Source :- BBC INDIA NEWS

'ऑपरेशन टायगर'मध्ये किती तथ्य?

फोटो स्रोत, Getty Images

शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन तोंडावर असताना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठी खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नऊ पैकी सात खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत.

रविवारी 14 जून रोजी उद्धव ठाकरे यांनी त्यांचं निवासस्थान ‘मातोश्री’ याठिकाणी निमंत्रित केलेल्या बैठकीला तब्बल पाच खासदार प्रत्यक्षरीत्या उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली होती. त्यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले.

इतकंच नाही तर गेल्या काही काळात एकनाथ शिंदे यांनी अनेकदा दिल्ली वारी केली आहे. 8 जून रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी ते दिल्लीत होते. त्यापूर्वी त्यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली होती.

या चर्चांच्या पार्श्वभूमीवर खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बोलवलेली बैठक महत्त्वाची होती. याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण यात पाच खासदार मातोश्रीवर पोहचले नाहीत. त्यांनी वेगवेगळी कारणे देत बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली.

यात यवतमाळचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर प्रत्यक्ष हजर नव्हते.

तर दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई, उत्तर-पूर्व मुंबईचे खासदार संजय दीना पाटील आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाझे बैठकीला उपस्थित होते.

आणि यानंतरच ‘ऑपरेशन टायगर’ संदर्भातल्या चर्चांना उधाण आलं. या चर्चा अधिक प्रबळ होत गेल्या. पण केवळ चर्चाच नाही तर घडामोडी सुद्धा संभ्रम निर्माण व्हावा किंवा राजकीय हालचालींना वेग आल्याचंच स्पष्ट करतात.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते संजय राऊत यांनी ऑपरेशन टायगरबाबतचे दावे फेटाळले आहेत.

शिवसेनेत नेमकं काय घडतंय? आणि याचा राज्यातल्या राजकारणावर काय परिणाम होईल? जाणून घेऊया.

संजय राऊत काय म्हणाले?

‘मातोश्री’ या ठिकाणच्या खासदारांच्या गैरहजेरीच्या बातम्या थांबत नाहीत तोपर्यंत या बैठकीला प्रत्यक्ष गैरहजर राहिलेले ठाकरेंचे खासदार संजय देशमुख (यवतमाळ) दुसऱ्या दिवशी मात्र दिल्लीला पोहचले. इतकंच नाही तर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार आणि राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली.

म्हणजे ज्या खासदारांना आदल्या दिवशी मुंबईत पोहचता आलं नाही ते दुसऱ्या दिवशी मात्र दिल्लीला नेमके महायुतीच्याच मंत्र्यांना भेटायला गेले. अर्थात त्यांनी आपलं खासगी काम असल्याचं नंतर स्पष्ट केलं.

याच दिवशी म्हणजे सोमवारी 15 जून रोजी उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी खासदारांच्या पक्षांतराचे दावे फेटाळले. पण संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत यांनी मात्र तातडीने दिल्ली गाठली.

14 जून रोजी शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी ‘ऑपरेशन टायगर’ असा उल्लेख करत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं की, “कोणत्या ऑपरेशन टायगरची बात तुम्ही करताय. आम्ही आता लांडगा ऑपरेशन करणार आहोत. आम्ही घाबरणारे लोक नाही. आमचा लोकसभा गट मजबूत आणि एकसाथ आहे.”

शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत

फोटो स्रोत, ani

गेल्या काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’ ही टर्म माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सात खासदार पक्षांतर करत असल्याची ही चर्चा आहे. खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच प्रवेश करतील असा दावा केला जात आहे.

यालाच ‘ऑपरेशन टायगर’ असं म्हणत खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. आणि या चर्चेला त्यांनी त्यांच्या ‘स्टाईल’ने उत्तर देत फेटाळून लावलं.

पण पुढच्या 48 तासांनंतरच खासदार संजय राऊत यांच्या भाषेतही बदल दिसला.

16 जून रोजी दिल्ली दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांना पुन्हा यावर प्रश्न विचारण्यात आला आणि ते म्हणाले, “शिवसेनेत हे यापूर्वीही झालं आहे. तरीही पक्ष उभा आहे. आमच्या पक्षाला संघर्षाचा मोठा अनुभव आहे. साठ वर्षांत असे अनेक घाव आम्ही पाहिले आहेत. आमचा पक्ष केवळ खासदार आणि आमदारांचा पक्ष नाही. हा पक्ष कॅडर बेस पक्ष आहे. आमदार खासदार येत असतात आणि जातात. आमचा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.”

सात खासदार जाऊ शकतात का? यावर ते म्हणाले की, “आमच्यासमोर अशी कोणतीही माहिती किंवा घडामोड समोर आलेली नाही. आमचेही दिवस येतील.”

यापूर्वी संजय राऊत यांनी खासदार कुठेही जात नसल्याचं सांगत दिल्ली येथेच माध्यमांशी बोलताना आपल्या खासदारांनी बैठकीत अगदी शपथा घेतल्याचंही सांगितलं. ते म्हणाले, “अशी कोणतीही माहिती आमच्याकडे नाही. उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या बैठकीत सर्व खासदार सहभागी झाले होते. काही जण ऑनलाईन हजर होते. यापैकी काही खासदारांनी सर्व खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. कोणी देवाची शपथ घेतली, कोणी साईबाबांची शपथ घेतली, कोणी आपल्या मुलाची शपथ घेतली आणि शेवटपर्यंत पक्षासोबत असल्याचं सांगितलं.”

बैठकीला ऑनलाईन हजेरी लावलेल्या काही खासदारांशी संपर्क साधण्याचा बीबीसी मराठीने अनेक वेळा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यावर अपडेट करण्यात येईल.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या नेत्यांनी काय दावे केले?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ज्येष्ठ नेते कृपाल तुमाने यांनी ‘ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर त्यांच्या दाव्यानुसार, 16 आमदार आणि 7 खासदारांना पक्षांतर करण्यासाठी अंतिम वाटाघाटी पूर्ण झाल्या असून, केवळ पक्षात सामील होण्याची तारीख बाकी आहे. उभाठाच्या 16 आमदारांचे ऑपरेशन टायगर हे पावसाळी अधिवेशनांनंतर होईल असेही कृपाल तुमाने म्हणालेत.

परंतु मंत्री उदय सामंत यांनी मात्र अशा कुठल्याचा बंडाचा दावा किंवा ठाकरेंच्या खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबतची भेट झाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

उदय सामंत

फोटो स्रोत, facebook

उदय सामंत म्हणाले की, “किती खासदार बैठकीला उपस्थित होते, नव्हते हे तुमच्या माध्यमातून आम्हाला कळतंय. शिवसेना पक्षाला खासदार फोडण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. यूबीटीच्या खासदारांच्या संदर्भात आमचा कोणाचीही संपर्क झालेला नाही. ऑपरेशन टायगरच्या संदर्भात जे काही वातावरण तयार केलं जातं आहे. यूबीटीच्या खासदारांची कोणतीही बैठक झालेली नाही. मी शिर्डीला असताना बाजूला खासदार वाकचौरे होते. मी भेटलेलो नाही. एकनाथ शिंदेही युबीटीच्या खासदारांना भेटलेले नाहीत.”

घटनाक्रम काय सांगतो?

महायुतीच्या सत्तास्थापनेपासून ठाकरेंचे आमदार किंवा खासदार आमच्या संपर्कात आहेत असे अनेक दावे दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून करण्यात आलेले आहेत. पण मुंबई महानगरपालिकेत पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर पुन्हा एक नवं आव्हान उभं राहिलं.

शिवाय, राज्यात महायुतीतही सारं काही आलबेल नसल्याचं चित्र सातत्याने समोर येताना दिसतं. शिवसेनेला डावललं जात असल्याच्या तक्रारी सुद्धा आता उघडपणे केल्या जाऊ लागल्या आहेत. यामुळे भाजप आणि शिवसेना या दोन्ही नेतृत्वात कुरघोडीचं राजकारण सुरू असल्याचंही म्हटलं जातं.

या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आपला पक्ष आणि आपलं स्थान अधिक मजबूत करू पाहतायत असंही याचं विश्लेषण केलं जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही महिन्यात अनेकदा दिल्ली दौरे केले आहेत. जूनमध्ये झालेल्या दिल्लीवारीनंतर खासदार फुटीच्या चर्चा अधिक होऊ लागल्या.

उद्धव ठाकरे यांनी अचानक आपल्या खासदारांची बैठक बोलवणं हे सुद्धा पडद्यामागे सुरू असलेल्या हालचालींचे संकेत असल्याचं मानलं जात आहे. आणि यानंतर दिल्लीतल्या घडामोडी, ठाकरेंच्या शिवसेनेतून खासदारांच्या समोर येणाऱ्या प्रतिक्रिया आणि पाच खासदारांची प्रत्यक्ष अनुपस्थिती यामुळेही अनेक अंदाज बांधले जात आहेत.

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Getty Images

ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणाले की, “दोन-तृतीयांश खासदारांच्या संख्येची जुळवाजुळव झालेली दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर ही संख्या जुळलेली दिसत आहे. मातोश्री या ठिकाणी झालेल्या बैठकीत पोहचलेले खासदार सोबत राहतील आणि गैरहजर राहिलेले सोडून जातील असं काही गृहीत धरता येणार नाही. कारण आपण 2022 मध्ये झालेल्या घडामोडी पाल्या तर अनेकजण शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंच्या बैठकीत उपस्थित होते पण शेवटच्या क्षणी गेले. यामुळे उपस्थितीनुसार काही गृहीत धरण्याचं कारण नाही.”

उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा सेटबॅक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. “विशेषत: मुंबई महानगरपालिका हातातून गेल्यानंतर म्हणजे शेवटचा गडही ढासळल्यानंतर पक्षासाठी आव्हानात्मक परिस्थिती आहे. असं बंड पुन्हा झालं तर आमचीच खरी शिवसेना आहे हे आणखी अधोरेखित होईल,” असंही अभय देशपांडे म्हणाले.

ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान असं सांगतात, “प्रत्येकाने गैरहजर राहण्याची कारणे दिलेली आहेत. या सरकारमध्ये दुर्देवाची गोष्ट अशी आहे की तुम्ही सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी नसाल तर तुम्हाला अनेक बाबतीत अडवणूक केली जाते. निधी मिळत नाही. किंवा नाममात्र निधी दिला जातो.

“आमदार आणि खासदारांमध्ये असलेली ही अस्वस्थता आहे. शेजारच्या जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निधी आलेला दिसतो मात्र विरोधी पक्षांना तो फारसा मिळत नाही यामुळे अस्वस्थता असते. यामुळे अनेकांना असं वाटत असतं की आपल्या पक्षाच्या नेत्याने किंवा आपण सत्तेच्या जवळ असलं पाहिजे,” असं प्रधान सांगतात.

भाजप एकनाथ शिंदे यांना प्रबळ का करेल?

राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी सत्तास्थापनेपासूनच भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेतल्या कुरबुरी लपून राहिलेल्या नाहीत. सुरुवातीला खातेवाटप, यानंतर निधीवाटप आणि जिल्हापातळीवर आपल्याला डावललं जात असल्याच्या अनेक तक्रारी आतापर्यंत समोर आल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लोकसभेच्या खासदारांची संख्या सात आहे. यात कल्याणमधून श्रीकांत शिंदे, ठाण्यातून नरेश म्हस्के, छत्रपती संभाजीनगर येथून संदीपान भूमरे, हातकणंगलेतून धैर्यशील माने, उत्तर-पश्चिम मतदारसंघातून रविंद्र वायकर, बुलढाण्यातून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि मावळमधून श्रीरंग बारणे. यात ठाकरेंच्या शिवसेनेतून खासदारांनी पक्षांतर केल्यास अर्थात एकनाथ शिंदे यांची दिल्लीतली ताकद वाढणार हे स्पष्ट आहे. पण खासदारांच्या फुटण्याची ही वेळ कशी महत्त्वाची आहे आणि त्यातून काय साध्य केलं जाऊ शकतं?

राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी सत्तास्थापनेपासूनच भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेतल्या कुरबुरी लपून राहीलेल्या नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images

ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संदीप प्रधान सांगतात की, “दर महिन्यातून एकदा ऑपरेशन टायगर होणार अशा अफवा पसरत असतात. यापूर्वी अनेकदा असं कानावर आलंय की एकनाथ शिंदे यांनी यासाठी दिल्लीत परवानगी मागितली होती. राज्यात भाजप त्यांना सापत्न वागणूक देत असल्याचंही अनेकदा समोर आलं आहे. ठाकरेंची शिवसेना संपवून एकनाथ शिंदे यांची शिवसेना प्रबळ करण्यात भाजपला रस आहे का, हा यातला कळीचा मुद्दा आहे. जर समजा ऑपरेशन टायगर झालं तर एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणखी मोठा होईल, राज्यात आणि दिल्लीत त्यांचं वजन वाढेल. शिंदे प्रबळ झाले तर केंद्र सरकारमध्ये वाढलेल्या वजनामुळे दिल्लीत मंत्रिपद मागतील, भविष्यात राज्यात मुख्यमंत्रीपद मागतील. यामुळे भाजपला यात रस आहे का? हा प्रश्न आहे.”

ते पुढे सांगतात, “गेल्या काही काळात पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं ट्युनिंग बऱ्यापैकी दिसत आहे. समजा काही खासदारांची गरज दिल्ली सभागृहात पडली तर ते उद्धव ठाकरे यांच्याशी बोलू शकतात. शिवाय, राज्यात एकनाथ शिंदे महायुतीत आहेतच. यामुळे भाजपला दोन्ही गोष्टी साध्य करता येत असतील तर भाजप एकनाथ शिंदे यांना प्रबळ करणार नाही किंवा तशी गरज भाजपला नाही.”

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Getty Images

ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे सांगतात, “एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत मोठी फूट पाडली त्याबदल्यात त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले, पण ते मुख्यमंत्री असताना झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त खासदार निवडून आणता आले नाहीत. ठाकरेंचे 9 तर शिंदेचे 7 खासदार निवडून आले. ही सल एकनाथ शिंदेंच्या मनात असणारच. दुसरीकडे जेवढे जास्त खासदार तेवढे दिल्लीत जास्त वजन हे शिंदे जाणून आहेत. एनडीएलाही संसदेतील दोन तृतीयांश बहुमतासाठी सध्या जास्त खासदारांची आवश्यकता आहे. शिंदेंनी ठाकरेंचे जास्तीत जास्त खासदार फोडले तर ते एनडीए पर्यायाने भाजपसाठी आणि शिंदेंसाठी फायद्याचे असेल. त्यातूनच ॲापरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षातील खासदारांना सांभाळण्यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीयेत.”

“हे खासदार फोडले तर दिल्लीतील वजन वाढण्याबरोबर शिंदेंचे राज्यातील राजकारणातील वजनही वाढणार आहे. सध्या भाजपकडून राज्यात शिंदेंना दाबले जात असल्याचे चित्र आहे, मात्र खासदार फोडल्यानंतर शिंदेंना राज्यातही भाजपकडून नीट सांभाळले जाऊ शकते,” असं भातुसेंना वाटतं.

पक्षांतर बंदी कायदा काय सांगतो?

पक्षांतर करायचं असल्यास लोकप्रतिनिधी यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. ही कारवाई होऊ नये यासाठी मूळ पक्षाच्या एकूण संख्येच्या दोन तृतीयांश लोकप्रतिनिधी सोबत असणं आवश्यक आहे असं कायदेतज्ज्ञ सांगतात.

उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या 9 खासदार आहेत. त्यामुळे अपात्रतेपासून वाचण्यासाठी आणि कायदेशीर विलीनीकरणासाठी कमीत कमी 7 खासदारांचा गट एकत्र बाहेर पडणे आवश्यक आहे.

1. जर कोणत्याही आमदाराने किंवा खासदाराने स्वतःहून आपल्या पक्षाचा राजीनामा दिला तर

2. जर कोणताही निवडून आलेल्या आमदार किंवा खासदाराने पक्षाच्या आदेशाचं किंवा विचारसरणीचं उल्लंघन केलं तर

3. जर निवडून आलेल्या सदस्याने पक्षाचा व्हीप मानला नाही तर

पण या कायद्याला एक अपवाद आहे. जर कोणत्याही पक्षाचे दोन तृतीयांश आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC