Home LATEST NEWS ताजी बातमी ‘युद्धामुळे हरलो’, रिपब्लिकन पक्षाच्या पराभवानंतर जेडी व्हान्स यांच्या वक्तव्याचा असा आहे अर्थ

‘युद्धामुळे हरलो’, रिपब्लिकन पक्षाच्या पराभवानंतर जेडी व्हान्स यांच्या वक्तव्याचा असा आहे अर्थ

7
0

Source :- BBC INDIA NEWS

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी बुधवारी वॉशिंग्टनमध्ये खळबळ उडवून दिली. मिडटर्म निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या पराभवास त्यांनी थेट इराण युद्धाला जबाबदार धरलं.

त्यांच्या या वक्तव्याकडे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून अंतर राखण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं जात आहे. व्हान्स 2028 ची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे.

2024 मध्ये ट्रम्प यांना मतदान करणाऱ्या मतदारांनी मिडटर्म निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला साथ दिली नाही, असं उपराष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सुमारे 600 शब्दांच्या अत्यंत संयत निवेदनात मान्य केलं.

ते म्हणाले, “आमच्या पराभवाचं कारण युद्ध आहे. राष्ट्राध्यक्षांनी स्वतः काल रात्री ही गोष्ट मान्य केली होती.”

ट्रम्प यांच्याशी उघड मतभेद

मंगळवारी उशिरा रात्री आणि बुधवारी दिलेल्या मुलाखतींमध्ये ट्रम्प यांनी युद्धाचं समर्थन केलं होतं.

मात्र, अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेत आणि सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला बहुमत मिळण्यात युद्धाची भूमिका असल्याचंही त्यांनी मान्य केलं.

इराण युद्धाबाबत व्हान्स यांची भूमिका कुणापासूनही लपलेली नाही.

फेब्रुवारीमध्ये अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केल्यानंतर त्यांनी सार्वजनिकरीत्या अनेक वेळा या संघर्षाचं समर्थन केलं होतं.

मात्र, वृत्तांनुसार प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या खासगी बैठकींमध्ये त्यांनी युद्धाला विरोध केला होता.

परंतु आतापर्यंत हे मतभेद सार्वजनिक होऊ दिले गेले नव्हते. आता तसं राहिलेलं नाही.

ट्रम्प यांच्याशी उघड मतभेद

ट्रम्प आणि त्यांच्या पक्षाला निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागल्यानंतर अवघ्या काही तासांतच व्हान्स यांनी, युद्ध सुरू करण्याचा निर्णय हा राजकीयदृष्ट्या मोठी चूक होती, असं त्यांचं मत असल्याचं स्पष्ट केलं

व्हान्स म्हणाले, “जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की हे सगळं करणं योग्य होतं आणि पुढील सहा वर्षांसाठी सिनेटमधील बहुमत गमावणं योग्य होतं, तर तुम्ही तसं म्हणू शकता. त्यासाठी ही किंमत मोजणं योग्य होतं असंही तुम्ही म्हणू शकता. तुम्ही त्याच्याशी सहमत असाल किंवा नसाल, पण किमान तो प्रामाणिक युक्तिवाद तरी असेल.”

हे वक्तव्य अत्यंत असामान्य आहे. अलीकडच्या अमेरिकन राजकीय इतिहासात याचं उदाहरण आठवणं कठीण आहे.

परराष्ट्र धोरणाच्या एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर विद्यमान उपराष्ट्राध्यक्षांनी राष्ट्राध्यक्षांशी इतक्या उघडपणे असहमती व्यक्त केलेली दुसरी घटना आठवणं कठीण आहे.

ट्रम्प सहसा आपल्या वरिष्ठ सल्लागारांकडून पूर्ण निष्ठेची अपेक्षा करतात.

मात्र, मिडटर्म निवडणुकीचा निकाल मोठ्या प्रमाणात युद्धामुळे ठरला, या व्हान्स यांच्या मताशी त्यांनी सहमती दर्शवली.

तथापि, त्यांना पुन्हा तोच निर्णय घ्यायची संधी मिळाली तर ते पुन्हा तसंच करतील, असंही त्यांनी सांगितलं.

‘ट्रम्प यांच्यापेक्षा वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न’

ट्रम्प आपल्या सल्लागारांच्या निष्ठेला खूप महत्त्व देतात. व्हान्स यांच्या विधानाला पाठिंबा देणं, हे उपराष्ट्राध्यक्षांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास ट्रम्प त्यांना स्वतंत्र भूमिका घेण्याची मोकळीक देऊ शकतात, याचा संकेत मानला जात आहे.

पत्रकारांनी व्हान्स यांच्या त्या पोस्टबद्दल ट्रम्प यांना विचारलं, त्यात त्यांनी युद्धाला निवडणुकीच्या निकालांमागील कारण म्हटलं होतं.

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स

त्यावर ट्रम्प म्हणाले, “या विषयावर त्यांचं मत काय आहे हे मला माहिती आहे. मला वाटतं ते योग्य होतं. मी युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला याची जाणीव होती. आम्ही त्यांना (इराणला) अण्वस्त्र मिळवण्यापासून रोखलं आणि आता त्यांना कधीही अण्वस्त्र मिळणार नाही.”

सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजचे परराष्ट्र धोरण तज्ज्ञ डॅनियल बायमन यांनी म्हटलं की, व्हान्स यांचं हे वक्तव्य “ट्रम्प यांच्यापासून स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न” असल्यासारखं वाटतं.

बायमन पुढे म्हणाले की, जर व्हान्स राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले, तर ट्रम्प यांच्याशी तुलना करताना त्यांना अत्यंत नाजूक राजकीय समतोल साधावा लागेल.

हा समतोल व्हान्स यांच्या पोस्टमध्ये स्पष्टपणे दिसून आला. उपराष्ट्राध्यक्षांनी ट्रम्प यांचं नाव घेतलं नाही आणि निवडणुकीच्या निकालांवरील आपल्या विश्लेषणाचं श्रेय बहुतांश अज्ञात सर्वेक्षणकर्त्यांना दिलं.

रिपब्लिकन रणनीतीकार ॲशली डेव्हिस यांनी बीबीसीला सांगितलं की, व्हान्स यांनी “आपण पुढे काय करणार आहोत हे पाहण्यासाठी पहिला अंदाज घेऊन पाहिला आहे.”

इराण युद्धावर टीका करण्याबरोबरच व्हान्स यांनी पक्षासाठी एक राजकीय आराखडाही मांडला. त्यामुळे त्यांच्या संभाव्य राष्ट्राध्यक्षीय प्रचार मोहिमेची झलकही दिसून आली.

मतदारांचा पाठिंबा पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी पक्षासाठी चार सूत्री रणनीती मांडली:

  • युद्ध समाप्त करा.
  • जीवनावश्यक खर्च आणि महागाईवर लक्ष केंद्रित करा.
  • अमेरिकेला प्राधान्य द्या.
  • इस्रायलशी असलेल्या संबंधांमध्ये बदल करा.

या यादीतून राष्ट्रीय राजकारणात आल्यानंतरपासून व्हान्स ज्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहतात, त्याची झलक मिळते. भविष्यातील निवडणूक प्रचारातील भाषणांमध्ये ते मांडू शकतील अशा मुद्द्यांसारखे हे विचार वाटतात.

या प्रकरणावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी बीबीसीने व्हान्स यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला आहे.

पुढील राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीकडे लक्ष

अर्थात, पुढील राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीस अजून दोन वर्षांचा कालावधी आहे. व्हान्स निवडणूक लढवतील अशी अपेक्षा आहे, परंतु त्यांनी अद्याप याबाबत कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही.

सहकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, ते अद्याप यावर विचार करत आहेत. व्हान्स यांनी प्रत्यक्षात ट्रम्प यांच्याशी कितपत असहमती दर्शवली, याबाबतही चर्चा सुरू आहे.

‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, व्हान्स यांनी आपली पोस्ट ऑनलाइन प्रकाशित करण्यापूर्वी ट्रम्प यांना दाखवली होती.

पुढील राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीकडे लक्ष

दुसरीकडे, ट्रम्प आपली भूमिका बदलू शकतात आणि व्हान्स किंवा इतर कुणाचीही असहमती सहन केली जाणार नाही, असं स्पष्ट करू शकतात.

2028 मध्ये रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत ट्रम्प यांनी अद्याप कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत.

अनेक प्रसंगी ट्रम्प यांनी व्हान्स आणि परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांचं कौतुक केलं आहे, मात्र ते नेमकं कोणाला आणि केव्हा पाठिंबा देतील याबद्दल त्यांनी काहीही सांगितलेलं नाही.

आपल्या राजकीय चळवळीचं नेतृत्व पुढे कोण करेल, याबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये ट्रम्प यांना रस असल्याचं दिसतं.

अमेरिकेची राज्यघटनेची परवानगी नसतानाही ते तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता व्यक्त करत होते,

मिडटर्म निवडणुकांबाबत व्हान्स यांचं हे विधान अखेरीस फारसं महत्त्वाचं ठरणार नाही, असंही होऊ शकतं.

मात्र, 2028 च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीचा आणि ट्रम्प यांच्यानंतर रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व कोण करणार यावरील संघर्षाचा हा सुरुवातीचा संकेतही ठरू शकतो.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC