Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
अलिकडच्या वर्षांमध्ये मेटाला न्यायालयांमध्ये वारंवार पराभवाचा सामना करावा लागला आहे. ‘त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समुळे तरुण वापरकर्त्यांचं (यंग युजर्स) नुकसान झालं आहे’, असं या खटल्यांमध्ये न्यायालयांनी म्हटलं आहे.
मात्र, मंगळवारपासून सुरू होणारी ज्युरी ट्रायल मेटासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा धोका ठरू शकते.
2023 मध्ये कॅलिफोर्निया आणि न्यूयॉर्कसह अमेरिकेतील 30 राज्यांनी मेटाविरुद्ध खटला दाखल केला होता. हा खटला त्याच प्रकरणाशी संबंधित आहे.
मेटानं केंद्र आणि राज्यांनी मुलांशी संबंधित केलेल्या कायद्यांचं उल्लंघन केलं आहे आणि त्यांच्या गोपनीयतेला (प्रायव्हसीला) धोका निर्माण केला आहे, असा या राज्यांचा आरोप आहे.
या राज्यांनी केवळ मेटाकडून 1 ट्रिलियन डॉलरहून अधिक नुकसानभरपाईची मागणी केलेली नाही, तर इन्स्टाग्राम आणि फेसबुकमध्ये बदल करण्याचीही मागणी करत आहेत.
यात ‘लाइक’ काउंट आणि सतत स्क्रोल करत राहण्याच्या (इन्फिनिट स्क्रोल) सुविधेचा अंत करणे यांचा समावेश आहे.
जर मेटा इतक्या मोठ्या खटल्यात हरली, तर तरुणांचा सोशल मीडिया वापरण्याचा अनुभव कायमचा बदलू शकतो.
मेटाविरोधात खटला दाखल करणारी राज्यं इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या कामकाजाच्या पद्धतीत आणखी बदल करण्याची मागणी करत आहेत, जेणेकरून ते अल्पवयीन युजर्स आणि मुलांसाठी अधिक सुरक्षित बनतील.
या राज्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
- किशोरवयीन युजर्ससाठी पालकांद्वारे पडताळणी (पॅरेंटल व्हेरिफिकेशन) प्रक्रिया लागू करावी.
- अल्गोरिदममध्ये बदल करून युजर्स सलग अनेक तास स्क्रोल करत बसणार नाहीत याची व्यवस्था करावी.
- व्यक्तीचा चेहरा किंवा रूप बदलणारे अनेक इमेज फिल्टर्स हटवावेत.
- व्हीडिओ कंटेंटमधील ऑटो-प्ले फीचर काढून टाकावं.
- एकापेक्षा अधिक अकाउंट तयार करण्यावर निर्बंध आणावेत.
- इन्स्टाग्राम स्टोरीजसारख्या गायब होणाऱ्या किंवा ‘तात्पुरत्या’ पोस्ट बंद कराव्यात.
ही सर्व वैशिष्ट्ये सध्या मेटाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची अत्यंत महत्त्वाची वैशिष्ट्ये मानली जातात.
फोटो स्रोत, Getty Images
या राज्यांचं म्हणणं आहे की ही वैशिष्ट्यं मुलं, किशोरवयीन आणि इतर युजर्सही जास्तीत जास्त वेळ प्लॅटफॉर्मवर राहतील अशाप्रकारेच डिझाइन करण्यात आली आहेत.
नोटिफिकेशनसारख्या माध्यमांतून मेटाची ॲप्स तरुणांना वारंवार पुन्हा प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी प्रवृत्त करतात, असा त्यांचा आरोप आहे.
‘मेटानं मुलांना लक्ष्य करून तरुणांचं शोषण केलं, जेणेकरून ते त्याच्या प्लॅटफॉर्मशी जोडले जावेत, त्यांचा युजर्स वर्ग (यूजर बेस) वाढावा आणि व्यवसायाचा विस्तार व्हावा, असा आरोप आहे.
आज शेअर बाजारात मेटाचं मूल्य सुमारे 1.5 ट्रिलियन डॉलर आहे.
मेटाने सातत्याने अशा आरोपांचं खंडन केलं आहे.
कंपनीच्या एका प्रवक्त्यानं एका निवेदनात म्हटलं, “आम्ही या आरोपांशी पूर्णपणे असहमत आहोत आणि पुरावे हे तरुणांना पाठिंबा देण्याबाबतची आमची दीर्घकालीन बांधिलकी दाखवतील, असा आम्हाला विश्वास आहे.”
ही राज्यं आपले दावे कॅलिफोर्नियातील मुख्य संघीय न्यायाधीश इव्हॉन गोंझालेझ रॉजर्स यांच्यासमोर मांडत आहेत. त्या एलन मस्क विरुद्ध सॅम ऑल्टमन या हाय-प्रोफाइल खटल्याच्या न्यायाधीश होत्या आणि जवळपास 20 वर्षांच्या कार्यकाळात स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात.
सोशल मीडिया ‘सार्वजनिक उपद्रव’ ठरला
मेटाविरोधातील अलिकडील एका निर्णयात न्यू मेक्सिकोमधील एका न्यायाधीशांनी कंपनीला सुमारे 94.2 कोटी डॉलरचा दंड ठोठावला आणि प्लॅटफॉर्ममध्ये अशाच प्रकारचे काही बदल करण्याचे आदेश दिले, असेच बदल 30 राज्यंही आता मागत आहेत.
न्यायाधीश ब्रायन बिडशाइड यांनी आपल्या आदेशात म्हटलं की, इन्स्टाग्राम आणि फेसबुकने 18 वर्षांखालील युजर्ससाठी लाइक काउंट काढून टाकावा, किशोरवयीन मुलांना प्लॅटफॉर्मद्वारे न्यूड कंटेंट पाठवण्यापासून रोखावं आणि ॲपमधील पुश नोटिफिकेशन्स दिवसातील काही ठराविक तासांपुरती मर्यादित करावीत.
न्यायाधीशांनी मेटाला ‘पब्लिक न्यूसेन्स’ (सार्वजनिक उपद्रव) घोषित केलं. म्हणजेच हवा प्रदूषित करणाऱ्या कारखान्यासारखी अशी संस्था, ज्याचा लोकांवर अत्यंत नकारात्मक परिणाम होत आहे. मेटानं या निर्णयाविरोधात अपील करणार असल्याचं म्हटलं आहे.
जरी न्यायाधीश बिडशाइड यांच्या आदेशात मेटाला केवळ न्यू मेक्सिकोमध्येच बदल करण्यास सांगितलं आहे. मात्र जर या स्वतंत्र खटल्यात 30 राज्यांना यश मिळालं, तर मेटाला जवळपास निश्चितपणे संपूर्ण अमेरिकेत आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये बदल करावे लागतील.
या खटल्यात सहभागी राज्यं अमेरिकेच्या सुमारे दोन-तृतीयांश लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात.
जर मेटानं असे बदल लागू केले, तर युजर्सच्या प्लॅटफॉर्म वापरण्याच्या अनुभवात मोठा बदल होईल.
‘लाइक्स’वरून निर्माण झालेले प्रश्न
उदाहरणार्थ, ‘लाइक’ची संख्या ही मेटाच्या सुरुवातीच्या काळापासूनच प्लॅटफॉर्मचा भाग राहिली आहे, जेव्हा कंपनीचं नाव फेसबुक होतं आणि तोच तिचा एकमेव प्लॅटफॉर्म होता.
आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइक्स सर्वत्र दिसतात. ऑनलाइन पाहिलेल्या मजकूर, फोटो आणि व्हीडिओंशी संवाद साधण्याचा तो प्रमुख मार्ग आहे.
तरीही, विशेषतः तरुणांमध्ये, लाइक काउंटला नकारात्मक भावना वाढीस लावणारा घटक म्हणून अधिकाधिक पाहिलं जात आहे.
कॅली नावाच्या एका तरुण युजर यावर्षीच्या सुरुवातीला मेटाविरोधातील खटल्यात जिंकल्या होत्या. त्यांनी यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर डझनभर अकाउंट्स कसे तयार केले होते, हे त्यांनी न्यायालयात साक्ष देताना सांगितलं होतं.
आपल्या पोस्टना जास्त लाइक्स मिळावेत यासाठी त्या या अकाउंट सिस्टमचा वापर करत होत्या, जेणेकरून इतर वापरकर्त्यांशी जोडता येईल आणि स्वतःबद्दल समाधान व आत्मसन्मानाची भावना निर्माण होईल.
त्यावेळी कॅली फक्त नऊ वर्षांच्या होत्या. त्यांनी सांगितलं की, तेव्हा त्या नैराश्याशी (डिप्रेशनशी) झुंज देत होत्या. नंतर त्या त्यातून बाहेर पडल्या.
फोटो स्रोत, Getty Images
लाइक काउंटसारखे एंगेजमेंट मेट्रिक्स किशोरवयीन मुलांमध्ये नकार मिळाल्याची भावना (रिजेक्शन) आणि नैराश्याच्या भावनांना चालना देऊ शकतात, असं गेल्या अनेक वर्षांतील संशोधनातून दिसून आलं आहे.
या राज्यांनी मेटाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात कंपनीने म्हटलं आहे की, तिने 20 लाखांहून अधिक दस्तऐवज सादर केले आहेत. मात्र, वकिलांनी मेटाच्या स्वतःच्या संशोधनाचा दाखला दिला आहे. त्या संशोधनानुसार लाइक्स आणि तत्सम गोष्टी अनावश्यक तुलना वाढवतात आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात.
मेटाच्या स्वतःच्या संशोधनानुसार, इन्स्टाग्राम युजर्स स्वतःची इतरांशी तुलना करतात. त्यामुळे एकटेपणाची भावना वाढते, शरीराविषयी असमाधान वाढतं आणि मनःस्थितीही बिघडते.
न्यायाधीश बिडशाइड यांनी आपल्या आदेशात म्हटलं की न्यू मेक्सिको आणि इतर ठिकाणी तरुणांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित संकटांमागे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचाही मोठा वाटा आहे.
आता आणखी 30 राज्यांचे वकील न्यायाधीश गोंझालेझ रॉजर्स यांना हाच निष्कर्ष काढण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न करतील.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




