Source :- BBC INDIA NEWS

ममता बॅनर्जी आणि ऋतब्रत बॅनर्जी

फोटो स्रोत, ANI

Published

वाचन वेळ: 5 मिनिटे

तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले ऋतब्रत बॅनर्जी पश्चिम बंगालच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते झाले आहेत.

बंडखोर आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांना विधानसभेचे अध्यक्ष रथींद्र बसू यांनी बंडखोर आमदारांनी दिलेल्या पाठिंब्याच्या पत्राला मान्यता दिली आहे. तसंच, विरोधी पक्षनेत्यांसाठीच्या राखीव कक्षाची किल्लीही ऋतब्रत बॅनर्जी यांच्याकडे दिली.

ऋतब्रत बॅनर्जी यांना दोनच दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसमधून काढून टाकण्यात आलं होतं.

ऋतब्रत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं, “तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर जिंकलेले दोन-तृतीयांश आमदार एकजूट आहेत. आम्हाला 60 आमदारांचा पाठिंबा आहे. दोन आमदार सध्या राज्याबाहेर आहेत. आम्ही सभागृहात भाजपा विरुद्ध ठामपणे लढू.”

कल्याण बॅनर्जींचं विधानसभा अध्यक्षांना पत्र

तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील खासदार कल्याण बॅनर्जी यांनी मात्र विधानसभा अध्यक्षांना एक पत्र लिहून दुसऱ्याच नेत्यांना विरोधीपक्षनेते, उपनेते, प्रतोद म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे.

त्यांनी लिहिलेल्या पत्रात पक्षाने विरोधी पक्षनेते म्हणून सोभांदेब चट्टोपाध्याय, उपनेते म्हणून अशिमा पात्रा आणि नयना बंदोपाध्याय, तसेच मुख्य प्रतोद म्हणून फिरहाद हकीम यांच्या नियुक्तीची शिफारस केली आहे. विधानसभेच्या दीर्घकाळ चालत आलेल्या परंपरा आणि प्रक्रियेच्या आधारावर या नियुक्तींना मान्यता द्यावी असं म्हटलंय.

तसेच, कल्याण बॅनर्जींनी पूर्वी 2001, 2006, 2011, 2016 आणि 2021 मध्येही अशाच पद्धतीने विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती मान्य करण्यात आल्याच पत्रात नमूद केलं आहे आणि याआधारे लवकरात लवकर या नियुक्तींना मंजुरी देण्याची मागणी केलीय.

58 बंडखोर आमदारांचा ऋतब्रत बॅनर्जींना पाठिंबा

ऋतब्रत यांनी तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांना संसदीय गटाचे सल्लागार होण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी असंही म्हटलं की, अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत त्यांचा कोणताही संबंध नाही.

यापूर्वी दुपारी 58 बंडखोर आमदारांनी विधानसभेत बैठक घेऊन अध्यक्षांना एक पत्र दिलं. या पत्रात ऋतब्रत यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड झाल्याची माहिती देण्यात आली होती.

ऋतब्रत यांनी सांगितलं, “अखरूज्जम्मां यांची विधानसभेत मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय जावेद अहमद खान, सबीना यास्मीन, शिउली साहा आणि संदीपन साहा यांची उपनेते म्हणून निवड करण्यात आली आहे.”

त्यांनी सांगितलं की, त्यांचा गट सभागृहात जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावेल.

ममता बॅनर्जींच्या TMC मध्ये फूट? पक्षातून हकालपट्टी केलेले ऋतब्रत बनर्जी बनले विरोधी पक्षनते

फोटो स्रोत, ANI

दरम्यान, यापूर्वी तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांनी दुपारी पक्षाच्या सर्व समित्या आणि संघटना बरखास्त केल्या होत्या. त्या सध्या आपल्या निवासस्थानी अभिषेक बॅनर्जी, कुणाल घोष आणि माजी मंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांच्यासोबत पुढील रणनीतीबाबत बैठक घेत आहेत.

ऋतब्रत बॅनर्जी काय म्हणाले?

माध्यमांशी बोलताना ऋतब्रत बॅनर्जी म्हणाले, “पश्चिम बंगालच्या 18 व्या विधानसभेत तृणमूल काँग्रेसच्या दोन-तृतीयांश बहुमत असलेल्या या आमदार गटाचा विश्वास ‘मी’मध्ये नाही, तर ‘आम्ही’मध्ये आहे. जे नियम आणि निकष निश्चित करण्यात आले आहेत, त्यांचे आम्ही पूर्णपणे पालन केले आहे. त्यामुळेच आम्हाला 18 व्या पश्चिम बंगाल विधानसभेत मुख्य विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे.”

ते पुढे म्हणाले, “आमची इच्छा आहे की ममता बॅनर्जी आमच्या प्रमुख सल्लागार असाव्यात आणि त्यांनी आम्हाला असे मार्गदर्शन करावे की विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका आणखी मजबूत होईल. तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर 80 सदस्य निवडून आले होते. त्यापैकी दोन-तृतीयांशपेक्षा अधिक सदस्यांनी आमच्या दाव्याला पाठिंबा दिला आहे आणि आमचा दावा स्वीकारण्यात आला आहे.”

तर तृणमूल काँग्रेसमधून काढून टाकण्यात आलेले त्या पक्षाचे माजी प्रवक्ते रिजू दत्ता यांनी ट्वीटरवर बंडखोरांच्या ममता बॅनर्जी नेत्या म्हणून चालतील या विधानाचा विशेष उल्लेख केला आहे. ममता बॅनर्जी चालतील पण अभिषेक बॅनर्जी नकोत हे यातून ध्वनित होत असल्याचं ते दाखवून देतात.

रिजू दत्ता लिहितात, “नवीन तृणमूल आकार घेत आहे. ऋतब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अखरूज्जमान यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण 64 निवडून आलेल्या तृणमूल आमदारांनी जाहीर केलं की, ‘ते ममता बॅनर्जी यांना आपले नेते म्हणून मान्य करतात, पण अभिषेक बॅनर्जी यांना स्वीकारत नाहीत’.”

X पोस्टवरून पुढे जा, 1

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

मजकूर उपलब्ध नाही

Xवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

काय म्हणतात कल्याण बॅनर्जी?

कल्याण बॅनर्जी एक ट्वीट करून कार्यकर्ते ममता बॅनर्जी यांच्याबरोबर आहेत, असा दावा केला आहे.

ते लिहितात, “तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते नेहमीच ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत, आजही उभे आहेत आणि पुढेही उभे राहतील. तेच पक्षाची खरी ताकद आणि जिवंत आत्मा आहेत.

“आज ज्यांनी ‘दीदी’चा विश्वासघात केला आहे, त्यांचे मूल्यांकन शेवटी जनतेकडूनच होईल. त्यांच्या कृतींमुळे ते भाजपपेक्षा वेगळे नाहीत अशी धारणा अधिक बळकट झाली आहे.

“ममता बॅनर्जी यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्ते आणि समर्थकांची अढळ निष्ठा. याच लोकांच्या बळावर संघटना अधिक मजबूत होईल आणि तिच्या विचारांना दृढ विश्वासाने आणि बांधिलकीने पुढे नेलं जाईल.”

X पोस्टवरून पुढे जा, 2

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

मजकूर उपलब्ध नाही

Xवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

फिरहाद हकीम यांनी दिला कोलकात्याच्या महापौरपदाचा राजीनामा

दरम्यान, माजी शहरी विकास मंत्री आणि कोलकाता महानगरपालिकेचे महापौर फिरहाद हकीम यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला आहे. तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने याची पुष्टी केली आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर त्या नेत्याने सांगितलं की, “दिवसभरातील राजकीय घडामोडी आणि पक्षात संभाव्य फुट लक्षात घेऊन ममतांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हकीम यांनी महापौरपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती.”

ममता बॅनर्जी यांच्या संमतीनंतर त्यांनी आपला राजीनामा सादर केला आहे. महानगरपालिकेची मुदत यावर्षी डिसेंबरपर्यंत आहे आणि तिच्या प्रशासन मंडळावर तृणमूल काँग्रेसचाच ताबा आहे.

दरम्यान, पक्षाचे आणखी एक नेते कुणाल घोष यांनी सांगितलं, “कोलकात्याचे महापौर फिरहाद हकीम यांनी पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांच्याकडे राजीनामा देण्याची परवानगी मागितली होती. राज्य सरकार महानगरपालिकेला निष्क्रिय करत असल्यामुळे ते सन्मानाने पद सोडू इच्छित होते. आतापर्यंत ममता बॅनर्जी यांनी त्यांना परवानगी दिली नव्हती.

मात्र आज नबान्न येथे झालेल्या प्रशासकीय बैठकीनंतर महानगरपालिका निष्क्रिय झाल्याचं स्पष्ट झालं. ही परिस्थिती लक्षात घेऊन आणि वरिष्ठ नेते फिरहाद हकीम यांचा सन्मान कायम ठेवण्यासाठी, ममता बॅनर्जी यांनी आज त्यांना राजीनामा देण्याची परवानगी दिली, कारण राज्य सरकारने महानगरपालिकेला प्रत्यक्षात निष्क्रियच केलं आहे.”

ममता बॅनर्जींसाठी आव्हानात्मक काळ

सलग 15 वर्षे पश्चिम बंगालची सत्ता हाती ठेवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे.

त्यानंतरपासून ममता बॅनर्जी आपल्या राजकीय कारकिर्दीतील या मोठ्या आव्हानाचा सामना करत आहेत.

पराभवानंतर पक्षात वाढत चाललेली बंडाळी आणि राजीनाम्यांची मालिका पाहता राजकीय वर्तुळात, तृणमूल काँग्रेस पुढील काळात फुटणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तसंच, सत्ता हेच तृणमूल काँग्रेसला एकजूट ठेवण्याचं एकमेव माध्यम होतं का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

ममता बॅनर्जींच्या TMC मध्ये फूट? पक्षातून हकालपट्टी केलेले ऋतब्रत बनर्जी बनले विरोधी पक्षनते

फोटो स्रोत, ANI

सत्ता हातातून गेल्यानंतर तृणमूल काँग्रेस सरकारच्या कार्यकाळावर आणि पक्षाच्या नेतृत्वावर सार्वजनिकरित्या प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

गेल्या आठवड्यात पक्षात ममता यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेले लोकसभा खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्यासाठी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी भाजपला जबाबदार ठरवलं असलं, तरी या संपूर्ण घडामोडींमुळे पक्षाची बंगालमधली प्रत्यक्ष पकड सैल होत आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC