Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे
ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन म्हणजेच आयसाच्या अध्यक्ष नेहा बोरा जुलैमध्ये दिल्लीच्या जंतर-मंतर येथे सुरू झालेल्या आंदोलनानंतर प्रकाशझोतात आल्या.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेही याच आंदोलनानंतर राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले. दोघेही तरुण नेते आहेत. परंतु, त्यांच्या संघटना वेगवेगळ्या आहेत. दोघांनीही अनेकवेळा स्वतंत्रपणे आंदोलनं केली आहेत.
अशा परिस्थितीमध्ये सोशल मीडियावर अनेकजण दोघांची तुलना करू लागले आहेत. त्यापैकी कोण अधिक प्रगल्भ आहे, अशी चर्चा केली जाते.
शनिवारीही (3 ऑक्टोबर) सोशल मीडियावर अशाच काही पोस्ट करण्यात आल्या. या पोस्टवर अभिजीत दिपके यांच्यासोबत नेहा बोरा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
अमोक नावाच्या एका ‘एक्स’ यूजरने नेहा बोरा यांचा फोटो पोस्ट करत लिहिलं, “प्रगल्भता म्हणजे नेहा बोरा, त्या अभिजीत दिपके यांच्यापेक्षा जास्त प्रतिभावान आहेत. त्या जेन झीच्या आयकॉन आहेत आणि त्यांचा स्वॅगही जबरदस्त आहे.”
ही पोस्ट अभिजीत दिपके यांनी रिपोस्ट केली आणि “मी या मताशी सहमत आहे,” असं लिहिलं.
या पोस्टनंतर काही वेळाने नेहा बोरा यांनी ‘एक्स’वर लिहिलं, “तुलना नको, एकजूट हवी. आपण याविरोधात मिळून लढू.”
त्यावर अभिजीत दिपके यांनी ‘इन्कलाब जिंदाबाद’ असं उत्तर दिलं.
मात्र, काही लोक नेहा बोरा आणि अभिजीत दिपके यांच्याकडे एकत्रितपणे पाहत आहेत. अर्थशास्त्रज्ञ जयती घोष यांनी ‘एक्स’वर लिहिलं, “भारताच्या भविष्यासाठी नेहा बोरा आणि अभिजीत दिपके यांच्यासारख्या निर्भीड आणि समर्पित तरुणांकडून आम्हाला आशा आहे.”
फोटो स्रोत, Getty Images
सौरभ-आशुतोष यांच्या निशाण्यावर कोण?
सीजेपीचे सहसंयोजक आशुतोष रांका यांनी आपल्या एका पोस्टमध्ये लिहिलं की, स्वतःला उदारमतवादी म्हणवणारे लोक अभिजीत दिपकेंना नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये लिहिलं, “स्वतःला उदारमतवादी म्हणवणारा एक गट अभिजीत दिपके यांच्यावर टीका करण्यासाठी सक्रिय झाला आहे. अनेक वर्षांनंतर अभिजीत दिपके लाखो भारतीयांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाले आहेत, याचाही या गटाला त्रास होत आहे. गंमत म्हणजे हा सगळा गट केवळ ‘एक्स’वरच दिसतो, पण लोकशाही वाचवण्याची जबाबदारी फक्त आपलीच आहे, असा त्यांचा समज आहे.”
आशुतोष यांच्या पोस्टला रिपोस्ट करत सीजेपी नेते सौरव दास यांनी लिहिलं, “ही एक खूप मोठी समस्या आहे. केवळ भाजपच नव्हे, तर दुसऱ्या एका पक्षातही असा एक विशिष्ट गट आहे ज्यांना असं वाटतं की, भारत आणि संविधान वाचवण्याची जबाबदारी केवळ त्यांचीच आहे. ते स्वतःला उदारमतवादी आणि संविधानाचे स्वयंघोषित रक्षक मानतात.”
“हा गट अत्यंत कटू वातावरण तयार करणारा आहे. कधी-कधी तो भाजपच्या इकोसिस्टिमपेक्षाही अधिक आक्रमक दिसतो. अशा प्रकारे लोकांमध्ये फूट पाडून आपला प्रभाव कायम ठेवता येणार नाही, हे त्यांनी समजून घ्यायला हवं.”
“गेल्या काही वर्षांतील त्यांच्या अपयशांमुळे आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, आता तरुणांना मार्ग दाखवावा लागत आहे. त्यामुळे त्यांनी आमच्याबद्दल गप्प राहावं आणि तरुणांना कसं पाठबळ देता येईल, यावर लक्ष द्यावं. हे लोक परिस्थिती समजून घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत,” असं मत सौरव दास यांनी व्यक्त केलं.
अभिजीत दिपके
अभिजीत दिपके हे एक तरुण दलित नेते आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपली वाटचाल सुरू केली आणि आपल्या साध्या व सहज वागण्यामुळे ते लोकांशी जोडले गेले.
अभिजित दिपके यांनी याच वर्षी मे महिन्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’ची स्थापना केली होती.
हे सोशल मीडिया अकाउंट सरन्यायाधीश (सीजेआय) सूर्यकांत यांच्या एका वक्तव्याला उत्तर म्हणून सुरू करण्यात आलं होतं. त्यांनी देशातील काही बेरोजगार तरुणांना ‘कॉकरोच’ म्हटलं होतं. त्यावर उपहासात्मक प्रत्युत्तर म्हणून हे अकाउंट सुरू करण्यात आलं होतं.
पण नंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण देत आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला, असं सांगितलं होतं.
विद्यार्थ्यांमध्ये ओळख निर्माण करण्यापूर्वी दिपके हे डिजिटल राजकीय संदेश तयार करणे, सोशल मीडियावर मुद्दे मांडणे आणि ऑनलाइन मोहिमांची रणनीती आखणे या कामासाठी ओळखले जात होते.
त्यांनी पुण्यातून पत्रकारितेची पदवी घेतली आहे. तसेच, बोस्टन युनिव्हर्सिटीतून पब्लिक रिलेशन्समध्ये दोन वर्षांची पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
फोटो स्रोत, Getty Images
विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ काही दिवस ऑनलाइन आवाज उठवल्यानंतर दिपके याच वर्षी जूनमध्ये भारतात परतले. त्यानंतर त्यांनी जंतर-मंतर येथे झालेल्या सीजेपीच्या पहिल्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं.
यानंतर देशातील इतर शहरांमध्येही अशाच प्रकारची आंदोलनं झाली. त्यानंतर सीजेपीने दिल्लीच्या जंतर-मंतर येथे मोठं आंदोलन सुरू केलं. या आंदोलनात नीट-यूजी पेपर लीक आणि इतर परीक्षांमधील कथित गैरप्रकारांबाबत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली.
धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केल्यानंतर दिपके यांनी ‘एक्स’वर लिहिलं होतं, “मी आता थोडी डुलकी घेणार आहे. थोड्या वेळाने पुन्हा भेटुया.”
नेहा बोरा या जंतर-मंतर येथील आंदोलनातील आणखी एक प्रमुख आवाज होत्या. त्यांनी म्हटलं होतं की, दिपके नम्र आहेत आणि इतरांच्या सूचना ऐकून घेण्यास ते नेहमी तयार असतात. त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना असं जाणवून दिलं की, तेही त्यांच्यासारखेच या लढ्यातील एक विद्यार्थी आणि सहकारी आहेत.
सध्या दिपके यांचं म्हणणं आहे की, कॉकरोच जनता पार्टी राजकीय दबावगट म्हणून काम करत राहील. आपला अजेंडा ठरवताना ते विविध क्षेत्रांतील लोकांशी चर्चा करतील. त्यांनी परवडणारं शिक्षण, खासगी शाळांच्या शुल्कावर मर्यादा आणि सरकारी शाळांमधील सुविधा सुधारण्याची मागणी केली आहे.
नेहा बोरा
जंतर मंतर येथे झालेल्या बेमुदत उपोषणात सोनम वांगचुक एकटे नव्हते. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे (आयसा) 3 विद्यार्थीही त्यांच्यासोबत होते. यामध्ये नेहा बोरा, मनीष कुमार आणि अमीन अमितोज यांचा समावेश होता. वांगचुक यांच्या उपोषणाआधीच त्यांचे उपोषण संपले.
नेहा बोरा जेएनयूमध्ये पीएचडी संशोधक आहेत. जंतर मंतरवरील आंदोलनांसंदर्भात नेहा बोरा यांनी ‘फ्रंटलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “जंतर मंतरवरही मोठ्या संख्येने पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यावर लिहिले होते, ‘तुम्ही गोडसेवर विश्वास ठेवता, आम्ही भगत सिंगवर विश्वास ठेवतो. हाच तुमच्या आणि माझ्यातला मूलभूत फरक आहे आणि म्हणूनच तुम्ही इथून निघून जा.’ जे गोडसेला मानतात ते या देशावर राज्य करणार नाहीत, हेच लोकांनी सातत्याने सांगितले.”
फोटो स्रोत, Getty Images
यात आरएसएसच्या वारशावर बोलताना जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोपही करण्यात आला. तसेच ते गोडसेच्या बाजूने उभे होते, तर आम्ही भगतसिंगांच्या बाजूने उभे होतो. त्यांच्या विभाजनकारी राजकारणामुळे देश अशा परिस्थितीत कसा येऊन पोहोचला, जिथे पेपरफुटी ही आता मोठी गोष्ट राहिली नव्हती, पण हिंदू-मुस्लीम वादाच्या मुद्द्याने अचानक सर्वांचे लक्ष वेधून घेतले, यावरही चर्चा करण्यात आली.
“मला वाटतं की, या आंदोलनांनी हे दाखवून दिलं की देशातील तरुणांना सध्याच्या राजवटीकडून आता काहीही नको आहे. या आंदोलनाने जे धडे आम्हा सर्वांना शिकवले, ते फॅसिस्टांनाही जबाबदार धरता येईल या कल्पनेच्या पलीकडचे होते. म्हणूनच, जेव्हा मी उपोषणावरून परत आले आणि माईकवर बोलत होते, तेव्हा मी हे म्हणाले: तरुणांनी एकमेकांविरुद्ध नव्हे, तर एकमेकांसाठी लढण्याची भावना लक्षात ठेवली पाहिजे. हेच आम्ही गेल्या 12 वर्षांत शिकलो आहोत,” असंही नेहा बोरा यांनी नमूद केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूचे प्रकाशन)
SOURCE : BBC



