Home LATEST NEWS ताजी बातमी शकुंतलाबाई नगरकर : ‘मला सगळे चौरंगी चिरा म्हणायचे’; लावणी घोळवणारी शेवटची अदाकारा

शकुंतलाबाई नगरकर : ‘मला सगळे चौरंगी चिरा म्हणायचे’; लावणी घोळवणारी शेवटची अदाकारा

6
0

Source :- BBC INDIA NEWS

शकुंतलाबाई नगरकर

शकुंतलाबाई नगरकर हे लावणीतलं एक मोठं नाव. 22 सप्टेंबर रोजी कॅन्सरच्या प्रदीर्घ आजारानंतर त्यांचं अहिल्यानगर जिल्ह्यातील राहत्या घरी निधन झालं.

मित्र आणि निर्माता या दुहेरी नात्यातून त्यांना जवळून ओळखणारे लेखक भूषण कोरगांवकर यांनी शकुबाईंच्या आयुष्याची धावती झलक आणि त्यांच्या लावणीची खासियत या लेखात उलगडून दाखवली आहे.

जन्म, बालपण आणि लावणीतलं पदार्पण

भातु कोल्हाटी या मूळच्या भटक्या, स्त्रीप्रधान जातीत शकुबाईंचा जन्म झाला. शकुंतला छबूबाई काळे हे त्यांचं मूळ कागदोपत्रीचं नाव. पण संगीत बारीच्या परंपरेनुसार त्या शकुंतला नगरकर झाल्या. कारण खरं आडनाव न लावता गावाचं नाव व्यावसायिक नावात वापरायची त्यांची पद्धत.

छबूबाई नगरकरांची स्वतःची संगीत पार्टी होती. आई, मावश्या, इतर मोठ्या कलाकार यांचं काम बघतच शकुबाई मोठ्या झाल्या. बुद्धी तल्लख, शाळेत जायची खूप आवड. विशेषत: मराठी आणि इतिहास-भूगोल हे अतिशय लाडके विषय. पण तिसरीत शाळा सोडून आईने जेव्हा पायात घुंगरू बांधले तेव्हा शिक्षण संपण्याच्या दुःखापेक्षा आपल्यालाही आता नाचगाणं करायला मिळणार या विचाराची खुशी मोठी होती.

“तेव्हा त्या वयात काय समजत होतं? आज वाटतं शिकले असते तर इंग्लिश बोलता आलं असतं. परदेशी लोकांत गेल्यावर नुसती तुमची तोंडं बघत बसावं लागलं नसतं,” शकुबाई हसतात.

आई, मावश्या, इतर मोठ्या कलाकार यांचं काम बघतच शकुबाई मोठ्या झाल्या.

त्याकाळात संगीत बारीची हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढीच थिएटर्स होती, मुंबई, पुणे, सोलापूर, बार्शी, परळी-वैजनाथ, सांगली, कोल्हापूर, आणि बेळगाव. (बाकी खानदेश, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात मुख्यत्त्वे दिवाणखाने चालत.) एका थिएटरला चार-पाच पार्ट्या (संच) आणि एका पार्टीत सात-आठ कलाकार अशी तेव्हाची पद्धत. (आज हेच आकडे एका कला केंद्रात 8-10 पार्ट्या, आणि एका पार्टीत पंधरा-सोळा कलाकार असे आहेत.)

संध्याकाळ झाली की, रोजचे स्टेज कार्यक्रम सुरू होत. सात वाजता पहिली बेल वाजली की एक पार्टी आपली सनगं (म्हणजे वाद्यं – पायपेटी, तबला, ढोलकी) घेऊन स्टेजवर यायची. तराणा, गवळण, नाचकाम, लावण्या, हिंदी-मराठी गाणी असा कार्यक्रम चालायचा. पाऊण तास झाला की पुन्हा बेल वाजायची. मग मुली, साथीदार स्टेजवरुन उतरायचे आणि दुसरी पार्टी आपला कार्यक्रम सुरू करायची.

प्रत्येक पार्टीला संधी मिळेस्तोवर हे सुरू राहायचं. बारीबारीने इथे नाचगाण्याचे कार्यक्रम चालतात म्हणून याचं नाव संगीत बारी. काही दर्दी लोक आपल्या आवडत्या पार्टीची खासगी बैठकही लावायचे. एक बैठक रात्रभर सुरू असे. (आज तासातासाच्या हिशोबाने बैठका होतात, स्टेज शो जवळपास बंदच झाले आहेत.) या बैठकांमधून, स्टेजवरून शकुबाईंची कला बहरत होती.

चौरंगी चिरा

शकुबाईंना नटूनथटून, नाचगाणं करायचा प्रचंड नाद होता. एका पायात चार चार किलोचे घुंगरू, नऊवार साडी, माफक मेकअप, बुचडा, गजरे असा दर संध्याकाळी साज असे.

कुठली पार्टी कशी झाली, कुणाला किती दौलतज्यादा मिळाला यावर लहानगी शकु बारीक लक्ष ठेवून असे. मग कुणी कुठलं गाणं घेतलं, ते कसं खेळलं, कुठल्या अदा किती वेळा कशा केल्या, कुठल्या अदेला जास्त पैसे मिळाले याची गणितं तिच्या डोक्यात सुरू होत.

भरपूर दौलतज्यादा झाला की आनंद, पण कमी झाला तर त्याच्या कारणांचा सतत विचार. नाच आणि गाणं सोडून दुसरा छंदच नाही. ईर्षा पण जबरदस्त होती. “हिला आज एवढे पैसे मिळाले, मी उद्या हिच्यापुढं जाऊनच दाखवणार,” शकुबाई डोळे मिचकावतात, “अशी लई ठसन केली.

वाईची गौरा सोडली तर जिवाभावाची दुसरी मैत्रीण कुणी नव्हती. पण दुश्मन चिक्कार होत्या.” पण ही सगळी दुश्मनी लुटूपुटूची – निव्वळ कलेच्या बाबतीत. आणि त्यांच्या मते या इर्षेचा त्यांची कला बहरण्यात मोठा हात आहे. समोर आव्हान नसेल, स्पर्धा नसेल तर पुढे जायची मौज कमी होते ना!

भातु कोल्हाटी या मूळच्या भटक्या, स्त्रीप्रधान जातीत शकुबाईंचा जन्म झाला. शकुंतला छबूबाई काळे हे त्यांचं मूळ कागदोपत्रीचं नाव. पण संगीत बारीच्या परंपरेनुसार त्या शकुंतला नगरकर झाल्या

“मला सगळे चौरंगी चिरा म्हणायचे,” त्या अभिमानाने सांगतात, “नृत्य, गायन, अदाकारी आणि रूप या चारही बाबतीत मी वरचढ होते.” आवाज सुराला एकदम पक्का आणि एवढा मोठा की अख्ख्या गावाला ऐकू जायचा.

सुरूवातीला मुंबईच्या हनुमान थिएटरला वसंतराव घाडगे आणि गोविंदराव निकम यांच्याकडून त्यांनी नृत्याचे धडे गिरवले. “मी क्वचितच चुकायचे. पण बाकीच्या पोरी घडीघडी चुकायच्या. मग आमच्या पायावर सपासप वेताच्या छड्या पडायच्या.”

शकुबाईंच्या चेहर्‍यावर हे सांगताना हसू असलं तरी त्याकाळात ते सहन करताना भरपूर रडून झालेलं आहे, “सुदैवानं माझं हे ट्रेनिंग चार महिन्यात संपलं. कारण पार्टी तिकडनं निघून परळी-वैजनाथला गेली. पण या चार महिन्यात पाय पक्के झाले.”

संगीत बारीत एका विशिष्ट प्रकारची कलाच बहरू शकते – ती म्हणजे लहानशा बैठकीत आपल्या गायन, अदाकारी आणि नृत्याने समोरच्याला गारद करायची. ही कला फारच कठीण आणि महत्त्वाची आहे. आजच्या काळात खूप दुर्मीळही आहे. पण एकदम मोठ्या स्टेजवर काम करायची वेळ आली तर असे कलाकार सुरूवातीला गडबडून जातात.

शेकडो प्रेक्षक समोर पहायची सवय नसते, माईक कसे वापरावेत, लाइट कसा घ्यावा याची माहिती नसते. शकुबाईंचं मात्र असं झालं नाही.

संगीत बारीचा उंबरठा ओलांडताना

महत्त्वाकांक्षी छबूबाईंनी भागीदारीत ढोलकी फडाचा तमाशाही सुरू केला होता. याचा व्याप आणि प्रेक्षकवर्ग संगीत बारीपेक्षा खूप मोठा असतो.

वगनाट्य, बतावणी, या गोष्टी इकडे नाचगाण्याइतक्याच महत्त्वाच्या. त्यामुळे उत्स्फूर्त बोलणं, संवादफेक, हजरजबाबीपणा या गोष्टींतही शकुबाई तरबेज झाल्या.

“लावणी माझा श्वास आहे” असं म्हणणार्‍या शकुबाईंना कारकिर्दीच्या सुरूवातीला लावणी जराही आवडत नव्हती.

1972 साली त्यांचं संगीत बारीच्या क्षेत्रात पदार्पण झालं तेव्हा सुरुवातीला त्यांना फक्त हिंदी गाण्यांचाच छंद होता. इकडे स्टेजवर आणि बैठकांमध्ये समोरचे लोक जी फर्माईश करतील तीच गाणी घ्यावी लागतात.

हिंदी सिनेमाच्या संगीताने समाजमनावर गारुड केलं तसं पारंपारिक लावण्या, छकडी, लोकगीतं, कव्वाल्या, गझला, नाट्यपदं आणि भावगीतांच्या जोडीला हिंदी आणि मराठी फिल्मी गाणी आणि फिल्मी लावण्यांची मागणी वाढू लागली. अर्थात ही सगळी गाणी इथे लावण्यांच्या ढंगातच खेळली जायची / जातात.

पायपेटी, ढोलकी, तबला आणि मुलींचा बुलंद आवाज यामुळे इथली हिंदी गाणी जवळपास लावण्याच वाटतात. पण कितीही झालं तरी शेवटी ती हिंदी गाणीच.

“ख्वाजा की दिवानी” ही शकुबाईंची हुकमी कव्वाली होती. त्यांच्या पहाडी आवाजात ती ऐकायला दूरदूरहून लोक यायचे. अभी जा रसिया, मधुबन मे राधिका, लग जा गले, शायराना सी है अशी अनेक गाणी त्यांच्या आवडीची पण त्यांचं सर्वात लाडकं गाणं होतं – “कही प्यार हो ना जाए”.

सखी माझी लावणी

1980 नंतर पारंपारिक लावण्यांची मागणी इतकी कमी झाली होती की तिला पुन्हा एकदा उर्जितावस्था आणण्यासाठी 1992 साली अकलूजच्या मोहिते पाटलांनी राज्यस्तरीय स्पर्धा सुरू केली. तेव्हा मज्जूशेठ तांब्यांनी आर्यभूषण थिएटरची ग्रुप पार्टी तयार केली. त्यात चंदाबाई, मोहनाबाई, पुतळाबाई यांच्यासह शकुबाईही होत्या. त्यावेळेस पहिल्यांदा शकुबाई रस घेऊन लावणी शिकल्या.

1997 साली मधु कांबीकरांनी 'सखी माझी लावणी' हा कार्यक्रम काढला तेव्हापासून खरोखरीच लावणी शकुबाईंची जीवनभराची सखी बनून गेली.

अनेक दिवस भान विसरून तालमी केल्या. त्याला फळही मिळालं. नंबर आला, कौतुक झालं आणि तेव्हापासून त्यांना लावणीची लज्जत समजली. जुन्या जुन्या लावण्या त्या कष्ट घेऊन मिळवू लागल्या. पुढे 1997 साली मधु कांबीकरांनी ‘सखी माझी लावणी’ हा कार्यक्रम काढला तेव्हापासून खरोखरीच लावणी शकुबाईंची जीवनभराची सखी बनून गेली.

या कार्यक्रमात लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, दिलजानबाई परितेकर, आशाबाई मुसळे, स्वतः मधुबाई यांच्याकडून जुन्या लावण्यांचा खजिनाच त्यांच्या हाती लागला.

केशवराव बडगे या राष्ट्रीय पातळीवरच्या कलाकाराचाही शकुबाईंच्या कारकीर्दीत मोठा हात आहे. त्यांच्यासोबत शकुबाईंनी लोककलेचे अनेक कार्यक्रम केले.

मोठा पुरस्कार आणि सक्तीची विश्रांती

पण पुढे बडगेकाका वारले, मधुबाईंचा कार्यक्रम बंद पडला. आता काय करावं हा प्रश्न उभा राहिला. सिनेमा-नाटकाच्या एक दोन ऑफर येऊन गेल्या. “पण व्यावसायिक दुश्मनीमुळे त्या माझ्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत”, शकुबाईंना नेहमीच याची खंत वाटत राहिली.

शकुंतलाबाई नगरकर

एक आनंदाची घटना म्हणजे 2008 साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला. तेव्हा भाचीच्या, म्हणजे बबलीच्या पार्टीत मालकीण म्हणून त्या काम सांभाळत होत्या.

सणसवाडीच्या जय अंबिका कला केंद्रात एक वर्ष मॅनेजर म्हणूनही राहिल्या. “सगळं ठीक सुरू असलं तरी या क्षेत्रात आता पूर्वीची रौनक राहिली नाही. इथला बेशिस्त कारभार मनाला पटत नाही,” हीच त्यांची खंत होती. त्यामुळे 2009 सालापासून नाईलाजाने त्या घरी बसल्या.

कुठवर पाहू वाट

उदासीने घेरलं. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. “ऐन जवानीत एका व्यक्तीच्या प्रेमात पडले होते. तो माणूस मनानं चांगला होता, दिसायलाही एकदम हीरो. त्याची इच्छा होती की मी नाचगाणं सोडून त्यानं घेऊन दिलेल्या घरात महाराणी म्हणून राहावं. जमीन नावावर करायलाही त्याची तयारी होती.

खरंच सांगते, खूप म्हणजे खूप इच्छा होती. एकदा तरी हे घरगुती आयुष्य जगून पहावंसं वाटत होतं. पण आई नाहीच मानली. कला महत्त्वाची.

तिचं म्हणणं की आपल्या घराण्याचं नाव रोशन झालं पाहिजे. खूप रडले. आणि मनावर दगड ठेवून त्या माणसाला नकार दिला. पुढे राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार घेऊन घरी आले, तेव्हा आईनं माझं दारातच औक्षण करून स्वागत केलं.

शास्त्रीय नृत्याच्या कितीतरी कलाकारांनी शकुबाईंकडून शृंगार रसाचे धडे गिरवले आहेत.

आई खूप खुश होती पण मला राहवलं नाही. म्हटलं, आता झालं का तुझं समाधान? झालं घराण्याचं नाव रोशन? काय करू आता या पुरस्काराचं? उरलंय का काही या क्षेत्रात माझ्या लायकीचं?” शकुबाईंसमोर आई निरुत्तर झाली.

खरंच काही उरलं नाही असं वाटण्यासारखी परिस्थिती तयार झाली होती. पुढची सहा वर्षं चांगल्या संधीची वाट पाहण्यात गेली. सिनेमा, नाटक, लावणी काहीही करायची त्यांची तयारी होती. हाती घेईल त्याचं सोनं करेन हा आत्मविश्वासही होता पण घडत काहीच नव्हतं.

कलेची घोडदौड

2014 साली एक छोटीशी घटना घडली ती त्यांच्या कारकीर्दीला कलाटणी देणारी ठरली. माझ्या ‘संगीत बारी’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात आम्ही लावणीचा एक छोटेखानी कार्यक्रम केला. तो प्रचंड यशस्वी झाला. तेव्हापासून आमचे कार्यक्रम, Lecture-demos, कार्यशाळा यांचं एक नवीन पर्व सुरू झालं.

मुंबई-पुणेच नाही तर दिल्ली, कलकत्ता, बंगलोर, मैसूर, चेन्नई, पोंडीचेरी, गोवा, अहमदाबाद, मेरठ, अगदी बर्लिन, सेंट पीटर्सबर्ग, शिवाय वेगवेगळ्या नृत्यशाळा, आंतरराष्ट्रीय महाविद्यालयं – आम्ही अनेक ठिकाणी पोहोचलो.

शकुंतला नगरकर हे वयाने, अनुभवाने, कामानेही मोठं, जुनं नाव पुन्हा नव्याने सगळ्यांच्या समोर आलं. हळूहळू इतर संधींचेही दरवाजे उघडू लागले.

उमेश कुलकर्णींचा ‘हायवे’ सिनेमा, निपुण धर्माधिकारीचा ‘मी वसंतराव’ आणि मुख्य म्हणजे ‘ढोलकीच्या तालावर’ या टीव्ही रियालिटी शोच्या परीक्षणाची दोन सत्रांमध्ये मिळालेली संधी. लोकप्रियता वाढत गेली. तशी कलेची पातळीही वाढतच गेली.

लावणी कशी खेळावी?

शकुबाईंच्या हुकमी लावण्या चिकार आहेत. नेसले पितांबर जरी, पाहुनिया चंद्रवदन, जाईल गं झोक, सख्या चला बागामंदी, शिवू नका, शुद्ध श्रावणमासी….यादी खूप लांबू शकते. तसं तर कुठलीही लावणी किंवा गाणं त्या अतिशय उत्तमपणेच खेळत. “लावणी करणं खूप सोपं आहे,” त्या आमच्या workshop मध्ये नेहमी सांगत, “बेसिक पाय शिकून घ्या. शब्द समजून घ्या, मग त्या शब्दानुसार अभिनय करा. झाली लावणी.”

“पण तुमच्यासारखी लावणी करायला, ती लेव्हल गाठायला काय करायचं?” एकदा कुणीतरी विचारलं.

“माझ्यासारखं आयुष्य जगायचं” त्यांनी अगदी खरंखुरं उत्तर दिलं, “म्हणजे मी काही खूप ग्रेट जगलेय असं नाही, प्रत्येकजण आपापलं आयुष्य जगतच असतो. प्रत्येकाच्याच आयुष्यात चढउतार असतात. पण माझे डोळे आणि कान नेहमी सताड उघडे असतात एवढंच. तुमच्या आयुष्यात तुम्ही जे अनुभव घेतलेत किंवा इतरांचे जे अनुभव पाहिलेत ते त्यात घातले की लावणी रंगणारच.”

काही काही प्रोजेक्टमध्ये फारशी तालीम न करताही त्यांनी अतिशय सरस काम केलेलं आहे.

तालमीलाही त्या नेहमीच प्रचंड महत्त्व द्यायच्या. “पण आमची तालीम रोज रोज बैठका करूनच होते. त्यासाठी सेपरेट वेळ काढायला इकडं कोणाला सवड नसते,” त्या सांगायच्या, “एखादी गोष्ट तुम्ही जितक्या वेळा कराल तितकी ती तुमच्या अंगात भिनत जाते. त्यामुळं लावणी आमच्या रक्तात भिनली तर त्यात काय नवल! पण रोजरोज करावं लागतं म्हणून कंटाळून जायचं की नवीन नवीन जागा काढून तिला जास्त सुंदर बनवायचं हे तुमच्या मनावर आहे.”

लावणी तीच, प्रयोग निराळे

काही काही प्रोजेक्टमध्ये फारशी तालीम न करताही त्यांनी अतिशय सरस काम केलेलं आहे. परोमिता व्होरा यांच्या दिग्दर्शनाखाली आम्ही दोन व्हीडिओ केले. Consent लावणी आणि Complaint लावणी. बायकांची संमती आणि बायका पोलिस स्टेशनला आपल्या तक्रारी घेऊन जातात तेव्हा काय घडतं आणि काय घडलं पाहिजे असे हे विषय.

या दोन्ही लावण्यांच्या वेळेस आम्ही मोजून प्रत्येकी दीड दिवस तालमी केल्या आणि एकेक दिवस शूट. फक्त पाच दिवस काम. Complaint लावणीची तर चाल लावण्यातही शकुबाईंचा सहभाग होता. सगळं काम झटपट पण चोख. वाचकांनी हे दोन्ही व्हीडिओ यूट्यूबवर आवर्जून पहावेत.

“त्या एका कोपर्‍यात शांत बसलेल्या असल्या तरी त्यांचा लार्जर दॅन लाईफ ऑरा काही लपून राहू शकत नाही.” परोमिताचं ठाम मत आहे, “काही काही कलाकार इतके ग्रेट असतात की त्यांच्या काही न करण्यातसुद्धा कला ठासून भरलेली असते आणि ती समोरच्याला नेहमीच अवाक् करून सोडते.”

शकुंतलाबाई नगरकर

शास्त्रीय नृत्याच्या कितीतरी कलाकारांनी शकुबाईंकडून शृंगार रसाचे धडे गिरवले आहेत. वैभव आरेकरांसोबत आम्ही ‘शृंगाररंग’ नावाचा लावणी-भरतनाट्यम असा एक कार्यक्रम करायचो. त्यात ‘रुसली राधा’ या पदावर बाईंनी तासाभरात नाच बसवला आणि तो दुसर्‍या दिवशी पेश केला.

अर्थात नेहमीच्या सहजतेने आणि हुकमी टाळ्यांच्या गजरात. या सगळ्या गाण्यांमध्ये निदान भाषा मराठी आणि शब्द सहज कळण्याजोगे. पण एकदा एका हॉटेलमध्ये एक चायनीज ग्रुप आला होता. रात्री कॅम्प फायरच्या वेळेस त्यांनी त्यांचं गाणं सुरू केलं आणि त्या तालावर शकुबाई उत्स्फूर्त नाचू लागल्या. माणसं प्रचंड खुश झाली.

“या बाईंना नक्कीच हे आमचं चायनीज गाणं आधीपासून माहीत असणार, त्याशिवाय इतके अचूक हावभाव येऊच शकणार नाहीत,” त्यांच्या ग्रुपमधली एक बाई मला म्हणाली. मी तिला म्हणालो की हे गाणं सोडाच, ही भाषाही त्या आयुष्यात पहिल्यांदा ऐकतायत.

नाचता नाचता शकुबाईंनी हातावर भोवरा नाचवायची अदा सुरू केली. “ओह माय गॉड,” चायनीज बाई किंचाळली, “या गाण्यात बॅलन्सचा उल्लेख आहे. या बाई म्हणजे कमाल आहेत कमाल! कशी समजत असेल त्यांना आमची भाषा?”

“गाण्यांची पण एक भाषा असतेच ना,” शकुबाईंचं उत्तर, “आणि अख्खं आयुष्य तालासुरात घालवल्यावर ती समजली नाही तर काय मजा!” बाईंचा भोवरा गरगर नाचत होता आणि सगळा ग्रुप दंग होऊन पाहत होता.

हुकमी लावण्या, हुकमी अदा

असाच भोवरा शकुबाई ‘जाईल गं झोक सांभाळ तोल” या लावणीतसुद्धा नाचवायच्या. ‘दहा वर्षाच्या पोरी लहान’ हे शब्द आले की बाई लावणी घोळवायला घ्यायच्या. आजच्या सुपरफास्ट लावण्यांच्या जमान्यात ‘घोळवणं’ बाद झालंय, नुसतंच ‘चाळवणं’ उरलंय. पण एकेकाळी “घोळली नाही तर कळलीच नाही” ही लावणीची खरी ओळख होती. एकेक लावणी एकेक तास घोळली जायची.

घोळवणं म्हणजे एका शब्दाचे किंवा ओळीचे अनेक पदर आपल्या अभिनयातून दाखवणं, त्याची एक गोष्ट बनवून ती सांगणं. उदा. दहा वर्षाच्या पोरी लहान, या ओळींमध्ये दहा वर्षाच्या पोरींचं अख्खं विश्वच शकुबाई आपल्या अदाकारीतून उभं करायच्या.

या दहा वर्षाच्या मुली काय काय करतात, त्यांची अल्लड चाल, बिनधास्त नाकात बोटं घालणं, फतकल मारून बसणं, मैत्रिणींना चिडवणं आणि वेगवेगळे खेळ खेळणं. या खेळात भोवरा, फुगड्या, आंधळी कोशिंबीर, लंगडी, पकडापकडी, टिप्पर आणि शकुबाईंच्या आवडत्या गोट्या. गोट्या खेळायला घेतल्या की बाईंना जोर यायचा. मग एखाद्याकडे जाऊन गोट्या द्या असं खुणेने म्हणायचं.

समोरचाही खिशातून दिल्याची अ‍ॅक्टिंग करणार. मग सगळ्यांच्या गोळा करून खेळाला सुरुवात. एकदा एक जण गोट्या मागताच म्हणाला, “सॉरी – विसरलो” तशा बाई म्हणतात, “कोण विसरलं? तुम्ही की देव?” सगळं प्रेक्षागृह खदखदून हसायला लागलं.

शकुंतलाबाई नगरकर

“पाहुनिया चंद्रवदन, मला साहेना मदन” या लावणीत शकुबाईंची ठरलेली अदा होती. लावणी संपत आली की त्या खुणेनेच एखाद्याला विचारायच्या, मला फिरायला घेऊन जाता का? मग तो हो म्हणाला की पुढचा प्रश्न – कुठल्या वाहनाने नेणार? मग सायकल, स्कूटर, रिक्शा, गाडी एकेका वाहनाची अॅक्टिंग करून त्यांना नाकारलं जायचं आणि अगदी शेवटी विमानाची अ‍ॅक्टिंग करून – असं विमानाने नेणार असाल तरच मी येणार असं म्हणून लावणी संपवली जायची.

हे सगळं न बोलता, फक्त ढोलकी आणि डग्गा-तबल्याच्या साथीने केल्या जाणार्‍या अभिनयावर चालतं. काही काही प्रेक्षक आमचे कार्यक्रम इतक्या वेळा बघतात की त्यांना सगळ्या लावण्या, सगळ्या अ‍ॅक्शन्स पाठ होऊन जातात. त्या दिवशी पहिल्या रांगेत बसलेल्या एकाने बाईंच्या आधीच उठून उभा राहून विमानाची अदा केली.

एका अर्थाने बाईंचं गुपित आधीच उघड केलं. क्षणभर बाई गडबडल्या पण लगेच त्याला ठेंगा दाखवून एक हात आडवा करून, तो भिरभिर फिरवत, त्याला खालून एक बोट लावून हेलिकॉप्टरची अदा केली.

‘स्नेह तोसि केला’ ही त्यांची लावणीही अशीच रंगणारी. त्यात सुरुवातीच्या अंतर्‍यांमध्ये सासुऱवाशिण बाईचा होणारा छळ डोळ्यातून पाणी काढतो. नंतर ती बाई जेव्हा सहनशक्तीचा अंत होऊन पेटून उठते तेव्हा तिची ‘काळी जादू’ आणि ‘चेटूक’ पाहून कित्येक प्रेक्षकांना अस्वस्थ वाटू लागायचं, भीतीने कित्येक लोक गारठून जायचे. पण त्याच क्षणी लावणीचा मूड बादलायचा.

हा संसार, ही सगळी मोहमाया आहे, नव्हे हा तर विटीदांडू आणि भोवर्‍याचा खेळच आहे, तो मजा घेऊन खेळा असा तिचा शेवटचा अंतरा आहे. त्यात विटीदांडूचा खेळ अनेक मिनिटं घोळवला जायचा. खेळत खेळत जेव्हा अगदी शेवटी ती विटी दांडूला लागून शकुबाई टोलवायच्या तेव्हा त्या बघतील त्या दिशेला झाडून सगळ्या प्रेक्षकांच्या माना फिरायच्या. प्रत्यक्षात नसलेली विटी अक्षरश: समोर प्रकट व्हायची.

शकुंतलाबाई नगरकर

‘वद जाऊ कुणाला शरण’ हे नाट्यगीत ज्या लावणीवरून बेतलंय ती ‘नेसले पितांबर जरी’ ही शकुबाईंची अशीच एक हातखंडा लावणी. त्यातल्या ‘दोन्ही भिवया-कमलावरून’ या ओळींवर एकापाठोपाठ एक डौलदार हलणार्‍या बाईंच्या भुवया पाहताच लोक वेडे व्हायचे.

‘आला चैत्रमास उन्हाळा’ या ओळींवर बाई उन्हाची काहिली वाढल्याचा अभिनय इतका अफाट करायच्या की बसल्या जागी, एसी हॉलमध्ये लोकांना घाम फुटायचा. पण पुढच्याच ‘हवा खाऊ चला आंबेवना’ या ओळीला बाईंचा खट्याळपणा जागृत व्हायचा. आंब्याचा आकार हातांनी दाखवून, डोळ्यांच्या खुणा झाल्या की प्रेक्षकांना गुदगुल्या झाल्याच म्हणून समजा. पण सगळे वाट पहायचे ती या

लावणीच्या शेवटच्या अंतर्‍याची. ‘आम्ही काशीचे ब्राह्मण’ हे तीनच शब्द. पण ते जवळपास दहा मिनिटं घोळवले जायचे. हे ब्राह्मण संध्या कशी करतात, धोतर कसे नेसतात, जपमाळ कशी ओढतात, गिर्हाइकं कशी हेरतात, ध्यान लावतालावता हळूच डोळे किलकिले करून एखाद्या पोरीला कसं हपापल्या नजरेने पाहतात, मग स्वतःचीच चोरी ध्यानात येऊन तोंडात कसे मारून घेतात, याचं हुबेहूब दर्शन त्या घडवायच्या. काही वेळाने समोर एक सजलेली, सुंदर बाई नसून ढेरपोट्या, उघडाबंब, चतुर ब्राह्मण आहे असंच वाटू लागायचं.

एका कार्यक्रमाला माझा एक डॉक्टर मित्र त्याच्या काकांना घेऊन आला होता. शकुबाईंनी नेहमीप्रमाणे लावणी मध्येच थांबवून प्रेक्षकांशी संवाद साधायला सुरुवात केली. त्यात नेमकं हेरलं ते या काकांना. त्यांची यथेच्छ खिल्ली उडवली. पण काका प्रचंड खुश झाले. कार्यक्रम संपल्यावर बाईंसोबत सेल्फी काढली आणि सगळ्यांना फोन करून स्वतःचा पराक्रम सांगू लागले.

आयुष्यात प्रथमच कुणीतरी त्यांच्याशी एवढ्या सलगीने बोललं होतं. दुसर्‍या दिवशी त्यांना माइल्ड हार्ट अटॅक आला. डॉक्टर मित्र म्हणाला, अचानक खूप खुशी झाली तरी असं घडतं. पुढे सुदैवाने ते बरे झाले. पण शकुबाईंचा तीर अगदी शब्दशः त्यांच्या हृदयात घुसला हे खरं.

स्पर्शाची अ‍ॅलर्जी

आमचे कार्यक्रम झाले की बाईंच्या भोवती त्यांच्या नव्या-जुन्या चाहत्यांचा गराडा नेहमीचा. त्यात बायका-मुलींची संख्या जास्त. अख्खी जवानी पुरुषांसमोर लावणी खेळण्यात घालवलेली. सुरूवातीला प्रेक्षकांत बायकांना पाहून त्यांना (आणि बाकीच्या कलाकारांनाही) अदा करायला अवघड जायचं. पण हळूहळू त्यांना सवय झाली. आपल्या लावणीने बायका मुलीही तितक्याच घायाळ होतात, तितक्याच चेकाळतात, आणि खुश झाल्या की त्यांचेही खिसे (किंवा पर्स) तितकेच सैल होतात हे लक्षात आल्यावर त्यांची भीड चेपली गेली आणि त्यांची लावणी अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक बनली.

बायका-मुलींची दाद त्यांना जास्तच आवडायला लागली. यातल्या अनेक जणी, विशेषत: त्यातल्या शास्त्रीय नृत्यांगना आणि नट्या आधी बाईंच्या पाया पडायच्या आणि मग मिठया मारायच्या. काहीजणी तर गालावर, हातावर पप्प्या पण द्यायच्या. शकुबाई हसतमुखाने सगळे लाड करवून घ्यायच्या. पण मला त्यांची एक खोड माहित होती. त्यांना कुठल्याच माणसाचा, अगदी स्वतःच्या मुला-मुलींचाही स्पर्श नकोसा होता. कुणीही लाडात आलेलं, अंगचटीला आलेलं त्यांना अजिबात चालत नसे.

शकुंतलाबाई नगरकर

“मग फॅन्सकडून हे बरं आवडीने करून घेता?” मी त्यांना विचारलं. “काय करू मग? त्या एवढं प्रेमाने जवळ घेतात, इज्जत देतात, मग त्यांना नाही म्हणून त्यांचं मन कसं दुखवू?” त्या म्हणाल्या, “खरं विचारशील तर मला ते आजही नकोसंच वाटतं पण आपल्याच लेकराची शी-शू कशी आपण निमूट काढतो तसे हे यांच्या मिठया आणि पाप्या मी चालवून घेते. शेवटी आपण कलाकार आणि रसिक प्रेक्षक ही आपली लेकरं.”

स्पर्श नकोसे वाटण्यात जवानीतल्या वाईट अनुभवांचा हात असेल का?

“छे छे,” बाईंचं उत्तर, “माझी नजरच एवढी कडक होती की कुठल्याच पुरुषानं कधी हिंमतच केली नाही मला हात लावण्याची. हात तर सोड, गुंड लोक बी मला बघूनच दूर पळायचे. यामुळे नुकसानही झालं. आमच्या पार्टीच्या बैठका थोड्या कमीच झाल्या असतील पण इज्जतीने पैसा मिळवलेला बरा. हो की नाही?” शकुबाई नेहमीच क्लियर होत्या.

व्यवहार आणि दुनियादारी

हिशोबाच्या बाबतीतही त्या चोख होत्या. आपला हक्काचा, कष्टाचा एकही पैसाही सोडणार नाही, पण दुसर्‍याच्या वाटणीचा एक पैसाही आपल्याकडे ठेवणार नाही. प्रत्येकालाच आपल्याला मिळतेय ती बिदागी आपल्या योग्यतेच्या मानाने थोडी कमीच आहे असं वाटत असतं. पण शकुबाई त्याला अपवाद होत्या.

ज्या दिवशी त्यांच्याकडून कामात काही चुका झाल्या असतील (ज्या प्रेक्षकांपैकी कुणालाच कधी कळल्या नाहीत) त्या दिवशी त्या नेहमी बोलून दाखवायच्या, “आज हजार रुपये काप बरं का माझे. म्हणजे पुढच्या वेळेस ही चूक होणार नाही माझ्याकडनं!”

आम्ही स्टेज कार्यक्रम करतो, तसंच लोकांच्या घरी जाऊन, किंवा हॉटेलमध्ये खाजगी बैठकाही करतो. अशा बैठकांमधून सलग नाचगाणी सुरू असतात. फर्माइशी येत राहतात, लोकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. पुष्पा, गौरी, गीता, लता, अक्षय, मिराबाई यासारख्या कलाकारांना याची सवय असते आणि अशा बैठकांमधून तेच अथक नाचतात-गातात.

आमचे साथीदार म्हणजे चंद्रकांत, विनायक, सुमितही वाजवण्याच्या बाबतीत कधी थकत नाहीत. शकुबाई मात्र अशा ठिकाणी मोजक्या दोन किंवा तीन लावण्या करत. अशा वेळेस त्या नेहमी म्हणायच्या “बैठका असतील तेव्हा मला अर्धच पाकीट देत जा, पोरीच नाचतात, मी फुकटचे एवढे पैसे घेतेय असं वाटतं.” तेव्हा मी, कुणाल, गीतांजली, अनिता वगैरे त्यांना समजावून सांगायचो – “तुमच्या ‘एका’ लावणीत सुद्धा ती ताकद आहे, त्यामुळे असा विचारही तुम्ही मनात आणू नका.”

लावणीतलं खरंखुरं माणूसपण

त्यांच्या लावणीचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे काही सेकंदातच त्या समोरच्याशी कनेक्ट होऊन जायच्या. याचं कारण त्या जाणूनबुजून दाखवत असलेली स्वतःची खरीखुरी vulnerability – मग ती विरहाने तळमळणारी नायिका असो, पोरींना डोळे मारणारा काशीचा ब्राह्मण असो की सख्याला ऑर्डर सोडणारी खमकी नायिका. त्यातल्या मूळ खट्याळ किंवा आगाऊ किंवा नालायक अशा कुठल्याही स्वभावविशेषाला अधोरेखित करतं ते त्याच्यामागचं माणूसपण – धडपडणारं, खरचटणारं, हताश होणारं पण डोळे पुसून पुन्हा नव्या दमाने उभं राहणारं, जगत राहणारं. हे असं रसरसलेलं माणूसपण त्यांच्या लावणीत हमखास दिसून यायचं आणि म्हणूनच ते चटकन भिडायचं.

शकुबाईंना खरं तर पूर्ण वेळ फक्त कलाकार म्हणून जगायलाच आवडत होतं. जवानीतल्या प्रेमाच्या भरात लावणी सोडायला निघालेल्या शकुबाईंना उतार वयात तिला सोडणं अजिबात मान्य नव्हतं. कॅन्सरने एकदा नाही, दोनदा नाही, तीन वेळा त्यांच्यावर हल्ला चढवला. पण तीनही वेळा त्या त्याला पुरून उरल्या.

ऐन कीमोथेरपीच्या दरम्यानही कार्यक्रम करत राहिल्या, वर्कशॉप्स घेत राहिल्या. “कला हीच माझी ताकद आहे,” त्या नेहमी म्हणायच्या. त्यांच्या डॉक्टर्सचंही हेच मत होतं. त्यांचं आजारपण, त्यांच्या कुटुंबाने, विशेषत: मुलीने त्यांची केलेली सेवा आणि स्वतः शकुबाईंची अत्यंत खंबीर मनोवृत्ती हा तर एका स्वतंत्र लेखाचाच विषय आहे.

शकुंतलाबाई नगरकर

आई, बहिणी, भाऊ, त्यांची आणि स्वतःची मुलं-बाळं असं त्यांचं भलंमोठं कुटुंब त्या बहिणींच्या साथीने सांभाळत आल्या. प्रेमाने, पण त्याहून जास्त शिस्त आणि कर्तव्याच्या भावनेने. शिस्त हे त्यांच्या स्वभावाचं एक प्रमुख वैशिष्ट्य होतं.

लावणी खेळता खेळता स्टेजवरच मरण यावं ही त्यांची शेवटची इच्छा अधुरी राहिली. परंतु सर्व जगाने आपल्याला एक मोठी कलाकार म्हणून ओळखावं ही त्यांची इच्छा पूर्ण होता होताच त्यांना मरण आलं. हॉस्पिटलमध्येही त्यांचा गमत्या स्वभाव, गाणं म्हणायची आवड कमी झाली नव्हती. “दुखणं तर असतंच. म्हणून काय रडत बसायचं? अरे हट!” त्या हसायच्या.

अशा होत्या शकुबाई! एकमेवाद्वितीय! लावणी घोळवणार्‍या पिढीतल्या शेवटच्या कलाकार. पुढे ही शैली टिकेल का? लावणीतलं लावण्य किती शिल्लक राहील? शकुबाईंना अतिशय प्रिय अशा लावणीतल्या नजाकत आणि ठेहराव या गोष्टी नमुन्याला तरी उरतील का?

शकुबाईंबद्दल बोलताना भूतकाळ वापरायला जड जातंय. त्या आजही आपल्यात आहेत असा भास होत राहतो. कदाचित हीच त्यांच्या कलेची ताकद आहे. जो ‘काळ’ विसरायला लावतो तो ‘कला’कार असतो. शकुबाईंना पाहताना काळाचं भान गळून पडतं. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना नुसता भूतकाळ आणि वर्तमानकाळच नव्हे तर भविष्यकाळही वापरला गेला तरी ते योग्यच राहील. आपल्याला, लावणीला, कलाक्षेत्राला नेहमीच शकुबाईंची गरज भासेल. त्या आपल्या स्वप्नांत आणि आठवणींत कायम जिवंत राहतील.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC