Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, ShahidShaikh/BBC
“हा अजिबातच शिजत नाही नुसतं दगडागत. दोन तीन वर्ष झालं म्हणून शीजत नसेल,” शालेय पोषण आहार बनवणाऱ्या महिला बचत गटाच्या सदस्य महिलांनी बीबीसी मराठीशी बोलताना ही तक्रार बोलून दाखवली.
पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील केंजळ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार करून देणाऱ्या महिलांनी ही तक्रार केली आहे. याठिकाणच्या शिक्षक आणि पालकांनीही ही बाब समोर आणली आहे.
आपण घरी वाटाणा शिजवण्यासाठी कुकरमध्ये किती शिट्ट्या घेतो? तीन, चार किंवा पाच? पण आठ ते दहा शिट्ट्या घेऊनही हा वाटाणा कच्चा राहत असल्याचं शालेय पोषण आहार बनवणाऱ्या बचत गटाच्या महिला आणि अंगणवाडी सेविका सांगतात. याचा थेट संबंध बालकांच्या पोषण आहाराशी आहे.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात दिला जाणारा वाटाणा शिजत नसल्याची तक्रार ही तक्रार आहे.
पण जिल्हा परिषदेची ही एकच शाळा नव्हे तर इतरही काही अंगणवाडींमध्ये तीन ते सहा वयोगटातल्या बालकांसाठी आहार तयार करणाऱ्या मदतनीस आणि अंगणवाडी सेविकांनीही अशीच तक्रार केल्याचं समोर आलं आहे.
बीबीसी मराठीच्या टीमनं या संदर्भात केंजळ प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी तसंच नंबरवाडी अंगणवाडी या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात माहिती घेतली. त्या संदर्भातला हा ग्राऊंड रिपोर्ट.
‘कितीही शिजवा, वाटाणा दगडागत पाहतो’
एकात्मिक बालविकास विभागानंही बीबीसी मराठीशी बोलताना राज्यातील काही ठिकाणच्या अंगणवाडी सेविकांकडून अशी तक्रार समोर आल्याची माहिती दिली.
बालकांची वाढ आणि विकास योग्य पद्धतीने होण्यासाठी अंगणवाडीत तीन ते सहा वयोगटातील लहान मुलं आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो.
अंगणवाड्यांमध्ये तर बालकांची उंची आणि वजन यांची नोंद तसंच कुपोषणाच्या स्थितीनुसार प्रत्येक बालकांचा स्वतंत्र आलेख तयार केला जातो.
परंतु शालेय पोषण आहार आणि अंगणवाडीत दिला जाणारा आहारातील वाटाण्यासंदर्भात तक्रारी समोर येत आहेत. काही ठिकाणी शालेय पोषण आहारात दिला जाणारा वाटाणा शिजतच नसल्याचं समोर आलं आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील केंजळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. यासाठी महिला बचत गटाच्या महिला स्वयंपाक करतात.
आम्ही या शाळेत पोहचलो त्यावेळी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी पोषण आहारातला वाटाणा शिजत नसल्याची तक्रार असल्याचं सांगितलं. हा वाटाणा बीबीसी मराठीच्या कॅमेऱ्यासमोर या महिलांनी दाखवला.
“वाटाणा शिजत नाही. मुलं खात नाहीत म्हणून आम्ही सरांकडे तक्रार केली. आम्ही शिजवतच नाही सध्या. वाटाणा शिजावा म्हणून सोडा टाकतो, मीठ टाकतो सगळं करतो पण शिजत नाही. कधी-कधी डाळही शिजत नाही. अर्ध अर्ध केलं तरी तसंच,” असं पोषण आहार बनवणाऱ्या विजया म्हणाल्या.
“आम्ही पालकांनाही सांगितलं की दहा बारा शिट्ट्या घेतो तरी वाटाणा कच्चा राहतो, ” असंही त्या म्हणाल्या.
फोटो स्रोत, ShahidShaikh/BBC
वाटाणा शिजावा म्हणून या महिला आदल्यादिवशी हा वाटाणा पाण्यात भिजवतात. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेत अन्न शिजवण्यापूर्वी वाटाणा निवडून मग तो कुकरमध्ये शिजवला जातो.
“दुसऱ्या दिवशी बारा शिट्ट्या केल्या तरी अजिबात शीजत नाही. दोन तीन महिने झाले असतील. पहिला माल शिजत होता सहा महिन्यांपूर्वीचा,” असं बचत गटाच्या महिलांनी सांगितलं.
कच्चा असल्यानं विद्यार्थी तयार केलेला वाटाणाही फेकून देतात असंही या महिला सांगतात.
“नाही खात पोरं. जेवढी फोडणी आम्ही देतो ते सगळं कचऱ्यात जातं. मग त्याचा काय उपयोग? गॅस, तेल पण वाया जातं. एक तास शिवजवायला लागतो त्यात खूप गॅस जातो. इतर धान्य दोन तीन शिट्ट्यांत होतं, पण हे शिजतच नाही,” असं महिला म्हणाल्या.
असा वाटाणा खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांचं पोट खराब झालं तर कोण जबाबदार? असा प्रश्नही त्या उपस्थित करतात.
“कसं आहे, नाही शिजला आणि पोरांचं पोटबीट दुखलं, बिघडलं तर आमचीच जबाबदारी आहे. मुलं आईला सांगणारच की कच्च देतात, मग आमची बदनामी होणार. त्यामुळं आम्ही सरांना सांगितलं की, त्याऐवजी दुसरं काही आणा. पण ते वरून येतं तर आम्हाला बनवावच लागतं,” असं बचत गटाच्या महिला म्हणतात.
अंगणवाडीतही तशीच स्थिती
याच शाळेच्या आवारात दोन अंगणवाड्या आहे. इथं गेल्यानंतर एका अंगणवाडीतल्या मदतनीस म्हणजे लहान मुलांसाठी पोषण आहाराचा स्वयंपाक तयार करणाऱ्या महिलेनंही असंच काहीतरी सांगितलं.
दहा बारा शिट्ट्या घेतल्यानंतर वाटाणा थोडा फार शिजतो असं त्यांचं म्हणणं आहे.
तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नंबरवाडी अंगणवाडीतील सेविकेनंही याबाबत तक्रार केली असून सोशल मीडियावर यासंदर्भात व्हीडिओही पोस्ट केला आहे.
फोटो स्रोत, ShahidShaikh/BBC
आम्ही त्या ठिकाणी पोहचलो तेव्हा भिजत घातलेला वाटाणा त्यांनी आमच्यासमोर कुकरमध्ये शिजवायला लावला. आठ शिट्ट्या पूर्ण केल्यानंतर कुकर थंड झाला. त्यानंतर वाटाणा काढून बाहेर आणून आम्हाला दाखवला. पण, खरंच तो शिजला नव्हता.
इथल्या अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांच्या मते, “मुलांसाठी येणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे. वाटाणा किंवा लापशीचा भरडा येतो. तो शिजत नाहीच नाही, पण वाटाणा आदल्यादिवशी भिजवूनही दहा-बारा शिट्यांनंतरही शिजत नाही. मुलं खात नाहीत. पोटात दुखल्याची तक्रार करतात. आपल्या मुलांची काळजी आपणच घ्यायला पाहीजे असं वाटलं म्हणून मी बोलत आहे. यापूर्वी खूप वेळा सांगितलं आहे. याबद्दल कोणी बोलत नाही. लेखीही दिलेलं आहे.”
शिक्षक आणि पालकांची मागणी
केंजळ जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि पालक यांनीही सरकारला या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.
“सांगितला हिरवा वाटणा आणि येतोय पांढरा वाटाणा. दर्जाही कमी आहे. आम्हाला मीड डे मीलच्या कूक सांगतात की, दहा बारा शिट्ट्या झाल्या तरी ते शिजत नाही. मुलं बाजूला काढतात. यात शासनानं सुधारणा करण्याची गरज आहे. दुपारच्या जेवणाची घंटा झाल्यावर मीड डे मीलच्या ओढीने मुलं बाहेर पडत असतात. त्याअनुषंगाने दर्जा सुधारणं गरजेचं आहे,” असं शाळेचे उपशिक्षक जे. के. पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.
फोटो स्रोत, ShahidShaikh/BBC
याच शाळेत मुलं शिकणारे पालकही तक्रार करत आहे.
“अंगणवाडीचा आणि प्राथमिक शाळेचा वाटाणा पण शिजत नाही लवकर. भात वगैरे चवीला चांगला होतो पण वाटाण्याचा प्रॉब्लेम येतो, अशी मुलांची तक्रार असते. वाटाणा पूर्ण कच्चा राहतो. आहार चांगला यायला पाहीजे,” असं पालक प्रियंका जाधव सांगतात,
तर आणखी एक पालक कोमल मोरे म्हणतात की, “माझी छोटी मुलगी अंगणवाडीत आहे आणि मुलगा शाळेत आहे. पोषण आहारात येणारा वाटाणा शिजत नाही तो चांगला यायला पाहीजे. त्याचा त्रास मुलांना व्हायला नको.”
शासनाची प्रतिक्रिया काय?
अंगणवाडीत येणाऱ्या पोषण आहारासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सेंट्रल एजन्सीमार्फत राज्यभरात धान्याचा पुरवठा केला जातो. तर काही ठिकाणी बचत गटांच्यामार्फत हे काम चालतं, अशी माहिती एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेसाई यांनी दिली.
वाटाण्याबाबत राज्यातल्या काही भागातून तक्रारी समोर आल्याचंही त्यांनी मान्य केलं.
“पांढरा वाटाणा शिजत नाही अशी तक्रार आली होती. तो रिप्लेस करून आम्ही घेत आहोत. भिजवण्याची प्रक्रिया आणि पाण्याची यात भूमिका आहे. नंदूरबारमध्ये आम्ही गेलो तर काही ठिकाणी खरच शिजला नव्हता.
काही ठिकाणी मध्यम स्वरुपात शिजला होता. हार्ड वॉटर किंवा फ्रेश पाणी याचाही काही परिणाम असेल. पांढऱ्या वाटाण्याऐवजी हिरवा वाटाणा देण्यासाठी सूचना केल्या आहेत,” असं त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
फोटो स्रोत, ShahidShaikh/BBC
तर जिल्हा परिषद शाळेत दिला जाणारा पोषण आहार शालेय शिक्षण विभागाकडून दिला जातो.
प्राथमिक शालेय शिक्षण विभागाचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, “हिरव्या वाटाण्याऐवजी पांढरा वाटाणा दिला जात असल्याबाबत काही जिल्ह्यांतून तक्रारी आल्यानंतर शासन स्तरावर समिती नेमलेली आहे. या समितीची चौकशी सुरू आहे.”
हा नेमका काय प्रकार आहे? वाटाण्याचा दर्जा निकृष्ट असल्यास त्याची पडताळणी केली जात आहे का? यासंदर्भात पुरवठादारांवर कारवाई होणार का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात.
बालकांच्या शारीरिक विकासासाठी त्यांना प्रथिनांची कमतरता भासू नये आणि आरोग्याच्या दृष्टीने विकास व्हावा हा या योजनेचा हेतू आहे. पण ते साध्य होतंय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC




