Home LATEST NEWS ताजी बातमी ‘ऑपरेशन टायगर’ नंतर शिंदे – फडणवीस यांच्यातला सुप्त संघर्ष वाढत जाण्याची चर्चा

‘ऑपरेशन टायगर’ नंतर शिंदे – फडणवीस यांच्यातला सुप्त संघर्ष वाढत जाण्याची चर्चा

2
0

Source :- BBC INDIA NEWS

फडणवीस-शिंदे

फोटो स्रोत, Hindustan Times via Getty Images

‘महाविकास आघाडी’ सरकार असताना एकनाथ शिंदेंनी बंड केलं. शिवसेना फुटली. अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या आणि शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली.

या पहिल्या फुटीनं जे मिळायचं होतं ते मिळालं.

मग आता जेव्हा उद्धव ठाकरेंची शिवसेना दुस-या फुटीला सामोरं जाते आहे, तेव्हा ठाकरेंपेक्षा लक्ष शिंदेंकडेच जास्त आहे.

ठाकरेंच्या पक्षाच्या फुटीमुळे शिंदेंना काय मिळणार?

ठाकरेंची साथ सोडून बाहेर पडलेले खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून त्यामार्गाने ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’ (एनडीए) मध्ये सहभागी झाले आहेत.

म्हणजे लोकसभेत भाजपाप्रणित सरकारला दोन तृतीयांश बहुमताकडे जाण्यासाठी ते मदत करणार.

पण केवळ या आकडेमोडीपाशी थांबणारा हा खेळ नाही. याचे केंद्राच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ शकणारे परिणाम बरेच आहेत.

या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे मध्यवर्ती ठिकाणी उभे आहेत. त्यांनी बांधलेल्या काही कयासांवर हे पुढचे राजकारण उलगडत जाईल.

‘एनडीए’ मध्ये वाढणारं वजन

एकनाथ शिंदेंचं ‘एनडीए’ मध्ये वाढत जाणारं वजन हा दिल्लीच्या राजकारणातला एक महत्वाचा मुद्दा आहे. एकनाथ शिंदेंकडे स्वत:चे 7 खासदार आहेत. आता 6 खासदारांच्या प्रवेशानंतर हा आकडा 13 झाला आहेत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत अनेकांना अपेक्षित होते त्यापेक्षा शिंदेंचे जास्त उमेदवार निवडून आले. पण दिल्लीत आणि ‘एनडीए’मध्ये प्रभाव पाडण्यासाठी ते पुरेसे नाहीत.

उदाहरणार्थ चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याकडे असलेल्या खासदारांच्या संख्येमुळे आज ते किंगमेकर भूमिकेत आहेत.

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Getty Images

आजच्या आकड्यांच्या स्थितीमध्ये शिंदे किंगमेकर बनू शकत नसले तरीही त्यांचं महत्व नक्की वाढू शकतं. पण जर खासदारांची संख्या वाढली तर. कारण भाजपाला त्याची गरज आहे.

लोकसभेत दोन तृतीयांश बहुमत नसल्यानं मोदी सरकारला आवश्यक वाटणारी घटनादुरुस्ती विधेयकं पारित होऊ शकत नाहीत. अलिकडेच संसदेत येऊन लोकसभेत पराभूत झालेलं 131 वी घटना दुरुस्ती विधेयक त्याचं एक उदाहरण.

त्यामुळं भाजपा सध्या खासदारांची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार वेगळे होऊन, एका छोट्या प्रादेशिक पक्षात विलिन होऊन, ‘एनडीए’ मध्ये सहभागी होण्याची खेळी हा त्यातलाच एक प्रयत्न आहे.

अशा गरजेच्या वेळी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आपल्याकडे ओढून ‘एनडीए’च्या संख्याबळ वाढीत स्वत:चं योगदान देण्याचा प्रयत्न करत आहेत.

याचं कारण स्पष्ट आहे. भाजपाश्रेष्ठींच्या, म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह, यांच्या नजरेत एकनाथ शिंदे स्वत:चं राजकीय वजन वाढवू पाहताहेत.

आतच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा प्रयत्न त्यांची उपयुक्तता वाढण्यात होतो आहे.

लोकसभेत ‘एनडीए’ अद्याप 360 या दोन तृतीयांश संख्याबळाच्या आकड्यापासून बरीच लांब आहे.

पण त्या अगोदर शिंदे त्यांच्या उपस्थितीची दखल घेण्यास मोदी-शाहांना भाग पाडत आहे. या प्रयत्नाचं एक कारण दिल्लीत असलं तरीही दुसरं आणि अधिक महत्वाचं कारण मुंबईत आहे.

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Getty Images

मुख्यमंत्रीपदाची न लपलेली इच्छा

‘ऑपरेशन टायगर’ करुन दिल्ली दरबारी वजन वाढवण्यामागे एकनाथ शिंदेंचे लक्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाकडे असल्याची चर्चा आहे.

ते उपमुख्यमंत्री झाल्यापासून मुंबईच्या ‘पॉवर कॉरिडॉर्स’मध्ये सतत ही चर्चा पाहायला मिळते.

शिंदेंच्या नेतृत्वात ‘महायुती’ सरकारनं 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. शिवसेनेच्याही जागा वाढल्या.

पण शिंदेंच्या हातून राज्यातलं सर्वोच्च पद गेलं. पण तेव्हापासून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

अधिक खासदार आपल्यासोबत आणून, केंद्रातलं सरकार अधिक बळकट करुन मोदी-शाहांच्या नजरेत वजन वाढवताना शिंदेंची नजर मुख्यमंत्रीपदाकडे आहे असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Getty Images

“शिंदेंची मुख्यमंत्रीपदाची मनिषा अजिबात लपून राहिली नाही आहे. त्यामुळे आता 2029 पर्यंत कोणतीही निवडणूक नसतांना उद्धव ठाकरेंचे अधिकाधिक खासदार वा आमदार आपल्याकडे ओढून आपला दावा बळकट करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे,” असं ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर म्हणतात.

“यासाठी त्यांना दिल्लीतून मदत मिळाल्याशिवाय ते जे सगळं जमवून आणणं शक्य नाही. तसंही ते ‘महाशक्ती’चा उल्लेखसतत करत आले आहेतच.

कारण खासदार जरी यायला तयार असले तरीही त्यात अनेक कायदेशीर अडथळे आहेत. ते सोडवण्यासाठी दिल्लीची मदत आवश्यक आहे. म्हणजे शिंदेंच्या दिल्लीचं पाठबळ आहे,” असं अकोलकर पुढे म्हणतात.

अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक लपून राहिलेली नाही. राज्यात कोणताही राजकीय पेच भाजपासोबत निर्माण झाला की शिंदे दिल्लीला अमित शाहांना भेटायला जातात.

अलिकडचं उदाहरण म्हणजे विधानपरिषदेच्या निवडणुकांमधल्या जागांवरुन रस्सीखेच सुरु असतांना ते प्रकरण शिंदे शाहांकडे घेऊन गेले होते.

भाजपाअंतर्गत शाहांना मानणारा एक गट आहे हे सर्वज्ञात आहे. शनिवारी राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या मेळाव्यात तृणमूलमध्ये जे होतं आहे, शिवसेनेत जे होतं आहे आणि केंद्रात भाजपाअतंर्गत जी नेतृत्वस्पर्धा आहे त्याच्याशी संबंध कसा आहे याची एक थिअरी सांगितली.

त्यांच्या मते ही 2029 साठीची स्पर्धा आहे. त्याकडेही संधी म्हणून शिंदे पाहात आहेत का?

फडणवीसांसोबत सुप्त संघर्ष

खासदारांचं हे ‘ऑपरेशन टायगर’ होण्यापूर्वीच शिंदेंच्या सेनेच्या नेत्यांनी असंच काही आमदार आणि नगरसेवकांसोबत होण्याचंही सतत सूचित केलं आहे.

त्यात खरं काय आणि कल्पना किती हे काही काळानं समजेलच, पण ते अगदीच अनपेक्षित असणार नाही. कारण ते पूर्वीही झालं आहे.

पण यामुळे महाराष्ट्रातला भाजपासोबतच शिवसेनेचा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. त्यातही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला संघर्ष वाढू शकतो.

“महाराष्ट्रात सध्या फडणवीस विरुद्ध शिंदे हा सुप्त संघर्ष तर आहेच. पण हा सोबतच केवळ फडणवीस विरुद्ध शिंदे एवढाच तो संघर्ष नाही, तर फडवीस विरुद्ध भाजपाचं केंद्रीय नेतृत्व असाही एक संघर्ष आहे.

म्हणजे फडणवीस मोठे झालेले भाजपाच्या दिल्लीतल्या एका अथवा दोन नेत्यांना नको असेल. कारण ते पुढचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरू शकतात. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना बळ द्यायचं, असंही यातून दिसतं आहे,” असं प्रकाश अकोलकर सांगतात.

त्यामुळेच आता दिल्लीच्या मदतीनं खासदारांची संख्या वाढवल्यावर शिंदेंचं महाराष्ट्रातलं वजनही वाढेल. गेल्या काही काळात संघर्षाची काही चिन्हं दिसली आहेत.

उदाहरणार्थ जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणुकीत साताऱ्यात जे घडलं ते. पोलिस विरुद्ध शिवसेनेचे नेते असा झगडा झाला. शिंदे त्याबद्दल विधानसभेतही बोलले.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

अजून एक उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि फडणवीस यांच्यात जवळीक वाढते आहे अशीही चर्चा आहे.

उद्धव त्यांच्या आमदारांसमवेत फडणवीसांना काही वेळा भेटले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेचे काही निर्णय आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना फोन केल्यावर बदलण्यात आले.

शिंदे-फडणवीस संघर्ष ठाकरेंना भाजपाच्या जवळ आणतो आहे का? हाही एक प्रश्न आहे.

त्यामुळेच आता ‘ऑपरेशन टायगर’नंतर दिल्लीत शिंदेंच वजन वाढल्यावर महाराष्ट्रातला सत्ताधा-यांमधला संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

पण त्यातून आणखी काही नवं राजकारण पाहायला मिळणार का? हे सत्तेच्या सारीपाटावरील पुढील चाली पाहिल्यानंतरच स्पष्ट होईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC