Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे
अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार झाला असल्याचं पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी रविवारी (भारतीय प्रमाणवेळेनुसार 14 जूनच्या रात्री) जाहीर केलं.
करारावर शुक्रवारी (19 जून) स्वित्झर्लंडमध्ये अधिकृतपणे स्वाक्षरी केली जाईल, अशी माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिली. करारात नेमके कोणते मुद्दे आहेत त्याचा तपशील मात्र अद्याप समोर आलेला नाही.
शुक्रवारी (19 जून) करारावर सह्या झाल्यानंतर ‘तेलाचा मुबलक पुरवठा सुरू होईल’ असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या घोषणेनंतर तेलाच्या किमतीत घसरणही झाली आहे.
इराणच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांनी सरकारी टीव्हीवर कराराला अंतिम स्वरुप मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर इराणच्या सर्वोच्च लष्करी कमांडने हा त्यांचा विजय अल्याचं म्हटलं आहे.
या करारामुळं लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील लष्करी कारवाया संपुष्टात येतील. अलिकडेच याठिकाणी दोन शस्त्रसंधी अपयशी ठरल्या आहेत, असं बीबीसीच्या प्रतिनिधींनी म्हटलंय.
अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर 28 फेब्रुवारी रोजी केलेल्या हल्ल्यांमुळे या युद्धाला सुरुवात झाली होती. त्यामुळे इराणनं इस्रायल आणि आखातातील अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले केले, तसंच तेल आणि वायू वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली होती.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी काय सांगितलं?
अमेरिका आणि इराण यांच्यात या करारासाठी मध्यस्थीची भूमिका बजावणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या कराराची घोषणा केली.
“गहन चर्चेनंतर अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार झाला आहे हे जाहीर करताना आनंद होत आहे, ” असं त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं.
फोटो स्रोत, Anadolu via Getty Images
दोन्ही बाजूंनी लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील लष्करी कारवाया तत्काळ आणि कायमस्वरूपी समाप्त केल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.
करारावर अधिकृत स्वाक्षरींचा कार्यक्रम 19 जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये होईल, असंही त्यांनी सांगितलेलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी शांतता करारावर सह्या झाल्यानंतर ‘तेलाचा पुरवठा सुरू होईल’, असं म्हटलं आहे.
ट्रम्प यांनी अमेरिका-इराण कराराबद्दल केलेल्या पोस्टमध्ये इतरांना जिथं अपयश आलं तिथं आपण यशस्वी झाल्याचं म्हटलं आहे.
‘हा महान करार संपूर्ण प्रदेशात शांतता आणि सुरक्षा आणेल,’असं त्यांनी ‘ट्रुथ सोशल’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं.
फोटो स्रोत, Ken Cedeno / AFP via Getty Images
माझ्याआधी अनेक राष्ट्राध्यक्षांनी इराणसोबत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. ते सर्व अयशस्वी ठरले आहेत. या प्रदेशातील नेत्यांना, प्रथमच असे राष्ट्राध्यक्ष भेटले आहेत जे त्यांना खरी शांतता प्रस्थापित करण्यास मदत करू शकतात, असं त्यांनी म्हटलं.
शुक्रवारी करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर सामुद्रधुनी खुली होईल आणि त्यानंतर या प्रदेशासाठी आणि जगासाठी दोन्ही बाजूंनी तेलाचा प्रवाह पुन्हा सुरू होईल! असं ट्रम्प म्हणाले.
इराणची प्रतिक्रिया
इराणचे उप-परराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी सरकारी टीव्हीवरून फोनवर बोलताना कराराच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
“लेबनॉनसह विविध आघाड्यांवरील युद्ध आणि लष्करी कारवाया तत्काळ आणि कायमस्वरूपी संपुष्टात आणल्याची घोषणा आज रात्री केली जाईल,” असं ते म्हणाले.
इराणवरील अमेरिकेची नौदल नाकेबंदीही आज रात्री उठवली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
इराणच्या सरकारी टीव्हीवर निवेदकांनी, ‘अमेरिकेला इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण आणि रेझिस्टन्स फ्रंटसोबतचे युद्ध संपवण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडलं गेलं’ असं म्हटलं आहे.
सरकारी टीव्ही आणि काही इराणी वृत्तसंस्था हा करार इराणचा विजय असल्याचं म्हणत आहेत. हा करार झाल्याच्या वृत्तावर एकाही इराणी अधिकाऱ्याने अद्याप भाष्य केलेले नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC






