Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
लांबसडक, दाट आणि चमकदार केस सगळ्यांनाच हवे असतात. पण तुम्हाला माहीत आहे का? याचं खरं रहस्य दडलंय आपल्या केसांच्या प्रकारात आणि रोज वापरत असलेल्या हेअर ब्रश किंवा कंगव्याच्या योग्य निवडीमध्ये.
मी जेव्हापासून स्वतः माझ्या केसांची निरा राखू लागले लागले, तेव्हापासून माझे केस पाठीच्या खालपर्यंत अगदी सरळ आणि लांब आहेत.
लहान असताना मला जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा मी केस विंचरायला बसायचे. म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यावर, प्रत्येक वेळी बाथरुममध्ये गेल्यावर आणि अगदी अभ्यासाचा कंटाळा आला म्हणून छोटासा ब्रेक हवा असला, तरीही मी केस विंचरत राहायचे.
पण, आता मोठी झाल्यावर मी फक्त आंघोळीच्या वेळीच व्यवस्थितपणे केस विंचरते. पण तरीही माझे केस पूर्वीसारखेच छान दिसतात. निदान मला तरी तसंच वाटतं.
त्याच्या कारणाचा विचार करता, व्हिक्टोरियन काळातील कथांमध्ये थोडेफार तथ्य असले तरी केस किती वेळा विंचरावेत यामागचं विज्ञान निश्चितच गुंतागुंतीचं आहे.
भौतिकशास्त्रज्ञांपासून (फिजिसिस्ट) ते हेअरड्रेसर्सपर्यंत प्रत्येकजण यामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
पण याचं उत्तर तुमच्या केसांचा प्रकार, कंगव्याचा प्रकार, तुमची दिनचर्या आणि इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. त्यामुळे तुमच्या केसांची योग्य काळजी कशी घ्यावी, हे जाणून घेऊया.
इतिहासाची पानं उलटताना
कंगवा किंवा हेअरब्रश वापरण्याची म्हणजेच केस नीटनेटके ठेवण्याची ही सवय काही आजकालची नाही. तर ती अगदी अश्मयुगापासून चालत आली आहे.
‘द हेअर हिस्टोरियन’च्या संस्थापिका रेचेल गिब्सन म्हणतात की, “माणसाने स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी आणि सौंदर्यासाठी नेहमीच त्याच्या आजूबाजूला सहज मिळणाऱ्या गोष्टींपासून साधनं तयार केली. त्यामुळेच जर आपण जगाचा इतिहास पाहिला तर केस विंचरण्याला नेहमीच खूप महत्त्व दिलं गेलं आहे.”
केसांतून 100 वेळा कंगवा फिरवण्याची कल्पना बहुदा व्हिक्टोरियन कालखंडात सुरू झाली असावी. त्यावेळी सामाजिक समजुतींमुळे महिलांचे केस खूप लांब असायचे.
रेचेल गिब्सन यांच्या मते, त्या काळात लांब केस हे महिलांचं ‘वैभव’ मानलं जायचं आणि ते त्यांच्या स्त्रीत्वाचा तसेच सन्मानाचा एक अविभाज्य भाग होते.

त्याकाळी दिनचर्येत सहसा आधी कंगव्याने केसांमधील गुंता काढला जायचा. केसांमधील कचरा, धूळ आणि उवा स्वच्छ केल्या जायच्या. त्यानंतर डुकराच्या केसांपासून (बोअर हेअर) बनवलेल्या मऊ ब्रशने केस विंचरले जायचे. केस मऊ आणि चमकदार व्हावेत आणि डोक्यातील नैसर्गिक तेल केसांमध्ये सर्वत्र पसरावे, हा त्यामागचा उद्देश.
रेचेल गिब्सन सांगतात की, त्या काळातील उच्चभ्रू व्हिक्टोरियन महिलांकडे कपड्यांवर तुटलेले केस पडू नयेत म्हणून खास डिझाइन केलेले केप्स (capes) असायचे.
तसेच हे तुटलेले केस गोळा करण्यासाठी एक भांडं असायचं. नंतर या गोळा केलेल्या केसांपासून त्या “डेड हेअर डोनट्स” (dead hair doughnuts) बनवायच्या. त्याचा वापर हेअरस्टाईलला एक विशिष्ट आकार आणि दाटपणा देण्यासाठी केला जायचा.
यानंतर 1898 मध्ये, अमेरिकेतील ओहायोमध्ये राहणाऱ्या ‘लायडा न्यूमन’ नावाच्या आफ्रिकन-अमेरिकन हेअरड्रेसरने पहिल्यांदा नायलॉन किंवा प्लास्टिकसारख्या कृत्रिम धाग्यांचा हेअरब्रश किंवा कंगवा बनवला.
यामुळे कंगव्याचं उत्पादन खूप स्वस्त आणि सोपं झालं, या मार्केटमध्ये एक मोठी क्रांती झाली. या नवीन शोधामुळे सर्वसामान्य लोकांमध्येही कंगव्याने केस विंचरण्याची क्रेझ वाढली.
पण या नव्या सवयीसोबतच केसांच्या बाबतीत अनेक चुकीचे समज आणि अफवा देखील पसरू लागल्या.
केसांचं गुंतागुंतीचं भौतिकशास्त्र
जास्त वेळा केस विंचरल्याने ते लवकर वाढतात, असा एक समज आहे. वर्ष 2025 मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात तब्बल 46% पेक्षा जास्त लोकांनी या गोष्टीवर विश्वास दाखवला होता.
पण अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील एका हेअर सलोनच्या मालक निक्की कॉर्झिन यांच्या मते, हा निव्वळ एक भ्रम आहे. कॉर्झिन सांगतात की, ‘फक्त जास्त वेळा कंगवा फिरवल्याने केसांची वाढ कधीच वेगाने होत नसते.’
केस विंचरल्याने केसांच्या होणाऱ्या नुकसानाची अचूक चाचणी करण्यासाठी काही शास्त्रज्ञांनी सूत्रं तयार केली आहेत. त्यांच्या मते, अतिप्रमाणात केस विंचरल्याने केसांचं नुकसान होऊ शकतं आणि केस गळू शकतात.
संशोधकांच्या एका पथकाने एक चाचणी तयार केली, त्यात केसांच्या दोन बटा एकमेकांमध्ये गुंतून गाठ पडल्यावर आणि नंतर त्या सोडवण्यासाठी ओढल्या गेल्यावर काय होते, याचे हुबेहूब अनुकरण करण्यात आले.
यात असं दिसून आलं की, जास्त वेळा कंगवा फिरवल्याने केसांच्या आतून चिरा पडतात. विशेषतः ज्यांचे केस दुभंगणारे म्हणजेच केसांच्या टोकांचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त भाग होतात त्यांना याचा त्रास होतो.
निरोगी केसांची स्थिती तुलनेने चांगली राहिली असली तरी वारंवार पडणाऱ्या दाबामुळे ते देखील शेवटी दुभंगू लागले आणि त्यांच्यावर बाहेरून आतल्या बाजूला चिरा पडू लागल्या.
फोटो स्रोत, BBC/ Prashanti Aswani
आयर्लंडमधील ट्रिनिटी कॉलेज डब्लिन येथील इंजिनिअरिंगचे प्राध्यापक आणि या अभ्यासाचे लेखक डेव्हिड टेलर म्हणतात, “आमच्या मते केस दुभंगण्याचे मुख्य कारण हेच आहे. कारण अशा परिस्थितीत केस जास्त वळलेले असल्याने त्यांच्यावर नेहमीपेक्षा खूप जास्त ताण पडतो.
खरं तर, आपण जितके जास्त केस विंचरू तितके त्यांचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. पण प्रत्यक्षात हे नुकसान तुम्ही किती वेळा कंगवा फिरवता यावर नाही तर केस विंचरताना तुम्ही किती ताकद लावून कंगवा ओढता यावर अवलंबून असते.”
टीआरआय प्रिन्स्टन (TRI Princeton) या केस संशोधन संस्थेचे ट्रेफोर इव्हान्स यांनी केसांच्या तुटण्याबाबत केलेल्या विविध सांख्यिकीय विश्लेषणातून असं दाखवून दिलं आहे की, सारखे केस विंचरत राहिल्याने केसांवर सतत ताण पडतो आणि त्यांचं हळूहळू पण कायमचं नुकसान होतं.
पण इव्हान्स पुढे असंही म्हणतात की, लॅबमध्ये दिसणारे हे बारीक-सारीक परिणाम रोजच्या आयुष्यात तंतोतंत तसेच जाणवतील असं नाही.
केमिकल ट्रिटमेंट्स (कलरिंग, स्ट्रेटनिंग) आणि हिटिंग टूल्स (ड्रायर, कर्लर) मुळे केसांचं जे नुकसान होतं त्यामानाने रोज कंगवा फिरवल्याने होणारा त्रास हा बहुतेकांसाठी अगदीच किरकोळ किंवा नावापुरताच असतो.
त्यांच्या मते, विंचरण्यामुळे केसांना पोहोचणारी इजा ही ‘नुकसानीच्या अथांग समुद्रातल्या एका छोट्याशा थेंबासारखी’ आहे.
केस विंचरण्याचे काही छुपे फायदे
कॉर्झिन सांगतात, “हळुवारपणे आणि काळजीपूर्वक केस विंचरणे अजिबात चुकीचं नाही. समस्या केस विंचरण्यात नाही तर तुम्ही ते कोणत्या पद्धतीने विंचरता यात आहे.”
नियमितपणे केस विंचरत राहिल्याने केसांचा गुंता वाढत नाही. तुम्ही केस विंचरता तेव्हा केस जास्त ओढावे लागत नाहीत आणि ते तुटतही नाहीत.
हेअरकेअर ब्रँड सुरू करणारे जैवशास्त्रज्ञ जॅरेड रेनॉल्ड्स म्हणतात,”आठवडाभर केस तसेच ठेवून नंतर एकदम जोरात गुंता सोडवण्यापेक्षा दिवसातून 1-2 वेळा नियमितपणे केस विंचरले तर केसांचे नुकसान खूप कमी होते.”
फोटो स्रोत, Getty Images
पण सोबतच ते हे देखील सांगतात की, लॅबमध्ये केसांवर केलेले प्रयोग आणि आपल्या रोजच्या जगण्यातील नैसर्गिक गोष्टी या दोन्हीमध्ये फरक असतोच.
रोज नियमितपणे कंगवा फिरवल्याने गळून पडलेले केस, डोक्यातील कोंडा (मृत त्वचा) आणि टाळूवर जमा झालेली धूळ-माती सहज निघून जाते.
जर या गोष्टी डोक्यात तशाच साठून राहिल्या तर तिथे बॅक्टेरिया किंवा इन्फेक्शन वाढू शकतं ज्यामुळे टाळूला खाज किंवा जळजळ होऊ शकते.
केस विंचरण्याची योग्य पद्धत
केस विंचरण्याची सर्वात योग्य पद्धत ही तुमच्या केसांच्या प्रकारावर अवलंबून असते.
अमेरिकेतील मियामी येथील एका हेअर सलोनच्या मालक निकोला लिंच म्हणतात की, ज्यांचे केस सरळ किंवा वळणदार आहेत आणि जास्त कुरळे आहेत त्यांनी आठवड्यातून किमान 3 वेळा केस विंचरले पाहिजेत.
शक्य असल्यास दिवसातून 2 वेळा विंचरणे अधिक चांगले. (रेनॉल्ड्स आणि कॉर्झिन देखील दिवसातून 1 ते 2 वेळा केस विंचरण्याचा सल्ला देतात.)
लिंच पुढे सांगतात की, सरळ किंवा वळणदार केस असलेल्या लोकांनी केस ओले असताना ते विंचरणे टाळावे. ओले केस हाताला मजबूत आणि जाड वाटत असले तरी ते आतून खूप कमकुवत झालेले असतात आणि लवकर तुटतात.
यामागचं कारण काय? तर केसांची एक बट ‘कॉर्टेक्स’ (केसांचा मधला भाग) आणि ‘क्युटिकल’ने बनलेला असतो.
क्युटिकल म्हणजे कॅराटिनचे थर असतात. हे त्याच मटेरियलचे असतात ज्यापासून आपली नखं बनतात. हे थर घराच्या छतावर बसवलेल्या कौलांसारखे एकमेकांवर घट्ट चिकटलेले असतात.
पण जेव्हा सरळ किंवा कुरळे केस ओले होतात तेव्हा या कौलांसारख्या थरांच्या कडा वर उचलल्या जातात आणि त्या सुटसुटीत होतात.
यामुळं ओले केस जास्त ताणले तर जातात पण ते मधूनच तुटण्याचा किंवा त्यांचे टोक खराब होण्याचा धोकाही खूप जास्त वाढतो.
ज्यांचे केस खूप जास्त कुरळे किंवा स्प्रिंगसारखे आहेत त्यांच्यासाठी मात्र अगदी उलट नियम लागू होतो. त्यांनी कोरडे केस विंचरणे पूर्णपणे टाळावे आणि फक्त केस धुतानाच त्यांचा गुंता सोडवावा.
सरळ आणि वळणदार (wavy) केसांच्या तुलनेत कुरळ्या आणि कॉइली केसांचे भौतिक गुणधर्म खूप वेगळे असतात.
फोटो स्रोत, BBC/ Prashanti Aswani
अमेरिकेतील जॉर्जिया येथील स्पेलमन कॉलेजमधील रसायनशास्त्र आणि जैवसायनशास्त्राच्या प्राध्यापिका मिशेल गेन्स यांच्या मते, वैज्ञानिक संशोधन आणि हेअरकेअर उद्योगात या गुणधर्मांकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केलं गेलं आहे.
गेन्स या वेगवेगळ्या प्रकारच्या केसांच्या रचनेचा अभ्यास करतात. त्यांनी कुरळ्या केसांचे प्रकार वैज्ञानिकदृष्ट्या ओळखण्याची एक पद्धत शोधली आहे.
त्यांच्या संशोधनात असं समोर आलं की, केसांचे धागे जितके जास्त कुरळे किंवा स्प्रिंगसारखे होतात, तितकी त्यांच्यातील अंतर्गत जोडणी (केमिकल बॉन्ड्स) बदलते. याचा थेट परिणाम केसांच्या मजबुतीवर होतो. त्यामुळेच असे केस लवकर तुटण्याचा धोका असतो.
गेन्स यांच्या सुरुवातीच्या प्रयोगांनुसार, नेहमीच्या वळणदार केसांपेक्षा कुरळ्या आणि स्प्रिंगसारख्या केसांमधील क्युटिकलचे थर खूप बारीक, जवळजवळ आणि कडांना थोडे खडबडीत असतात.
यामुळे अशा केसांमध्ये ओलावा टिकून राहत नाही आणि पर्यायाने हे केस लवकर खराब होऊन त्यात जास्त गाठी पडतात. अर्थात, यावर अजून जास्त संशोधन होणं बाकी आहे.
गेन्स पुढे असंही म्हणतात की, त्यातल्या त्यात सध्याच्या सोशल स्टाईल ट्रेंड्समुळे कुरळ्या केसांवर खूप जास्त प्रयोग केले जातात. त्यात सतत ब्रश करणं, केस सरळ (स्ट्रेटनिंग) करणं, केमिकल्स वापरून केस मऊ करणं (relaxing) किंवा बाहेरचे खोटे केस वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या घालणं. यामुळे केसांचे आणखी जास्त नुकसान होते.
म्हणूनच मिशेल गेन्स सल्ला देतात की, केसांचा गुंता सहज सोडवण्यासाठी ‘डिटँगलिंग’ (detangling) उत्पादनांचा वापर करा. त्यामुळं कंगवा किंवा ब्रश केसांमधून सहज आणि न अडकता फिरू शकेल आणि केसांचे संरक्षण होईल.
कंगवा कोणता वापरावा?
शेवटची पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, केसांचा प्रकार कोणताही असो, तुम्ही नेहमी योग्य प्रकारचाच ब्रश किंवा कंगवा वापरत आहात याची खात्री करून घ्या.
निकोला लिंच म्हणतात की, जर तुमचे केस कुरळे किंवा स्प्रिंगसारखे असतील किंवा तुमचे केस सरळ किंवा वळणदार असूनही तुम्हाला ते ओले असतानाच विंचरायचे असतील तर कोणताही कडक कंगवा वापरू नका.
त्याऐवजी गुंता सोडवण्यासाठी खास बनवलेला मऊ आणि लवचिक ब्रश वापरा. (ज्याला तज्ज्ञ “वेट ब्रश” – wet brush म्हणतात). कोरड्या केसांसाठी मऊ ब्रिस्टल्स (केस) असलेला ब्रश वापरा जो टाळूला टोचणार नाही.
अशा ब्रशमुळे टाळूवरील नैसर्गिक तेल केसांच्या टोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. यांना अजूनही ‘बोअर ब्रिस्टल ब्रशेस’ (डुकराच्या केसांचे ब्रश) म्हटलं जातं, कारण व्हिक्टोरियन काळात ते डुकराच्या केसांपासून बनवले जायचे.
हा तोच काळ होता जेव्हा महाराणी सिसी एका वेळी मोजून 100 वेळा आपले केस विंचरायच्या.
फोटो स्रोत, Getty Images
दोन्ही ब्रशचे दुहेरी फायदे एकाच वेळी मिळावेत म्हणून रेनॉल्ड्स सध्या एका नवीन प्रकारच्या हायब्रिड (मिश्र) ब्रशचे मॉडेल तयार करत आहेत.
यामध्ये प्लास्टिकचे गोल टोकांचे पिन्स आणि बोअर-स्टाईलचे मऊ ब्रिस्टल्स एकाच वेळी वापरण्यात आले आहेत. यातील लांब प्लास्टिक पिन्स केसांचा गुंता सोडवून ते मोकळे करतात, तर लहान बोअर-स्टाईल ब्रिस्टल्स केसांना मऊ करतात, टाळूचे तेल संपूर्ण केसांत पसरवतात आणि केसांना दाटपणा देतात.
इतिहास पाहिलं तर कंगवे आणि ब्रश नेहमीच वेगवेगळ्या आकारांत आणि डिझाईन्समध्ये पाहायला मिळाले आहेत.
अगदी इसवी सन पूर्व 3200 च्या काळातील प्राचीन इजिप्तच्या थडग्यांमध्ये हस्तिदंतापासून बनवलेले कंगवे सापडले आहेत. तर काही ठिकाणी झाडांच्या वाकलेल्या फांद्यांचे कंगवेही वापरायचे.
आता भविष्यात केसांचं रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र जसजसं आपल्याला आणखी जवळून समजेल तसतसं केसांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काही क्रांतिकारी नवीन मार्ग शोधून काढू शकतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC




