Home LATEST NEWS ताजी बातमी ‘मला सेक्स आवडतं की नाही याची कोणाला पर्वा नाही’, उत्तर कोरियातील निर्वासित...

‘मला सेक्स आवडतं की नाही याची कोणाला पर्वा नाही’, उत्तर कोरियातील निर्वासित महिला सेक्स आणि प्रेमाबद्दल काय म्हणतात?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, AFP via Getty Images

“उत्तर कोरियात माझ्या पतीची इच्छा असेल तेव्हाच मला सेक्स करावा लागायचा. माझ्या इच्छेचा विचारच केला जात नव्हता.”

“आमच्यासाठी सेक्स किंवा लैंगिक संबंध म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग नाही. तो आमच्यावर लादलेला एक नियम आहे. लग्नानंतर मुलं होण्यासाठी महिलांना ते दैनंदिन जीवनाचा एक भाग मानून स्वीकारावं लागतं.”

हा अनुभव ‘अ’ नावाच्या एका 60 वर्षांच्या महिलेचा आहे. जीवाला धोका असल्यामुळे त्या उत्तर कोरियातून पळून दक्षिण कोरियात आल्या होत्या.

बीबीसीने आणखी काही निर्वासितांशीही याबाबत चर्चा केली. त्यांच्या सुरक्षिततेसाठी या बातमीत त्यांची खरी ओळख जाहीर केलेली नाही. बीबीसीने 20 वर्षांच्या ‘ब’ आणि 40 वर्षांच्या ‘क’ या दोन महिलांशीही संवाद साधला.

“आम्हाला ते हवं आहे की नाही, हे कोणीच विचारत नाही. आमची इच्छा काय आहे, हे ते का विचारत नाहीत?”, असा सवाल त्या करतात.

उत्तर कोरियातील महिला

फोटो स्रोत, Getty Images

उत्तर कोरियातील महिलांनी अनेक वर्षांपासून सरकार आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यातच आपलं आयुष्य घालवलं आहे.

त्यांची भूमिका आज्ञाधारक मुलगी, कुटुंबाला साथ देणारी समर्पित पत्नी आणि कुटुंबासाठी त्याग करणारी आई, एवढ्यापुरतीच मर्यादित राहिली आहे.

त्या महिला म्हणाल्या, “तिथे प्रेम, विवाह आणि मुलं होणं हा वैयक्तिक निर्णय नसतो. देशाला आपल्याकडून ज्या जबाबदाऱ्या अपेक्षित असतात, त्या आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. ‘मला काय हवं आहे?’ असा प्रश्न विचारण्याचीही तिथे मुभा नसते.”

हा लेख लिहिण्यापूर्वी मला उत्तर कोरियातील महिलांना सेक्सबद्दल काय वाटतं आणि त्यांचं याबाबतचं मत काय आहे, हे समजून घ्यायचं होतं. पण, या विषयावर माहिती घेताना लक्षात आलं की, हा फक्त सेक्सचा विषय नाही. त्यापलीकडेही आणखी अनेक गोष्टी आहेत.

‘स्पर्श केल्याने गर्भवती राहीन, असं वाटायचं’

या सर्व कहाण्या कदाचित वेगवेगळ्या वाटतील, परंतु त्यात एक गोष्ट समान आहे- स्वतःच्या इच्छेनुसार आयुष्य जगण्याचा अधिकार.

या लेखात लैंगिकतेच्या दृष्टिकोनातून उत्तर कोरियातील महिलांच्या शरीरावर आणि त्यांच्या इच्छांवर किती बंधने आहेत आणि त्यांना स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचं किती स्वातंत्र्य आहे, याचा आढावा घेतला आहे.

परंतु, शेवटी प्रश्न एकच उरतो- “हे शरीर नेमकं कोणाचं आहे?”

सिओल विद्यापीठाच्या प्राध्यापिका जिओन जु-राम उत्तर कोरियातून आलेल्या लोकांचा अभ्यास करतात. उत्तर कोरियातील काही महिलांशी बोलताना ‘इच्छा’ हा शब्द त्यांना सर्वात आश्चर्यकारक वाटला.

उत्तर कोरियात लोकांना आपल्या आवडीची शाळा, नोकरी किंवा कामाचं ठिकाण निवडण्याचं स्वातंत्र्य नाही. त्यांना केवळ अधिकाऱ्यांचे निर्णय आणि आदेश यानुसारच काम करावं लागतं.

प्रा. जिओन जु-राम सांगतात, “लहानपणापासूनच कोणीतरी म्हणतं, ‘तू उंच आहेस, देखणा आहेस, सरळ उभा राहा.’ त्यानंतर त्याला पकडून थेट डिव्हिजन 5 मध्ये नेलं जातं. कोणाला कोणती नोकरी मिळेल, हेही त्याच्या हातात नसतं.”

“ते कॉलेजमध्ये जातील किंवा नाही, हेही त्याच्या सामाजिक पार्श्वभूमीवर ठरतं. आयुष्यभर ते अशाच पद्धतीने जगल्यामुळे त्यांना यात काही वेगळं किंवा चुकीचंही वाटत नाही.”

उत्तर कोरिया नागरिक (प्रातिनिधिक फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

उत्तर कोरियात लैंगिक विषयांबाबत किती कमी माहिती आहे, हे त्या देशातून पळून आलेल्या महिलांच्या अनुभवातूनही दिसून येतं.

त्या महिलांनी सांगितलं की, उत्तर कोरियात त्यांना कधीही लैंगिक शिक्षण मिळालेलं नव्हतं.

त्यांचं म्हणणं होतं की, अशा विषयांवर बोलणं टाळलं जायचं. हे लाजिरवाणं आहे, असं सांगून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जायचं.

वयाची साठी गाठलेल्या ‘अ’ सांगतात, “मला खरंच काहीच माहिती नव्हतं. स्त्रीच्या शरीरात एग्ज केव्हा तयार होतात. हात पकडल्यानेही गर्भ राहतो, असंच मला वाटायचं. वयाच्या विशीपर्यंत माझा हाच समज कायम होता. कारण मला लैंगिक विषयांबद्दल योग्य माहिती किंवा शिक्षण कधीच मिळालं नव्हतं.”

उत्तर कोरियातून पळून दक्षिण कोरियात आल्यानंतर हनावन निर्वासित छावणीत त्यांना पहिल्यांदाच लैंगिक विषयांबद्दल माहिती मिळाली.

20 वर्षीय ‘बी’ या निर्वासित महिलेलाही हनावनमध्ये पहिल्यांदा लैंगिक शिक्षण मिळालं. ती म्हणाली, “अशा गोष्टींबद्दल इतक्या लोकांसमोर बोलताना मला थोडा संकोचल्यासारखं झालं होतं.”

ती म्हणाली, “मी झोपल्याचं नाटक करायचे. मला वाटायचं, अशा गोष्टी लक्ष देऊन ऐकल्या तर लोक माझ्याबद्दल चुकीचा समज करून घेतील.”

‘पती मद्यधुंद होऊन यायचे’

सिओल नॅशनल युनिव्हर्सिटीच्या समाजशास्त्राच्या प्राध्यापक पार्क क्यॉन्ग-सूक यांनी ‘गव्हर्नमेंट, पॅट्रियार्की अँड वुमन इन नॉर्थ कोरियन सोसायटी’ या आपल्या संशोधनपत्रात उत्तर कोरियातील लैंगिकतेबाबतच्या (लिंगभाव) सरकारी दृष्टिकोनाचा अभ्यास केला आहे. हा या विषयावरील प्राथमिक अभ्यासांपैकी एक आहे.

त्या म्हणतात, “उत्तर कोरियाच्या अधिकृत भूमिकेनुसार लैंगिक विषय ही लपवून ठेवण्याची आणि लाजिरवाणी गोष्ट मानली जाते. लग्न आणि मुलं होणं यांसारख्या देशाच्या गरजांसाठीच त्याला परवानगी दिली जाते.”

उत्तर कोरियातून पळून आलेल्या महिलांचे अनुभवही याच गोष्टीकडे लक्ष वेधून घेतात.

‘बी’ म्हणाल्या, “माझे पती घरी मद्यधुंद अवस्थेत आले तरी मला सेक्स करावा लागायचा. मला मासिक पाळी सुरू असली तरी त्यांना त्याचा काहीच फरक पडत नव्हता.”

“माझ्या पतीची इच्छा असेल तर मला सेक्स करावाच लागायचा. त्याआधी प्रेमाने जवळ येणं किंवा स्पर्श करणं असं काहीच नव्हतं. त्यामुळे माझ्यासाठी त्याला विशेष काही अर्थही नव्हता.”

एक उत्तर कोरियन महिला आणि एक तरुण (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

त्या म्हणाल्या, “एखादी महिला स्वतःहून मला सेक्स करायचा आहे की नाही, असं विचारेल, याची मी कधी कल्पनाही केली नव्हती.”

त्या सांगतात, “सेक्स 5 मिनिटंही चालत नाही. कधी-कधी आम्ही एकमेकांचं चुंबन घेतो. पुरुष जे करायचं ते करतो आणि नंतर निघून जातो.”

“सर्व इतक्या पटकन संपतं की इच्छा ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. महिलेला खरंच काय हवं आहे, याचा पुरुष विचारच करताना दिसत नाहीत.”

“सेक्सच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दलही काहीच माहिती नव्हती. पुरुष वर आणि महिला खाली, इतकंच त्यांना माहीत असतं. आता विचार करते तेव्हा मला ऑर्गॅझम म्हणजे नेमकं काय, हेही माहीत नव्हतं.”

‘अ’ म्हणाल्या, “काहीच न जाणता माझं तरुणपण गेलं, हे माझं दुर्दैव आहे.”

‘हिंसा असेल तरच प्रेम’

दुसऱ्या एका महिलेने सांगितलं, “मला मारहाण झाली तरी मी काहीच बोलू शकत नव्हते. मला वाटायचं की मी एक गृहिणी आणि मुलांची आई आहे. त्यामुळे पतीची व्यवस्थित काळजी घेणं हीच माझी जबाबदारी आहे.”

त्या म्हणाल्या, “पतीचे विवाहबाह्य संबंधही महिलांना सहन करावे लागत होते, कारण उत्तर कोरियात घटस्फोटाची प्रक्रिया अत्यंत कठीण आहे.”

“कारण पुरुषप्रधान संस्कृती तिथे नैसर्गिक मानली जाते.”

शिनहान विद्यापीठाच्या पोस्ट-डिव्हिजन बॉर्डर कल्चर इन्स्टिट्यूटचे डॉ. क्वॉन ग्युम-सांग यांनी सांगितलं की, पूर्वी उत्तर कोरियामध्ये गर्भनिरोधक साधनांच्या वापरावर अधिक कठोर नियम होते.

हिंसा सहन करणं, घटस्फोटाचा विचार सोडून देणं आणि स्वतःचं शरीर पतीच्या स्वाधीन करणं- या सर्वांमागे एक जुना आणि अत्यंत मोठा प्रश्न दडलेला आहे.

प्रश्न असा आहे, “सरकार महिलांच्या शरीरावर इतकं नियंत्रण का ठेवतं?”

डॉ. क्वॉन ग्युम-सांग म्हणाले, “कारण पुरुषप्रधान व्यवस्था तिथे नैसर्गिक मानली जाते.”

‘एका कंडोमच्या पैशात चार जणांचं पोट भरू शकतं’

बीबीसीने ज्या महिलांशी संवाद साधला, त्यांच्या म्हणण्यानुसार उत्तर कोरियात गर्भनिरोधक वापरण्याची जबाबदारी संपूर्णपणे महिलांवरच असते.

सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या पद्धतीत ‘हुक’ नावाचं इंट्रायूटेरिन डिव्हाइस (आययूडी) गर्भाशयात बसवलं जातं.

महिला तांब्याच्या रिंग वापरत असत. ज्यांच्याकडे थोडे जास्त पैसे असायचे, त्या चांदीच्या रिंग वापरायच्या. त्या बाजारातून चीनमधून आलेल्या रिंग खरेदी करून त्या बसवण्यासाठी रुग्णालयात जायच्या.

महिलांनी सांगितलं की, या धातूच्या रिंगशिवाय इतर गर्भनिरोधक पद्धतींमुळे त्यांना त्रास किंवा दुष्परिणाम होत होते.

अनेक महिलांना अति रक्तस्राव आणि अनेक महिने कंबरदुखीचा त्रास होत होता.

संशोधक चोई सॉल यांच्या मते, काळानुसार गर्भनिरोधक वापरण्याबाबत पुरुषांचा दृष्टिकोन बदलला आहे. 2010 नंतर कंडोमचा वापरही मोठ्याप्रमाणात वाढला आहे.

‘बी’ नावाच्या एका महिलेने सांगितलं, “पुरुष खरंच गर्भनिरोधक वापरतात की नाही, मला माहीत नाही. पण हे नेहमी महिलांनाच करावं लागतं.”

त्या म्हणाल्या, “मी बाजारात लपून कंडोम विकायचे. परंतु ते खूप महाग होते. एका कंडोमच्या पैशात चार जणांचं पोट भरू शकतं. मग पुरुष ते का वापरतील?”

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

2000 सालापर्यंत त्यांना कंडोम असतात, हेही माहिती नव्हतं. ते कोण आणतं आणि कसं आणतं, याचीही त्यांना माहिती नव्हती. पण बाजारातून त्याबद्दलची माहिती अधूनमधून गुपचूप मिळत राहायची.

त्या म्हणाल्या, “वारंवार गर्भ राहिला तर मुलांचा सांभाळ कसा करायचा? म्हणूनच महिलांना आययूडी बसवून घ्यावं लागतं. पुरुष एखाद्या महिलेला गर्भवती करून सहज निघून जाऊ शकतो, पण मग त्या महिलेचं काय?”

त्या महिलेने सांगितलं, “तिथे आजही महिला गर्भपात करतात. त्या अनेकदा स्वतःच घरी गर्भपात करतात.”

मी ज्या-ज्या महिलांशी बोलले, त्यापैकी अनेक महिलांना त्यांच्या आईने गर्भनिरोधकांचा वापर कसा करायचा, हे शिकवलं होतं.

जर त्याचाही काही उपयोग झाला नाही तर काही माता स्वतःच आपल्या मुलीच्या गर्भाशयात ही रिंग बसवायच्या. ही प्रक्रिया अत्यंत वेदनादायक होती.

सरकारने लैंगिक विषयांबद्दल योग्य माहिती आणि शिक्षण देणं अपेक्षित होतं. परंतु, ते झालं नाही. त्यामुळे ही माहिती देण्याचं काम मातांनी केलं.

हे ‘गुप्त ज्ञान’ पिढ्यान्-पिढ्या मुलांच्या भल्यासाठी पुढे दिलं जात आहे. पण काही कुटुंबांमध्ये आजही अशा गोष्टींबद्दल बोलणं लाजिरवाणं आणि चुकीचं मानलं जातं.

एका महिलेनं सांगितलं, “आई-वडिलांशी अशा गोष्टींबद्दल बोलताना लाज वाटते. अशा गोष्टी मित्र-मैत्रिणींशीच बोलायच्या असतात.”

‘माझं स्वातंत्र्य, माझ्या शरीरावर माझा हक्क…’

एका महिला निर्वासिताने सांगितलं, “उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात आल्यानंतर इथली डेटिंगची पद्धत आणि स्वतःची काळजी घेण्याच्या पद्धती आम्हाला सर्वाधिक आश्चर्यकारक वाटतात.”

एका महिलेने सांगितलं की, दक्षिण कोरियात आल्यानंतर डेटिंगबाबत तिच्या आयुष्यात अनपेक्षित बदल झाले.

“एकदा तुम्ही दक्षिण कोरियातील पुरुषासोबत डेटिंग केलं की, पुन्हा उत्तर कोरियातील पुरुषासोबत डेटिंग करण्याची तुमची इच्छा होणार नाही.”

“उत्तर कोरियातील पुरुषांसोबत जेव्हा मी होते, त्यावेळी मला वाटायचं की मी केवळ त्यांची सेवा करतेय. मी त्यांच्यासाठी सर्व करायचे, पण त्या बदल्यात- कौतुक तर दूरच, माझ्या प्रयत्नांची साधी दखलही घेतली जात नव्हती.”

“दक्षिण कोरियातील पुरुषांना भेटल्यानंतर मला दोघांमध्ये किती मोठा फरक आहे, हे जाणवलं. इथल्या पुरुषांचा आवाजही खूप सौम्य असतो.”

“मी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये असते, तेव्हा ते मला कसं वाटतंय, मला हे आवडतं की नाही, हे विचारतात. त्यावेळी मला पहिल्यांदा जाणवलं की खरं प्रेम म्हणजे काय.”

महिलेने सांगितलं, “उत्तर कोरियातील पुरुषांना वाटतं की, सर्व महिलांनी असंच वागलं पाहिजे. यामुळे मला अस्वस्थ वाटतं. मला अशा ठिकाणी राहायचं आहे, जिथे मला प्रेम मिळेल.”

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, AFP via Getty Images

एका 20 वर्षीय महिलेने दक्षिण कोरियातील पुरुषांसोबतचे लैंगिक अनुभव सांगितले. ती म्हणाली की, ते तिची मानसिक आणि शारीरिक अवस्था समजून घेत होते. सेक्सनंतर ते तिला विचारायचे, “तू ठीक आहेस ना?”

एका 40 वर्षीय महिलेनं म्हटलं की, दक्षिण कोरियात आल्यानंतर मी उत्तर कोरियातील एका पुरुषाशी लग्न केलं. त्याचे विचार अजूनही जुनेच होते. त्यामुळे माझं आयुष्य आणखी कठीण झालं.

प्रा. जिओन जु-राम म्हणाल्या, “लैंगिक अनुभवाचे 4 टप्पे असतात- उत्तेजना, सेक्सपूर्वीची जवळीक, परमोच्च आनंद आणि वीर्यस्खलन. दक्षिण कोरियातील पुरुषांसोबत नात्यात असलेल्या उत्तर कोरियातील बहुतांश महिला आपल्या नात्याबद्दल समाधानी असल्याचं दिसून येतं.”

परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे, महिलांमध्ये झालेल्या या बदलांमुळे उत्तर कोरियातून एकत्र आलेल्या काही जोडप्यांचा घटस्फोट होताना दिसत आहे.

संशोधक चोई सॉल म्हणाले, “उत्तर कोरियातून एकत्र पळून आलेल्या अनेक जोडप्यांचा शेवटी घटस्फोट होतो. दक्षिण कोरियात आल्यानंतर महिलांना जाणवतं की काहीतरी चुकीचं आहे. उत्तर कोरियातील पुरुषांनी स्वतःमध्ये लवकर बदल करायला हवा. पण ते इतकं सोपं आहे का? ते बदलत नाहीत.”

सॉल म्हणाले, “हा केवळ संस्कृतीच्या पसंतीचा प्रश्न नाही. वेगवेगळ्या समाजांमध्ये पुरुष आणि महिलांनी कसं वागावं, याबद्दलच्या अपेक्षाही वेगवेगळ्या असतात. उत्तर कोरियामध्ये पुरुषप्रधान व्यवस्था सत्तेचं एक साधन म्हणून वापरली जाते. तर दक्षिण कोरियात महिलांना अधिक सक्षम करण्याच्या प्रयत्नांमुळे लैंगिक समानतेकडे वाटचाल झाली आहे.”

‘दक्षिण कोरियाच्या गुप्तचर अधिकाऱ्यांबद्दल आकर्षण… ‘

दरम्यान, दक्षिण कोरियात पोहोचल्यानंतर नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिसचे (एनआयएस) अधिकारी महिलांची चौकशी करत होते. त्यावेळी उत्तर कोरियातील महिलांनी त्यांना भेटलेल्या पुरुषांबद्दलही आपल्या भावना सांगितल्या. हा भागही अतिशय रंजक होता.

एका महिलेनं सांगितलं, “एनआयएसचे अधिकारी इतके आकर्षक दिसायचे की त्यांना पाहिल्यावरच मनात काहीतरी भावना निर्माण व्हायच्या. खरं सांगायचं तर, मीही दक्षिण कोरियात पहिल्यांदा आले तेव्हा अशीच होते. ते सूट घालायचे, खूप देखणे आणि प्रेमळ स्वभावाचे वाटायचे. त्यांना पाहिलं की मला खूप आनंद व्हायचा, उत्साह वाढायचा.”

या छोट्याशा घटनेतून दक्षिण कोरियात स्थायिक झालेल्या उत्तर कोरियातील महिलांसाठी आदर आणि आपुलकी, सहानुभूती किती नवीन आणि महत्त्वाची आहे, हे समजतं.

एका 60 वर्षीय महिलेनं सांगितलं, “दक्षिण कोरियातील एका पुरुषासोबत माझं जवळचं नातं होतं. आता आम्ही वेगळे झालो आहोत. पण तो खूप दयाळू होता. तो माझ्याशी प्रेमाने वागला. मला पुन्हा दक्षिण कोरियातील एखाद्या पुरुषासोबत नातं जोडायचं आहे. एक दिवस लग्नही करायचं आहे.”

मुलाखतीच्या शेवटी मी त्या महिलांना सेक्सबद्दल त्यांचं मत विचारलं.

उत्तर कोरियातील नवविवाहित जोडपे

फोटो स्रोत, Getty Images

‘ब’ नावाच्या महिलेने सांगितलं, “लैंगिकतेबद्दल जाणून घेतल्यानंतर, मला अनेक लोकांशी जोडले जाण्याची इच्छा झाली.”

“सुरुवातीला मला काय हवं आहे, हेच माहीत नव्हतं. पण आता मला अशी व्यक्ती हवी आहे, जी माझ्यावर प्रेम करेल आणि वेळोवेळी नव्या पद्धतीने माझी काळजी घेईल.”

‘अ’ नावाच्या महिलेनं सांगितलं, “मला खूप छान आणि आनंदी वाटतं. सेक्सनंतर मला खूप आनंद आणि समाधान मिळतं. दक्षिण कोरियात आल्यानंतर मला हे समजलं. एक महिला म्हणून आनंदी राहणं म्हणजे काय असतं, हे मी इथे शिकले.”

उत्तर कोरियातील महिलांना “तुम्हाला काय हवं आहे?” असं विचारलं तेव्हा त्यांना पहिल्यांदा जाणवू लागलं की, त्यांचं शरीर खरंच त्यांचं स्वतःचं आहे. ही जाणीव त्यांना उशिरा झाली असली, तरी ती खूपच महत्त्वाची होती.

सरकार, समाज आणि पतीच्या नियंत्रणामुळे त्यांनी आपल्या शरीरावरील हक्क गमावला होता. दक्षिण कोरियात मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेता आल्यामुळे त्यांनी हा हक्क पुन्हा मिळवला. हा बदल त्यांच्यासाठी एखाद्या क्रांतीपेक्षा कमी नाही.

‘अ’ म्हणाल्या, “मला पुन्हा एकदा जन्म घेण्याची संधी मिळाली, तर मला दक्षिण कोरियात जन्म घ्यायला आवडेल. मला नेहमीच मोकळेपणाने आणि निर्भयपणे डेटिंग करायचं होतं. माझ्या शरीराबद्दलचे निर्णय मला स्वतः घ्यायचे आहेत. आता मला खरं स्वातंत्र्य म्हणजे काय, याचा अर्थ समजला आहे.”

त्यांची कहाणी अजूनही अपूर्ण आहे. अनेक वर्षांपासून शरीरावरचा हक्क, स्वतःच्या इच्छा आणि प्रेम यापासून त्या खूप दूर होत्या. हे सर्व पुन्हा मिळवण्याचा त्यांचा प्रवास अजून सुरू आहे. आता त्या मोकळेपणाने आपले अनुभव सांगत आहेत.

दुसऱ्या एका महिलेनं सांगितलं, “आता माझं शरीर पूर्णपणे माझंच आहे. मी खूप आनंद आहे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC