Home LATEST NEWS ताजी बातमी रात्री जेवणानंतरही गोड किंवा चटपटीत खाण्याची इच्छा होते? जाणून घ्या यामागची...

रात्री जेवणानंतरही गोड किंवा चटपटीत खाण्याची इच्छा होते? जाणून घ्या यामागची कारणं आणि उपाय

7
0

Source :- BBC INDIA NEWS

रात्री जेवल्यावरही काहीतरी गोडधोड किंवा चटपटीत खावंसं वाटतं?

रात्री पोटभर जेवण झालंय, मस्त तृप्त वाटतंय; तरीही अर्ध्या तासात खाण्यासाठी स्वयंपाकघरात काहीतरी शोधत राहता? तुमच्या बाबतीत असंच घडतंय ना?

संशोधन असं सांगतं की, जवळपास एक-तृतीयांश लोक रोज रात्री जेवण झाल्यावर काही ना काही छोटंमोठं खातातच. 18 ते 24 वयोगटातील तरुणांमध्ये ही सवय इतकी जास्त आहे की, 5 पैकी 4 जणांना स्वतःचा हा मोह आवरताच येत नाही.

पण रात्रीच्या वेळीच अशी खाण्याची इच्छा का अनावर होते? आणि ही सवय वेळीच कशी नियंत्रणात आणायची?

संध्याकाळी भूक जास्त का लागते?

रात्री झोपेत आपण तासनतास उपाशी असतो, तरीही संध्याकाळ झाली की भूक जास्त जाणवते असं संशोधन सांगतं. मग दिवसभरात तुम्ही आधी कितीही खाल्लं असलं तरी त्याचा फारसा फरक पडत नाही.

आपलं शरीर अन्नाचा आणि ऊर्जेचा वापर कसा करतं, यावर अभ्यास करणारे बाथ युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जेम्स बेट्स सांगतात की, यामागचं एक मोठं कारण म्हणजे शरीरातील ‘हंगर हॉर्मोन’ म्हणजेच ‘घ्रेलिन’. संध्याकाळच्या वेळी शरीरात या हॉर्मोनचं प्रमाण नैसर्गिकरीत्या वाढायला लागतं.

जेवल्यामुळे हे हार्मोन नियंत्रणात येत असलं तरी हे फक्त सकाळच्या पहिल्या खाण्यानंतरच घडतं, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर नाही.

शिवाय तुम्ही ताटात काय वाढून घेता यावरही बरेच काही अवलंबून असते. भरपूर प्रोटीन, फायबर आणि पोट भरेल असा आहार घेतल्यास दीर्घकाळ तृप्त वाटतं.

रात्री जेवल्यावरही काहीतरी गोडधोड किंवा चटरपटर खावंसं वाटतं?

प्रा. बेट्स सांगतात की, रात्रीचं जेवण पोट भरणारं किंवा पौष्टिक नसेल तर काही वेळाने अचानक पुन्हा भूक तीव्र होते आणि लोक किचनमध्ये काहीतरी खायला शोधू लागतात.

काही लोकांच्या बाबतीत मात्र वेगळंच असतं. रात्री मधेच भूक लागून जाग येईल की काय, या भीतीपोटी ते खातात, तर काहींसाठी ही निव्वळ सवय बनलेली असते.

“तुम्ही जर सतत एकाच ठिकाणी बसून काहीतरी खात असाल तर आजूबाजूच्या गोष्टीच तुमच्या मनात खाण्याची इच्छा निर्माण करू लागतात,” असं भूक आणि आहाराच्या अभ्यासक, युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅमच्या प्रोफेसर सुझान हिग्ज सांगतात.

उदाहरणार्थ, टीव्ही बघता बघता काहीतरी चटपटीत खाण्याची जर कोणाला सवय असेल, तर निव्वळ टीव्ही चालू केल्यावरही त्यांना लगेच काहीतरी खावंसं वाटू शकतं.

गोड खाण्याचा मोह का आवरत नाही?

संध्याकाळच्या सुमारास केवळ भूकच वाढते असं नाही. तर जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाण्याची इच्छाही तीव्र होते असं संशोधन सांगतं. खरं तर शरीराला ऊर्जेची गरज असते म्हणून नाही, तर मेंदूच्या ‘रिवॉर्ड सिस्टीम’मुळे म्हणजे काहीतरी खाऊन मिळणाऱ्या तात्पुरत्या समाधानामुळे असं घडतं.

“कमी फॅट्स असलेल्या पदार्थांपेक्षा जास्त फॅट्स असलेले पदार्थ खाण्याची इच्छा आणि ओढ दिवसाच्या उत्तरार्धात किंवा रात्री जास्त जाणवते,” असं लीड्स युनिव्हर्सिटी आणि कॅनडाच्या मॉन्कटन युनिव्हर्सिटीत कार्यरत असलेल्या डॉ. ब्यूलियू सांगतात.

“फक्त जिभेचे चोचले पुरवण्याची ही इच्छा पोट भरल्याच्या संकेतांनाही बाजूला सारते. त्यामुळे पोट तुडुंब भरलेलं असलं तरीही आपल्याला काहीतरी स्नॅक्स किंवा गोडधोड खावंसं वाटतं.”

रात्री जेवल्यावरही काहीतरी गोडधोड किंवा चटरपटर खावंसं वाटतं?

रात्री पोटभर जेवल्यानंतरही साखर, फॅट्स किंवा मीठ जास्त असलेले पदार्थ मेंदूतील ‘रिवॉर्ड सिस्टीम’ सतत जागृत ठेवतात. म्हणूनच जेवण झाल्यावरही लोकांचे हात पुन्हा काहीतरी खाण्याकडे का वळतात याचं उत्तर यातच दडलेलं आहे.

त्यामुळे रात्री 9 वाजता तुम्ही बिस्किटांच्या डब्यासमोर उभे असाल तर तो तुमच्या इच्छाशक्तीचा अभाव आहेच असं नाही. तुमचं शरीरच त्या क्षणी तुमच्याविरुद्ध काम करत असतं.

रात्री काहीतरी खाल्ल्याने झोपमोड होते का?

याबाबतचे पुरावे संमिश्र आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की, रात्री उशीरा भरपेट जेवल्यास पचनक्रियेवर ताण पडतो आणि झोपेसाठी शरीराची जी नैसर्गिक पूर्वतयारी सुरू असते त्यात अडथळा येतो.

मग रात्रीच्या वेळी खाल्ल्या जाणाऱ्या छोट्या-मोठ्या स्नॅक्सचं काय? याबाबतचे संशोधन मात्र तितकेसे स्पष्ट नाही.

तरीही काही संशोधनांतून असं दिसून आलं आहे की, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स आणि जास्तीची साखर असलेले पदार्थ जसे की पांढरा ब्रेड, भात, बिस्किटे किंवा केक यांच्यामुळे झोपेची गुणवत्ता खालावू शकते.

रात्री जेवल्यावरही काहीतरी गोडधोड किंवा चटरपटर खावंसं वाटतं?

संशोधकांच्या मते याचं कारण असं असू शकतं की, अशा पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वर-खाली होते. शिवाय झोप आणि भूक नियंत्रित करणाऱ्या काही हॉर्मोन्सच्या संकेतांमध्येही यामुळे गडबड होऊ शकते.

मात्र यात नेमकं कारण कोणतं आणि परिणाम कोणता, हे शोधून काढणं थोडं कठीण आहे. कारण ज्यांची झोप नीट होत नाही ते गोड पदार्थ जास्त खाण्याची शक्यताही तितकीच असते.

“झोप अपुरी झाली की फक्त भूकच वाढत नाही तर जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाण्याची इच्छाही बळावते, हे आता सिद्ध झालेलं आहे,” असं सरे युनिव्हर्सिटीतील स्लीप आणि बॉडी क्लॉकचे तज्ज्ञ प्रोफेसर जोनाथन जॉन्स्टन सांगतात.

याचाच अर्थ रात्री उशिरा काही खाल्ल्याने झोपेवर नक्की परिणाम होतोच का, यावर ठाम निष्कर्षापर्यंत पोहोचणं खूप कठीण आहे, असं बेट्स सांगतात.

“याबाबतचे पुरावे अजिबात स्पष्ट नाहीत. कदाचित यातून असं दिसतं की, झोपण्यापूर्वी खाल्लेल्या वेगवेगळ्या पदार्थांवर प्रत्येकाच्या शरीराची प्रतिक्रिया ही दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळी असू शकते.”

काहीतरी खाण्याची सवय आरोग्यदायी कशी करायची?

सगळ्यात आधी, तुम्हाला खाण्याची इच्छा नक्की कशामुळे होतेय हे समजून घ्या.

  • जर खरंच भूक लागली असेल तर आधीच्या जेवणात पोट भरेल अशा पदार्थांचा समावेश करा.
  • जर निव्वळ सवयीपोटी खात असाल तर तुमची दिनचर्या थोडी बदला आणि रात्री काय खायचं हे आधीच ठरवा.

“लक्ष दुसरीकडे असताना खाणं जसं की टीव्ही बघता बघता खाणं. यामुळे लोक नकळत प्रमाणाबाहेर खातात. कारण आपण किती खाल्लं याकडे त्यांचं लक्षच नसतं,” असं हिग्ज सांगतात.

पण संध्याकाळी किंवा रात्री काहीतरी खाणं पूर्णपणे बंद करण्याची मुळीच गरज नाही, असं ब्यूलियू सांगतात.

  • आवडीचं काहीतरी माफक प्रमाणात खाणं हे जास्त काळ टिकून राहू शकतं.
  • घरात फळे, दही आणि ड्रायफ्रूट्ससारखे पौष्टिक पर्याय हाताशी ठेवा.
  • अगदी कधीमधी थोडं चॉकलेट खाल्लं तरी आभाळ कोसळत नाही…
  • क्रेव्हिंग होणारे पदार्थ अधूनमधून आणि प्रमाणात खाण्यात काहीच गैर नाही.

पौष्टिक पर्याय हाच तुमचा पहिला आणि सोपा पर्याय ठरला पाहिजे, असं त्या सांगतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC