Home LATEST NEWS ताजी बातमी अक्कलदाढ नेमकी कशासाठी असते आणि ती काढून टाकणं कधी गरजेचं ठरतं?

अक्कलदाढ नेमकी कशासाठी असते आणि ती काढून टाकणं कधी गरजेचं ठरतं?

4
0

Source :- BBC INDIA NEWS

प्रत्येकालाच अक्कलदाढ येते असं नाही.

फोटो स्रोत, Getty Images

लहान बाळांचे दात काही महिन्यांचे झाल्यानंतर यायला सुरुवात होते. किशोरवयात येईपर्यंत त्यांचे जवळपास सर्व कायमचे दात आलेले असतात. मात्र तोंडाच्या अगदी मागच्या बाजूला असलेल्या काही दाढा सर्वांत शेवटी येतात.

साधारणपणे एखादी व्यक्ती प्रौढत्वाकडे वाटचाल करत असताना या दाढा येतात.

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशातील अनेक भाषांमध्ये या दाढांना अक्कलदाढ म्हटलं जातं.

वय वाढत जातं तशी माणसाची समज आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते, अशी धारणा आहे. ‘अक्कल’ म्हणजे समज किंवा विवेक. म्हणूनच इंग्रजीमध्ये या दाढेला Wisdom Tooth म्हणतात.

वैद्यकीय भाषेत तिला थर्ड मोलर (Third Molar) किंवा तिसरी दाढ असं म्हणतात. हे नाव यासाठी पडलं आहे की दातांच्या रांगेतील ही तिसरी दाढ असते.

मात्र प्रत्येकालाच अक्कलदाढ येते असं नाही. काही लोकांमध्ये ही दाढ असूनही कोणतीही समस्या निर्माण होत नाही, तर काहींसाठी ती वेदना आणि त्रासाचं कारण ठरते.

मग अक्कलदाढ इतक्या उशिरा का येते? ती येताना का दुखतं? ती कोणत्या वयापर्यंत येऊ शकते? आणि दुखत असेल तर दाढ काढून टाकणं हाच एकमेव उपाय असतो का?

अक्कलदाढ काढण्याचं योग्य वय कोणतं?

एका प्रौढ व्यक्तीचे साधारणपणे 32 दात असतात. यापैकी वरच्या आणि खालच्या जबड्यात दोन्ही बाजूंना अगदी मागे प्रत्येकी एक, अशा एकूण 4 अक्कलदाढा असू शकतात.

मात्र प्रत्येक व्यक्तीमध्ये चारही अक्कलदाढा असतातच असं नाही. काहींना 1, 2 किंवा 3 अक्कलदाढा असतात, तर काहींना एकही नसते.

अमेरिकन डेंटल असोसिएशननुसार, अक्कलदाढ साधारणपणे 17 ते 21 वर्षांच्या वयात यायला सुरुवात होते.

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, या दाढा साधारणपणे किशोरवयाच्या शेवटच्या टप्प्यापासून ते 25 वर्षांपर्यंत येतात. मात्र याचा अर्थ असा नाही की हे वय उलटल्यानंतर अक्कलदाढ येऊ शकत नाही. काही लोकांमध्ये ती त्यानंतरही येते.

अक्कलदाढ हिरडीत योग्य जागी आली, तर ती तोंडाच्या मागच्या भागाला आधार देण्यास आणि जबड्याचं हाड मजबूत ठेवण्यास मदत करू शकते. पण एकूणच पाहिलं तर आजच्या काळात अक्कलदाढेची गरज फारशी उरलेली नाही.

उलट बहुतांश वैद्यकीय तज्ज्ञ तिला शरीरातील निष्क्रिय अवयव (vestigial organ) मानतात. पूर्वी तिची एक महत्त्वाची भूमिका होती, पण आता ती जवळपास संपली आहे.

अक्कलदाढ हिरडीच्या अगदी शेवटच्या भागात येते.

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेतील क्लीव्हलँड क्लिनिकनुसार, आपल्या पूर्वजांच्या आहारात कच्च्या वनस्पती, सुकामेवा आणि कडक, तंतुमय मांस मोठ्या प्रमाणात असायचं. अशा प्रकारचं अन्न चावून पचण्यायोग्य बनवण्यात अक्कलदाढ महत्त्वाची भूमिका बजावत असे.

आज मात्र अन्न शिजवण्याच्या आधुनिक पद्धती आणि खाण्यासाठी वापरली जाणारी साधनं यामुळे अक्कलदाढेची गरज मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

अक्कलदाढ येत असताना रुग्णांच्या सर्वाधिक तक्रारी वेदना आणि सूज याबाबत असतात.

फोटो स्रोत, Getty Images

आहारातील या बदलांबरोबरच आपल्या शरीरातही काही सूक्ष्म बदल झाले आहेत. उदाहरणार्थ, आपल्या पूर्वजांच्या तुलनेत आता मानवी जबडा आकाराने लहान झाला आहे. त्यामुळे अनेकांच्या तोंडात अक्कलदाढ येण्यासाठी पुरेशी जागाच नसते.

साधारणपणे माणसाला 4 अक्कलदाढा असतात, पण त्या चारही येतीलच असं नाही. दर 10 लोकांपैकी सुमारे 8 लोकांना किमान एक अक्कलदाढ येत नाही.

मात्र एकही अक्कलदाढ न येणं किंवा चारही येणं या दोन्ही गोष्टी सामान्य मानल्या जातात.

अक्कलदाढ येताना वेदना का होतात?

अक्कलदाढ इतर दातांप्रमाणे योग्य जागी आणि पुरेशी जागा मिळाल्यानंतर आली, तर सहसा कोणतीही समस्या होत नाही. तरीही दाढ येताना थोडी वेदना किंवा अस्वस्थता जाणवू शकते.

अक्कलदाढेमुळे होणाऱ्या बहुतेक समस्या जागेच्या कमतरतेमुळे निर्माण होतात. ही दाढ हिरडीच्या अगदी शेवटच्या भागात येते.

जर तिथे पुरेशी जागा नसेल, तर ती शेजारच्या दाताकडे झुकू शकते किंवा अर्धी किंवा पूर्णपणे हिरडीत किंवा जबड्याच्या हाडात अडकून राहू शकते.

अशा दाढेला इम्पॅक्टेड विज्डम टूथ (Impacted Wisdom Tooth) किंवा अडकलेली अक्कलदाढ म्हणतात. अर्धवट बाहेर आलेल्या दाढेवर हिरडीचा काही भाग राहिला, तर तिथे अन्नकण आणि जिवाणू साचू शकतात. त्यामुळे दाढेभोवतीच्या हिरडीत सूज किंवा संसर्ग होऊ शकतो.

या स्थितीला पेरिकोरोनायटिस (Pericoronitis) म्हणतात. यामुळे दाढ किडण्याचाही धोका वाढतो. अर्धवट आलेल्या दाढेभोवती स्वच्छता करणं कठीण असल्यामुळे काही वेळा त्या भागात द्रव साचून सिस्ट किंवा अ‍ॅब्सेस (पू साचणं) तयार होऊ शकतो.

दाढ काढण्याची प्रक्रिया

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेतील मेयो क्लिनिकनुसार, अडकलेली किंवा इम्पॅक्टेड अक्कलदाढ शेजारच्या दातांनाही नुकसान पोहोचवू शकते.

या स्थितीत केवळ वेदनाच होत नाहीत, तर हिरड्या सुजतात आणि तोंड उघडणं किंवा अन्न चावणंही कठीण होऊ शकतं.

मात्र अक्कलदाढ योग्य प्रकारे आली, तर ती अन्न चावण्यास मदत करते.

प्रत्येक जबड्यात साधारणपणे मागच्या बाजूला अन्न चावण्यासाठी तीन दाढा असतात.

समोरून मागे जाताना त्या पहिली मोलर, दुसरी मोलर आणि तिसरी मोलर अशा क्रमाने असतात.

यातील सर्वांत शेवटची तिसरी मोलर म्हणजेच अक्कलदाढ किंवा विज्डम टूथ.

काही वेळा अक्कलदाढ बाहेरून दिसत नसली, तरी एक्स-रेद्वारे तिची स्थिती समजू शकते.

ढाका येथील दंतचिकित्सक डॉ. ए.के.एम. हसनुज्जमान यांच्या मते, “दाढ योग्य स्थितीत असेल आणि ती येण्यासाठी पुरेशी जागा असेल, तर अक्कलदाढ साधारणपणे 1 ते 2 वर्षांत पूर्णपणे येऊ शकते. या काळात दर काही महिन्यांनी वेदना होऊ शकतात.”

त्यांच्या मते, अक्कलदाढ येताना रुग्णांच्या सर्वाधिक तक्रारी वेदना आणि सूज याबाबत असतात.

अनेकांना तोंड पूर्णपणे उघडतानाही त्रास होतो.

हिरडीतील संसर्गावर बराच काळ उपचार झाले नाहीत, तर तो तोंड आणि घशाच्या इतर भागांमध्ये पसरून गंभीर संसर्ग होऊ शकतो.

डॉ. हसनुज्जमान म्हणतात, “अशा वेळी श्वास घेणं किंवा अन्न खाणं कठीण होऊ शकतं. परिस्थिती गंभीर झाल्यास रुग्णाला रुग्णालयात दाखल करावं लागू शकतं. अनेक प्रकरणांमध्ये शेवटी शस्त्रक्रिया करावी लागते.”

अक्कलदाढ काढून टाकणं नेहमीच गरजेचं असतं का?

डॉक्टरांच्या मते, अक्कलदाढ दुखते म्हणजे ती काढून टाकणं आवश्यक आहे, असं नाही. एनएचएस (NHS)च्या मते, अक्कलदाढेमुळे कोणतीही समस्या निर्माण होत नसेल, तर ती सहसा काढली जात नाही.

त्याऐवजी नियमित दंत तपासणी करून तिच्या स्थितीवर लक्ष ठेवलं जातं.

मात्र वारंवार हिरडीला संसर्ग होणं, तीव्र वेदना होणं किंवा दाढ खराब होणं अशा परिस्थितीत अक्कलदाढ काढण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

सिस्ट किंवा फोड्यासारख्या गुंतागुंती निर्माण झाल्या, तरी डॉक्टर दाढ काढण्याची शिफारस करू शकतात.

दाढ काढण्यापूर्वी साधारणपणे हिरडीत भूल (Local Anesthesia) दिली जाते.

त्यामुळे संबंधित भाग बधीर होतो आणि दाढ काढताना वेदना जाणवत नाहीत.

रुग्णाला अधिक आरामदायी वाटावं म्हणून काही वेळा सेडेशन देखील दिलं जाऊ शकतं.

दाढ काढण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची असेल किंवा रुग्ण खूप घाबरलेला असेल, तर सामान्य भूल (General Anesthesia) दिली जाते. अशा वेळी रुग्ण झोपेत असतो.

दाढ काढण्याची प्रक्रिया

फोटो स्रोत, Getty Images

अक्कलदाढ काढताना साधारणपणे पुढील टप्पे असतात:

  • दाढ हिरडीखाली दडलेली असेल, तर डॉक्टर आधी हिरडीत छोटा छेद देतात.
  • त्यानंतर गरजेनुसार दाढेभोवतीची जागा मोकळी केली जाते.
  • शक्य असल्यास दाढ एकाच तुकड्यात काढली जाते. मात्र गरज पडल्यास ती 2 किंवा 3 तुकड्यांत काढावी लागू शकते.
  • शेवटी हिरडीला असे टाके घातले जातात, जे काही दिवसांनी आपोआप विरघळतात.

अक्कलदाढ काढल्यानंतर बरे होण्यासाठी किती वेळ लागतो?

अक्कलदाढ काढल्यानंतर बहुतांश लोक दुसऱ्याच दिवशी दैनंदिन कामं पुन्हा सुरू करू शकतात.

मात्र दाढ काढण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची असेल किंवा सामान्य भूल देण्यात आली असेल, तर 1 ते 3 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो.

साधारणपणे दाढ काढल्यानंतर 2 आठवड्यांपर्यंत काही त्रास जाणवू शकतो. त्यात हलक्या वेदना आणि सूज यांचा समावेश असतो.

मात्र या तक्रारी सहसा 1 किंवा 2 दिवसांनंतर कमी होऊ लागतात.

याशिवाय गालावर सूज किंवा काळसर व्रण पडू शकतात. जबडा दुखणं किंवा आखडल्यासारखं वाटणं, अन्न चावताना किंवा गिळताना त्रास होणं, अशा तक्रारीही होऊ शकतात.

दाढ काढल्यानंतर टाके घातले असतील, तर ते सहसा आपोआप विरघळतात.

दाढ काढलेल्या जागी रक्ताची गुठळी (ब्लड क्लॉट) तयार होते आणि ती जखम भरून येण्यास मदत करते.

डॉक्टरांच्या मते, सुरुवातीच्या काही दिवसांत जखम लवकर आणि नीट भरून यावी यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

वेदना कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पॅरासिटामॉल किंवा आयबुप्रोफेन घेऊ शकता.

व्यवस्थित चावता येईपर्यंत मऊ किंवा द्रव स्वरूपातील अन्न खाणं योग्य ठरतं.

माउथवॉश किंवा कोमट मिठाच्या पाण्याने हलक्या हाताने गुळण्या करून जखमेची स्वच्छता ठेवावी.

इतर दात नेहमीप्रमाणे स्वच्छ करावेत, पण जखमेच्या जागेवर ब्रश लागू देऊ नये. त्यामुळे टाके किंवा रक्ताची गुठळी निघण्याचा धोका कमी होतो.

दाढ

फोटो स्रोत, Getty Images

रक्तस्राव होत असेल, तर स्वच्छ कापड किंवा कापसाचा बोळा त्या जागेवर किमान 10 मिनिटे दाबून धरावा.

डॉक्टरांच्या मते, सामान्य भूल दिल्यानंतर 48 तास वाहन चालवू नये. सेडेशनचं इंजेक्शन दिलं असेल, तर 24 तास वाहन चालवणं टाळावं.

तसंच कडक, कुरकुरीत किंवा जखमेत अडकू शकणारे अन्नपदार्थ जसे सुकामेवा किंवा बिया काही दिवस टाळावेत.

धूम्रपानही करू नये, कारण त्यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो.

अक्कलदाढ काढणं ही सहसा अवघड प्रक्रिया नसते. तरी काही गुंतागुंती होऊ शकतात.

ड्राय सॉकेट (Dry Socket): दाढ काढल्यानंतर तयार झालेल्या जागेत रक्ताची गुठळी तयार होते. ती व्यवस्थित तयार झाली नाही किंवा जखम भरून येण्यापूर्वी निघून गेली, तर तीव्र वेदना होऊ शकतात. या स्थितीला ड्राय सॉकेट म्हणतात.

संसर्ग: दाढ काढलेल्या जागी संसर्ग होऊ शकतो. अशा वेळी अँटिबायोटिक्सची गरज लागू शकते.

मज्जातंतूंना इजा: दाढेजवळील मज्जातंतूंवर परिणाम झाल्यास जीभ, ओठ किंवा हनुवटी सुन्न पडू शकते किंवा झिणझिण्या जाणवू शकतात.

बहुतांश वेळा ही समस्या कालांतराने आपोआप कमी होते. मात्र काही प्रकरणांमध्ये ती अनेक आठवडे किंवा काही महिनेही कायम राहू शकते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC