Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
आपल्यापैकी अनेकांनी लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल की बटाटा खाल्ल्यामुळे पोट फुगतं, अस्वस्थ वाटतं किंवा गॅसची समस्या वाढते.
बटाटा हा जगातील सर्वाधिक खाल्ला जाणारा खाद्यपदार्थ आहे. मॅश केलेला म्हणजे भरीतासारखा कुस्करलेला बटाटा, बटाट्याच्या फ्राईज किंवा चिप्स जास्त प्रमाणात खाल्ल्यानंतर काहीजणांना पोट अस्वाभाविकपणे फुगल्यासारखं वाटतं.
खूप जास्त प्रमाणात बटाटे खाल्ल्यामुळे खरोखरंच पोटात गॅस होतो का?
वरिष्ठ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (पचनसंस्था किंवा पचनविकार तज्ज्ञ) अरुल प्रकाश म्हणतात की यावर निश्चित असं कोणतंही उत्तर नाही. याचं उत्तर ‘हो’ असंही नाही किंवा ‘नाही’ असंही देता येत नाही.
“बहुतांश लोकांच्या बाबतीत बटाटे हे गॅस निर्माण करणाऱ्या प्रमुख पदार्थांपैकी नाहीत. तरीदेखील खूप जास्त प्रमाणात बटाटे खाल्ल्यास काही परिस्थितींमध्ये पोट फुगणं, जड वाटणं आणि आतड्यांमध्ये गॅस तयार होणं यासारख्या समस्या काही जणांना होऊ शकतात. मात्र ही बाब प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी असू शकते, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे,” असं ते म्हणाले.
तज्ज्ञ म्हणतात की पोटाच्या अशा समस्यांसाठी बटाटे हेच एकमेव कारण नसतं. किंबहुना त्यामागे अनेक कारणं असू शकतात. उदाहरणार्थ, स्वयंपाकाची किंवा अन्न शिजवण्याची पद्धत, खाण्याचं प्रमाण, त्या व्यक्तीची पचनक्षमता आणि विशिष्ट प्रकारच्या स्टार्चना त्या व्यक्तीचं शरीर कशाप्रकारे प्रतिक्रिया देतं हे मुद्दे महत्त्वाचे असतात.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबेटिस अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेस (एनआयडीडीके) नुसार जेव्हा लहान आतड्यात व्यवस्थित न पचलेले कार्बोहाड्रेट्स मोठ्या आतड्यातील जिवाणूंद्वारे आंबवले (फर्मेंट) जातात, तेव्हा गॅस तयार होतो.
असं म्हटलं जातं की, आंबवण्याच्या प्रक्रियेत हायड्रोजन, मिथेन आणि कार्बन डायऑक्साईडसारखे गॅस नैसर्गिकरित्या तयार होतात. खूप जास्त प्रमाणात आंबवण्याची प्रक्रिया झाल्यास पोट फुगणं, अस्वस्थ वाटणं आणि गॅसची समस्या उद्भवू शकते.
‘बटाटे हे गॅस होण्यामागचं एकमेव कारण नाही’
बटाट्यांमध्ये मुख्यत: स्टार्च असतं. यातील बहुतांश स्टार्च लहान आतड्यात पचतो आणि शोषला जातो. मात्र यातील काही स्टार्च पचनाच्या क्रियेत पूर्णपणे न पचता तसाच पुढे मोठ्या आतड्यात पोहोचतो. तिथे आतड्यामधील जिवाणू त्याचं रुपांतर करतात.
‘न्युट्रिशन अँड गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, रेझिस्टंट स्टार्च हे प्रीबायोटिक म्हणून काम करतं. म्हणजेच ते आतड्यांमधील फायदेशीर किंवा उपयुक्त जिवाणूंना पोषण देतं. दीर्घकालीन आरोग्यासाठी ही गोष्ट सामान्यपणे चांगली मानली जाते. मात्र काही जणांच्या बाबतीत आंबवण्याच्या या प्रक्रियेमुळे तात्पुरत्या स्वरुपात गॅसची निर्मिती वाढू शकते.
डॉ. अरुल प्रकाश असंही म्हणतात की “अनेक प्रदेशांमध्ये बटाटा हा आहारातील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे फक्त बटाटेच नाही तर बीन्स आणि मुळ्यासारख्या मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट असलेले खाद्यपदार्थांमुळे देखील पोट फुगणं किंवा गॅस होण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.”
याशिवाय ते म्हणाले की काही जणांना बटाट्यासारख्या खाद्यपदार्थामुळे अस्वस्थ वाटतं किंवा त्रास होतो, याचा अर्थ तो उपयुक्त किंवा फायदेशीर नाही असा होत नाही. उलट प्रत्येक व्यक्तीची पचनक्षमता, पचनक्रिया वेगवेगळी असते.
फोटो स्रोत, Getty Images
विशेषकरून त्यांनी सांगितलं की या बाबतीत बटाट्यांना दोष देता येणार नाही. ते पुढे म्हणाले की “दुग्धजन्य पदार्थ, पोम प्रकारातील फळं (उदाहरणार्थ सफरचंद), बीन्स (उदा. सोयाबीन, काळा घेवडा, राजमा) आणि मुळा यासारख्या अन्नपदार्थांमुळे गॅस होणं आणि पोट फुगण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक असते.”
ते म्हणाले, “ही समस्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीररचना आणि पचनशक्तीवर अवलंबून असू शकते. बटाट्यासोबत इतर पदार्थ खाल्ल्यामुळे देखील या समस्या वाढू शकतात. त्यामुळे जर डाळ किंवा बटाटे खाल्ल्यामुळे जर ही समस्या उद्भवत असेल, तर पुढील वेळेस हे पदार्थ स्वतंत्रपणे खाऊन पाहा. त्यावेळेस त्याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याकडे लक्ष द्या.”
“असं केल्यानं नेमका कशामुळे हा त्रास होतो आहे हे समजण्यास तुम्हाला मदत होईल. जर अशी समस्या दोन आठवड्यांहून अधिक काळ राहिली, तर मग डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक ठरतं.”
याव्यतिरिक्त ज्या लोकांना लॅक्टोज इनटॉलरन्सची समस्या असते. म्हणजे ज्यांना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ पचत नाहीत अशांना दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यावर पोट फुगणं किंवा गॅसची समस्या होऊ शकते. तळलेले बटाटे खाल्ल्यामुळे त्यात चरबीयुक्त घटक असल्यानं पोट बराचं वेळ भरल्यासारखं वाटू शकतं. काहीजणांना यामुळे जेवणानंतर पोट जास्त भरल्यासारखं वाटू शकतं किंवा अस्वस्थ वाटू शकतं.
बटाट्याव्यतिरिक्त पोटात गॅस तयार करणारे पदार्थ
तज्ज्ञांच्या मते, बटाट्यासारखे इतरही पदार्थ असतात ज्यामुळे पोट फुगणं किंवा गॅसची समस्या होऊ शकते.
यासंदर्भात वरिष्ठ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट अरुल प्रकाश बीन्स, चणे, वाटाणे, डाळी यांचा उल्लेख करतात. या पदार्थांमध्ये ओलिगोसॅकराईड्स नावाचे गुंतागुंतीचे कार्बोहायट्रेट्स असतात. मात्र या मिश्रणाला पूर्णपणे पचवण्यासाठी आवश्यक असलेले एन्झाईम्स (शरीरातील रासायनिक प्रक्रियेला गती देणारे विशेष प्रोटीन) लहान आतड्यात नसतात. त्यामुळे हे पदार्थ मोठ्या आतड्यात पोहोचतात आणि तिथे जिवाणूंमुळे आंबवण्याची प्रक्रिया होते. त्यातून गॅस तयार होतो.
अशाच प्रकारे ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसचं म्हणणं आहे की “फुलकोबी, ब्रोकोली आणि कोबी यासारख्या भाज्यांमध्ये रॅफिनोज नावाचं संयुग असतं, त्यात गंधक असतं. पचनाच्या क्रियेदरम्यान या संयुगामुळे मोठ्या प्रमाणात गॅस तयार होऊ शकतो.”
“हा अन्नपदार्थ जरी खूप पौष्टिक असला तरी यामुळे सुद्धा पोट फुगण्याचा त्रास होतो असं मानलं जातं,” असं अरुल प्रकाश म्हणाले.
याव्यतिरिक्त दूध, आईस्क्रीम, सॉफ्ट चीज आणि योगर्ट (दही) यामध्ये लॅक्टोज असतं. ज्या लोकांना लॅक्टोज इनटॉलरन्सची समस्या असते त्यांच्या शरीरात लॅक्टोज व्यवस्थित पचवण्यासाठी आवश्यक असलेले लॅक्टोज एन्झाईम पुरेशा प्रमाणात तयार होत नाहीत.
अरुल प्रकाश म्हणतात की न पचलेले लॅक्टोज मोठ्या प्रमाणात आतड्यांमध्ये पोहोचतात. तिथे जिवाणूंद्वारे आंबवण्याची प्रक्रिया होते. त्यामुळे गॅस होणं, पोट फुगणं, पोटदुखी आणि काहीवेळा अतिसार यासारख्या समस्या उद्भवतात.

वैज्ञानिक संशोधनांनुसार, संपूर्ण धान्य आणि फायबरयुक्त पदार्थांमुळे पचन क्रिया सुधारते तसंच त्यामुळे पोटाच्या जुनाट समस्यांना प्रतिबंध होतो. मात्र काही तज्ज्ञ सल्ला देतात की खूप जास्त प्रमाणात फायबरचं सेवन केल्यास त्यामुळे पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो आणि त्यातून समस्या निर्माण होऊ शकतात.
शुगर-फ्री च्युईंग गम, कँडी आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमध्ये सर्वसामान्यपणे सॉर्बिटॉल, मॅनिटॉल, झायलिटॉल आणि माल्टिटॉल यासारखे शुगर अल्कोहोल असतात. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की हे स्वीटनर्स लहान आतड्यामध्ये व्यवस्थित शोषले जात नाहीत.
त्यातील उरलेला भाग मोठ्या आतड्यात पोहोचतो. तिथे आतड्यातील जिवाणूंमुळे त्याची आंबवण्याची प्रक्रिया होते. ते आतड्यामधून पाणी शोषून घेऊ शकतं. त्यामुळे पोट फुगणं, गॅस होणं किंव अतिसार होणं या समस्या उद्भवू शकतात.
कट अँड पेडियाट्रिक्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात सॉर्बिटल कमी प्रमाणात शोषल्यामुळे (सॉर्बिटॉल मालॲबसॉर्पशन) होणाऱ्या गॅस्ट्रोइन्टेस्टिनल म्हणजे पचनसंस्थेशी संबंधित लक्षणांची नोंद करण्यात आली आहे. मेयो क्लिनिकनं सॉर्बिटॉल, मॅनिटॉल आणि झायलिटॉल यासारख्या साखरेच्या पर्यायांचं वर्गीकरण आतड्यांमध्ये अतिरिक्त गॅस तयार होण्यामागची सामान्य कारणं म्हणून केलं आहे.
इतकंच नाही तर मेयो क्लिनिकनुसार कार्बोनेटेड पेयदेखील पचनाशी संबंधि विकारांना कारणीभूत ठरू शकतात. त्यांच्या मते, “सॉफ्ट ड्रिंक्समुळे पोटात गॅस होऊ शकतो. कार्बोनेटेड पेयं ही ढेकर देण्यामागचं सामान्य कारणदेखील असतात. कारण ते पचनमार्गात कार्बन डायऑक्साईड वायू सोडतात.”
विशेषकरून “यांचं सेवन मोठ्या प्रमाणात केल्यास त्यामुळे गॅस होणं, पोट फुगणं, पोट भरल्यासारखं वाटणं आणि वारंवार ढेकर येणं या समस्या होऊ शकतात.”
गॅस आणि पोटाच्या समस्या कशा टाळाव्यात?
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट अरुल प्रकाश यांच्या मते पचनाच्या समस्या प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळ्या असतात.
म्हणजे “एखाद्या व्यक्तीला खूप गॅस होत असण्यामागे अनेक कारणं असू शकतात. यामध्ये त्यांच्या आतड्यातील सूक्ष्मजीवांची रचना, पचनाचा वेग, खाण्याच्या सवयी आणि अन्नाची ॲलर्जी या गोष्टींचा समावेश असतो.”
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टनुसार, गॅस आणि पोट फुगण्याच्या बहुतांश समस्या आहारातील साधे-सोपे बदल आणि जीवनशैलीतील बदलांनी नियंत्रणात आणता येतात.
विशेषकरून, “जेव्हा लोक घाईघाईनं खातात, तेव्हा ते जास्त हवा गिळतात. ही हवा त्यांच्या पचनमार्गात अडकते. त्यामुळे पोट फुगतं आणि ढेकर येता. त्यामुळेच अन्न नीट चावून खाल्ल्यास आणि हळूहळू खाल्ल्यास ही लक्षणं लक्षणीयरित्या कमी होऊ शकतात.”
फोटो स्रोत, Getty Images
त्याचप्रमाणे, काही लोकांच्या बाबतीत काही विशिष्ट पदार्थांमुळे समस्या निर्माण होऊ शकतात.
डॉ. अरुल प्रकाश म्हणतात की, काही जणांना बटाट्यासारखे कंद खाल्ल्यानंतर ही लक्षणं जाणवू शकतात. तर काहींना दुग्धजन्य पदार्थ किंवा कडधान्यं खाल्ल्यानंतर असा त्रास होऊ शकतो.
त्यांच्या मते, असा कोणताही एकच पदार्थ नाही, ज्यामुळे प्रत्येकाच्याच पोटावर किंवा पचनसंस्थेवर सारखाच परिणाम होतो.
त्यामुळेच “एखादा विशिष्ट अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर जर अशी लक्षणं आढळली तर तुम्ही त्या पदार्थांचं प्रमाण कमी करण्याचा किंवा तो पदार्थ शिजवण्याची पद्धत बदलण्याचा विचार करू शकता. तरीदेखील जर ती समस्या राहिली तर तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे,” असा सल्ला त्यांनी दिला.
डॉक्टरांच्या मते, गॅस आणि पोट फुगणं या समस्या सहसा हानिकारक नसतात. मात्र, जर या लक्षणांबरोबर “अकारण वजन कमी होणं, सतत पोटदुखी असणं, अतिसार, शौचावाटे रक्त जाणं, तीव्र स्वरुपाची बद्धकोष्ठता आणि उलट्या,” यासारखी लक्षणं आढळली, तर तुम्ही लगेचच डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC







