Home LATEST NEWS ताजी बातमी ‘इंदिरा गांधींना जणू मृत्यूची चाहूल लागली होती’; आणीबाणी, बाबरी मशीद सारख्या...

‘इंदिरा गांधींना जणू मृत्यूची चाहूल लागली होती’; आणीबाणी, बाबरी मशीद सारख्या मुद्द्यांवर सोनिया गांधींची मते

4
0

Source :- BBC INDIA NEWS

सोनिया गांधी

वाचन वेळ: 6 मिनिटे

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी 1975 मध्ये देशात लागू केलेली आणीबाणी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या आणि बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेबाबत आपली भूमिका मांडली आहे.

आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांची काय भूमिका होती, यावरही त्यांनी चर्चा केली.

सोनिया गांधी यांच्या मते, आणीबाणी लागू करण्यासाठी केवळ संजय गांधी जबाबदार नव्हते, तर इंदिरा गांधी यांच्यावर त्यांच्या काही वरिष्ठ सहकाऱ्यांचाही दबाव होता.

सोनिया गांधी यांनी इंग्रजी वृत्तपत्र ‘द हिंदू’ आणि ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी त्यांनी हे म्हटलं.

या दरम्यान, त्यांनी राजीव गांधी यांनी आणीबाणीला केलेला विरोध आणि या मुद्द्यावरून गांधी कुटुंबात निर्माण झालेल्या तणावाचाही उल्लेख केला.

‘संजय गांधींना नियंत्रणात ठेवलं असतं तर…’

आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांच्या भूमिकेबाबत विचारले असता, केवळ ते एकटेच यासाठी जबाबदार नव्हते, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, “आणीबाणीसाठी केवळ संजय गांधीच जबाबदार नव्हते. परंतु सामान्य लोकांच्या मनात आणीबाणीचा उल्लेख झाला की, संजय गांधी यांचंच नाव समोर येतं. इंदिरा गांधी यांच्यावर त्यांच्या काही वरिष्ठ सहकाऱ्यांचाही मोठा दबाव होता.

मला वाटतं, त्यांच्या आसपास राजीव गांधी यांच्यासारखे फारच कमी लोक होते, ज्यांचे विचार त्यांच्यापेक्षा वेगळे होते. मला वाटतं, शेवटी माझ्या सासूबाईंनी परिस्थिती ओळखली आणि ती सुधारण्यासाठी पावलं उचलली.”

आणीबाणीच्या निर्णयावरून कुटुंबातही तणाव निर्माण झाला होता, असं सोनिया गांधींनी सांगितलं. (फाइल फोटोः संजय गांधी आणि इंदिरा गांधी)

सोनिया गांधी यांच्या मते, “आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयावरून गांधी कुटुंबातही एकमत नव्हतं. राजीव गांधी यांचा या निर्णयाला विरोध होता. पुढची निवडणूक होईपर्यंत थांबावं, असा सल्ला त्यांनी आई इंदिरा गांधी यांना दिला होता. परंतु, त्यांचे धाकटे भाऊ संजय गांधी आणीबाणी लागू करण्याच्या बाजूने होते. कुटुंबासोबत रात्रीच्या जेवणाच्या वेळी त्यांनी म्हटलं होतं की, विरोधक त्यांच्या आईचं राजकीय नुकसान करतील.”

‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की, “संजय गांधी यांना नियंत्रणात ठेवलं गेलं असतं, तर नंतर झालेलं बरंचसं नुकसान टाळता आलं असतं.”

सोनिया गांधी

यामुळे त्यांच्या कुटुंबातही तणाव वाढला होता, असं सोनिया गांधी सांगतात.

त्यांच्या मते, राजीव गांधी यांनी आपल्या आईशी याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण इंदिरा गांधी यांनी त्यांचं ऐेकलं नाही.

सोनिया गांधी सांगतात, “आणीबाणीच्या काळात जे काही घडत होतं, त्याचं गांभीर्य मला ती संपल्यानंतरच लक्षात आलं. हो, त्या काळात लोकांचे लोकशाही हक्क रोखण्यात आले होते. कोणताही खटला न चालवता अटकेत ठेवण्याच्या विरोधात दाद मागण्याचा कायदेशीर अधिकारही काढून घेण्यात आला होता. परंतु, हे सर्व निर्णय संविधानाच्या चौकटीत राहूनच घेण्यात आले होते.”

“तरीही, त्या काळाचा विचार केला आणि इंदिरा गांधी यांच्या दृष्टिकोनातून परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर मला जाणवतं की बिघडत चाललेली परिस्थिती हाताळण्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. त्यावेळी हिंसक आंदोलनं सुरू होती. सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांना आग लावली जात होती. मोठ्या प्रमाणावर अशांतता पसरवली जात होती. सरकारी अधिकारी आणि लष्करानेही सरकारचे आदेश पाळू नयेत, असं आवाहन केलं जात होतं.”

‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत सोनिया गांधी म्हणाल्या की, इंदिरा गांधी यांना नंतर परिस्थितीची जाणीव झाली होती. त्यामुळेच त्यांनी मार्च 1977 मध्ये निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला होता.

सोनिया गांधी म्हणाल्या की, नंतर इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात झालेल्या अन्यायाबद्दल जाहीरपणे खेद व्यक्त केला होता आणि माफीही मागितली होती.

‘इंदिरा गांधींना मृत्यूची चाहूल आधीच लागली होती’

सोनिया गांधी यांनी 1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येशी संबंधित घटनांबाबतही भाष्य केलं.

त्यावेळी काही सशस्त्र कट्टरतावादी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपून बसले होते. ते स्वतंत्र शीख देशाची घोषणा करण्याच्या तयारीत होते.

अशा परिस्थितीत इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिरात लष्करी कारवाई करण्यास परवानगी दिली. हे मंदिर शीख धर्मातील हे सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक आहे.

या लष्करी कारवाईत भाविकांसह अनेक कट्टरतावादीही मारले गेले. रणगाडे आणि मोठ्या शस्त्रांचा वापर केल्यामुळे सुवर्ण मंदिराचेही मोठे नुकसान झाले.

सोनिया गांधी सांगतात की, या कारवाईत झालेल्या विध्वंसाची छायाचित्रं जेव्हा त्यांच्या सासूबाईंना दाखवण्यात आली, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

यानंतर इंदिरा गांधी यांना सतत धमक्या मिळू लागल्या. सोनिया गांधी म्हणतात, “आपला मृत्यू झाल्यास काय करायचं, हे इंदिरा गांधी यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं. म्हणजेच, त्यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती.”

‘द गार्डियन’च्या वृत्तानुसार, इंदिरा गांधी यांनी राहुल यांना धाडसी बनण्याचा आणि न रडण्याचा सल्ला दिला होता.

त्याच उन्हाळ्यामध्ये इंदिरा गांधी आपल्या नातवंडांना घेऊन काश्मीरमधील त्यांच्या वडिलोपार्जित घरी गेल्या होत्या. सोनिया गांधी यांच्या मते, या भेटीतून इंदिरा गांधी त्यांचा ‘शेवटचा निरोप’ घेऊ इच्छित होत्या.

इंदिरा गांधी यांनी शीख सुरक्षारक्षकांना हटवण्याचा सल्लाही मानला नाही. पुढे हाच निर्णय त्यांच्या मृत्युचे कारण बनले.

31 ऑक्टोबर 1984 रोजी सोनिया गांधी घरात असताना त्यांना फटाके फुटल्यासारखा आवाज ऐकू आला. त्या लगेच शेजारीच असलेल्या कार्यालयाच्या दिशेने धावत गेल्या.

तिथे त्यांना आपल्या सासूबाई इंदिरा गांधी रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेल्या दिसल्या. त्यांच्या शरीरावर गोळ्या लागल्याच्या अनेक जखमा होत्या. सुवर्ण मंदिरातील लष्करी कारवाईचा बदला घेण्यासाठी इंदिरा गांधी यांच्याच शीख सुरक्षारक्षकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.

इंदिरा गांधी यांच्यावर त्यांच्या शीख सुरक्षारक्षकांनी गोळ्या झाडल्या होत्या. (इंदिरा गांधी यांच्यावर अंतिम संस्कार केले जात असतानाचे छायाचित्र.)

यानंतर घडलेली घटना आजही सोनिया गांधी यांच्या आठवणीत आहे. इंदिरा गांधी यांना गाडीत ठेवल्यानंतर सोनिया यांनी त्यांचं रक्ताने माखलेलं शरीर आपल्या कुशीत घेतलं होतं.

त्या इंदिरा गांधी यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होत्या. गाडी वेगाने रुग्णालयाच्या दिशेने जात होती.

सोनिया गांधी सांगतात, “आजूबाजूला सर्वत्र रक्तच दिसत होतं. इंदिरा गांधी माझ्या प्रश्नांना उत्तर देत नव्हत्या, हे माझ्या लक्षात आलं. जणू काही त्या या जगातून आधीच निघून गेल्या होता, असं वाटत होतं.”

सोनिया गांधी यांनी सांगितलं, “मला आठवतं, घरापासून रुग्णालयापर्यंतचा प्रवास खूप वेदनादायी होता. रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती, तरीही रुग्णालयात पोहोचायला खूप वेळ लागत असल्यासारखं वाटत होतं. इंदिरा गांधी काहीच बोलत नव्हत्या. म्हणजे सगळं संपलं आहे, याची मला जाणीव झाली होती.”

‘मशीद पाडल्याची छायाचित्रं पाहून रडल्या होत्या’

सोनिया गांधी यांनी मुलाखतीत राजीव गांधी यांच्या हत्येबाबतही भाष्य केलं. त्यांच्या मते, राजीव गांधी यांच्या हत्येमागचं सत्य अजूनही पूर्णपणे समोर आलेलं नाही.

राजीव गांधी यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी नेमलेला शेवटचा आयोग मोदी सरकारने बंद केला, असं सोनिया गांधी सांगतात. त्या खेदाने म्हणाल्या, “आता या हत्येमागचं सत्य आपल्याला कधी समजू शकेल, असं मला वाटत नाही.”

टीव्हीवर मशीद पाडतानाचे दृश्य पाहताना आपल्याला रडू आलं होतं, असं सोनिया गांधी यांनी सांगितलं. (फाइल फोटो : 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली, त्या दिवशीचे छायाचित्र)

मुलाखतीत सोनिया गांधी यांनी 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्याच्या घटनेचाही उल्लेख केला.

टीव्हीवर बाबरी मशीद पाडतानाची दृश्यं पाहून आपल्याला रडू कोसळलं होतं, असं त्यांनी सांगितलं.

“त्याच क्षणी आपल्याला जाणवलं की महात्मा गांधी, नेहरू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घडवण्याचा प्रयत्न केलेल्या धर्मनिरपेक्ष भारतासाठी आता आपल्याला मोठा संघर्ष करावा लागणार आहे,” असं त्या म्हणाल्या.

भाजप आणि तिच्या कट्टर हिंदुत्वाच्या राजकारणाचा प्रभाव वाढण्यामागे त्यांच्या स्वतःच्या काँग्रेस पक्षाच्याही काही चुका कारणीभूत आहेत, असं त्या मान्य करतात.

सोनिया गांधी म्हणतात, “मला वाटतं, अनेक बाबतीत आम्ही खूप निष्काळजी राहिलो. जे घडत आहे, ते घडू द्या, अशीच आमची भूमिका होती.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC