Home LATEST NEWS ताजी बातमी सतत रील्स पाहण्याचा तुमच्या मनावर असा होतो परिणाम, मानसिक आरोग्याबाबत 14 प्रश्नांची...

सतत रील्स पाहण्याचा तुमच्या मनावर असा होतो परिणाम, मानसिक आरोग्याबाबत 14 प्रश्नांची उत्तरे

5
0

Source :- BBC INDIA NEWS

[photo caption- मनावरचा ताण आणि अस्वस्थता प्रमाणाबाहेर वाढल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे ठरू शकते.]

फोटो स्रोत, Getty Images

स्वतःच्या मानसिक आरोग्याची स्थिती कशी ओळखावी आणि मनाची अस्वस्थता नेमकी कधी एखाद्या गंभीर आजारात बदलते?

नैराश्य, चिंता आणि अतिताणाचा सामना करताना मानसोपचारतज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला कधी घेतला पाहिजे? याशिवाय आपल्या सर्वांचे मानसिक आरोग्य उत्तम राहावे, म्हणून नेमकी कोणती काळजी घेणे गरजेचे आहे?

या आणि अशा अनेक प्रश्नांवर बीबीसी पंजाबीच्या ‘सेहत सिक्रेट्स’ या आरोग्यविषयक पॉडकास्टमध्ये मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कोमलप्रीत कौर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

मानसिक आरोग्याशी निगडित विविध प्रश्नांवर बीबीसी पत्रकार प्रियांका धीमान यांनी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कोमलप्रीत कौर यांच्याकडून जाणून घेतलेली माहिती.]

प्रश्न: मानसशास्त्रज्ञ (सायकॉलॉजिस्ट) आणि मानसोपचारतज्ज्ञ (सायकियाट्रिस्ट) या दोघांमध्ये काय फरक आहे आणि दोघांचे काम काय असते?

उत्तर: मानसशास्त्रज्ञ हे मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ असतात. ते आपले विचार, भावना आणि वर्तणूक समजून घेण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतात.

ते काउन्सिलिंग (समुपदेशन) आणि विविध थेरपींच्या साहाय्याने भावनिक समस्यांवर मात करण्यासाठी मदत करतात.

याउलट सायकियाट्रिस्ट हे वैद्यकीय पदवी असलेले डॉक्टर असतात, ते गरज पडल्यास औषधांच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार करतात.

सायकॉलॉजिस्ट कधीही औषधे लिहून देत नाहीत. मात्र मानसिक समस्या गंभीर टप्प्यावर पोहोचते, तेव्हा औषधोपचारांची गरज असते आणि ते काम सायकियाट्रिस्ट करतात.

अनेकदा रुग्णाच्या पूर्ण उपचारांसाठी हे दोघेही परस्पर समन्वयाने एका टीमप्रमाणे काम करत असतात.

प्रश्न: एखाद्या व्यक्तीला मानसिक उपचारांची गरज आहे हे कोणत्या लक्षणांवरून ओळखता येते?

उत्तर: जर एखादी व्यक्ती दोन आठवड्यांहून अधिक काळ सतत अस्वस्थ किंवा चिंतेत असेल, खूप जास्त झोपत असेल किंवा झोपच लागत नसेल, तसेच भूक अचानक खूप वाढली किंवा कमी झाली असेल, तर ते मानसिक आरोग्याच्या समस्येचे संकेत असू शकतात.

तसेच, सतत तणावग्रस्त किंवा नैराश्यात राहणे, लोकांपासून दूर राहणे, कोणालाही न भेटणे आणि पूर्वी आवडणाऱ्या गोष्टींमध्ये रस कमी होणे हीदेखील महत्त्वाची लक्षणे आहेत.

अशी लक्षणे दिसू लागल्यास, मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

[ photo caption-मानसिक आजारांची काही कारणे आपल्या जनुकांवर आणि काही आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असतात: डॉ. कोमलप्रीत कौर (प्रातिनिधिक फुट)]

फोटो स्रोत, Getty Images

प्रश्न: साधे उदास वाटणे आणि नैराश्य यात नेमका काय फरक असतो?

उत्तर: नेहमीची उदासीनता ही एखाद्या तात्कालिक प्रसंगामुळे किंवा परिस्थितीमुळे येते आणि काही दिवसांत निवळून जाते. मात्र डिप्रेशनमुळे आलेली उदासीनता सहजासहजी जात नाही, ती दीर्घकाळ मनात घर करून राहते.

हळूहळू याचे दुष्परिणाम शरीरावरही उमटू लागतात. झोप न लागणे, खाण्यापिण्यात रस वाटेनासा होणं आणि लोकांमध्ये मिसळणे पूर्णपणे बंद होणे अशा तक्रारी सुरू होतात.

परिणामी, संबंधित व्यक्तीचे रोजचे जगणे आणि जवळच्या व्यक्तींसोबतचे नातेसंबंध यांवरही याचा गंभीर परिणाम होतो.

प्रश्न: मानसिक आजार किंवा डिप्रेशनची (नैराश्याची) कारणे काय असतात?

उत्तर: यामागे काही प्रमाणात जनुकीय घटक, तर बऱ्याच अंशी भोवतालची परिस्थिती कारणीभूत ठरते.

उदा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला आधी असा मानसिक त्रास झाला असेल तर पुढील पिढीतील व्यक्तींमध्येही ही समस्या उद्भवण्याची शक्यता वाढते. कारण त्यांच्यावर त्या वातावरणाचा नकळत प्रभाव पडत असतो.

अशा व्यक्तींमध्ये स्वतःविषयी, जगाविषयी आणि आपल्या भविष्याविषयी सतत नकारात्मक विचार येऊ लागतात. त्यांना पुढील आयुष्याबद्दल कोणतीही नवी आशा उरत नाही. म्हणूनच ही लक्षणे वेळीच ओळखून योग्य पावले उचलणे अत्यंत गरजेचे ठरते.

[ photo caption- डॉ. कोमलप्रीत यांच्या मते, मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तीवर विविध प्रकारच्या थेरपींच्या माध्यमातून उपचार केले जाऊ शकतात.]

फोटो स्रोत, Getty Images

प्रश्न: मानसिक आजाराचा सामना करणाऱ्या रुग्णांवर उपचार कसे केले जातात?

उत्तर: आम्ही रुग्णाला विविध सायकोथेरपी देतो. उदा. ‘सीबीटी’ (कॉग्निटिव्ह बिहेव्हियरल थेरपी). ही थेरपी व्यक्तीच्या नकारात्मक विचारांना बदलून सकारात्मक विचारसरणीची नव्याने रचना करते. भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘डीबीटी’ (डायलेक्टिकल बिहेव्हियर थेरपी) वापरली जाते.

तसेच हिप्नोथेरपी आणि ‘एनएलपी’सारख्या तंत्रांद्वारे मेंदूतील विचारांचे जुने पॅटर्न बदलून नवी विचारसरणी रुजवली (री-वायरिंग केली) जाते. याशिवाय शरीर, मन आणि मानवी भावनांमध्ये समतोल साधण्यासाठी ‘गेस्टाल्ट थेरपी’ अत्यंत प्रभावी ठरते.

प्रश्न: मानसिक आरोग्य म्हणजे नेमके काय आणि शारीरिक आरोग्याइतकेच त्यालाही महत्त्व का दिले पाहिजे?

उत्तर: मानसिक आरोग्य सुदृढ नसेल तर मनाचे विविध आजार जडण्याचा धोका अधिक असतो. उदाहरणार्थ, शारीरिक आरोग्य चांगले नसेल तर तुम्ही वारंवार आजारी पडता.

अगदी तसेच जर मन आतून खंबीर नसेल तर व्यक्ती प्रत्येक प्रसंगात नकारात्मक विचार करू लागते आणि तिच्या वागण्या-बोलण्यातून किंवा कृतीतून तीच नकारात्मकता दिसू लागते.

याच कारणाने आपल्या आयुष्यात मानसिक आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा तुमचे मन निरोगी आणि शांत असते तेव्हाच तुम्ही मानसिक विकारांपासून सुरक्षित राहू शकता.

[photo caption- चांगल्या मानसिक आरोग्यासाठी व्यायाम, पौष्टिक आहार, पुरेशी झोप आणि ध्यान दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे गरजेचे: डॉ. कोमलप्रीत ]

फोटो स्रोत, Getty Images

प्रश्न: उत्तम मानसिक आरोग्यासाठी काही टिप्स?

उत्तर: दररोज स्वतःसाठी किमान 30 मिनिटे वेळ काढा. नियमित व्यायाम करा, मोकळ्या हवेत चालायला जा, चांगला सकस आहार घ्या आणि जंक फूडपासून दूर राहा.

रोज ईश्वराचे आभार माना, ध्यानधारणा करा आणि दीर्घ श्वसनाचा सराव करा. या सर्व गोष्टी एखाद्या अँटी-व्हायरसप्रमाणे काम करतात ज्यामुळे तुम्हाला दररोज उत्साही आणि सकारात्मक राहण्यास मदत करतात.

या सर्व चांगल्या सवयींमुळे मेंदूमध्ये नैसर्गिकरीत्या आनंद देणारे ‘हॅपी हार्मोन्स’ तयार होतात.

प्रश्न: नैराश्य, तणाव आणि अस्वस्थपणा – या तिघांमध्ये नेमका काय फरक आहे?

उत्तर: तणाव हा परिस्थितीनुसार तात्पुरता निर्माण होतो. अडचण संपली की तो आपोआप कमी होतो. नैराश्य म्हणजे जेव्हा तुम्ही भूतकाळातील एखादी दुःखद अथवा वेदनादायी आठवण पुन्हा पुन्हा जगत असता आणि एन्झायटी- अस्वस्थता म्हणजे जेव्हा तुम्हाला भविष्याबद्दल सतत भीती किंवा काळजी वाटत राहते.

विनाकारण किंवा एखाद्या कारणावरून सातत्याने वाटणारी ही चिंता जेव्हा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागते, तेव्हा ती एन्झायटी ठरते.

प्रश्न: सोशल मीडियाचा आपल्या मानसिक आरोग्यावर किती प्रभाव पडतो?

उत्तर: इन्स्टाग्रामवर सातत्याने रील्स स्क्रोल करताना दर सेकंदाला भावनांचे रंग बदलतात. एक रील हसवणारी, तर दुसरी लगेच भावूक करणारी तर कधी चीड आणणारी असते.

[photo caption-सलग रील्स पाहिल्यामुळे मेंदूला भावनांची योग्य पद्धतीने प्रक्रिया करता येत नाही असे डॉ. कोमलप्रीत सांगतात. ]

फोटो स्रोत, Getty Images

भावना इतक्या वेगाने बदलतात की मेंदूला त्या समजून घेणे आणि सामावून घेणे शक्य होत नाही. भावनांचे संतुलन कसे साधावे हेच आपल्याला समजेनासे होते.

ज्याप्रमाणे मोबाईल स्क्रीनवर अनेक ॲप्स आणि टॅब सुरू असतात. अगदी तसेच एकाच वेळी हजारो विचार डोक्यात चालू राहतात. यामुळे ‘ब्रेन फॉग’ची म्हणजे विचारांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होते आणि साधे निर्णय घेणेही कठीण होऊन बसते.

प्रश्न: मुलांमधील नैराश्य आणि मानसिक ताण वाढण्याची मुख्य कारणे कोणती? पालकांनी त्यांना कसे सांभाळावे?

उत्तर: यामागे सर्वात मोठा वाटा सोशल मीडियाचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुले सतत स्वतःची इतरांशी तुलना करत राहतात. त्यात पालकांच्या आणि समाजाच्या वाढत्या अपेक्षांचे ओझे असतेच शिवाय मुलांच्या स्वतःकडूनही अवास्तव अपेक्षा असतात.

जेव्हा मनासारखे यश मिळत नाही, तेव्हा मुलांच्या मनात स्वतःविषयी न्यूनगंड आणि नकारात्मक विचार सुरू होतात जे पुढे गंभीर नैराश्यात बदलतात.

यात पालकांच्या वागण्याचाही मोठा वाटा असतो. नोकरी-व्यवसायामुळे मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही, म्हणून पालक मुलांचा प्रत्येक हट्ट पुरवतात. परिणामी, मुलांना नकार पचवण्याचे म्हणजे जणू ‘व्हिटॅमिन-नो’चे संस्कार मिळतच नाहीत.

मग भविष्यात जेव्हा त्यांना घरातून किंवा बाहेरून ‘नाही’ ऐकावे लागते तेव्हा ते सहन करू शकत नाहीत आणि खचून जातात. म्हणूनच 10 पैकी केवळ 4 गोष्टी मान्य करण्यासारख्या असतील त्याच मान्य करा. मात्र नकार देताना मुलांना त्यामागचे योग्य कारण समजावून सांगा.

[photo caption- आजच्या काळात पालकांनी मुलांसाठी आवश्यक वेळ काढणे अत्यंत गरजेचे आहे असे डॉ. कोमलप्रीत सांगतात. ]

फोटो स्रोत, Getty Images

लहान मुले म्हणजे जणू न घडवलेला मातीचा गोळा! जसा कुंभार मातीला सुंदर आकार देतो. अगदी तसेच पालक आपल्या संस्कारांनी मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवतात. मुलांनी केलेल्या चांगल्या कामात पालकांनी त्यांच्या निकालापेक्षा त्यांच्या प्रयत्नांची पाठ थोपटली पाहिजे. यामुळे आपण मेहनत केली म्हणूनच यश मिळाले हा विश्वास मुलांमध्ये निर्माण होतो.

याउलट सतत पोकळ कौतुक केले तर मुलांमध्ये गर्विष्ठपणा वाढू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांना कधीही नकारात्मक ‘लेबल’ लावू नका. जसे की ‘तू आळशी आहेस’ किंवा ‘तुझ्याकडून काहीच होणार नाही’. अशा बोलण्याने त्यांचा आत्मविश्वास खचतो आणि ती स्वतःला खरोखरच कमी लेखू लागतात.

मुलांना थेट ‘तू वाईट आहेस’ असे म्हणण्याऐवजी ‘तू जे वागत आहेस ते चुकीचे आहे’ हे समजावून सांगा. चूक वर्तणुकीत असते, मुलामध्ये नाही. यासोबतच मुलांसोबत पुरेसा दर्जेदार वेळ घालवा.

म्हणजे सतत दोष न देता उपदेशाचे डोस न पाजता आणि कोणतीही टोकाटोकी न करता त्यांच्या विश्वात सहभागी व्हा. त्यांच्यासोबत खेळ खेळा. हल्ली पालक आणि पाल्यांमधील भावनिक संवाद कमी होत आहे, तो पुन्हा घट्ट करण्याची गरज आहे.

मुलांचे ऐकायला शिका. हल्लीच्या मुलांना अनेकदा वाटते की घरात कोणी त्यांना समजूनच घेत नाही. माझ्या अनुभवात अनेकदा असे घडते की मुलाने एखादी चूक प्रामाणिकपणे कबूल केल्यावर पालक भडकतात आणि त्यालाच ओरडतात. यामुळे मुले घाबरतात आणि पुढे कधीच काही सांगत नाहीत. म्हणूनच संवाद टिकवून ठेवण्यासाठी मुलांचे म्हणणे लक्षपूर्वक आणि संयमाने ऐकून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.

प्रश्न: ऑफिसमधील ताणतणाव टाळून कामाच्या ठिकाणी मानसिक स्वास्थ्य कसे जपावे?

उत्तर: आपण जिथे काम करतो त्या कामाच्या ठिकाणाचा आपल्या मानसिक स्वास्थ्याशी थेट संबंध असतो. यासाठी कामाचे आणि वैयक्तिक आयुष्याचे योग्य संतुलन राखणे सर्वात महत्त्वाचे ठरते.

कामावरून घरी परतताना ऑफिसचा ताण तिथेच सोडून घरी जा आणि ऑफिसमध्ये असताना घरच्या गोष्टी आणि काळजी बाजूला ठेवा. ही स्पष्ट सीमारेषा आणि समतोल साधता आला, तर मन शांत आणि निरोगी राहू शकते.

[photo caption- मानसिक आरोग्यासाठी कामाचे आणि वैयक्तिक आयुष्याचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे असं डॉ. कोमलप्रीत सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

ऑफिसच्या समस्या घरी आणि घरच्या समस्या ऑफिसमध्ये घेऊन जाऊ नका. त्यासाठी काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात स्पष्ट सीमा ठेवायला शिकणे गरजेचे आहे.

यासाठी श्वसनाच्या विविध प्रकारांचा रोजच्या दिनक्रमात समावेश करा. यामध्ये बॉक्स ब्रीदिंग, बटरफ्लाय ब्रीदिंग, दीर्घ श्वसन आणि 4-7-8 ब्रीदिंगसारख्या तंत्रांचा समावेश होतो. कामाच्या धावपळीत दर 1 किंवा 2 तासांनी काही मिनिटांचा वेळ काढून हा सराव करा. यामुळे शरीरातील पॅरासिम्पेथेटिक नर्व्हस सिस्टीम कार्यान्वित होऊन मन लगेच शांत होते.

मन शांत राहिले की विचार स्पष्ट होतात, योग्य निर्णय घेता येतात, कामाची गुणवत्ता वाढते आणि पर्यायाने घरातील आणि ऑफिसमधील नातेसंबंधही चांगले राहतात.

प्रश्न: महिलांच्या मानसिक आरोग्यावर कोणत्या कारणांमुळे सर्वाधिक परिणाम होतो?

उत्तर: घरकाम, मुलांचे संगोपन, नोकरी आणि आर्थिक नियोजन या सर्व गोष्टींचा समतोल साधताना महिलांवर प्रचंड ताण येतो. ऑफिसमध्ये काम करत असतानाही महिलांच्या डोक्यात घराचेच विचार जणू पिंगा घालत असतात. मुलं काय करत असतील, घरी गेल्यावर स्वयंपाक किंवा इतर कामे कशी आवरायची, पाहुण्यांचे काय करायचे, अशा नानाविध चिंता एकाच वेळी चालू असतात.

त्यामुळे या अखंड धावपळीतून डोक्याला आणि शरीराला थोडा वेळ विश्रांती देणे अतिशय गरजेचे आहे. विशेषतः नोकरदार महिलांमध्ये सतत सुरू असलेला हा अतिविचार त्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याला सर्वात जास्त घातक ठरतो.

केवळ नोकरदार महिलाच नव्हे तर गृहिणींनाही या समस्येचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतो. आजच्या सुशिक्षित स्त्रिया लग्नानंतर कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे करिअर बाजूला ठेवतात आणि आपले संपूर्ण आयुष्य मुलं, पती आणि घरासाठी समर्पित करतात.

पण मुलं मोठी होऊन स्वतःच्या विश्वात रमली की, या स्त्रियांच्या वाट्याला अचानक एकटेपणा येतो. आपण आता कुटुंबासाठी ‘बिनकामाचे’ किंवा ‘निरुपयोगी’ झालो आहोत ही नकारात्मक भावना त्यांच्या मनात घर करू लागते आणि त्या गंभीर नैराश्यात जातात.

[photo caption- ज्या गोष्टीतून तुम्हाला खरा आनंद मिळतो, ती गोष्ट आवर्जून केली पाहिजे असे डॉ. कोमलप्रीत सांगतात. ]

फोटो स्रोत, Getty Images

प्रश्न: गृहिणींनी स्वतःचे मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

उत्तर: सर्वात महत्त्वाचा मंत्र म्हणजे ‘स्वतःवर प्रेम करायला शिका’. रोजच्या धावपळीतून थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि आवडते छंद जोपासा. यामुळे मेंदूत आनंदी ठेवणारे हार्मोन्स सक्रिय होतात.

नियमित व्यायाम, चांगला आहार आणि शांत झोप या त्रिसूत्रीसोबतच रोज छान नीटनेटके आणि तयार होऊन राहा. अनेक महिलांचा असा समज असतो की घरातच राहायचे आहे तर कशाला नटायचे-थटायचे? पण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी छान तयार होता तेव्हा ‘मी स्वतःसाठी महत्त्वाची आहे’ हा सकारात्मक संदेश मेंदूपर्यंत पोहोचतो आणि उत्साह वाढतो.

चौरस आहार, मेडिटेशन, कृतज्ञ भाव आणि प्राणायाम किंवा श्वसनाचे व्यायाम या गोष्टी केवळ गृहिणींनीच नव्हे, तर नोकरदार महिलांसह प्रत्येकानेच आपल्या दिनक्रमात आणल्या पाहिजेत. मानसिक आरोग्यासाठी हे सर्व घटक एखाद्या रामबाण उपाया सारखे काम करतात.

प्रश्न: प्रवास केल्याने मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो का?

उत्तर: नक्कीच, कधीतरी एकटंच प्रवासाला निघा आणि मनमुराद जगा. ज्या गोष्टी तुम्हाला आतून आनंद देतात त्या आवर्जून करा.

तुम्ही आनंदी असाल, तर तुम्ही तुमच्या आजूबाजूलाही एक सकारात्मक वातावरण तयार करता. जसे मी आधी सांगितले होते, जर तुम्ही आतून आनंदी आणि समाधानी असाल तर बाहेर आपोआपच आनंदाचे वातावरण तयार होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC