Home LATEST NEWS ताजी बातमी आकाराने छोटी असलेली टोपी सोशल मीडिया फेम पाणघोड्याच्या जीवावर कशी बेतली?

आकाराने छोटी असलेली टोपी सोशल मीडिया फेम पाणघोड्याच्या जीवावर कशी बेतली?

6
0

Source :- BBC INDIA NEWS

 टोपी गिळलेल्या फिओना पाणघोड्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अमेरिकेतील ओहायो राज्यातील सिनसिनाटी प्राणिसंग्रहालयात फिओना नावाच्या मादी पाणघोड्यानं खाली पडलेली टोपी गिळली होती.

त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती प्राणिसंग्रहालय प्रशासनाने दिली.

“पशुवैद्यकीय डॉक्टर आणि प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी फिओनाला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. परंतु, आम्ही तिचे प्राण वाचवू शकलो नाही, ही दुःखद बातमी देताना आम्हाला अतिशय वाईट वाटत आहे,” अशी माहिती प्राणिसंग्रहालयाने गुरुवारी (19 नोव्हेंबर) दुपारी दिली.

फिओनाचा जन्म 2017 मध्ये मुदत पूर्ण होण्यापूर्वीच झाला होता. पुढे ती सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाली.

साधारण 10 दिवसांपूर्वी टोपी गिळल्यामुळे फिओनाला तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज भासली होती.

फिओनाला वाचवण्यासाठी पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु, त्यांना यश आले नाही, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सुरुवातीला फिओनामध्ये आजाराची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. तिचं शरीर मोठं असल्यामुळे ही छोटीशी टोपी सहज पचून बाहेर पडेल, असं प्राणिसंग्रहालय प्रशासनाला वाटलं होतं.

पण, काही दिवसांनंतर फिओनाची भूक कमी होऊ लागली. त्यामुळे फिओनावर तातडीने उपचार करावे लागले, असं प्राणिसंग्रहालय प्रशासनाने स्पष्ट केलं.

Captipon- सुमारे आठवड्यापूर्वी टोपी गिळल्यानंतर सुरुवातीला फिओना ठीक असल्याचं दिसत होतं.

टोपी पचनसंस्थेतून बाहेर पडावी, यासाठी प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी फिओनाला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला.

सिनसिनाटी प्राणिसंग्रहालयात फिओनाचा जन्म मुदत पूर्ण होण्याआधीच झाला होता. जन्मानंतर सुरुवातीच्या काळात तिला जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता.

फिओनाच्या प्रेरणादायी कहाणीवरून आईस्क्रीमचा एक खास फ्लेवर तयार करण्यात आला. तसेच, सिनसिनाटी बॅलेच्या एका नृत्यनाटिकेतही तिच्यावर आधारित पात्र साकारण्यात आलं.

प्राणिसंग्रहालयातील एका पर्यटकाने टोपी हवेत उडवली होती. ती छताला असलेल्या पंख्याला लागली आणि एका छोट्या छिद्रातून खाली पडत फिओनाजवळ पोहोचली, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाच्या प्रवक्त्या मिशेल कर्ली यांनी अमेरिकेतील प्रसारमाध्यमांना दिली.

“पुन्हा असं करण्याचा प्रयत्न केला, तरी कदाचित ते शक्य होणार नाही,” असं कर्ली यांनी सांगितलं.

फिओना लवकर बरी व्हावी, यासाठी प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी तिला द्रव पदार्थ दिले. तसेच, तिची अल्ट्रासाऊंड तपासणीही केली.

अल्ट्रासाऊंड तपासणीमध्ये टोपी फिओनाच्या लहान आतड्यामधून पुढे सरकत असल्याचं दिसून आलं. पण, तिच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण अजूनही कमी होतं, असं प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

“पूर्ण वाढ झालेल्या पाणघोड्यावर शस्त्रक्रिया करणं शक्य नसतं. त्यामुळे फिओनाने नैसर्गिकरीत्या टोपी शरीराबाहेर टाकणं हाच सर्वोत्तम पर्याय होता,” असं प्राणिसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितलं.

फिओनाला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करूनही यश आलं नाही, असं प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

“सध्या आम्हाला मोठा धक्का बसला आहे. असा शेवट होईल, अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. फिओनाने शेवटच्या क्षणापर्यंत जगण्यासाठी संघर्ष केला,” असं सिनसिनाटी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डेव्ह जेनिक यांनी एका निवेदनात म्हटलं.

Caption- पाणघोडा साधारणपणे 50 वर्षांपर्यंत जगतात. त्यामुळे फिओनाचा मृत्यू खूप लवकर झाला, असं प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

फिओनाचा जन्म 2017 मध्ये झाला होता. जन्माच्या वेळी तिचं वजन फक्त 13 किलो होतं.

या प्रजातीच्या प्राण्यांमध्ये यापूर्वी नोंदवलेल्या सर्वात कमी जन्माच्या वजनाच्या तुलनेतही फिओनाचं वजन निम्मंच होतं, असं प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

“जन्माच्या वेळी फिओनाने जिद्द दाखवत मृत्यूशी झुंज दिली होती. आताही ती त्याच जिद्दीने बरी होईल, अशी आम्हाला आशा होती,” असं प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी म्हटलं.

पाणघोडा माणसांच्या देखरेखीखाली साधारणपणे 50 वर्षांपर्यंत जगतात. त्यामुळे फिओनाचा मृत्यू अपेक्षेपेक्षा खूप लवकर झाला, असं प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

“हे जाणीवपूर्वक केलेलं नसले, तरी दुर्दैवाने अशा घटना अनेकवेळा घडतात. फिओनाचा मृत्यू ही दुःखद घटना आहे. यातून प्रत्येकाने प्राण्यांशी काळजीपूर्वक आणि आदराने वागलं पाहिजे, हा संदेश मिळतो,” असं प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या ‘पेटा’ या संघटनेच्या कॅप्टिव्ह वाइल्डलाइफ विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक डेबी मेट्झलर यांनी म्हटलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC