Home LATEST NEWS ताजी बातमी ‘एलियन स्टार’ : टोमण्यांपासून ते स्टारडमपर्यंत प्रवास केलेला 12 वर्षांचा चिमुकला कोण...

‘एलियन स्टार’ : टोमण्यांपासून ते स्टारडमपर्यंत प्रवास केलेला 12 वर्षांचा चिमुकला कोण आहे?

2
0

Source :- BBC INDIA NEWS

मोती मेघवाल असं नाव असलेला हा चिमुकला सोशल मीडिया सेंसेशन 'एलियन स्टार' आहे.

फोटो स्रोत, Mohar Sinh Meena

राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील सुजानगडपासून पुढे चरिया गावाच्या दिशेने निघालं की रस्ता हळूहळू अरुंद होताना दिसतो. पुढे एक वाळू असलेली एक पायवाट आणि भोवती राजस्थानच्या गावांमध्ये असलेली नेहमीची शांतता होती.

याच शांततेमध्ये तीन खोल्यांचं एक घर आहे. सध्या या घरामध्ये अनेकदा दूर दूरवरून येणाऱ्या लोकांची गर्दी असते.

आम्ही पोहोचलो तेव्हा घराबाहेर बरीच गर्दी होती. काही जण सेल्फी काढण्यासाठी थांबले होते, तर काही जण सोशल मीडियावर ज्या मुलाचा व्हीडिओ पाहिला त्याला जवळून पाहता यावं म्हणून दूरवरून आलेले होते.

ही सगळी गर्दी जमली होती, मोती मेघवालसाठी. त्याला सोशल मीडियामध्ये ‘एलियन स्टार’ म्हणून ओळखतात.

मोतीबाबत ऐकल्यानंतर मनात असा प्रश्न येऊ शकतो की, या मुलामध्ये असं काय विशेष आहे की लोक त्याला भेटायला येत आहेत?

तर याच्या उत्तराची सुरुवात होते त्याच्या चेहऱ्यापासून आणि शेवट होतो त्याच्या कहाणीनं.

मोतीला त्याच्या चेहऱ्यामुळं किंवा विशेषतः भुवयांमुळं गावकरी आणि शाळेतीले मुलं ‘एलियन’ म्हणजे दुसऱ्या ग्रहावरून आलेला असं चिडवत होते.

मोती मेघवाल बीबीसीशी बोलताना म्हणाला की, पूर्वी त्यांना याबद्दल वाईट वाटायचं. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता लोक याच ‘एलियन स्टार’सोबत फोटो काढण्यासाठी वाट पाहतात.

'एलियन स्टार' : टोमण्यांपासून ते स्टारडमपर्यंत प्रवास केलेला 12 वर्षांचा चिमुकला कोण आहे?

फोटो स्रोत, Mohar Sinh Meena

“पूर्वी जेव्हा लोक मला एलियन म्हणायचे, तेव्हा मला वाईट वाटायचं. पण आता जेव्हा ते मला प्रेमानं एलियन स्टार म्हणतात, तेव्हा मला खूप छान वाटतं,” असं मोती म्हणतो.

सोशल मीडियावर त्याचा एक व्हीडिओ जवळपास 18.6 कोटी वेळा पाहिला गेला आहे. तर दुसऱ्या एका व्हीडिओला जवळपास 10 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. त्याशिवाय त्याच्या इतरही व्हीडिओंना लाखो व्ह्यूज आहेत.

त्याचे इन्स्टाग्रामवर सुमारे 19 लाख आणि फेसबुकवर सुमारे 11 लाख फॉलोअर्स आहेत.

मोतीने विनोदालाच बनवली ओळख

मोतीची गोष्ट ही केवळ लाखो व्ह्यूज आणि फॉलोअर्सपुरतीच मर्यादित नाही. ही एका अशा मुलाची गोष्ट आहे, ज्यानं त्याच्याबाबत केलेल्या एका मस्करीलाच स्वतःची ओळख बनवले.

पूर्वी वर्गात त्याचे कोणी मित्र नव्हते, पण आता सगळे त्याच्याबरोबर सेल्फी काढतात.

बारा वर्षांचा मोती मेघवाल सातवीत शिकतो. त्याचे आई-वडील शेतकरी असून, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अगदी सामान्य आहे.

मोती जवळपास वर्षभरापासून व्हीडिओ बनवत आहे.

सुरुवातीला, त्याच्या व्हीडिओंना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नंतर त्याने एका व्हीडिओमध्ये बोललेल्या एका वाक्याने लक्ष वेधून घ्यायला सुरुवात केली.

मोती त्याचा हा गाजलेला डायलॉग म्हणतो, “लोग बोलते थे तू कुछ नहीं कर पाएगा, अब वही लोग कहते हैं तू बहुत आगे जाएगा.”

'एलियन स्टार' : टोमण्यांपासून ते स्टारडमपर्यंत प्रवास केलेला 12 वर्षांचा चिमुकला कोण आहे?

फोटो स्रोत, Mohar Sinh Meena

आयुष्य बदलून टाकणारा एक व्हिडिओ

मोती सांगतो की, त्याचे जवळपास अडीच लाख फॉलोअर्स होते. नंतर 15 ऑगस्टसाठी बनवलेल्या एका व्हीडिओने त्यांचं आयुष्य बदलून टाकलं.

व्हीडिओमध्ये शिक्षिका शाळेत मुलांना,’जो चांगले कपडे घालून येईल त्याला दोन लाडू मिळतील’ असं सांगतात. दुसऱ्या दिवशी मोती शेरवानी घालून शाळेत जातो. असा हा व्हीडिओ होता.

हा व्हीडिओ अत्यंत वेगानं व्हायरल झाला आणि मोतीनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत त्याला 18.6 कोटींहीन जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

त्यानंतर बनवलेल्या त्याच्या बहुतांश व्हीडिओंना लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

'एलियन स्टार' : टोमण्यांपासून ते स्टारडमपर्यंत प्रवास केलेला 12 वर्षांचा चिमुकला कोण आहे?

फोटो स्रोत, Mohar Sinh Meena

सध्या त्याचे इन्स्टाग्रामवर 19 लाख आणि फेसबूकवर 11 लाख फॉलोअर्स आहेत असं मोती सांगतो. त्यांनं आता यूट्यूबवरही काम सुरू केलं आहे.

पण फक्त फॉलोअर्सची संख्या हा मोतीसाठीचा सर्वात मोठा बदल नाही.

तो म्हणतो, “पूर्वी वर्गात माझे कोणी मित्र नव्हते, माझ्याशी कोणी बोलत नसायचं. सगळे मला चिडवायचे. पण आता माझे मित्र बनले आहेत. सगळे माझ्याबरोबर सेल्फीही काढतात.”

स्वतःला ‘एलियन स्टार’ हे नाव का दिलं असं मोती हसून म्हणतो, “कारण, मी एलियनसारखा दिसतो.”

दररोज वेगवेगळ्या ठिकाणांहून सुमारे शंभर ते दोनशे लोक भेटायला येतात, असं मोती सांगतो.

“मला शिकायचं आहे, व्हीडिओ बनवायचे आहेत आणि हिरो बनायचं आहे,” असं मोती म्हणतो.

कुटुंबाचा दृष्टीकोनही बदलला

मोतीच्या लोकप्रियतेमुळे त्याच्या कुटुंबाची मानसिकताही बदलली आहे. पूर्वी कुटुंबीय त्याला अभ्यास करायला सांगायचे, पण आता ते त्याला व्हीडिओ बनवायला सांगतात, असं मोती म्हणतो.

आधी मोतीकडे एक साधा फोन होता. पण प्रसिद्धी मिळू लागल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी वडील निंबाराम मेघवाल यांनी त्याला नवीन फोन घेऊन दिला आहे.

सर्वसाधारणपणे पालक मुलांना मोबाईल फोनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण तुम्ही स्वतः फोन का घेऊन दिला? असं मोतीच्या वडिलांना विचारलं.

'एलियन स्टार' : टोमण्यांपासून ते स्टारडमपर्यंत प्रवास केलेला 12 वर्षांचा चिमुकला कोण आहे?

फोटो स्रोत, Mohar Sinh Meena

निंबाराम म्हणतात, “जर तो चांगलं काम करत असेल तर काही अडचण नाही.”

मोती अभ्यासात हुशार आहे, तो अभ्यास करतो आणि व्हीडिओही बनवतो, असं ते सांगतात.

पंजाब, चंदीगड, हरियाणा आणि इंदूर यांसारख्या ठिकाणांहून लोक मोतीला भेटायला येतात, असं त्याचे वडील सांगतात. गावकरीही यानं आनंदी असल्याचं ते सांगतात.

सोशल मीडियावरून मिळणाऱ्या उत्पन्नातून सध्या तरी त्यांचा खर्च भागतो, तसंच संपूर्ण कुटुंब आणि गाव मोतीला पाठिंबा देतात असं निंबाराम म्हणाले.

कन्याकुमारीपासून श्रीनगरपर्यंतचे लोक येतात

मोती सांगतो की, त्याला सोशल मीडियावरून थोडं उत्पन्न मिळू लागलं आहे तसंच लोक प्रसिद्धीसाठी त्याच्याकडं येऊ लागले आहेत. सोशल मीडियावर लोकप्रियता मिळाल्यानंतर इतर शहरांमध्ये प्रवास करतो, तेव्हा लोक त्याला ओळखतात, असंही त्यानं सांगितलं.

मोतीची लोकप्रियता आता गावाच्या सीमांपार पसरली आहे. त्याच्याघराबाहेर बसलेले पवन कुमार सुमारे 250 किलोमीटर दूर असलेल्या हरियाणातील भिवाडीहून त्याला भेटण्यासाठी आले होते.

ते म्हणाले की, “कुठेही आणि केव्हाही पाहिलं तर त्यांच्या फोनच्या स्क्रीनवर फक्त ‘एलियन स्टार’च दिसतो.”

'एलियन स्टार' : टोमण्यांपासून ते स्टारडमपर्यंत प्रवास केलेला 12 वर्षांचा चिमुकला कोण आहे?

फोटो स्रोत, Mohar Sinh Meena

त्यांनी मोतीचा पहिला व्हीडिओ पाहिला आणि तेव्हापासून ते त्याला फॉलो करत असल्याचं ते सांगतात.

“एवढ्या लहान मुलाला देशभरात एवढी प्रसिद्धी मिळत आहे हे पाहून मलाही आनंद झाला,” असं ते म्हणाले.

चारिया गावातील रहिवासी राजकुमार शर्मा यांच्यामते, मोतीची लोकप्रियता ही आता संपूर्ण गावाची ओळख बनली आहे.

“देशाच्या विविध भागांतून लोक इथं येत आहेत. ही अभिमानाची बाब आहे. चरिया गावात सुमारे सातशे घरं आहेत. हे ग्रामपंचायतीचे मुख्यालय आहे,” असं राजकुमार म्हणाले.

व्हीडिओ शूट करायला मदत

'एलियन स्टार' : टोमण्यांपासून ते स्टारडमपर्यंत प्रवास केलेला 12 वर्षांचा चिमुकला कोण आहे?

फोटो स्रोत, Mohar Sinh Meena

मोतीच्या काकांचा मुलगा असलेले मुकेश त्याला व्हीडिओ शूट करण्यात आणि स्क्रिप्टसाठी मदत करतात.

मोतीचा मोठा भाऊही व्हीडिओ बनवायचा, पण त्याचे व्हीडिओ व्हायरल झाले नाहीत. त्यानंतर त्याने मोतीसोबत व्हीडिओ बनवायला सुरुवात केली, असं मुकेश सांगतात.

मुकेश यांच्या मते, “आम्ही इतके व्हायरल होऊ, असा कधीच विचार केला नव्हता. लोकांकडून इतकं प्रेम मिळणं खूप छान वाटतं. आम्हाला भेटायला लोक दूरदूरवरून येतात.”

‘एलियन स्टार’ नावाने अकाऊंट

मोतीकडे व्हीडिओ तयार करण्यासाठी मोठा स्टुडिओ किंवा महागडी उपकरणं नाहीत.

“आमच्याकडे फारशी साधनं नाहीत. आम्ही घरी आणि आजूबाजूच्या परिसरात शूट करतो. तरीही, आमच्या प्रत्येक व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळतात,” असं मुकेश म्हणतात.

पण मुकेश यांच्या मते, मोतीच्या यशामागे खरं कारण काहीतरी वेगळंच आहे.

मोती व्हायरल झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल बोलताना मुकेश म्हणाले की, “तो चर्चेत आल्यानंतर खूप काही बदललं आहे. पूर्वी मोतीला कोणी मित्र नव्हते आणि आता लोक त्याला भेटायला, सेल्फी काढायला दूरदूरवरून येतात. त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे.”

आता चारिया गावात मोतीच्या घराबाहेर लोकांची सतत ये-जा असते.

'एलियन स्टार' : टोमण्यांपासून ते स्टारडमपर्यंत प्रवास केलेला 12 वर्षांचा चिमुकला कोण आहे?

फोटो स्रोत, Mohar Sinh Meena

कधीकधी कोणी त्याचे व्हीडिओ पाहून इथे येते, कधीकधी कोणीतरी मुलाला त्याला भेटायला घेऊन येते आणि कधीकधी कोणीतरी त्याच्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी येतं.

‘एलियन’ शब्द आता चेष्टेचा नाही

मोतीसाठी ‘एलियन’ हा आता चेष्टेचा राहिलेला नाही. तेच त्याचं नाव आहे आणि हीच त्याची ओळख आहे.

कदाचित त्याच्या जीवनाच्या गोष्टीतील हाच सर्वात हृदयस्पर्शी भाग आहे. ज्या गोष्टीसाठी त्याला लहानपणी हिणवलं जात असे, त्याच गोष्टीला त्याने शक्ती बनवलं.

आता, चारिया गावाच्या रस्त्यांवर, जेव्हा कोणी ‘एलियन स्टार’ कुठे राहतो, असं विचारतं तेव्हा लोक त्याला घरी सोडायला जातात.

मोतीने आता एक नवी ओळख निर्माण केली आहे, पण मुलांच्या चेहऱ्यांबद्दल केलेल्या टिप्पणींचा त्यांच्यावर नकारात्मक परिणामही होऊ शकतो.

आम्ही या विषयावर दिल्लीतील एम्स येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. गणेश कुमार मीना यांच्याशी बोललो. त्यांच्या मते, छळामुळे मुलांमध्ये चिंतेसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

यामुळे अनेकदा मुले इतरांशी संवाद साधणे कमी करतात, त्यांचे मित्र कमी होतात आणि त्यांना मिळणारा सामाजिक आधारही कमी होतो. अशा परिस्थितीत, अनेक मुलांना समुपदेशनाची गरज भासू शकते. जर मुलांमध्ये ही लक्षणे दिसून आली, तर पालकांनी डॉक्टर किंवा मानसिक आरोग्य तज्ञाचा सल्ला घ्यावा, असं ते सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC