाच प्रकारे थेट रक्त शेअर करण्याच्या घटना इतर देशांमध्येही आढळून आल्या आहेत. टांझानियामध्ये अमली पदार्थ इंजेक्शनद्वारे घेणाऱ्या लोकांमध्ये याला ‘फ्लॅशब्लड’ असं म्हटलं जातं. पण, ही पद्धत जगभरात मोठ्या प्रमाणावर आढळून येत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पण, अशा नव्या आणि फारशा माहिती नसलेल्या अमली पदार्थ घेण्याच्या पद्धती इतर देशांमध्येही सुरू असू शकतात आणि त्याची माहिती कोणालाच होणार नाही, अशी भीती तुमिसी यांना वाटते.

त्या सांगतात की, अमली पदार्थांच्या समस्येचा सामना करणाऱ्या लोकांनी सावध राहावं आणि याची सुरुवातीची लक्षणं ओळखायला शिकावं.

“जर तुम्ही पालक असाल, आणि जगाच्या कोणत्याही भागात राहत असाल तरीही, तुम्ही एक माणूस आहात. याचा अर्थ असा की, या समस्येचा तुम्हालाही धोका आहे. अमली पदार्थांच्या व्यसनामुळे काहीही घडू शकतं.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC