Home LATEST NEWS ताजी बातमी टेस्लाची उडणारी कार खरंच प्रत्यक्षात वापरता येईल का? इलॉन मस्क यांनी दिलं...

टेस्लाची उडणारी कार खरंच प्रत्यक्षात वापरता येईल का? इलॉन मस्क यांनी दिलं ‘असं’ उत्तर

2
0

Source :- BBC INDIA NEWS

टेस्लाच्या उडणाऱ्या कारचे वैशिष्ट्य काय आहे?

Published

वाचन वेळ: 3 मिनिटे

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये टेस्लाच्या ‘रोडस्टर’ या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारची एक नवीन आवृत्ती सादर करण्यात आली. या कारला खऱ्या अर्थानं उडणारी कार असल्याचं म्हटलं जात आहे.

या कारमध्ये थ्रस्टर्स लावण्यात आलेले आहेत. त्यांच्या मदतीनं ही कार जमिनीपासून वर उडू शकते आणि हवेत वळूही शकते.

या कारचा डेमो सादर करताना कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी “आज तुम्हाला काही आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळतील,” असं म्हटलं.

त्यांनी त्याच्या स्पेसएक्स कंपनीच्या एका केंद्रामध्ये ही कार सर्वांसमोर सादर केली. या कंपनीनेच हे हे मॉडेल विकसित करण्यास मदत केली होती.

टेस्लाने रोडस्टर मॉडेलला रिडिझाईन करून तिचं उडणाऱ्या कारमध्ये रूपांतर केले आहे.

हे ‘एआय’ नसून खरंच ही कार आहे हे सिद्ध करण्यासाठी इथं प्रेक्षकांची उपस्थिती आवश्यक होती, असं मस्क म्हणाले.

मस्क यांनी काय सांगितलं?

मस्क यांनी याठिकाणी रोडस्टरची प्रात्याश्रिकं दाखवली. त्यात एक गाडी एका रॅम्पवर चढते, मग हवेत झेपावते, गिरकी घेते आणि नंतर एअर जेट्सच्या मदतीने खाली उतरते.

बीबीसीच्या तंत्रज्ञान संपादक झो क्लाइनमन यांच्या मते, “नजीकच्या भविष्यात आपल्याला रस्त्यांवर उडणाऱ्या गाड्या दिसण्याची शक्यता कमी आहे, त्याची अनेक कारणं आहेत.”

इलॉन मस्क यांनी त्यांच्या एक्स हँडलवर या उडणाऱ्या कारच्या डेमोचा एक व्हीडिओ पोस्ट केला. त्यांनी लिहिलं की, “भविष्यात खरंच उडणाऱ्या गाड्या येतील, असं दिसतंय.”

इलॉन मस्क

टेस्लानं या दोन आसनी कारमध्ये स्पेसएक्सनं विकसित केलेले कोल्ड गॅस थ्रस्टर्स लावले आहेत. पण, उडण्याची क्षमता असली तरी ही वाहनं रस्त्यावर वापरण्यासाठी तयार आहेत की नाही, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

टेक्सासमधील डेमोदरम्यान, रोडस्टर सेकंड जनरेशन कार एका मोठ्या वक्राकार रॅम्पवर चढते आणि नंतर रॅम्पवरून वेगाने खाली जाते. त्यानंतर गाडी हवेत वळते आणि जमिनीवर सुरक्षितपणे उतरते.

यशस्वी लँडिंगनंतर मस्क यांनी चला हे यशस्वी झालं अशी प्रतक्रिया दिली. टेस्ला आणि स्पेसएक्सच्या अभियंत्यांनी एकत्रितपणे ही कार तयार केली असल्याचंही त्यांनी सांगतिलं आहे.

कारची वैशिष्ट्ये

कारची प्रात्यक्षिकं दाखवताना मस्क यांना ही कार रस्त्यांवर धावू शकेल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मस्क यांनी गंमत करत, “तुमचा रस्ता कसा आहे यावर ते अवलंबून आहे,” असं म्हटलं.

पण, वापरण्याच्या दृष्टीकोनातून ही ‘व्यवहारिक गाडी’ असेल असा दावा त्यांनी केला.

मस्क यांच्या मते, ही कार स्वतःला वर उचलण्यासाठी एका प्रगत अती-उच्च दाबाच्या हवेच्या टाकीचा वापर करते.

या कारमध्ये हवेत स्वतःला नियंत्रित करण्यासाठी उंची वाढवणारे थ्रस्टर्स आणि मागे मुख्य थ्रस्टर्स आहेत. ही कार अगदी रॉकेटप्रमाणे उड्डाण करू शकते आणि हवेत कसरतीही करू शकते.

कारची वैशिष्ट्ये

रॉकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्यांसारख्याच थ्रस्टर्सचाच वापर या कारमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळं ही कार 0.81 सेकंदात ताशी 97 किमीचा वेग गाठू शकते.

याच वेगासह ही कार बाजारात आली तर ती जगातली सर्वात वेगवान पिकअप असणारी कार ठरू शकते.

ही कार कोल्ड-गॅस थ्रस्टर तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्याचा उपयोग अवकाशात रॉकेट आणि उपग्रहांची दिशा बदलण्यासाठी केला जातो. यामध्ये उच्च दाबानं संकुचित हवा/वायू सोडून वाहनाला अतिरिक्त बल दिलं जातं.

या गाडीचा डेमो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी अनेक शक्यता व्यक्त केल्या. ही गाडी टोल बूथजवळ पोहोचल्यावर त्याच्यावरून उडून जाईल, असं काही लोक म्हणत आहेत. तर काहींनी खड्डे असलेल्या ठिकाणी ही कार उडवून नेण्याच कल्पना मांडली.

पण, हा रोडस्टर कारचा फक्त एक डेमो आहे. त्यामुळं नेमक्या कोणत्या विशेष तंत्रज्ञानासह ही कार बाजारात आणली जाईल, आणि ती चालवण्यासाठी रस्त्यांची परिस्थिती आणि इतर कशाची आवश्यकता असेल हे अद्याप स्पष्ट नाही.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन

SOURCE : BBC