Source :- BBC INDIA NEWS

मान्सूननं महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये केली आगेकूच

फोटो स्रोत, Getty Images

Published

वाचन वेळ: 3 मिनिटे

मान्सूननं महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगानामध्ये आगेकूच केली आहे.

मान्सूनची उत्तरी सीमा आता हर्णे, सोलापूर, कलबुर्गी, नांदयाल, चेन्नई, लॅमडिंग, नॉर्थ लखीमपूरमधून जातेय.

8 जून रोजी, भारतीय हवामान विभागाच्या मॉडेलनुसार, मान्सून 14-15 जूनच्या आसपास मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे.

त्यापूर्वी, मुंबई शहरात आणि उत्तर कोकणाच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे.

आज, 8 जून रोजी, नैऋत्य मान्सून अरबी समुद्राच्या आणखी काही भागांवर, दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटकाचा अधिक भाग, तेलंगाना आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांवर पुढे सरकला आहे.

राज्यात किमान 15 जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.

मात्र, त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे.

मान्सूननं महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये आगेकूच केली आहे.

फोटो स्रोत, IMD

सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.

दरम्यान, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन

कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे.

  • आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये.
  • विजांच्या कडकडाटावेळी झाड, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे.
कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

6 जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल

राज्यात अखेर पावसाची प्रतीक्षा अखेर संपली असून मान्सून अखेर 6 जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सूनने दक्षिण कोकणाचा काही भाग, तसेच गोव्यात सक्रियपणे प्रवेश केला आहे.

राज्यात अखेर पावसाची प्रतीक्षा अखेर संपली असून मान्सून अखेर 6 जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

मान्सून राज्याच्या अंतर्गत भागात सरकण्यास अनुकूल परिस्थिती असल्याने 7 जूनला कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC