Home LATEST NEWS ताजी बातमी कॅमेरा, व्हीडिओ आणि सोशल मिडिया; इराकमध्ये लैंगिक छळाविरोधात महिलांचं नवं अस्त्र

कॅमेरा, व्हीडिओ आणि सोशल मिडिया; इराकमध्ये लैंगिक छळाविरोधात महिलांचं नवं अस्त्र

2
0

Source :- BBC INDIA NEWS

सारा जासिम सांगतात की, त्यांनी सोशल मीडियावर टाकलेले व्हीडिओ लैंगिक छळाचे पुरावे नोंदवून ठेवण्यास मदत करतात.

‘कारमधून बाहेर ये.’

एक महिला रागाने ओरडली. तिचा आरोप होता की, ती रस्त्यावरून जात असताना कारमधील चालकाने तिला आपले गुप्तांग दाखवले आणि अश्लील वक्तव्य केलं.

ही घटना बगदादमधील एका गजबजलेल्या रस्त्यावर घडली. ती महिला आपल्या मोबाईलवर या घटनेचा व्हीडिओ काढत होती. व्हीडिओमध्ये दिसतं की, ती कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होती. पण चालक कारमधून बाहेर येण्यास नकार देत होता. ती महिला तिथेच उभी राहून त्याला जाब विचारत होती.

इराकमध्ये महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या सारा जासिम यांच्या इन्स्टाग्राम पेजवर हा आणि असेच अनेक व्हीडिओ पाहायला मिळतात.

इराकमधील पुरुष आणि मुलांवर लैंगिक शोषण आणि छळ केल्याचा आरोप करणाऱ्या महिला सारा यांच्याकडे आपले व्हीडिओ पाठवतात. सारा हे व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतात.

(महत्त्वाचं: या लेखात लैंगिक हिंसाचाराशी संबंधित माहिती आहे.)

‘समाज अनेकदा पीडित महिलेलाच दोष देतो’

सारा बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, “तुमचा कॅमेरा हेच तुमचं शस्त्र आहे. एखाद्या महिलेनं तिचा छळ करणाऱ्या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला, तर हा व्हीडिओ पुरावा म्हणून उपयोगी पडू शकतो. निदान त्या व्यक्तीला लाज वाटावी, यासाठी तरी या व्हीडिओचा उपयोग होऊ शकतो.”

सारा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पोस्ट केलेल्या एका व्हीडिओनंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. तो पोलीस कर्मचारी होता. त्याच्यावर शाळकरी मुलींचा छळ केल्याचा आरोप होता.

सारा म्हणाल्या की, हे व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट करणं त्यांच्यासाठी आणि संबंधित महिलांसाठी धोकादायक आहे.

इराकमध्ये लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या अनेक महिलांशी आम्ही बोललो. त्यांच्या म्हणण्यानुसार, समाज अनेकदा छळ झालेल्या महिलेलाच दोषी देतो.

जासिम यांनी पोस्ट केलेल्या एका व्हीडिओमध्ये एक महिला तिला गुप्तांग दाखवल्याचा आरोप असलेल्या पुरुषावर ओरडताना दिसते.

सारा म्हणाल्या, “मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. माझ्यावर ॲसिड हल्ल्याची धमकीही देण्यात आली आहे.”

“महिलांनी गप्प राहावं, शांत राहावं अशी अपेक्षा करणाऱ्या समाजात मी त्यांना बोलण्यासाठी प्रोत्साहन देते. त्यामुळे मी सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवत असल्याचा आरोपही माझ्यावर करण्यात आला आहे.”

सुरक्षेच्या कारणास्तव सारा आता क्वचितच घराबाहेर पडतात.

इराकमध्ये आणखी कडक कायदे करण्याची गरज असल्याचं सारा यांचं म्हणणं आहे. ‘छळ’ आणि ‘लैंगिक हिंसाचार’ हे गुन्हे असल्याचं कायद्यात स्पष्टपणे नमूद केलं पाहिजे. सध्या इराकच्या दंड संहितेत (पिनल कोड) या शब्दांचा उल्लेख नाही.

त्या म्हणतात, “समस्या आहे हे मान्य करणं, हाच ती सोडवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आम्हाला सुरक्षितता हवी आहे आणि छळ करणाऱ्यांना, शोषण करणाऱ्यांना रोखलं पाहिजे.”

‘मी तुला मारलं, तरी कोणाला कळणार नाही’

इराकमधील अनेक महिलांनी बीबीसीला सांगितलं की, न्यायव्यवस्था आणि पोलिसांनी त्यांना मदत केली नाही.

आम्ही ज्या सामाजिक कार्यकर्त्यांशी आणि वकिलांशी बोललो, त्यांच्या म्हणण्यानुसार, इराकमध्ये छळ किंवा बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करणं ही खूप वेळखाऊ प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया कठीण आहे आणि त्यातून न्याय मिळेलच, याची कोणतीही खात्रीही नसते.

महिलांसोबत होणाऱ्या भेदभावाच्या प्रकरणांकडे लक्ष देणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या एका समितीने मे महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं होतं की, इराकमध्ये “महिला आणि मुलींवर मोठ्या प्रमाणात हिंसाचार होतो. परंतु, यातील बहुतांश घटनांची नोंदच केली जात नाही.”

समितीने कायदे आणखी कडक करावेत अशी मागणी केली होती.

समितीने अनेक शिफारशी केल्या होत्या. त्यात, बलात्कार करणारा व्यक्ती पीडित महिलेशी विवाह करून शिक्षेपासून वाचू शकतो, अशा ‘भेदभाव करणाऱ्या’ कायद्यांमध्ये बदल करण्याची मागणीही करण्यात आली होती.

तथाकथित ‘ऑनर किलिंग’ म्हणजेच कुटुंबाच्या प्रतिष्ठेच्या नावाखाली हत्या करणाऱ्या व्यक्तीची शिक्षा कमी करण्याची परवानगी देणारे कायदेही रद्द करावेत, अशी मागणी समितीने केली होती.

‘आपल्याच मुलीवर वारंवार बलात्कार केला’

ही कहाणी अमल यांची आहे. अमल हे त्यांचं खरं नाव नाही. त्या गेल्या सुमारे पाच वर्षांपासून न्यायालयात लढा देत आहेत.

अमल यांचा आरोप आहे की, त्यांच्या पूर्वीच्या पतीने बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या मुलीवर वारंवार बलात्कार केला. त्यावेळी त्यांची मुलगी 18 वर्षांपेक्षा कमी वयाची होती.

अमल यांनी त्यांच्या मुलीने सांगितलेली ती भयानक घटना आठवून सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुलीचे वडील तिच्या खोलीत गेले आणि त्यांनी आपलं शस्त्र तिच्या पलंगावर ठेवलं.

त्याने मुलीला धमकी दिली, ‘जर मी तुला मारून टाकलं, तरी कोणाला कळणारही नाही.’

इराकमध्ये लैंगिक शोषणाबद्दल खुलेपणाने बोलणं योग्य मानलं जात नाही.

मी लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या अनेक महिलांच्या संपर्कात होते. त्यांचं म्हणणं होतं की, आपल्यासोबत घडलेली घटना लपवून ठेवलेलीच बरी. कारण, ही गोष्ट समजल्यावर आपले कुटुंबीय आपल्याच विरोधात जाऊ शकतात, अशी त्यांना भीती होती.

काही महिलांनी आम्हाला सांगितलं की, समाजात बदनामी होईल आणि आपलाच छळ होऊ शकतो, या भीतीने त्यांना पोलिसांकडे जायचं नव्हतं.

परंतु, अमल यांनी न्याय मिळवण्याचा निर्णय घेतला. घटनेची तक्रार करण्यासाठी त्या त्वरित पोलिसांकडे गेल्या.

अमल यांचा आरोप आहे की, त्यांच्या माजी पतीने त्यांच्या मुलीवर वारंवार बलात्कार केला. त्यावेळी त्यांची मुलगी 18 वर्षांपेक्षा कमी वयाची होती.

अमल म्हणाल्या, ‘तिचे हात खूप घट्ट पकडल्यामुळे तिच्या मनगटाच्या भोवत अनेक जखमांच्या खुणा होत्या. ती जेव्हा जेव्हा ओरडण्याचा प्रयत्न करायची, तेव्हा तो हाताने तिचं तोंड बंद करायचा.’

अमल यांनी मला वैद्यकीय कागदपत्रं दाखवली. त्यात डीएनए चाचणीचे पुरावेही होते. हे पुरावे त्यांच्या दाव्याचे समर्थन करतात.

अमल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या माजी पतीच्या क्रूरतेचा आणखी एक प्रकार त्यांना समजला. त्याने कुटुंबातील एका व्यक्तीला असं सांगताना ऐकलं की, “मला अटक झाली, तर आपल्या कुटुंबावरील कलंक पुसून टाकावा.”

इराकमध्ये ‘ऑनर किलिंग’ म्हणजेच कुटुंबाच्या प्रतिष्ठेच्या नावाखाली महिलांची हत्या करण्यासाठी अशा गोष्टींचा आधार घेतला जातो. एखाद्या महिलेनं कुटुंबाची प्रतिष्ठा कमी केली, असं मानून तिची हत्या केली जाते.

अमल यांना वाटतं की, त्यांच्या माजी पतीने मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ‘जेणेकरून, वैद्यकीय अहवाल समोर येऊ नये आणि त्याच्यावरील आरोप सिद्ध होऊ नयेत, असं त्याला वाटत होतं.’

अमल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा माजी पती फरार आहे आणि त्यांच्याविरोधातील खटला अजूनही न्यायालयामध्ये सुरू आहे.

‘ही संपूर्ण लढाई मी एकटीने लढले’

आपल्या पूर्वीच्या पतीने अनेक वकील नेमले होते, पण आपल्याकडे स्वतःसाठी वकील करण्याइतकेही पैसे नव्हते, असं सांगताना अमल यांना रडू कोसळलं. त्यांच्या कुटुंबानेही या परिस्थितीकडे दुर्लक्ष करणंच पसंत केलं.

त्या म्हणाल्या, ‘ही संपूर्ण लढाई मी एकटीने लढले.’

अमल यांना आता न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागेल, अशी आशा राहिलेली नाही.

निराशेनं दीर्घ श्वास घेत अमल म्हणाल्या, ‘मला केवळ इतकंच हवंय की तो माझ्या आयुष्यातून कायमचं निघून जावा.’

महिला हक्क कार्यकर्त्याची हत्या

इराकमध्ये घरातच लैंगिक शोषणाला सामोरं जाणाऱ्या अनेक महिलांच्या तुलनेत अमल यांच्या मुलीची परिस्थिती थोडी चांगली आहे. कारण तिच्याकडे सुरक्षित ठिकाणी राहण्याची सोय आहे.

लैंगिक शोषणाला सामोरं जाणाऱ्या अनेक महिलांकडे स्वतःचं उत्पन्न नसतं. त्यांना राहण्यासाठी दुसरीकडे सुरक्षित जागाही नसते.

इराकमध्ये हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी सुरक्षित निवारा केंद्रं खूपच कमी आहेत.

आम्हाला ज्या निवारा केंद्रांबद्दल माहिती आहे, ती यानार मोहम्मद यांनी सहस्थापना केलेल्या एका संघटनेनं सुरू केली होती. यानार मोहम्मद या महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या आणि जगभरात मान्यता असलेल्या कार्यकर्त्या होत्या.

गेल्या मार्च महिन्यात काही सशस्त्र लोकांनी बगदादमध्ये त्यांच्या घराबाहेरच त्यांची हत्या केली. त्यांची हत्या कोणी केली, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांनी एप्रिल महिन्यात लिहिलं होतं की, यानार मोहम्मद यांना अनेक वर्षांपासून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. त्यांना इंटरनेटवरूनही शिवीगाळ केली जात होती.

हना एडवर यांनी यानार मोहम्मद यांच्यासोबतचा हा फोटो शेअर केला. हना यांच्या म्हणण्यानुसार, यानार यांच्या हत्येच्या केवळ 2 दिवस आधी हा फोटो काढण्यात आला होता.

या धमक्या ‘कट्टर धार्मिक गटांकडून’ दिल्या जात असल्याचं मानलं जात होतं.

गेल्या काही वर्षांत आपल्या सहकाऱ्यांवर होणारे हल्ले वाढले आहेत, असं कार्यकर्त्यांनी आम्हाला वारंवार सांगितलं.

महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या आणखी एक प्रमुख कार्यकर्त्या हना एडवर यांनी सांगितलं की, यानार मोहम्मद यांच्या हत्येच्या केवळ 2 दिवस आधी त्यांच्याशी भेट झाली होती.

आपल्याही धमक्या मिळाल्याचे हना यांनी सांगितलं.

त्या मला म्हणाल्या, ‘इराकमध्ये महिलांसाठी ना कायदा आहे, ना कोणतीही सुरक्षा आणि कोणता न्यायही नाही.’

इराकी ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सचे प्रमुख मुस्तफा सादून यांनी बीबीसीला सांगितलं, “इराकमध्ये समस्या ही नाही की महिला गप्प राहतात. समस्या ही आहे की जेव्हा त्या बोलतात, तेव्हा त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी व्यवस्थेत फारच कमी मार्ग उपलब्ध असतात.”

‘लैंगिक हिंसाचाराची तक्रार करणाऱ्या महिलेला सर्वात प्रथम स्वतःचं घर सोडावं लागतं. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणि मग न्यायालयात जावं लागतं. या प्रत्येक ठिकाणी तिला कोणी ना कोणी हे प्रकरण गुपचूप मिटवून टाक, असं सांगू शकतं.’

‘कारमधून माझा पाठलाग केला’

व्यवस्थेनं आपल्याला साथ दिली नाही, असं वाटणाऱ्या इराकी महिलांमध्ये समिराचाही समावेश आहे. समिरा हे तिचं खरं नाव नाही.

वारंवार छळाला सामोरं जावं लागल्यामुळे रस्त्यावरून चालतानाही आपल्याला नेहमी भीती वाटते आणि सतर्क राहावं लागतं, असं समिराने बीबीसीला सांगितलं.

एकदा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत असताना एक व्यक्ती आपल्या मोबाईलवर अश्लील चित्रपट पाहत होता. त्याने अचानक तो मोबाईल आपल्या चेहऱ्यासमोर धरला, असं तिने सांगितलं.

बगदादमध्ये घडलेल्या आणखी एका घटनेबद्दल समिराने सांगितलं की, एका व्यक्तीने कारमधून 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ तिचा पाठलाग केला होता.

समिरा म्हणाली, ‘हा अनुभव खूप त्रासदायक होता. मला पोलिसांची एक गाडी दिसली. मी त्यांच्याकडे जाऊन काय घडलं ते सांगितलं. पण त्यांनी सांगितलं की, त्यांना याबाबत काहीही करण्याचा अधिकार नाही.’

सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत असताना आपला छळ झाला होता आणि कामावर जाताना एका व्यक्तीने कारमधून आपला पाठलाग केला होता, असं समिरा सांगते.

समिराची आई तिच्यावर खूप प्रेम करते आणि तिला साथही देते. तरीही, समिराने लैंगिक छळाच्या घटनांबद्दल आईला काहीही सांगितलेलं नाही.

‘मी माझ्या कुटुंबीयांना हे सांगितलं, तर ते माझ्या सुरक्षिततेसाठी मला लगेच घराबाहेर पडू नकोस, असं सांगतील,’ असं समिरा म्हणते.

समिराचा सरकारी संस्थांवरील विश्वास उडाला आहे.

ती म्हणते, ‘पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक पुरुषांना लैंगिक छळ करण्यात काहीच चुकीचं वाटत नाही. त्यांच्या मते, तुम्ही महिलांचा छळ केला नाही, तर तुम्ही खरे पुरुषच नाही.’

इराकमध्ये मी ज्या महिलांशी बोलले, त्यापैकी अनेक महिलांनी पोलिसांवरही लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.

मी इराकच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते मुकादाद मिरी यांच्यासमोर हे आरोप मांडले.

मिरी म्हणाले, “पोलिसांकडून छळ किंवा गैरवर्तन झाल्याच्या घटना समोर येतात, परंतु, अशा घटना फार कमी आहेत. अशा प्रकरणांत दोषींना कठोर शिक्षा दिली जाते. त्यांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो आणि नोकरीतूनही काढून टाकलं जातं.”

गृह मंत्रालयाचे प्रवक्ते मिरी यांच्या म्हणण्यानुसार,

काही महिला पोलिसांकडे तक्रार करायला घाबरतात. त्यामुळे त्या आता छळाचे पुरावे सोशल मीडियावर नोंदवून ठेवत आहेत, असं मिरी यांना सांगितलं.

महिला सोशल मीडियावर पोस्ट करतात, कारण अधिकृत तक्रार दाखल करण्यापेक्षा हा मार्ग सोपा आहे, असं मिरी म्हणाले. एखाद्या समस्येकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करणं हा आता नेहमीचा सामान्य मार्ग झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मी त्यांच्यासमोर समिराचा अनुभवही सांगितला. समिराच्या म्हणण्यानुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने तिला सांगितलं होतं की, छळ थांबवण्याचा त्याला कोणताही अधिकार नाही.

समिराला त्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल करता आली असती, असं मिरी म्हणाले.

इराकमध्ये लैंगिक हिंसाचार आणि छळाच्या घटनांबाबतची कोणतीही विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध नाही.

मिरी यांनी सांगितलं की, या वर्षाच्या सुरुवातीपासून पोलिसांकडे लैंगिक हिंसाचाराच्या जवळपास 300 तक्रारी आल्या आहेत.

परंतु, प्रत्यक्षात ही संख्या यापेक्षा जास्त असल्याचं त्यांनी मान्य केलं.

ते म्हणाले, “सामाजिक नियम, रूढी आणि परंपरांमुळे लैंगिक हिंसाचाराचे अनेक प्रकरणं पोलिसांपर्यंत पोहोचतच नाहीत.”

‘लढा फक्त लैंगिक हिंसाचाराविरोधात नाही’

बीबीसीने ज्या महिलांशी चर्चा केली, त्यांच्या अनुभवांवरून दिसून येतं की, त्यांचा लढा केवळ लैंगिक हिंसाचाराविरोधात नाही.

अशा हिंसाचाराला खतपाणी घालणाऱ्या खोलवर रुजलेल्या विचारसरणी आणि सामाजिक समजुतींविरोधातही त्या लढा देत आहेत.

हना एडवर गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ महिलांच्या प्रश्नांवर काम करत आहेत. परंतु, सध्याची परिस्थिती पाहून त्या निराश झाल्या आहेत.

त्या म्हणाल्या, ‘सद्दाम हुसेनची सत्ता उलथवून टाकल्यानंतर 23 वर्षांनी असं वाटतंय की, महिलांच्या हक्कांच्या बाबतीत आपण पुढे जाण्याऐवजी मागे मागे जात आहोत.’

परंतु, हना आणि सारा या दोघींनीही सांगितलं की, त्या हार मानणार नाहीत.

सारा म्हणाली, “जर आपण सगळेच घाबरलो, तर काहीच बदल घडवू शकणार नाही.”

(अतिरिक्त वार्तांकन: सलमा खत्ताब)

(महत्त्वाची सूचना : जर तुम्हालाही लैंगिक शोषण किंवा हिंसाचाराचा त्रास झाला असेल, तर तुम्ही आरोग्यतज्ज्ञ किंवा मदत करणाऱ्या संस्थेशी संपर्क साधू शकता.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC