Source :- BBC INDIA NEWS

हत्येच्या आरोपाखाली वडील आणि भावाला तुरुंगात टाकलं, तरुणी जिवंत बुलढाणा पोलिसांसमोर हजर झाली

फोटो स्रोत, UGC

तरुणीच्या हत्येच्या आरोपाखाली वडील आणि भावाला तुरुंगात टाकलं आणि तीच तरुणी स्वतः जिवंत पोलिसांसमोर हजर झाली.

“मी जिवंत असून माझ्या भावाला आणि वडिलांना सोडा”, अशी मागणी त्या तरुणीनं केली.

एप्रिल महिन्यातील एका हत्येच्या प्रकरणाला हे धक्कादायक वळण मिळालं असून बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद इथं ही घटना घडली.

शिवानी कळमेकर, असं या तरुणीचं नाव असून ती बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलिसांसमोर जिवंत हजर झाली आणि आपणच शिवानी कळमेकर असल्याचं सांगितलं.

यानंतर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

नेमकं काय घडलं?

जळगाव जामोद पोलिसांना 26 एप्रिल 2026 ला एक अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. याच प्रकरणाचा छडा लावत पोलीस मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील खकणार इथं पोहोचले.

खकणार पोलीस ठाण्यात शिवानी कळमेकर या तरुणीची मिसिंगची तक्रार दाखल होती. त्यावरून पोलीस तिच्या खडकी इथल्या घरी पोहोचले आणि तिची हत्या झाली असं सांगितलं.

त्यानंतर त्यांनी हत्येच्या आरोपाखाली शिवानीचे वडील बापूराम कळमेकर आणि भावाला अटक केली. त्यांना तुरुंगातही टाकलं.

त्यानंतर पोलिसांनी 10 मे रोजी प्रेस नोट काढून गुन्ह्याची उकल कशी केली याबदद्ल माहितीही दिली होती.

पण 20 दिवसानंतर या घटनेला एक धक्कादायक वळण मिळालं. पोलिसांनी ज्या शिवानीचा खून झाला असं म्हटलं होतं, ती स्वतःच 28 मे रोजी पोलिसांसमोर जिवंत हजर झाली.

“मी जिवंत असून माझ्या वडील आणि भावाला सोडा”, अशी मागणी तीने पोलिसांसमोर केली.

जळगाव जामोद पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. पण, यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण, पोलिसांनी डीएनए सॅम्पलच्या अहवालाची माहिती तपासण्याच्या आधीच तरुणीच्या वडील आणि भावाला तुरुंगात टाकलं.

या दोघांना मारहाण करून जबरदस्तीनं गुन्हा कबुल करून घेतला असा आरोपही बापूराम कळमेकर यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

हत्येच्या आरोपाखाली वडील आणि भावाला तुरुंगात टाकलं, तरुणी जिवंत  बुलढाणा पोलिसांसमोर हजर झाली

फोटो स्रोत, UGC

त्यांचे भाऊ नारायण कळमेकर माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, “आमची मुलगी पळाली असं समजलं तेव्हा आम्ही मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील खकणार पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती.

काही दिवसांनी पोलिसांनी घरी येऊन मुलीची हत्या झाल्याचं आणि जळगाव जामोद इथं तिचा मृतदेह आढळल्याचं सांगितलं. दोन दिवसानंतर माझा भाऊ आणि त्यांच्या मुलाला तुम्हीच मुलीची हत्या केली, तुमचे फिंगर फ्रिंट तिथं सापडले आहेत असं म्हणून घेऊन गेले.

त्यानंतर तुरुंगात टाकलं. पण, आता आमची मुलगी जिवंत असल्याचं आम्हाला कळलं तर आम्ही तिला घेऊन पोलिसांत आलो आहे.”

जळगाव जामोद पोलिसांनी मात्र, हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी तरुणीचे वडील आणि भावावरच आरोप केले आहेत.

जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील म्हणाले की, “आरोपीनं आमची दिशाभूल केली आहे. पहिल्या दिवसापासून पोलीस कोठडीत तपास करताना दिशाभूल का केली? यावरच आम्ही पुढील तपास करणार आहोत. एखाद्या गंभीर गुन्ह्यात अनोळखी महिलेची ओळख पटवणं आमच्यासाठी आव्हानात्मक आहे.”

अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला आणि आरोपींना अटक केली तेव्हा डीएनए चाचणी केली होती का? असा प्रश्न आम्ही नितीन पाटील यांना विचारला.

ते म्हणाले, “आम्ही डीएनए चाचणी केली होती. पण, त्याचा रिपोर्ट अजूनही आलेला नाही. कारवाई करणं गरजेचं होतं म्हणून आम्ही मुलीच्या वडिलांना आणि भावाला अटक केली.”

सध्या तरुणीचे वडील आणि भाऊ तुरुंगातच आहेत. पोलिसांसमोर आलेल्या महिलेचे सगळे कागदपत्रं आणि रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यानुसार पुढील तपास करत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

एप्रिल महिन्यात नेमकं काय घडलं होतं?

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद इथल्या राजुरा शिवारात एक अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता.

गळ्यात मंगळसूत्र आणि 20-25 वर्ष वयोगटातील महिलेचा हा मृतदेह होता. कवटी सुद्धा जळाली होती. त्यामुळे महिलेची ओळख पटवणं कठीण होतं. 26 एप्रिल 2026 रोजी हा मृतदेह सापडला होता. त्यानुसार जळगाव जामोद पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी अकोला, अमरावती, जळगाव आणि शेजारच्या मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यात पोलिसांची पथकं पाठवली होती.

एप्रिल महिन्यात नेमकं काय घडलं होतं?

फोटो स्रोत, UGC

यामध्ये बुऱ्हाणपूर इथं एका तरुणीची बेपत्ता असल्याची तक्रार असल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी त्या तरुणीसंदर्भात माहिती घेतली आणि तिच्या खडकी गावी पोहोचले.

शिवानी बापूराव कळमेकर असं या तरुणीचं नाव आहे. या तरुणीचे वडील आणि भाऊ अजय यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांनी खुनाची कबुली दिली, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी प्रेस नोटमध्ये दिलेली आहे.

पोलिसांनी यशस्वीपणे गुन्ह्याची उकल केली असं सांगत स्वतःच्या कामगिरीची कौतुक करणारी प्रेस नोट 10 मे रोजी प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये हा घटनाक्रम देण्यात आलेला आहे.

“मुलीचे वडील आणि भाऊ दोघांनाही विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली.

शिवानीचे अमरावती जिल्ह्यातील धारणी इथं लग्न झालं होतं. पण, ती सासरी न राहता माहेरी निघून आली. तिचे चुलत भावासोबत प्रेमसंबंध असल्यानं आणि ती लग्न होऊन सुद्धा ऐकत नसल्यानं वडील बापूराम आणि भावानं तिच्या डोक्यात बांबू मारून ठार केले.

23 एप्रिलला तिचा खुन केला आणि मृतदेह एक दिवस घरात ठेवून त्यानंतर मृतदेह बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद इथं आणून टाकला. पुरावे मिटविण्यासाठी मृतदेह जाळला. त्यानंतर पोलिसांत मिसिंगची तक्रार दिली, अशी कबुली आरोपींनी दिली”, असं पोलिसांनी प्रेस नोटमध्ये म्हटलेलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC