Source :- BBC INDIA NEWS
Ramayana: Rise of a Legend, Sony Pictures
हिंदूंचं पवित्र महाकाव्य असलेल्या रामायणावर आधारित हा भारतातील सर्वात महागडा चित्रपट आहे. दोन भागांत तयार करण्यात आलेल्या या चित्रपटावर सुमारे 500 दशलक्ष डॉलर (अंदाजे 4500 कोटी रुपये) खर्च झाल्याचं सांगितलं जातं.
जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. परंतु, समीक्षकांकडून या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत.
नितेश तिवारी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘रामायण : राइज ऑफ अ लेजेंड’ हा दोन भागांत तयार होणाऱ्या चित्रपटांपैकी पहिला भाग आहे. या चित्रपटात भारतातील अनेक मोठे कलाकार आहेत. त्यासाठी हॉलिवूडमधील व्हिज्युअल इफेक्ट्स तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे.
त्याचबरोबर, ऑस्कर पुरस्कार जिंकलेल्या 2 संगीतकारांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय आणि आदराचं स्थान असलेली रामायणाची कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
हिंदू धर्मातील महत्त्वाच्या महाकाव्यांपैकी एक असलेल्या रामायणाचा इतिहास अनेक शतकांचा आहे. ही कथा अनेक देशांमध्ये पोहोचली आहे. कविता, मंदिरांमधील शिल्पं, कठपुतळ्यांचे खेळ (शॅडो पपेट), लोकनाट्य आणि पिढ्यान्पिढ्या सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींमधून रामायण वेगवेगळ्या स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचलं आहे.
अनेक राजघराणी आणि साम्राज्यं, संस्थानं संपली, तरी रामायणाचं महत्त्व कायम राहिलं. या महाकाव्याने लोकांच्या धार्मिक श्रद्धेला आणि राजकीय चळवळींनाही प्रेरणा दिली आहे. दूरचित्रवाणी आणि चित्रपटांच्या माध्यमातूनही रामायणाची कथा सातत्याने नवीन स्वरुपात प्रेक्षकांसमोर आली आहे.
नितेश तिवारी यांच्या चित्रपटात प्रेम, कर्तव्य, वनवास आणि युद्धाची परिचित कथा पुन्हा पाहायला मिळते. देव आणि राक्षस, दिव्य अस्त्रं आणि बलाढ्य राज्यांच्या विश्वात ही कथा घडते.
Ramayana: Rise of a Legend, Sony Pictures
रणबीर कपूरने अयोध्येचा राजपुत्र भगवान राम यांची भूमिका साकारली आहे. राम यांना 14 वर्षांचा वनवास भोगावा लागतो. त्यावेळी ते पत्नी सीतेसह (साई पल्लवी) जंगलात राहायला जातात. परंतु, लंकेचा 10 तोंडांचा राजा रावण सीतेचं अपहरण करतो.
दक्षिण भारतातील लोकप्रिय अभिनेता यश याने रावणाची भूमिका साकारली आहे. रावण हा एक शक्तिशाली योद्धा असतो. त्याच्या अहंकारामुळे राम आणि रावण यांच्यात महायुद्ध होतं. हे युद्ध चित्रपटाच्या दुसऱ्या भागात दाखवण्यात येणार आहे. हा भाग पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा हे डीएनईजी या व्हिज्युअल इफेक्ट्स कंपनीचे प्रमुख आहेत. या कंपनीने ‘ड्यून’ आणि ‘इंटरस्टेलर’ यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांसाठी काम केलं आहे.
या चित्रपटाचं संगीत ए. आर. रहमान आणि हान्स झिमर यांनी एकत्रितपणे दिलं आहे. ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार जिंकणारे ए. आर. रहमान हे भारतीय संगीतकार आहेत.
तर ‘ग्लॅडिएटर’, ‘द डार्क नाइट’ आणि ‘ड्यून’ यांसारख्या गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटांना हान्स झिमर यांनी संगीत दिलं आहे. त्यांच्या संगीतामुळे हॉलिवूड चित्रपटांना एक वेगळी अशी नवीन ओळख मिळाली आहे.
राम वनवास संपवून अयोध्येत परतले, त्याचा आनंद म्हणून दिवाळी साजरी केली जाते. दिव्यांचा, प्रकाशाचा हा हिंदू सण असलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
परंतु, या चित्रपटाला आतापर्यंत संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
Ramayana: Rise of a Legend, Sony Pictures
एनडीटीव्हीचे समीक्षक सैबल चॅटर्जी यांनी या चित्रपटाला 5 पैकी 3 स्टार दिले आहेत. चित्रपटातील भव्य आणि नेत्रदीपक दृश्यांमुळे अनेकदा मूळ कथा मागे पडते, असं त्यांनी म्हटलं आहे. चित्रपटाचा अवाढव्यपणा हीच त्याची सर्वात उठून दिसणारी गोष्ट आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
परंतु, कलाकारांचा अभिनय प्रत्येक ठिकाणीसारखा ‘प्रभावी नाही’ म्हणजे अभिनयात सातत्य दिसत नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
‘हिंदुस्तान टाइम्स’चे समीक्षक ऋषभ सुरी यांनी मात्र या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्यांनी चित्रपटाला 5 पैकी 4 स्टार दिले आहेत.
“चित्रपटावर केलेला मोठा खर्च पडद्यावर स्पष्टपणे दिसून येतो”, असं त्यांनी म्हटलं आहे. कलाकारांचा अभिनय आणि व्हिज्युअल इफेक्ट्सचं त्यांनी कौतुक केलं. परंतु, चित्रपटाचा पहिला भाग संथ वाटतो आणि संगीतही फारसं प्रभावी नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या समीक्षक शुभ्रा गुप्ता यांनी या चित्रपटाला 5 पैकी 3 स्टार दिले आहेत. सुरुवातीला चित्रपटाचा प्रचंड भव्यपणा पाहून त्यांना काही शंका वाटल्या होत्या. परंतु, चित्रपट पाहताना त्यांचं मत हळूहळू बदललं. त्यांनी या चित्रपटाचं वर्णन ‘एक परिपूर्ण महाकाव्य’ (परफेक्ट इपिक) असं केलं आहे.
चित्रपटात प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी ‘जादूचे प्रसंग, थरार आणि साहस यांचा पुरेसा समावेश’ आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. चित्रपटाची कथा खूप मोठी असली, तरी ती हाताळताना दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी तिचा तोल जाऊ दिलेला नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
आंतरराष्ट्रीय समीक्षकांकडूनही या चित्रपटाबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
Ramanand Sagar Productions
‘द गार्डियन’मध्ये समीक्षक पीटर ब्रॅडशॉ यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्यांच्या मते, हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, उत्साह वाढवणारा आणि भव्य असं भारतीय महाकाव्य आहे.
रामांना वनवासात जावं लागण्यामागे राजघराण्यातील राजकारण आहे. या कथेत त्यांना शेक्सपिअरच्या नाटकांची आठवण झाली. तर सीतेला वाचवण्यासाठी राम करत असलेल्या प्रयत्नांमध्ये त्यांना ग्रीक महाकवी होमर यांच्या कथांची झलक दिसली. चित्रपटातील विस्तीर्ण निसर्गदृश्यं आणि काल्पनिक जगाची मांडणी पाहून त्यांना ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ आणि ‘द लायन किंग’ या चित्रपटांचीही आठवण झाली.
“हा चित्रपट म्हणजे एक विलक्षण साहसी अनुभव आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी या चित्रपटाला 5 पैकी 4 स्टार दिले आहेत.
परंतु, काही समीक्षकांना हा चित्रपट फारसा आवडलेला नाही. ‘आयजीएन’चे समीक्षक सिद्धांत अडलखा यांनी चित्रपटाला 10 पैकी 4 गुण दिले आहेत. चित्रपटातील ॲक्शन दृश्यं प्रभावी नसून ‘कृत्रिम’ वाटतात, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच, कॉम्प्युटरच्या मदतीने तयार केलेली दृश्यं ‘डोळ्यांना खटकतात’, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
WorldOfRamayana
‘नेक्स्ट बेस्ट पिक्चर’चे समीक्षक जिओव्हानी लागो यांनी या चित्रपटाला 10 पैकी 5 स्टार्स दिले.
आहेत. त्यांनी यशने साकारलेल्या रावणाच्या भूमिकेचं आणि ए. आर. रहमान व हान्स झिमर यांच्या संगीताचं कौतुक केलं आहे. परंतु, चित्रपटाची कथा खूप मोठी आणि विस्तृत असल्याने ती चित्रपटाऐवजी ‘गेम ऑफ थ्रोन्स’सारख्या वेब सीरिजच्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे दाखवता आली असती, असं त्यांना वाटतं.
चित्रपटाच्या इंग्रजी आवृत्तीसाठी कलाकारांच्या ओठांच्या हालचाली बदलण्यासाठी एआयचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रामुळेही चित्रपटावर टीका झाली आहे. हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना समजावा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचावा, यासाठी हा बदल केल्याचं दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी सांगितलं.
पण, समीक्षक सिद्धांत अडलखा यांनी या तंत्रावर टीका केली आहे. त्यांच्या मते, “कलाकारांच्या चेहऱ्यावरील स्थिर चित्रांवर विनोदी दृश्यांसाठी वापरतात तसे अतिशयोक्तीपूर्ण ओठांचे हावभाव लावल्यासारखं हे दिसून येतं.”
भारतात या चित्रपटाची तुलना रामायणाच्या आधीच्या आवृत्तींशी केली जात आहे. विशेषतः रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या दूरचित्रवाणी मालिकेशी त्याची तुलना होत आहे. सुमारे चार दशकांपूर्वी प्रसारित झालेल्या या मालिकेने संपूर्ण देशातील प्रेक्षकांना भुरळ घातली होती. त्या मालिकेत साधे सेट आणि त्यावेळच्या तंत्रज्ञानानुसार विशेष दृश्यांचा वापर करण्यात आला होता. आजच्या काळात हे सेट आणि दृश्यं जुनी वाटू शकतात.
ज्यावेळी 1987 मध्ये ही मालिका पहिल्यांदा प्रसारित झाली, तेव्हा रविवारी सकाळी संपूर्ण देशात जणू भक्तिमय वातावरण निर्माण व्हायचं.
मालिका सुरू होण्याच्या वेळी रस्ते ओस पडायचे, दुकानांचे शटर बंद व्हायचे आणि शेजारीपाजारी एकत्र येऊन टीव्हीसमोर बसायचे. काही प्रेक्षक तर मालिका सुरू होण्यापूर्वी आंघोळ करायचे, अगरबत्ती लावायचे आणि टीव्हीला हार घालायचे. जणू काही देवाची पूजा करण्यासाठी तयारी करावी, तशीच त्यांची ही मालिका पाहण्यासाठी तयारी असायची.
Monica Schipper/Getty Images
न्यूयॉर्क विद्यापीठातील माध्यम अभ्यासक अरविंद राजगोपाल यांनी 2019 मध्ये बीबीसीला सांगितलं होतं की, रामायण मालिका पाहण्यासाठी रेल्वे आणि बसही थांबवल्या जायच्या. प्रवासी खाली उतरून रस्त्याच्या कडेला असलेल्या टीव्हीवर ही मालिका पाहत असत.
सरकारी दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित झालेल्या या मालिकेचे एकूण 78 भाग होते. त्यातील काही भाग तब्बल 8 ते 10 कोटी लोकांनी पाहिल्याचा अंदाज आहे. त्या काळात भारतात टीव्ही असणं हीच मोठी गोष्ट होती. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येनं लोकांनी ही मालिका पाहणं थक्क करणारं आणि विशेष मानलं जातं.
या मालिकेतील कलाकारांनाही लोक देवासमान मानू लागले होते. रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांना पाहून लोकांच्या डोळ्यांत पाणी यायचं. काही जण तर त्यांच्या पाया पडायचे, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
आता नितेश तिवारी यांच्या नवीन चित्रपटात अरुण गोविल पुन्हा एकदा रामायणाशी जोडले गेले आहेत. यावेळी ते रामाचे वडील राजा दशरथ यांची भूमिका साकारत आहेत.
रामायणावर आधारित इतर चित्रपट आणि मालिकांनीही ही कथा वेगवेगळ्या पद्धतीने मांडली आहे. 1992 मध्ये भारत आणि जपानने मिळून ‘रामायण : द लिजेंड ऑफ प्रिन्स रामा’ हा अॅनिमेटेड चित्रपट तयार केला होता. हाताने चित्रं रेखाटलेल्या या चित्रपटात रामायणाची कथा सुंदर आणि तपशीलवार पद्धतीने दाखवण्यात आली होती.
नितेश तिवारी यांचा रामायण हा चित्रपट आधीच्या चित्रपट आणि मालिकांच्या तुलनेत खूप आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. परंतु, रामायणाची कथा आणि त्यातील पात्रं पाहत मोठ्या झालेल्या अनेक पिढ्यांच्या अपेक्षांचं ओझंही या चित्रपटावर आहे.
हा चित्रपट नेमका अशा वेळी प्रदर्शित झाला आहे, जेव्हा भारतात राम हे हिंदू धर्मीयांच्या ओळखीचं एक महत्त्वाचं प्रतीक बनले आहेत. मागील 15 वर्षांत रामायणावर केलेली वेगवेगळी भाष्यं किंवा नवीन पद्धतीने मांडलेल्या कथांवरूनही अनेकदा वाद निर्माण झाले आहेत.
Frazer Harrison/WireImage
2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ या रामायणावर आधारित आणखी एका मोठ्या बजेटच्या चित्रपटावरूनही अनेक मुद्द्यांवरून वाद निर्माण झाला होता. त्याला मोठ्या प्रमाणावर विरोधही झाला होता.
काही हिंदू संघटनांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. चित्रपटात हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला होता. तर काही समीक्षकांनी रावणाच्या व्यक्तिरेखेवर आक्षेप घेतला होता. रावणाला मुघल शासकांसारखं दाखवण्यात आलं असून, त्यातून मुस्लिमांविषयीचे जुने गैरसमज अधिक बळकट होतात, असं त्यांचं म्हणणं होतं. चित्रपटातील संवाद आणि व्हिज्युअल इफेक्ट्सवरही मोठ्याप्रमाणावर टीका झाली होती.
नवीन चित्रपटात रामायणातील ही पात्रं साकारणाऱ्या कलाकारांनाही या अपेक्षांचं मोठं दडपण जाणवत होतं.
रणबीर कपूरने बीबीसी एशियन नेटवर्कचे हारून रशीद यांना सांगितलं, “मला खूप भीती वाटत होती. कदाचित या भूमिकेसाठी माझं वय जास्त असेल आणि मला ही भूमिका योग्य प्रकारे साकारता येणार नाही किंवा मी त्याला न्याय देऊ शकणार नाही, असं मला वाटत होतं.”
रणबीरने ही भूमिका म्हणजे ‘आयुष्यात एकदाच मिळणारी संधी’ असल्याचं म्हटलं. परंतु, कोट्यवधी लोक ज्या व्यक्तीची देवाप्रमाणे पूजा करतात, अशा रामांची भूमिका साकारताना त्याला मर्यादा जाणवल्या. इतर चित्रपटांमध्ये मिळतं तसं आपल्या पद्धतीने भूमिका साकारण्याचं स्वातंत्र्य या चित्रपटात मिळालं नाही, असं त्यानं सांगितलं.
सीतेची भूमिका साकारणाऱ्या साई पल्लवीने सांगितलं की, हा अनुभव तिच्यासाठी केवळ अभिनयापुरता मर्यादित नव्हता, तर तो आध्यात्मिकही होता. धार्मिक वातावरणात वाढलेल्या साई पल्लवीने या भूमिकेकडे केवळ अभिनयाची संधी म्हणून पाहिलं नाही, तर स्वतःमध्ये बदल घडवण्याची आणि काहीतरी शिकण्याची संधी म्हणूनही पाहिलं.
चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी वाढू लागल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे लवकरच स्पष्ट होईल.
चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो, हे काहीही असलं तरी भारतासाठी हा एक महत्त्वाचा सांस्कृतिक क्षण आहे. अनेक पिढ्यांपासून लोकांच्या मनात असलेली रामायणाची कथा अभूतपूर्व स्वरूपात पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC




