Home LATEST NEWS ताजी बातमी कुत्रे आपल्या मालकाचा जीव घेऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

कुत्रे आपल्या मालकाचा जीव घेऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

5
0

Source :- BBC INDIA NEWS

घरात आपल्या कुत्र्याला मिठी मारणारी महिला.

वाचन वेळ: 6 मिनिटे

कुत्रे हे माणसाचे विश्वासू साथीदार मानले जातात. मात्र, काही परिस्थितींमध्ये पाळीव कुत्रेही आपल्या मालकासाठी धोकादायक ठरू शकतात.

मागील काही काळात भारतामध्ये कुत्रा चावण्याच्या घटनांची संख्या मोठी आहे.

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, देशात 2022 मध्ये कुत्रा चावण्याच्या 21 लाख 89 हजार 909 घटनांची नोंद झाली होती. 2023 मध्ये हा आकडा 30 लाख 52 हजार 521 वर, तर 2024 मध्ये 37 लाख 15 हजार 713 वर पोहोचला.

महाराष्ट्रातही 2024 मध्ये कुत्रा चावण्याच्या 4 लाख 85 हजार 345 घटनांची नोंद झाली होती. 2022 मध्ये ही संख्या 3 लाख 93 हजार 20 होती. ही आकडेवारी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या एकात्मिक रोग निगराणी कार्यक्रमाच्या (IDSP) पोर्टलवरील माहितीवर आधारित आहे.

कुत्रा चावण्याच्या घटनांबरोबरच रेबीजमुळे होणारे मृत्यू हीदेखील चिंतेची बाब आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, भारतात 2022 मध्ये रेबीजमुळे 21 संशयित मृत्यूंची नोंद झाली होती. 2023 मध्ये हा आकडा 50, तर 2024 मध्ये 54 होता. महाराष्ट्रात 2023 आणि 2024 या दोन्ही वर्षांत प्रत्येकी 14 संशयित मृत्यूंची नोंद झाली होती.

2 पाळीव कुत्र्यांनी मालकाचा जीव घेतल्याची घटना

2017 मध्ये अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे 2 पाळीव कुत्र्यांच्या हल्ल्यानंतर बेथेनी स्टीफन्स या 22 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे या महिलेने त्या कुत्र्यांना लहानपणापासून वाढवले ​​असूनही हा हल्ला झाला होता.

या घटनेनंतर पाळीव कुत्रे आपल्या मालकावरही हल्ला करू शकतात का, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

तज्ज्ञांच्या मते हे अजूनही अस्पष्ट आहे. मात्र, सर्वसाधारणपणे कुत्रे हिंसक होण्याची अनेक कारणे आहेत. ही कारण आपल्याला माहिती असायला हवीत.

कुत्र्यांना स्वतःला धोका जाणवला किंवा ते अस्वस्थ झाले, तर ते आक्रमक होऊ शकतात. त्यामुळे कुत्र्यांच्या वर्तनातील बदल आणि त्यांच्या शारीरिक भाषेतून मिळणारे संकेत समजून घेणं महत्त्वाचं आहे.

ब्रिटनमधील प्राण्यांच्या उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या रुग्णालयातील पशुवैद्यक सीन वेन्सली सांगतात, “कुत्र्यांना चावा घेण्यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यापैकी एक म्हणजे भीती.”

“याशिवाय इतरही काही कारणं असू शकतात. उदाहरणार्थ, त्यांना आवडणारी एखादी वस्तू, विश्रांतीची जागा किंवा त्यांची झोपण्याची जागा सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नातही कुत्रे चावा घेऊ शकतात,” असं ते पुढे सांगतात.

कुत्र्यांची शारीरिक भाषा

सीन वेन्सली यांच्या मते, काही वेळा कुत्रे आपलं अन्न सुरक्षित ठेवण्यासाठीही चावा घेऊ शकतात. कुत्र्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या डॉग ट्रेनर कॅरोलिन मेंटिथ सांगतात की, सुट्ट्यांच्या काळात कुत्र्यांकडून चावा घेण्याच्या घटना अधिक घडतात. घरात पाहुण्यांची गर्दी, इकडे-तिकडे धावणारी मुलं आणि कुत्र्यांना पुरेसं फिरायला न मिळणं यामुळे ते कंटाळू किंवा अस्वस्थ होऊ शकतात.

कॅरोलिन मेंटिथ सांगतात, “आपण माणसं बोलून आपल्या भावना व्यक्त करू शकतो. आपल्याला काही आवडलं नाही किंवा आपण आनंदी नसलो, तर ते सांगू शकतो. पण आपले कुत्रे असं करू शकत नाहीत. ते आपल्या शारीरिक हालचालींमधून आणि देहबोलीतून आपल्याला संकेत देतात.”

“आपल्या पाळीव प्राण्यांचे सगळे संकेत अचूकपणे समजून घेणं खूप कठीण असतं. विशेषतः जेव्हा आपण इतर कामांमध्ये व्यग्र असतो, तेव्हा त्यांच्या वागण्याकडे आपलं लक्ष जात नाही,” असंही ते नमूद करतात.

कुत्रा

कुत्र्यांना त्रास होण्याची कारणं ओळखा

तुमच्याकडे 2 किंवा त्यापेक्षा अधिक कुत्रे असतील, तर ते एकमेकांशी कसे वागतात, याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.

सीन वेन्सली सांगतात, “जर 2 कुत्रे एकमेकांशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांच्यातील राग किंवा तणाव वाढत असल्याचं ते लक्षण असू शकतं. याकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर त्याचा परिणाम मालकावरही होऊ शकतो.”

कुत्रा

सामान्यतः मैत्रीपूर्ण आणि आनंदी स्वभावाचा कुत्राही अस्वस्थ असेल, तर तो चावा घेण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, तुम्ही कुत्र्याला दरवाजाजवळून जबरदस्तीने बाजूला करत असाल आणि या प्रक्रियेत अनवधानाने त्याला दुखापत झाली, तर तो आक्रमक प्रतिक्रिया देऊ शकतो.

कुत्र्यांच्या वर्तनातील बदलांमागे काही वैद्यकीय कारणंही असू शकतात. यकृताचा आजार किंवा मेंदूतील गाठ यामुळे कुत्र्यांचं वर्तन विचित्र होऊ शकतं. यकृताच्या आजाराचा परिणाम मेंदूवरही होऊ शकतो.

घरात लहान मुलं असतील तर विशेष काळजी घ्या

विशेषतः मानेवर कुत्र्याने चावा घेतल्यास ती दुखापत गंभीर ठरू शकते. मानेतील कॅरोटिड धमनीला इजा झाल्यास मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन मृत्यूही होऊ शकतो.

सीन वेन्सली सांगतात, “कुत्र्यांना लहान मुलांची सवय नसेल, तर त्यांची उपस्थितीही त्यांना अस्वस्थ करू शकते.”

“लहान मुलांचं वागणं अनेकदा थोडं अनपेक्षित असतं. ती ओरडू शकतात, कुत्र्याला घट्ट पकडू शकतात, त्यांना उचलण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा त्यांच्या अंगावरून हात फिरवू शकतात. अशा वागण्यामुळे कुत्रे घाबरू शकतात,” असं ते पुढे सांगतात.

कुत्रा

कुत्रा ओठांच्या वरच्या भागाला जीभ लावत असेल तर का सावध व्हा?

कुत्रा चावा घेण्यापूर्वी अनेकदा अस्वस्थतेचे संकेत देत असतो. मात्र, हे संकेत माणसांच्या लक्षात येत नाहीत.

कुत्रा ओठांच्या वरच्या भागावर जीभ फिरवत असेल, शरीर झुकवत असेल, कान मागे घेत असेल किंवा शेपटी पायांच्या मधोमध दाबून धरत असेल, तर तो अस्वस्थ किंवा घाबरलेला असू शकतो.

लहान मुलांना कुत्र्यांच्या या हालचालींचा अर्थ अनेकदा समजत नाही. काही वेळा कुत्रा दात दाखवत असेल, तर तो हसत आहे किंवा आनंदी आहे, असा त्यांचा गैरसमज होऊ शकतो.

कुत्रा

कॅरोलिन मेंटिथ सांगतात, “जेव्हा एखादा कुत्रा आपल्या मालकावर हल्ला करतो, तेव्हा लोकांना वाटतं की त्याने आधी कोणतेही संकेत दिले नव्हते आणि तो अचानक आक्रमक झाला. पण प्रत्यक्षात असं नसतं. तो कदाचित अनेक महिन्यांपासून आपल्या अस्वस्थतेबद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो.”

“सुरुवातीला आपण कुत्र्यांना आपल्या आयुष्याचा भाग बनवतो आणि त्यानंतर मात्र ते आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, याकडे लक्ष देत नाही,” असं त्या पुढे नमूद करतात.

कुत्र्यांना प्रशिक्षण देणं आवश्यक

तुमच्या कुत्र्याला अनोळखी मुलं आणि माणसांमध्ये मोकळं सोडणं योग्य आहे का, याचा विचार करणं गरजेचं आहे.

तुमच्या पाळीव कुत्र्याला मुलं आवडतात का? तुम्ही जवळ नसताना तो इतरांशी योग्य पद्धतीने वागेल, याची खात्री देऊ शकता का? असे प्रश्न स्वतःला विचारायला हवेत.

सीन वेन्सली सांगतात, “कधी कधी असं दिसून येतं की, लहान पिल्लांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात दिसणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींची आणि ऐकू येणाऱ्या आवाजांची सवय झालेली नसते.”

ते पुढे सांगतात, “काही पिल्लं अशा ठिकाणी वाढलेली असतात, जिथे त्यांच्या आजूबाजूला फारशा हालचाली नसतात. ती एखाद्या कुत्र्यांच्या प्रजनन केंद्रात किंवा गावात वाढलेली असू शकतात.”

“त्यानंतर कोणीतरी त्यांना ऑनलाइन किंवा महामार्गाजवळील एखाद्या ठिकाणाहून विकत घेऊन आपल्या घरी आणतं. त्यांच्यासाठी हे वातावरण पूर्णपणे नवीन असतं. कुत्रा या नव्या जगात सहज आनंदी राहील, अशी अपेक्षा केली जाते.”

“अशा परिस्थितीत कुत्रे खूप घाबरू शकतात आणि अस्वस्थ होऊ शकतात. त्यातून ते एखाद्यावर हल्ला करण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते,” असं ते सांगतात.

अशा घटना टाळण्यासाठी कुत्र्यांना अगदी लहान वयापासून, म्हणजे ते पिल्लू असतानाच प्रशिक्षण देणं आवश्यक आहे.

कुत्र्यांना प्रशिक्षण देताना सातत्य असणंही महत्त्वाचं आहे. एखाद्या गोष्टीला कधी परवानगी द्यायची आणि कधी त्यासाठी कुत्र्याला ओरडायचं, याबाबत मालकाच्या वागण्यात सातत्य नसेल, तर कुत्रा गोंधळू शकतो.

कुत्रा

लिंकन विद्यापीठ आणि बिशप बर्टन कॉलेजमध्ये संशोधन करणाऱ्या अ‍ॅन बॅसलिंग्टन-डेव्हिस यांनी कुत्र्यांच्या आक्रमक वर्तनामागील कारणांचा अभ्यास केला आहे.

अ‍ॅन बॅसलिंग्टन-डेव्हिस सांगतात, “आमच्या संशोधनात आढळलेल्या धोक्याच्या घटकांपैकी एक म्हणजे प्रशिक्षणात सातत्य नसणं.”

“उदाहरणार्थ, कुत्र्याला कधी सोफ्यावर बसण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं आणि दुसऱ्या वेळी त्याच गोष्टीसाठी ओरडलं जातं. यामुळे कुत्र्याच्या मनात गोंधळ निर्माण होतो. त्यातून निराशा वाढू शकते आणि ही निराशा आक्रमक वर्तनाचं एक कारण ठरू शकते.”

कुत्रा

डॉग्स ट्रस्ट या संस्थेमधील क्लिनिकल बिहेवियर सपोर्ट अँड डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख क्रिस ग्लोव्हर सांगतात, “आपल्याला कुत्र्याचं एखादं वर्तन आवडत नसेल आणि आपण त्याला त्यासाठी शिक्षा करत असू, तर तो असं का वागतोय, हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करत नसतो.”

“अनेकदा आपण कुत्र्याला आपल्याला त्याच्याकडून नेमकं कोणतं वर्तन अपेक्षित आहे, हे शिकवलेलंच नसतं. उदाहरणार्थ, कुत्रा अंगावर उड्या मारत असेल, तर त्याला केवळ ओरडण्याऐवजी उड्या मारू नयेत हे शिकवलं आहे का आणि त्याऐवजी कोणत्या वर्तनासाठी त्याचं कौतुक करता येईल, याचा विचार करायला हवा.”

“आपण कुत्र्यांना ओरडून किंवा शारीरिक शिक्षा देऊन त्यांचं वर्तन सुधारण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे, हे समजत नाही. उलट अशा पद्धतींमुळे त्यांच्यात तणाव आणि भीती वाढू शकते. दीर्घकाळात त्यांच्या वर्तनाशी संबंधित समस्याही निर्माण होऊ शकतात,” असं ते नमूद करतात.

कुत्र्यांच्या आक्रमक वर्तनासाठी मालकही जबाबदार असू शकतात

कुत्रा आक्रमक होण्यामागे केवळ एकच कारण असतं असं नाही. त्याचं संगोपन कसं झालं आहे, त्याला कोणते अनुभव आले आहेत आणि तो कोणत्या वातावरणात राहतो, याचाही त्याच्या वर्तनावर परिणाम होतो.

अ‍ॅन बॅसलिंग्टन-डेव्हिस सांगतात, “कोणत्याही प्राण्याच्या आक्रमक वर्तनामागे अनेक घटक असतात. आक्रमक प्रतिक्रियेला कारणीभूत ठरणारा एकच घटक शोधण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही.”

“कुत्र्यांच्या आक्रमक वर्तनाचा विचार करताना आपण अनेकदा संपूर्ण दोष कुत्र्यालाच देतो. मात्र, त्याच्या मालकाकडे, कुत्रा ज्या परिस्थितीत राहतो आणि त्याला यापूर्वी कोणते अनुभव आले आहेत, याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे,” असं मत त्या व्यक्त करतात.

कुत्र्यांना आपल्या कुटुंबाचा भाग बनवणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच त्यांची भाषा आणि गरजा समजून घेणंही आवश्यक आहे. त्यांच्या वागण्यातून मिळणारे अस्वस्थतेचे संकेत वेळीच ओळखले आणि योग्य प्रशिक्षण दिलं, तर कुत्र्यांसोबतचं सहजीवन अधिक सुरक्षित आणि आनंददायी होऊ शकतं.

(रिबेका सीएल्स आणि सुझी लॉसन यांच्या वार्तांकनासह)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC