Home LATEST NEWS ताजी बातमी काश्मीरमधून ‘लाल सोनं’ लुप्त होतंय का?

काश्मीरमधून ‘लाल सोनं’ लुप्त होतंय का?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

[ photo caption- काश्मीरमधल्या पंपोरमध्ये आपल्या आजोबांसोबत केशराची फुलं तोडणारी नातवंडं.]

काश्मीरच्या खोऱ्यात पिढ्यानपिढ्या बहरलेली केशराची शेती सध्या तिहेरी संकटाशी सामना करत आहे. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा, दुसरीकडे वेगाने होणारे सिमेंटीकरण आणि जोडीला बनावट केशराचा विळखा! त्यामुळेच एक अस्वस्थ करणारा प्रश्न समोर येतोय : हा मौल्यवान ठेवा कायमचा नाहीसा होण्याच्या मार्गावर आहे का?

श्रीनगरमध्ये एका दुकानदाराने केशर दाखवण्याआधी क्षणभर जरा थबकला आणि विचार केला.

जुना काश्मीर शहरातल्या त्या गजबजलेल्या खुल्या बाजारपेठेत पर्यटकांची वर्दळ सुरू होती. तो दुकानदार अक्रोड, मसाले आणि सुक्या मेव्याने खच्चून भरलेल्या कपाटांमागे उभा होता. मी त्याला काश्मिरी केशराबद्दल विचारताच त्याने आधी दुकानाच्या दाराकडे सावधपणे पाहिलं. नंतर काउंटरखालून फडक्यात गुंडाळलेला स्टीलचा एक छोटा डबा बाहेर काढला.

त्या डब्यामध्ये गडद लाल केशराचे काही मोजकेच नाजूक धागे होते.

तो दबक्या आवाजात म्हणाला, “पंपोरचं केशर.”

मग तो म्हणाला, “या वर्षी पीक खूपच कमी आलंय.”

त्यानंतर त्याने शेजारीच ठेवलेल्या काचेच्या दुसऱ्या एका जारकडे निर्देश केला. तो जार गडद, चमकदार लाल रंगाच्या केशराच्या काड्यांनी पूर्ण भरलेला होता.

त्याने सांगितलं, “हे इराणी केशर आहे. हल्ली बरीच दुकानं हेच केशर काश्मिरी असल्याचं सांगून विकतात. बहुतेक ग्राहकांना या दोघांतला फरक ओळखता येत नाही.”

ही ऑक्टोबर 2025 मधली गोष्ट आहे. केशराच्या जागतिक प्रसिद्धीमुळेच मला त्याबद्दल अधिक जाणून घेण्याची ओढ लागली होती.

[ photo caption- श्रीनगरच्या दक्षिणेला पंपोरमध्ये केशराच्या मळ्यात फुले वेचणारा एक काश्मिरी शेतकरी.]

या पिकाचा काश्मीरच्या संस्कृतीशी आणि तिथल्या माणसांच्या आठवणींशी खूप जवळचा संबंध आहे. लग्नकार्यातील खास पदार्थांमध्ये आणि ‘नून चहा’मध्ये केशर आवर्जून वापरलं जातं. याशिवाय आयुर्वेदिक औषधं आणि अत्तरांमध्येही याला मोठी मागणी असते. अनेक वर्षांपासून काश्मीर खोऱ्यातील सर्वात मौल्यवान निर्यात उत्पादनांमध्ये केशराची गणना होत आली आहे.

पण गेल्या काही वर्षांत घटलेलं पीक, पावसाची कमतरता आणि स्थानिक बाजारात इराणी केशराची वाढती आवक, अशा बातम्या सतत कानावर येत आहेत.

पंपोर हे तेच गाव आहे ज्याचं काश्मीरमधील केशराच्या शेतीशी शतकानुशतकांचं सर्वात घट्ट नातं राहिलं आहे.

पण तिथे गेल्यावर मला जे सत्य समजलं ते या अत्यंत मौल्यवान मसाल्यासाठी अजिबातच चांगलं नव्हतं. शिवाय ज्या काश्मिरी कुटुंबांचा संपूर्ण संसार आजही या केशरावरच अवलंबून आहे, त्यांच्यासाठीही ही अत्यंत चिंतेची बाब होती.

‘लाल सोन्याची’ गोष्ट

जसं आपण श्रीनगरमधून बाहेर पडतो, तशा उंच इमारती आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकानं हळूहळू मागे पडू लागतात. त्यांची जागा आता ‘करेवा’चं पठार घेऊ लागतं. हा कोरडा आणि उंचावर वसलेला असा पठारी भाग आहे जिथे दरवर्षी शरद ऋतूत केशराची नाजूक फुलं बहरतात.

ऑक्टोबरच्या मध्यापासून ते नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत जेव्हा या पिकाच्या काढणीचा हंगाम सुरू असतो तेव्हा हा संपूर्ण परिसर जांभळ्या रंगाच्या ‘क्रोकस’ फुलांच्या गालिच्याने जणू झाकून गेलेला असतो.

दररोज पहाटे सूर्योदयापूर्वीच शेतकऱ्यांची कुटुंबे येथे पोहोचतात. ते अत्यंत काळजीपूर्वक केशराची नाजूक फुलं वेताच्या टोपल्यांमध्ये गोळा करतात. तर दुसरीकडे, गावातल्या रस्त्यांच्या कडेला व्यापारी या ताज्या सकाळच्या पिकाची वाट पाहत उभे असतात.

पण मी जेव्हा ऑक्टोबर 2025 मध्ये तिथे पोहोचले तेव्हा अनेक शेतं पूर्णपणे सुकलेली दिसली. तिथल्या जमिनीला चक्क भेगा पडल्या होत्या.

'क्रोकस सॅटायव्हस'च्या रोपाला फुललेली जांभळी फुले

मी डुस्सू गावात होते. तिथे केशर उत्पादक शेतकरी मोहम्मद आसिफ आपल्या शेतातून संथ पावलांनी चालले होते. त्यांच्या कुटुंबाने पिढ्यानपिढ्या याच मातीत ही शेती कसली आहे.

पठारावर जांभळ्या फुलांचे छोटे-छोटे झुपके इथेतिथे विखुरलेले दिसत होते. शेताचा बराचसा भाग मात्र पूर्णपणे रिकामाच पडला होता.

आसिफ यांनी मला सांगितलं, “यंदा आमच्या शेतात जेमतेम 250 ग्रॅम केशराचं उत्पादन निघालं आहे.”

ते पुढे म्हणाले, “2024 मध्ये आम्हाला जवळपास दीड किलो केशर मिळालं होतं.”

ते म्हणाले, “केशराची शेती अचूक वेळेवर अवलंबून असते.”

त्यांनी खाली वाकून अत्यंत काळजीपूर्वक एक फूल आपल्या बोटांच्या चिमटीत उचललं.

पुढे ते म्हणाले, “जर पिकाला आवश्यक त्या वेळी पाऊस मिळाला नाही, तर फुलांच्या उत्पादनावर खूप लवकर परिणाम होतो.”

हजारो वर्षांपासून सुरू असलेली केशराची शेती

‘क्रोकस सॅटायव्हस’ नावाच्या जांभळ्या फुलांच्या रोपापासून केशर मिळतं. प्रत्येक फुलाच्या आत गडद लाल रंगाचे तीन नाजूक धागे असतात. या धाग्यांनाच केशर म्हटलं जातं.

या बारीक धाग्यांचा दर्जा आणि सुगंध टिकवून ठेवण्यासाठी सूर्योदयापूर्वीच ही फुलं हाताने तोडली जातात. त्यानंतर हे धागे अत्यंत काळजीपूर्वक वेगळे केले जातात आणि अनेक तास वाळवले जातात.

अवघे 1 औंस म्हणजेच सुमारे 28 ग्रॅम केशर तयार करण्यासाठी तब्बल 4,000 फुलांची गरज लागते. हे रोप वर्षभरात केवळ 2 ते 4 आठवडेच फुलतं. हेच कारण आहे की, केशराची गणना नेहमीच जगातील सर्वात महागड्या मसाल्यांमध्ये केली जाते. याला अनेकदा ‘लाल सोनं’ असंही म्हटलं जातं.

केशराची शेती करणारा एक शेतकरी

जंगलांमध्ये हे रोप आता कुठेही नैसर्गिकरीत्या आढळत नाही. केशराच्या सुरुवातीच्या लागवडीचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे. याचे पुरावे आजच्या इराण, ग्रीस आणि मध्य आशियाच्या काही भागांत पाहायला मिळतात.

शतकांपूर्वी पर्शियन प्रभाव आणि प्राचीन व्यापारी मार्गांच्या माध्यमातून हे केशर काश्मीरमध्ये येऊन पोहोचलं.

काश्मिरी केशरचं वेगळेपण

काश्मिरी केशर हे त्याच्या गडद लाल रंगछटेसाठी, जाडसर धाग्यांसाठी आणि तीव्र, मनमोहक सुगंधासाठी ओळखलं जातं.

केशराच्या रासायनिक संरचनेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना असं आढळून आलं आहे की, काश्मिरी केशरामध्ये ‘क्रोसिन’चं प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त असतं. क्रोसिन हे एक प्रकारचं कॅरोटिनॉइड संयुग आहे ज्यामुळे केशराला त्याचा हा गडद आणि आकर्षक रंग प्राप्त होतो.

काश्मिरी केशराची किंमत साधारणपणे इराणी केशरापेक्षा जास्त असते. याच्या अवघ्या 1 ग्रॅमची किंमत सुमारे 375 रुपये किंवा त्याहूनही अधिक असू शकते. याचाच अर्थ 1 औंस केशर खरेदी करण्यासाठी जवळपास 10,000 रुपये मोजावे लागतात.

पंपोरमधले शेतकरी पिढ्यान्‌पिढ्या केशराच्या शेतीवरच आपला संसार चालवत आले आहेत.

इथली कुटुंबं आपले घरखर्च आणि लग्नकार्याचे बेतसुद्धा केशराच्या हंगामाचा अंदाज घेऊनच आखायची.

संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत संपूर्ण गल्लीतले लोक एकत्र बसून फुलांमधून केशराच्या लाल काड्या वेगळ्या करायचे. बाजूलाच चूल किंवा शेगडीवर खारट चहाच्या किटल्या सतत उकळत राहायच्या.

गावातले वयस्कर लोक सांगतात की, एकेकाळी शरद ऋतूच्या सकाळी हे अख्खं पठार जांभळ्या रंगाच्या फुलांनी बहरून जायचं.

काश्मिरी केशराचं उत्पादन झपाट्यानं घसरलं

गेल्या 10 वर्षांत काश्मिरी केशराचे उत्पादन खूप वेगाने खाली आले आहे.

सरकारी आकडेवारी पाहिली तर, काश्मीर आणि लगतच्या जम्मू परिसरात 2010-11 मध्ये 8 टन केशर पिकायचे. 2023-24 मध्ये हा आकडा घसरून फक्त 2.6 टनांवर येऊन ठेपला आहे.

संशोधकांचं असं म्हणणं आहे की, या घसरणीमागे अनेक कारणं दडलेली आहेत आणि बदलते हवामान हे त्यापैकी एक मुख्य कारण आहे.

[ photo कॅप्शन: केशराची फुले वेचताना स्थानिक शेतकरी मोहम्मद आसिफ.]

अनेक अभ्यासांतून हे स्पष्ट झाले आहे की, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत पडणारा पाऊस केशराच्या रोपांना फुलं येण्यासाठी अत्यंत आवश्यक असतो. केशराच्या मुळांच्या वाढीमध्येही हा पाऊस महत्त्वाची भूमिका बजावतो.

जर या महिन्यांत कोरडवाहू परिस्थिती राहिली किंवा पाऊस लांबला तर उत्पादनात मोठी घसरण होऊ शकते.

‘केशराची शेती पूर्णपणे हवामानावर अवलंबून’

काश्मीरच्या स्वतंत्र हवामान अभ्यासक आणि पर्यावरण कार्यकर्त्या राबिया खान यांच्या मते, केशराची शेती हवामानाच्या एका अत्यंत नाजूक समतोलावर टिकून असते.

त्या सांगतात, “शरद ऋतूमध्ये पावसाविना राहणारे कोरडे दिवस आता पूर्वीपेक्षा अधिक दीर्घ आणि नेहमीचेच झाले आहेत.”

‘आता हिवाळा पूर्वीसारखा कडाक्याचा राहिला नाही’

पंपोरमधील शेतकऱ्यांना हे हवामान बदल समजून घेण्यासाठी कोणत्याही वैज्ञानिक आकडेवारीची गरज नाही. अनेक शेतकऱ्यांनी मला सांगितलं की, आता इथली थंडी पूर्वीसारखी बोचरी किंवा जास्त महिने टिकणारी राहिलेली नाही.

डोंगरावरचा बर्फ वितळून ज्या ओढ्या-नाल्यांमधून पूर्वी गावांना पाणी मिळायचे ते प्रवाह आता आटल्यासारखे दिसतात.

शेतकरी अब्दुल रशीद वानी सांगतात, “गेल्या काही वर्षांत पावसाच्या वेळापत्रकात आणि प्रमाणात खूप मोठा बदल झाला आहे.”

जमिनीतून काढलेली केशराची मुळे दाखवताना शेतकरी

ते पुढे म्हणतात, “आज आम्हाला पाण्यासाठी बऱ्याच अंशी पंपांवरच अवलंबून राहावं लागत आहे.”

केशराची घटत चाललेली शेती पाहून भारत सरकारने 2010 साली चिंतेपोटी ‘नॅशनल सॅफ्रन मिशन’ सुरू केले. या योजनेमागे शेतीला पाण्याची चांगली सोय करून देणे, केशराच्या कंदांना पुन्हा निरोगी व दर्जेदार बनवणे आणि उत्पादन वाढवणे हा हेतू होता. या अंतर्गत पंपोरच्या केशर पट्ट्यात बोअरवेल, स्प्रिंकलर सिंचन यंत्रणा आणि शेतकऱ्यांना तांत्रिक व वैज्ञानिक मदत पुरवण्यात आली.

काही गावांमध्ये पाण्याची सोय सुधारल्याचे काही शेतकरी मान्य करतात; पण दुसरीकडे, फुटलेल्या पाइपलाइन, अनियमित पाणीपुरवठा आणि दुरुस्तीच्या कामात होणारी दिरंगाई यांमुळे अनेक शेतकरी नाराज आहेत.

त्यांचं म्हणणं आहे की, पिकाला फुलं येण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावरच या समस्यांचा सर्वाधिक फटका बसतो.

शेतकऱ्यांच्या या तक्रारींवर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही भारताच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाशी संपर्क साधला होता. मात्र विभागाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

पंपोरमध्ये वेचलेल्या क्रोकसच्या फुलांमधून केशराचे तंतू अलग करताना महिला.

जिथे कधीकाळी केशराची मळे फुलायचे तिथे आता रस्ते रुंदीकरण, नवी घरे आणि व्यावसायिक प्रकल्प उभे राहिले आहेत.

अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत जिथे केशराची फुले डोलत होती त्या जागांकडे शेतकरी आज हताशपणे बोट दाखवतात.

कोनीबल गावातले वयस्कर रहिवासी हबीब खान मला म्हणाले, “पूर्वी इथल्या प्रत्येक घराचं पोट केशरावरच भरायचं. पण आताच्या तरुण पिढीला या शेतीत आपलं भविष्य दिसत नाही.”

इथल्या शेतकऱ्यांनी मला आणखी एका मोठ्या संकटाबद्दल सांगितले. आणि ते संकट आहे ‘साळिंदर’ या प्राण्याचे.

‘साळिंदरांच्या हल्ल्यामुळे पिकाचे नुकसान होते’

डुस्सू गावात आसिफ यांनी मला आपल्या शेताचे ते हिस्से दाखवले जिथे या प्राण्यांनी माती उकरून केशराच्या मुळांना आणि खोडांना मोठं नुकसान पोहोचवलं होतं.

मातीतल्या बिळांकडे बोट करत ते म्हणाले, “हे प्राणी रात्रीच्या अंधारात येतात आणि जमिनीखालचे कंद उकरून बाहेर काढतात.”

त्यांनी सांगितले, “बऱ्याचदा वरून आपल्याला फक्त फुले गायब झाल्याचे दिसते, मात्र खरा नाश जमिनीखाली झालेला असतो.”

त्यांनी सांगितलं की, अलीकडच्या वर्षांत साळिंदर प्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. विशेषतः जी शेतं मानवी वस्त्या आणि झुडपांच्या परिसराजवळ आहेत तिथे हा त्रास जास्त जाणवतो.

इतर शेतकऱ्यांनी सांगितलं की, पीक वाचवण्यासाठी त्यांनी शेताभोवती तात्पुरतं कुंपण घातलं आहे. तर काही शेतकरी रात्रीचं जागरण करून आपल्या शेतांची राखणही करतात.

नवी दिल्लीतील ‘डाउन टू अर्थ’ या नियतकालिकाच्या एका अहवालानुसार, अलीकडच्या काळात आसपासच्या कचरा डेपोमुळे वाढलेल्या उंदरांचाही केशराच्या कंदांना मोठा फटका बसत आहे.

काश्मिरी केशराच्या नावावर बनावट केशर

इराणमधील शेतकरीही बदलतं हवामान आणि पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करत आहेत. जगातील जवळपास 90 टक्के केशराचं उत्पादन एकट्या इराणमध्ये होतं.

पण काश्मीरच्या शेतकऱ्यांसाठी इराणी केशर हे आणखी एका वेगळ्याच कारणासाठी चिंतेचा विषय ठरलं आहे.

[ photo कॅप्शन: फुलांच्या पाकळ्यांमधून काढलेल्या केशराच्या काड्या ]

जानेवारी 2026 मध्ये दिल्लीच्या मसाला बाजारात भेटलेल्या एका व्यापाऱ्याने मला सांगितलं की, अनेकदा आयात केलेलं केशर मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारपेठांमध्ये येतं.

चारही बाजूंनी डबे आणि वजनकाटे ठेवलेल्या एका अरुंद स्टोअर रूममध्ये त्याने काही पाकिटं उघडून दाखवली. त्यामध्ये इराणी केशराचे धागे होते. त्यानंतर त्याने तिथेच थोड्या प्रमाणात असलेल्या अस्सल काश्मिरी केशराशी त्यांची तुलना करून दाखवली.

तो व्यापारी मला म्हणाला, “ग्राहक काश्मिरी केशराचीच मागणी करतात. कारण या नावाची बाजारपेठेत अधिक ओळख आणि प्रतिष्ठा आहे.”

“एकदा का पॅकिंग झालं की, साधारण लोकांना या दोघांतला फरक अजिबात समजत नाही.”

‘बनावट केशर’ ठरतंय काश्मिरी केशरासाठी घातक

जम्मू-काश्मीरच्या अन्न आणि औषध विभागात मसाल्यांच्या शुद्धतेवर संशोधन करणाऱ्या अन्न वैज्ञानिक शाझिया मलिक यांच्या मते, अशा भेसळीचा फटका ग्राहक आणि शेतकरी दोघांनाही बसतो.

त्या म्हणतात, “जेव्हा परदेशातून आलेलं केशर मिसळून किंवा खोटं लेबल लावून काश्मिरी केशराच्या नावावर विकलं जातं तेव्हा ग्राहकांचा विश्वास डळमळीत होतो.”

“याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या कमाईलाही बसतो,” असं त्यांनी सांगितलं.

पंपोरमधल्या अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, या फसवणुकीमुळे स्थानिक पातळीवर उत्पादनात होत असलेली खरी घसरण झाकली जाते.

बाजारात नावापुरतं ‘काश्मिरी केशर’ सहज मिळत असल्याचं चित्र दिसतं. पण प्रत्यक्षात मात्र अस्सल काश्मिरी केशराचं पीक दिवसेंदिवस कमी होत आहे, असं हे शेतकरी सांगतात.

गेल्या काही वर्षांत या पावलांमुळे तपासणी आणि देखरेख सुधारल्याचे एका सरकारी अधिकाऱ्याने बीबीसीशी बोलताना सांगितले. मात्र नियमांची अंमलबजावणी सगळीकडे सारख्याच पद्धतीने होत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.

काश्मिरी केशराची एक वेगळीच दुनिया

श्रीनगरजवळ सरकारी उद्यानविद्या शास्त्रज्ञ नियाझ अहमद डार हे इनडोअर फार्मिंग म्हणजेच एक बंदिस्त खोलीत पिकवलेल्या केशराच्या फुलांवर संशोधन करतात. या खोल्यांमधील ओलावा, तापमान आणि उजेड अत्यंत काळजीपूर्वक नियंत्रित केला जातो.

नोव्हेंबर 2025 मध्ये जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा ते म्हणाले, “इनडोअर फार्मिंगमुळे बदलत्या हवामानाचा धोका बराच कमी होतो.”

त्यांनी सांगितले, “केशराचे कंद म्हणजे मूळं आणि खोडांचे संरक्षण करणे तसेच फुलांचे उत्पादन सातत्यपूर्ण ठेवणे, हेच आमचे ध्येय आहे.”

नियंत्रित वातावरणात केलेल्या केशराच्या इनडोअर शेतीचे सुरुवातीचे संशोधन अहवाल खूप आशादायक आहेत.

[ photo caption- याच वर्षी पंपोरमध्ये लहान मुलींसोबत तोडलेल्या केशराच्या फुलांनी पिशवी भरणारा शेतकरी.]

या अभ्यासांमधून फुलांचे सातत्यपूर्ण उत्पादन आणि केशराची गुणवत्ता टिकवून ठेवणाऱ्या ‘क्रोसिन’ घटकाची पातळी कायम राहण्याचे चांगले संकेत मिळाले आहेत.

केशर पीक वाचवण्यासाठी काम करणारे शास्त्रज्ञ जमिनीतील पाण्याचे नियोजन, मुळांचे योग्य जतन आणि मातीतील ओलावा तपासण्यावरही विशेष लक्ष केंद्रित करत आहेत.

पंपोरमधल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी मला सांगितलं की, तात्पुरत्या पीक नुकसानीपेक्षा त्यांना दुसरीच एक गोष्ट जास्त सतावते.

वाढत्या काँक्रिटीकरणामुळे केशराची शेते हळूहळू कायमची नामशेष होतील, अशी भीती त्यांना वाटते.

एकदा का एखाद्या जमिनीवर बांधकाम उभे राहिले तर तिथे पुन्हा कधीच शेती होऊ शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

गेल्या नोव्हेंबरमध्ये जेव्हा मी पुन्हा एकदा डुस्सू गावात गेले तेव्हा आसिफ यांनी मला काढणीच्या आठवड्यात सूर्योदयापूर्वीच त्यांच्या कुटुंबासोबत शेतात येण्याचं निमंत्रण दिलं.

जसा सकाळचा प्रकाश पसरू लागला तसं यंदाच्या पिकाचं मर्यादित प्रमाण स्पष्ट दिसून आलं.

आसिफ यांना आठवत होतं की, पूर्वीच्या काळात त्यांच्या घरच्यांच्या टोपल्या यापेक्षा कितीतरी पटीने जास्त भरलेल्या असायच्या.

त्यानंतर आसिफ यांच्या पत्नी झेबा हाताने एक-एक करून केशराच्या लाल काड्या अलग करत होत्या.

आमच्यासमोर ठेवलेल्या खारट चहाच्या कपांमधून वाफा निघत होत्या.

आसिफ मोठ्या काळजीने केशराच्या त्या काड्या सुकवण्यासाठी एका ट्रेमध्ये पसरवून ठेवत होते. खोलीभर ताज्या केशराचा हलका, मातीसारखा सुगंध दरवळला होता.

आसिफ मला म्हणाले, “केशराच्या शेतीने शतकानुशतकं इथल्या कुटुंबांना एक वेगळी ओळख दिली आहे.”

त्यांनी सांगितलं, “लोकांना कमाईची काळजी तर आहेच, पण या जमिनीशी नाळ जोडलेली आपली जीवनशैलीच कुठे नष्ट होऊ नये, ही भीती त्यांना जास्त सतावते.”

(मीर सीनिन या काश्मीरच्या स्वतंत्र पत्रकार असून त्या दक्षिण आशिया आणि जगाच्या इतर भागांतील बातम्या कव्हर करतात.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC