Home LATEST NEWS ताजी बातमी मृत पिल्लाला वाहून नेणाऱ्या हत्तीणीची हृदयद्रावक गोष्ट; फोटोग्राफरने पाठलाग केला अन् ‘हे’...

मृत पिल्लाला वाहून नेणाऱ्या हत्तीणीची हृदयद्रावक गोष्ट; फोटोग्राफरने पाठलाग केला अन् ‘हे’ समजलं

7
0

Source :- BBC INDIA NEWS

नामिबियात एका हत्तीणीनं मृत जन्मलेल्या पिल्लाला सोंडेत उचलून नेल्याचं हृदयद्रावक दृश्य फेडेरिको वेरोनेसी यांनी टिपले.

‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर 2026’चा पुरस्कार पटकावणाऱ्या छायाचित्रात हत्तींचे अत्यंत दुर्मीळ वर्तन कॅमेऱ्यात कैद झाले आहे; ज्यातून हत्तींच्या भावविश्वाची अनोखी आणि गुंतागुंतीची बाजू उलगडते.

सप्टेंबर 2025 मध्ये नामिबियाच्या वाळवंटात कोरड्या पडलेल्या नदीच्या पात्रातून जाणाऱ्या हत्तींच्या कळपाचा मागोवा घेताना छायाचित्रकार फेडेरिको वेरोनेसी यांच्या डोळ्यांसमोर एक हृदय पिळवटून टाकणारे दृश्य आले.

तिथे एका हत्तीणीने तिच्या मृत जन्माला आलेल्या पिल्लाला सोंडेत उचलून धरले होते. पिल्लाचे बारीक पाय तिच्या सोंडेभोवती लटकलेले होते आणि त्याचे निष्प्राण शरीर हवेत झुलत होते.

या क्षणाची आठवण सांगताना वेरोनेसी म्हणतात, “तो खूप भावनिक आणि अगदी मनाला स्पर्शून जाणारा क्षण होता. ते पिल्लू अगदी मऊ होते, त्याचे शरीर कडक झाले नव्हते. यावरून त्याचा जन्म रात्री किंवा अवघ्या काही तासांपूर्वीच झाला असावा, हे स्पष्ट होतं.”

असं हृदयद्रावक दृश्य पाहून पहिल्या क्षणी असं वाटलं की, ती आपल्या पिल्लाच्या निधनाने हळहळलेली एक दुःखी आई आहे. पण वेरोनेसी यांना नंतर समजलं की, ते ज्या दुर्मीळ प्रसंगाचे साक्षीदार बनले होते त्यामागे एक अनपेक्षित गोष्ट दडलेली होती.

त्यावरून हत्तींमधील संवेदना आपण विचार करतो त्याहून कितीतरी पट जास्त सखोल आणि गुंतागुंतीची असते, हे स्पष्ट झाले.

‘ती त्या पिल्लाची आई नव्हती’

वेरोनेसी यांनी कित्येक तास या हत्तींच्या कळपाचा पाठलाग केला आणि काही थक्क करणारी छायाचित्रे कॅमेऱ्यात टिपली.

लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमतर्फे घेण्यात आलेल्या ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर 2026’ या स्पर्धेत त्यांच्या याच एका छायाचित्राला सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे.

वेरोनेसी सांगतात, “ती हत्तीण त्या पिल्लाला कित्येक तास वाहून नेत होती. पाणी पिण्यासाठी किंवा खायला लागल्यावर ती त्याला मध्येच खाली ठेवायची, आणि पुन्हा उचलून हुअब नदीच्या पात्रातून चालू लागायची.

हे दृश्य पाहून माझ्या मनात आले, ‘हे दृश्य खूप मन हेलावून टाकणारे आहे, पण लोकांनी हे पाहायलाच हवे.’ हे हत्ती किती दुःख सहन करतात आणि त्यांच्यातही माणसांसारख्याच हळव्या, गुंतागुंतीच्या भावना असतात ज्या सहसा प्राण्यांमध्ये असतात असे लोकांना वाटत नाही हेच या फोटोतून ठळकपणे समोर येते.”

पुढे जाऊन वेरोनेसी यांना समजले की, ती हत्तीण ज्या मृत पिल्लाला वाहून नेत होती, ते तिचे स्वतःचे पिल्लू नव्हतेच. नामिबियातील वाळवंटात राहणाऱ्या हत्तींचे रक्षण करणाऱ्या ‘EHRA’ या संस्थेच्या संवर्धन संचालक क्रिस्टिन विंटर सांगतात, “ती त्या पिल्लाची आई नाही.”

सध्या 14 वर्षांच्या असलेल्या या हत्तीणीचे स्वतःचे पिल्लू दोन वर्षांपूर्वी दगावले होते. तेव्हापासून तिने इतर हत्तीणींच्या मृत जन्माला आलेल्या पिल्लांना सोबत वाहून नेल्याच्या अशा तब्बल 4 वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत, असे विंटर सांगतात. या संपूर्ण परिसरात अशा प्रकारचे वर्तन पहिल्यांदाच नोंदवले गेले आहे, असेही त्या म्हणाल्या.

वेरोनेसी म्हणतात, “ही माहिती समोर आल्यानंतर या प्राण्यांच्या भावना किती सखोल असतात, याची जाणीव होते. स्वतःचे पिल्लू गमावल्यानंतर ती हत्तीण असे वागते आहे, हे पाहून हृदय पिळवटून निघते. इतकी वर्षे उलटूनही ती त्या दुःखातून सावरलेली नाही आणि अशा प्रकारे जणू काही ती अजूनही आपल्या त्या मृत पिल्लाशी पुन्हा जोडली जाण्याचा प्रयत्न करत आहे.

हत्तींचे भावनिक विश्व

ती हत्तीण त्या मृत पिल्लाला इतके तास सोबत घेऊन का फिरत होती, याबद्दल काही शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. विंटर यांच्या मते, हे तिच्या दुःखावर मात करण्याचे किंवा “भावना व्यक्त करण्याचे” एक माध्यम असू शकते.

“कदाचित मृत्यूचे वास्तव पचवणे तिला जड जात असावे आणि त्या दुःखाला लगेच मागे सोडणे तिला जमत नसावे. स्वतःचे पिल्लू गमावल्याचा मोठा धक्का तिच्या मनावर बसला असावा म्हणूनच जेव्हा जेव्हा असे पिल्लू दगावते, तेव्हा ती अचानक अशीच वागू लागत असावी,” असे विंटर सांगतात.

याशिवाय इतर शिकारी प्राण्यांपासून त्या पिल्लाच्या निष्प्राण शरीराचे रक्षण करण्याचाही तिचा हा प्रयत्न असू शकतो, असाही एक अंदाज विंटर यांनी व्यक्त केला.

फेडेरिको वेरोनेसी यांच्या या फोटोने 'वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर 2026' चा सर्वोच्च पुरस्कार जिंकला. (फोटो क्रेडिट: फेडेरिको वेरोनेसी)

नामिब वाळवंटातील 5 कोरड्या नद्यांच्या परिसरात राहणाऱ्या 150 कणखर वाळवंटी हत्तींचे अनोखे आयुष्य वेरोनेसी यांच्या फोटोंमधून पाहायला मिळते.

हे हत्ती अन्न आणि पाण्याच्या शोधात शेकडो मैलांचा खडतर प्रवास करतात. तसेच ॲना वृक्षांच्या शेंगा आणि नदीकाठच्या मैदानांमधील गवतावर जगतात.

हे हत्ती कुठली वेगळी प्रजाती नसून एक ‘इकोटाइप’ आहेत. म्हणजेच नामिबियाच्या स्केलेटन कोस्टवरील वाळवंटी सिंहांप्रमाणेच त्यांनी पिढ्यानपिढ्या शिकलेल्या सवयींमधून या कोरड्या वाळवंटात जगायला स्वतःला घडवले आहे कोणताही जनुकीय बदल न होता.

विंटर म्हणतात, “त्यांच्याकडे असलेले हे ज्ञानच त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते आणि तितकेच धोक्यातही आणते, कारण एकदा हे पिढ्यांचे ज्ञान नाहीसे झाले तर त्याची जागा सहजासहजी भरून काढता येत नाही.”

या हत्तींची घटती संख्या

गेल्या 20 वर्षांत या हत्तींची संख्या वेगाने कमी होत चालली आहे, असं विंटर सांगतात. सतत पडणारा दुष्काळ आणि पर्यावरणातील बदल याला काही प्रमाणात कारणीभूत असले तरी माणसांसोबत वाढलेला संघर्ष हेच यामागील मुख्य कारण आहे.

“हा सगळा वाद मुख्यत्वे पाण्यासाठीच पेटतो. हत्ती शेतात घुसून पाण्याच्या टाक्या उलथवून टाकतात, पाईप्स उपटून फेकतात आणि पाण्याचे पंप फोडतात. त्यामुळे हत्ती आपल्या परिसरात असण्याबाबत लोकांमध्ये फारसा संयम किंवा सहानुभूती उरलेली नाही. या संघर्षाच्या आठवणी लोकांच्या मनात खोलवर रुजलेल्या असतात आणि त्या दीर्घकाळ टिकून राहतात,” असं विंटर सांगतात.

नवजात पिल्लांचा मृत्यूदर ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचं विंटर सांगतात. “हा मृत्यूदर प्रचंड जास्त असून धडकी भरवणारा आहे. 2014 ते 2022 दरम्यान जन्मलेल्या 16 पिल्लांपैकी फक्त 2 पिल्लेच जिवंत राहू शकली,” असे त्या म्हणाल्या.

वाळवंटातील हत्तींची इतकी पिल्ले का दगावत आहेत, यामागे एक मुख्य कारण सांगितले जाते. विंटर यांच्या मते, ही पिल्ले वेळेआधीच (प्रिमॅच्युअर) जन्माला येतात.

“कारण मादी हत्तींमध्ये त्यांना पूर्ण दिवस पोटात वाढवण्याइतकी शारीरिक ताकदच उरलेली नसते.”

माणसांसोबत सतत होणाऱ्या संघर्षामुळे येणारा प्रचंड मानसिक ताण यामागे असू शकतो. संशोधनातून सिद्ध झाले आहे की, माणसांशी होणाऱ्या अशा जीवघेण्या संघर्षामुळे हत्तीसुद्धा ‘पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर’ म्हणजेच आघातानंतरचा तीव्र मानसिक तणाव सारखा त्रास होऊ शकतो.

विंटर सांगतात की, EHRA च्या टीमला जेव्हा जेव्हा अशी मृत जन्माला आलेली पिल्ले सापडतात तेव्हा ती आकाराने खूपच बारीक आणि लहान असतात. सहसा एका निरोगी हत्तीच्या नवजात पिल्लाचे वजन 100 ते 120 किलोपर्यंत असते. पण या मृत जन्मलेल्या पिल्लांचे वजन मात्र फक्त 60 ते 65 किलोच भरते.

पर्यावरणातील घटक आणि सततचा मानसिक ताण नामिबियाच्या वाळवंटी हत्तींवर काय परिणाम करत आहेत, याचा शोध घेण्यासाठी EHRA ही संस्था इंडियाना युनिव्हर्सिटीच्या हत्ती तज्ज्ञ आणि सहाय्यक प्राध्यापिका डॅनिएला चुसिड यांच्यासोबत काम करत आहे.

2028 पर्यंत चालणाऱ्या या संशोधन प्रकल्पाअंतर्गत हत्तींच्या विष्ठेचे नमुने गोळा केले जात आहेत जेणेकरून त्यातील घातक केमिकल्स (उदा. PFAS), घातक धातू आणि हत्तींमधील थायरॉईड आणि कोर्टिसोल या स्ट्रेस हार्मोन्सची पातळी तपासता येईल.

नामिबियात वाळवंटी हत्तींची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. (फोटो: फेडेरिको वेरोनेसी)

आफ्रिकन सव्हाना हत्तींच्या ज्येष्ठ तज्ज्ञ आणि ‘एलिफंट व्हॉइसेस’ संस्थेच्या संस्थापिका जॉईस पूल यांनी वेरोनेसी यांच्या या फोटोंना “अत्यंत हृदयद्रावक” म्हटले आहे. केनियामध्ये एका हत्तीणीचे आपल्या मृत पिल्लाबद्दलचे असेच हळवे रूप त्यांनी स्वतः पाहिले होते.

पूल सांगतात, “त्या हत्तीणीने पिल्लाला सोबत नेले नाही, तर तिने तिला वर उचलण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तब्बल 2 दिवस ती तिथेच पहारा देत आपल्या मृत पिल्लाचे रक्षण करत उभी राहिली.”

या छायाचित्रांमुळे “हत्तींमध्येही दुःख आणि वेदना अनुभवण्याची क्षमता असते,” याची जाणीव लोकांना नक्कीच होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

कळपातील एखादा सोबती दगावल्यास हत्तींनाही तीव्र दुःख होते, हे अनेकदा दिसून आले आहे. आपल्या कळपातील असो वा अनोळखी, मृत हत्तीच्या हाडांना सोंडेने हळुवार स्पर्श करणे आणि एखाद्या दुखवटा पाळणाऱ्या माणसाप्रमाणे दीर्घकाळ तिथेच शांत पहारा देत उभे राहणे, असे त्यांचे वर्तन अनेकदा निरीक्षणात आले आहे.

पूल म्हणतात, “फक्त वातावरणातील बदलांमुळेच नाही, तर नामिबिया सरकारने हौशी शिकारीसाठी (ट्रॉफी हंटिंग) दिलेल्या परवानग्यांमुळेही हे वाळवंटी हत्ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना या तीव्र मानसिक आघातातून वाचवण्यासाठी आपल्याला आणखी ठोस पावले उचलावी लागतील,” असे पूल सांगतात.

वेरोनेसी यांच्यासाठी त्या हत्तीणीचे त्या मृत पिल्लाप्रती असलेले वर्तन हे “अगदी माणसासारख्या भावना दाखवणारे” होते.

वेरोनेसी सांगतात, “याच कारणाने तो क्षण स्वतः अनुभवणे माझ्यासाठी अत्यंत थक्क करणारे होते. मला फक्त एवढाच संदेश द्यायचा आहे की, प्रत्येक हत्ती हा समजून घेण्याजोगा आणि जपण्यासारखा जीव आहे. आपल्याला फक्त एका प्रजातीचे अस्तित्व टिकवून ठेवायचे नसून, त्यातील प्रत्येक हत्तीचे आयुष्य आणि त्यांचे सुख-दुःखही जपायचे आहे.”

ही छायाचित्रे “हत्तींचे भावविश्व, त्यांचा अंतरात्मा आणि त्यांच्या हळव्या भावनांची खोली समजून घेण्यासाठी एक छोटी खिडकी उघडून देतील,” असा विश्वास छायाचित्रकाराने व्यक्त केला आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC