Source :- BBC INDIA NEWS

अफगाणिस्तानमध्ये आपल्याला खूप पाठिंबा मिळत असल्याचे झाकिया उर्फ रिव्हर अहमदने सांगितलं.

फोटो स्रोत, Sandro Gromen-Hayes

गिर्यारोहक झाकिया अहमद माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अफगाण महिला ठरली आहे.

ऑस्ट्रेलियात निर्वासित म्हणून राहणाऱ्या 30 वर्षीय झाकियाने 21 मे रोजी 8,848 मीटर उंच शिखरावर पाऊल ठेऊन इतिहास रचला आहे.

गिर्यारोहक झाकिया अहमद आता रिव्हर अहमद या नावानेही ओळखली जाते. तिने बीबीसीला सांगितलं की, “जगाच्या छतासारख्या या शिखरावर चढल्यानंतर मला स्वतःला खूप शक्तिशाली वाटत होतं.”

आपल्या यशातून तिला अफगाणिस्तानातील महिलांना संदेश द्यायचा आहे की, सर्वात कठीण काळातूनही त्या पुढे जाऊ शकतात.

रिव्हर अहमद तालिबानच्या दुसऱ्या सत्ताकाळात कसंतरी आपला जीव वाचवून भारतात आली आणि नंतर ऑस्ट्रेलियाला गेली.

याआधी ती अफगाणिस्तानमधील विद्यापीठात शिकत होती, परंतु निर्बंधांमुळे तिला धक्का बसला. नंतर ऑस्ट्रेलियाला गेल्यावर तिच्या भावाचा अचानक मृत्यू झाल्याने तिला आणखी एक मोठा धक्का बसला.

या काळात नद्यांनी (रिव्हरने) तिला पुढे जाण्यास प्रेरणा दिली. त्यामुळे झाकिया अहमद आता रिव्हर अहमद म्हणून ओळखली जाऊ लागली.

चढाईपूर्वी रिव्हर अहमदने सांगितलं होतं की, “मी एका उद्देशासाठी, स्वातंत्र्य आणि शिक्षणासाठी ही चढाई करत आहे.”

अफगाणिस्तानकडे जगाचे लक्ष वेधण्याचा उद्देश

या यशाच्या माध्यमातून तिला अफगाणिस्तानची परिस्थिती जगासमोर आणायची आहे.

2021 मध्ये तालिबान पुन्हा सत्तेत परतल्यानंतर 12 वर्षांवरील मुली आणि महिलांच्या शिक्षणावर बंदी घालण्यात आली आहे.

Caption- एव्हरेस्टच्या या बेस कॅम्पवरून गिर्यारोहक शिखरावर जाण्यासाठी चढाई सुरू करतात.

फोटो स्रोत, Getty Images

रिव्हरच्या या मोहिमेदरम्यान आम्ही तिला बेस कॅम्पमध्ये भेटलो. कॅम्प 4 हा या मार्गावरील सर्वात उंच कॅम्प आहे, तो 7,950 मीटर उंचीवर आहे.

येथून शिखरापर्यंतचा (8,849 मीटर) प्रवास ‘डेथ झोन’ मधून जातो, जिथे ऑक्सिजनची पातळी समुद्रसपाटीपेक्षा फक्त 30 टक्के असते.

रिव्हर अहमद सांगते की, “या कठीण चढाईत तिला तिच्या आयुष्यातील अनुभवांच्या आठवणी पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत होत्या.

त्यात तालिबानच्या हल्ल्यापासून कशीबशी वाचून बाहेर पडण्याच्या आठवणी होत्या आणि ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन नव्या संस्कृतीशी स्वतःला जुळवून घेण्याच्या आठवणीही होत्या.”

मरण्याचं नाटक करावं लागलं

याआधी ती अफगाणिस्तानमध्ये विद्यापीठात शिकत होती, परंतु निर्बंधांमुळे तिला मोठा धक्का बसला.

रिव्हर अहमदचा जन्म तालिबानच्या पहिल्या राजवटीत झाला होता, तेव्हाही मुलींच्या शिक्षणावर कडक निर्बंध होते.

पण 2001 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आक्रमणानंतर तालिबानला सत्तेतून हटवण्यात आले. त्यामुळे मुलींना पुन्हा शाळेत जाण्याची संधी मिळाली. महिलांना उच्च शिक्षण आणि काम करण्याची संधीही वाढली.

Caption- अफगाणिस्तानातील तालिबानी सुरक्षा कर्मचारी. (प्रतीकात्मक फोटो)

फोटो स्रोत, Photo by AFP via Getty Images

अहमद सांगते की, ती अफगाणिस्तानच्या आग्नेय (दक्षिण-पूर्व) भागातील गझनीमध्ये वाढली. हे ठिकाण हिंदू कुश पर्वतांच्या दक्षिणेला आहे.

ती म्हणाली, “मी रोज शाळेत जाण्यासाठी डोंगर आणि बर्फातून 4 तास चालत प्रवास करायचे.”

2014 मध्ये काबूल विद्यापीठात जाण्यासाठी तिने कुटुंबीयांची समजूत घालून त्यांची परवानगी घेतली. बसमध्ये ती एकटी महिला प्रवासी होती. त्याचवेळी तालिबानी सैनिकांनी बस थांबवली आणि गोळीबार सुरू केला, असं तिनं सांगितलं.

रिव्हर अहमद सांगते की, ही घटना तिच्या मासिक पाळीच्या वेळी घडली होती आणि त्यावेळी तिने पटकन चेहऱ्यावर थोडं रक्त लावलं.

हल्लेखोर तिला मृत समजून निघून जाईपर्यंत ती शांतपणे तिथेच पडून राहिली.

यानंतर तिचे कुटुंब काबूलला गेले. तिथे तिने पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आणि टोपणनावाने रेडिओ पत्रकार म्हणून काम केलं. 2019 मध्ये ती भारतात आली आणि तीन वर्षांनी ऑस्ट्रेलियाला गेली. तिथे ती इंग्रजी शिकली आणि एका फर्निचर कंपनीत काम केलं.

रेडिओ पत्रकार ते गिर्यारोहक प्रवास कसा होता

रिव्हर अहमदला गिर्यारोहणाची आवड एका दुर्घटनेनंतर निर्माण झाली.

ऑस्ट्रेलियाला आल्यावर अवघ्या 6 महिन्यांतच तिच्या 20 वर्षीय भावाने आत्महत्या केली. ती सांगते की, या घटनेनंतर तिला खूप हरवल्यासारखं आणि तुटल्यासारखं वाटत होतं.

याच काळात तिने आपलं पहिलं नाव झाकिया बदलून रिव्हर ठेवण्याचा निर्णय घेतला, जे ऑस्ट्रेलियातील नद्यांपासून प्रेरित होतं.

ती म्हणते, “नद्या स्वच्छ आणि थांबवता न येणाऱ्या म्हणजेच अजिंक्य असतात, त्या नेहमी वाहत राहतात. मला वाटलं की मीही तसंच व्हायला हवं.”

Caption- गिर्यारोहक अहमदला आपल्या यशातून जगाचं लक्ष अफगाणिस्तानकडे वेधायचं आहे

फोटो स्रोत, River Ahmad

अहमदने सिडनी हार्बर ब्रिजवर आयोजिक एका सामूहिक गिर्यारोहण मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

ती म्हणते, “मला उंचीवर खूप आनंदी आणि समाधानी वाटलं. तेव्हाच गिर्यारोहण केलं पाहिजे असं मला जाणवलं.”

तिने प्रशिक्षण सुरू केलं. जिमला जाऊ लागली आणि मेलबर्नच्या आजूबाजूच्या टेकड्यांवर चढाई करू लागली. तिने आपल्या मोहिमेसाठी 85 हजार डॉलर्स उभे करण्याचाही प्रयत्न केला.

ती सांगते की, यातील सुमारे एक चतुर्थांश रक्कम स्वतःच्या बचतीतून दिली आणि बाकी रक्कम एका फाउंडेशनकडून कर्ज म्हणून घेतले.

“निधी उभा करणं खूप कठीण आहे. या मोहिमेसाठी मला कोणीही प्रायोजक मिळाला नाही.” तरीही या यशानंतर भविष्यातील मोहिमांसाठी अधिक मदत मिळेल, अशी आशा आहे.

चढाईत अडचण ठरलेली गिर्यारोहकांची गर्दी

रिव्हर अहमद ही या वर्षी एव्हरेस्ट सर करण्याची परवानगी मिळालेल्या सुमारे 500 गिर्यारोहकांपैकी एक आहे. नेपाळ सरकारने यंदा विक्रमी संख्येने परवानग्या दिल्या आहेत. ती सांगते की, इतक्या मोठ्या संख्येमुळे जास्त अडचणी निर्माण झाल्या.

या वर्षी मार्चमध्ये एव्हरेस्ट परिसरात पोहोचल्यानंतर तिने 6 हजार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या दोन पर्वतांवर चढाई केली आणि अनेक आठवडे तिथे प्रशिक्षण व शरीर जुळवून घेण्याचा सराव केला.

Caption- गिर्यारोहक रांगेत उभे राहून वर चढत असल्यामुळे गर्दी होत आहे आणि त्यामुळे परिस्थिती अधिक आव्हानात्मक झाली आहे.

फोटो स्रोत, Pemba Sherpa

प्रत्येक गिर्यारोहकासोबत किमान एक सहायक असतो, त्यामुळे शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या 1 हजारपेक्षा जास्त होते. यापैकी बहुतेक सहायक नेपाळमधील शेर्पा समुदायातील असतात, असं तिने स्पष्ट केलं.

दुसरीकडे, यंदा तिबेटमार्गे चीनकडचा रस्ता परदेशी गिर्यारोहकांसाठी बंद असल्यामुळे नेपाळहून येणाऱ्या मार्गावर जास्त गर्दी वाढली आहे.

दरवर्षी एव्हरेस्ट शिखरावर जाण्यासाठी योग्य किंवा अनुकूल हवामानाचा कालावधी खूप कमी असतो.

हा काळ साधारणपणे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात असतो. रिव्हर अहमद सांगते की, या अनुकूल हवामानाच्या काही दिवसांत तिथे मोठ्या रांगा लागलेल्या असतात.

रिव्हर सांगते की, तिला आणि तिच्या दोन शेर्पा मार्गदर्शकांना शिखराच्या जवळ 4 तास वाट पाहावी लागली. त्यावेळी तापमान साधारणपणे उणे 25 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते.

“तो ट्रॅफिक जाम खूप भयानक होता. मी खूप घाबरली होती,” असं तिने सांगितलं.

‘हा वाट पाहण्याचा वेळ त्यांच्या चढाईसाठी धोकादायक ठरू शकतो, अशी त्यांना भीती वाटत होती.’

एव्हरेस्ट चढाईतील ट्रॅफिक जॅम धोकादायक

तज्ज्ञ सांगतात की, अशा रांगा जे गिर्यारोहक पुरेसं ऑक्सिजन सोबत नेत नाहीत, त्यांच्यासाठी जीवघेणा धोका निर्माण करू शकतात.

तसेच, अतिशय कठीण परिस्थितीत जास्त वेळ घालवल्याने फ्रॉस्टबाइट (हिमबाधा) आणि स्नो ब्लाइंडनेसचा (बर्फामुळे डोळ्यांना होणारा त्रास-हिम अंधत्व) धोका वाढतो.

गिर्यारोहक अहमद सांगते की, एका दिवशी 274 जणांनी शिखर गाठून विक्रम केला. दुसऱ्या दिवशी 160 जण शिखरावर पोहोचले, त्यात नेपाळमधील सहायक कर्मचारीही होते, ज्यांना परवान्याची आवश्यकता नसते.

दुसऱ्या दिवशी उतरताना दोन भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू झाला.

Caption- हा 2019 चा फोटो आहे. लांब रांगा लागल्यामुळे गिर्यारोहकांसाठी परिस्थिती जीवघेणी ठरू शकते, हे या फोटोतून दिसून येते. (फाईल फोटो)

फोटो स्रोत, AFP / GETTY / PROJECT POSSIBL

एव्हरेस्ट मार्गावरील गर्दीमुळे चिंता वाढल्यानंतर नेपाळ सरकारने मागील काही वर्षांत परवान्याची फी वाढवली आहे. तसेच अर्ज करणाऱ्यांसाठी नियमही अधिक कडक केले जात आहेत.

अधिकाऱ्यांनी मोहिमेच्या संचालकांसोबत (ऑपरेटर्स) मिळून शिखरावर जाण्याच्या वेळा वेगवेगळ्या करण्याचा प्रयास केला. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

अहमद सांगते की, “शिखरावर पोहोचल्यानंतर आणि तेथून खाली उतरताना तिला खूप आनंद झाला, कारण पृथ्वीवरील सर्वात उंच ठिकाणावरून निसर्ग पाहण्याचा अनुभव तिला मिळाला.”

अफगाणिस्ताने माजी राष्ट्राध्यक्ष करझाईंनी केलं कौतुक

अफगाण लोकांकडून या यशाला ‘आश्चर्यकारक’ प्रतिसाद मिळाला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनीही हे अफगाण महिलांचं मोठं यश असल्याचे सांगत कौतुक केलं आहे, असं रिव्हर अहमदने सांगितलं.

ती म्हणते, “यामुळे लोकांना एक संदेश गेला आहे की आम्ही (अफगाण महिला) सर्वात कठीण कामही करू शकतो.”

पण तिचा मुख्य संदेश गिर्यारोहणाच्या पलीकडे जातो.

ती म्हणते, “आजही लाखो अफगाण मुली शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित आहेत, आणि आपल्याला तो अडथळ्याचा डोंगर पार करायचा आहे.”

तालिबान सरकारने पुन्हा सत्तेत आल्यानंतर सांगितलं होतं की, मुली आणि महिलांच्या माध्यमिक व उच्च शिक्षणावर घातलेली बंदी तात्पुरती असेल. सुरक्षेचं कारण देऊन त्यांनी ही ‘तात्पुरती’ बंदी घातली होती.

नुकतंच बीबीसीने या मुद्द्यावर सरकारच्या उपप्रवक्त्याला विचारलं, तेव्हा त्यांनी हा प्रश्न शिक्षण मंत्रालयाला विचारण्यास सांगितलं. पण तिथूनही कोणतंही उत्तर मिळालं नाही.

अहमद सांगते की, ती अफगाणिस्तानातील महिलांच्या पाठिंब्यासाठी पैसे उभे करण्याची योजना आखत आहे.

ती आपल्या देशातील महिलांना संदेश देते, “मजबूत राहा. स्वतःवर विश्वास ठेवा की, तुम्ही आपल्या या इतिहासातील सर्वात कठीण काळातून बाहेर पडू शकता. आपण हे करू शकतो.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC