Home LATEST NEWS ताजी बातमी ‘कोहिनूर’ जिथं सापडला, ते गाव पाण्याखाली जाऊनही तिथं हिऱ्यांचा शोध का घेतला...

‘कोहिनूर’ जिथं सापडला, ते गाव पाण्याखाली जाऊनही तिथं हिऱ्यांचा शोध का घेतला जातोय?

2
0

Source :- BBC INDIA NEWS

ऐतिहासिक नोंदींनुसार, किमान 800 वर्षांपूर्वी कोल्लूर हे गाव जगप्रसिद्ध हिऱ्यांच्या खाणींसाठी ओळखले जात होते.

जेव्हा रस्त्यांवर हिऱ्यांचे ढीगच्या ढीग विकले जाण्याचा विषय निघतो, तेव्हा लोकांच्या मनात सर्वात आधी विजयनगर साम्राज्याचं नाव येतं.

विजयनगरच्या राजांच्या काळात हम्पीच्या बाजारपेठांमध्ये हिऱ्यांचा किती मोठा व्यापार चालायचा याचे किस्से आजही दक्षिण भारतात रंगवून सांगितले जातात. यावर सिनेमेही आले आहेत.

परंतु, याच भूभागावर राज्य करणारे आणखी एक साम्राज्य हिऱ्यांच्या व्यापारासाठी तितकंच प्रसिद्ध होतं, हे फार कमी लोकांना माहीत आहे. ते साम्राज्य म्हणजे गोवळकोंडा. त्याची राजधानी आज हैदराबाद म्हणून ओळखली जाते.

इथे सापडायचे सर्वाधिक हिरे

आज बहुतेक लोकांसाठी गोवळकोंडा म्हणजे फक्त एक ऐतिहासिक किल्ला आहे. पण एकेकाळी इंग्रजी भाषेत ‘गोलकोंडा’ हा शब्द नशीब आणि समृद्धी दर्शवण्यासाठी वापरला जाऊ लागला. याचं कारण समजून घेणं अजिबात कठीण नाही.

हम्पीच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर हिऱ्यांचा व्यापार चालायचा. अगदी तसाच व्यापार आजच्या हैदराबादच्या जुन्या शहरातील ‘कारवान’ भागातील रस्त्यांवरही भरायचा, असं नक्कीच म्हणता येईल.

18 व्या शतकापर्यंत भारत ही हिऱ्यांच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ होती.

आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये हिऱ्यांच्या खाणींचा शोध 18 व्या शतकानंतरच लागला होता.

दक्षिण भारतातील कृष्णा, तुंगभद्रा आणि पेन्ना नद्यांच्या खोऱ्यातील परिसर या हिऱ्यांचा मुख्य स्रोत होता.

याच कारणामुळे विजयनगर, विजापूर आणि गोलकोंडा यांसारख्या साम्राज्यांची, म्हणजेच संपूर्ण दख्खनची खरी ओळखच हिऱ्यांच्या व्यापारावरून तयार झाली होती.

विजयनगर, विजापूर आणि गोलकोंडा या साम्राज्यांची खरी ओळखच हिऱ्यांच्या व्यापाराने निर्माण झाली होती.

एकेकाळी गोलकोंडा साम्राज्याचा भाग असलेले कोल्लूर हे गाव आज आंध्र प्रदेशातील पलनाडू जिल्ह्यात येतं. तिथं पोहोचण्यासाठी बेल्लमकोंडाहून शेतातून, झाडी आणि टेकड्यांमधून वाट काढावी लागते.

पुढचा रस्ता इतका अरुंद आहे की ट्रॅक्टर आणि बाईक सोडून दुसरं कुठलंच वाहन तिथपर्यंत पोहोचू शकत नाही.

ना मोबाईलचं नेटवर्क, ना विजेचा पत्ता… अशा या आडवळणाच्या गावात हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच घरं नजरेस पडतात. तरीही दूरवरून आलेले काही लोक आपल्या कुटुंबापासून कित्येक आठवडे दूर राहून इथे जमीन खणत आणि वाळू चाळत बसलेले दिसतात.

ऐतिहासिक नोंदीनुसार, साधारण 800 वर्षांपूर्वी कोल्लूरची खरी ओळख ही इथल्या जगप्रसिद्ध हिऱ्यांच्या खाणींमुळेच होती.

या जागेचा इतिहास नीट समजून घ्यायचा असेल, तर किमान 400 वर्षांपूर्वी युरोपातून आलेल्या परदेशी प्रवाशांनी आणि व्यापाऱ्यांनी लिहून ठेवलेली पुस्तकं वाचावी लागतात.

हिऱ्यांचं गाव पाण्यात गडप झालं

साधारण 1618 ते 1622 या वर्षांमधली ही गोष्ट. युरोपमधून विल्यम मेथॉल्ड नावाचा एक प्रवासी कोल्लूर गावात आला. तिथं माणसांची झालेली तुफान गर्दी बघून ते थक्क झाले.

त्याने आपल्या नोंदीत लिहून ठेवलं, या गावाजवळच्या हिऱ्यांच्या खाणीत त्या काळात चक्क 30 हजार लोक काम करत होते. त्याच्या या नोंदीच्या जवळपास 50 वर्षांनंतर 1665 मध्ये फ्रान्सचे प्रवासी बाप्टिस्ट टॅव्हर्नियर नेमके याच ठिकाणी पोहोचले.

त्यांनी नोंदवून ठेवलं, या गावच्या हिऱ्यांच्या खाणीत 30 हजार नाही तर चक्क 60 हजार मजूर राबत होते.

या दोघांशिवाय मार्को पोलो, हेन्री हॉवर्ड आणि कॉलिन मॅकेन्झी यांसारख्या अनेक दिग्गजांनी इथल्या हिऱ्यांच्या खाणींवर भरभरून लिहिलं आहे.

पुढे हे संपूर्ण गाव धरणाच्या पाण्यात बुडलं आणि ते नाहीसंच झालं.

पुलीचिंतला धरणाच्या जलाशयामुळे कोल्लूर गाव पाण्याखाली बुडाले.

साधारण 10 वर्षांपूर्वीच रिकाम्या झालेल्या या गावात आता जेमतेम 4 कुटुंबं उरली आहेत. ही कुटुंब शेळीपालन करुन निर्वाह करतात.

इथून बोटीनं कृष्णा नदीवरील पुलीचिंतला धरणाच्या जलाशयात काही किलोमीटर पुढे गेलं की, पाण्याच्या मधोमध एक लहानसं बेट नजरेस पडतं.

वास्तविक पाहता, हा पाण्यात बुडालेल्या गावाचा एक उंचावरचा भाग आहे. काही लोक अजूनही इथं छोटे-छोटे तंबू ठोकून राहतात आणि रात्रंदिवस जमीन उकरून हिरे शोधत बसतात.

आजही इथं हिरे सापडत असल्याच्या बातम्या येत असतात. आणि म्हणूनच आपलं नशीब फळफळेल या आशेनं आजही शेकडो लोक इथे धाव घेतात.

बीबीसीच्या टीमनं 2018 मध्ये या गावाला भेट दिली होती तेव्हाही कित्येक लोक हिरे शोधण्याच्या कामात मग्न होते. त्यानंतर 2025 मध्ये पुन्हा एकदा बीबीसीची टीम या गावात पोहोचली.

कोल्लूर… ‘खाण’ या शब्दाचीच नवी ओळख

अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, एकेकाळी कोल्लूर हे गाव ‘खाण’ या शब्दाला समानार्थी शब्द बनलं होतं.

त्या काळात या गावाची ख्याती एवढी अफाट होती की, खाण म्हटलं की डोळ्यांसमोर कोल्लूरच यायचं.

जीएसआयचे (भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण) निवृत्त वैज्ञानिक एस. व्ही. सत्यनारायण यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, “18 व्या शतकापर्यंत दक्षिण भारतातले दख्खनचे पठार हिऱ्यांचं सर्वात मोठे माहेरघर होतं. फक्त कोहिनूरच नाही, तर ‘ग्रेट मोगल’, ‘रीजंट’, ‘ऑर्लोफ’, ‘निजाम’ आणि ‘होप डायमंड’सारखे जगातले सर्वात प्रसिद्ध आणि मौल्यवान हिरे याच मातीत सापडले होते.”

“विशेषतः 13 व्या शतकापासून ते 17 व्या शतकापर्यंतच्या काळात हिऱ्यांचा व्यापार अक्षरशः बहरला होता.”

सत्यनारायण पुढे सांगतात, “आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील कृष्णा आणि पेन्ना नद्यांच्या खोऱ्यांत हिऱ्यांचे मोठे साठे सापडायचे.”

“जगात इतरत्र असणाऱ्या तुरळक खाणी सोडल्या, तर त्या काळात हिऱ्यांचा सर्वात मोठा पुरवठादार हाच संपूर्ण परिसर होता. 1725 मध्ये ब्राझीलमध्ये हिऱ्यांच्या खाणी सापडेपर्यंत जगात भारताचाच दबदबा राहिला.”

“इंग्रज भारतात येण्यापूर्वी आपल्या परदेशी व्यापारात हिऱ्यांचा वाटा खूप मोठा होता. विजयनगर, विजापूर आणि गोलकोंडा साम्राज्यांच्या राजवटीत इथल्या हिऱ्यांनी जगभरात स्वतःचं नाव कमावलं होतं.”

इतिहास अभ्यासक आणि पत्रकार नानिसेट्टी शेरीश यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, “जास्तीत जास्त हिरे तुंगभद्रा आणि कृष्णा नद्यांच्या आसपासच्या भागातच सापडायचे. यामध्ये कोल्लूर हे ठिकाण सगळ्यात जास्त गाजलेले होते. इथे रावुलकोंडासारख्या इतरही खाणी होत्या आणि गांडीकोटासारखी प्रमुख व्यापारी केंद्रही अस्तित्वात होती.”

“सुरुवातीला हिऱ्यांच्या व्यापारावर विजयनगर साम्राज्याचा मोठा दबदबा होता. नंतरच्या काळात विजापूर आणि गोलकोंडा साम्राज्याचा प्रभाव वाढत गेला. या मौल्यवान हिऱ्यांशी अनेक रंजक आणि गूढ गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. यातील काही हिरे शापित असल्याचंही मानलं जातं.”

“सहसा उन्हाळ्याच्या दिवसांत नदीचे पाणी आटून जी कोरडी जमीन उघडी पडते तिथे आजही लोक नशीब आजमावण्यासाठी हिरे शोधायला उतरतात.”

कारवान : जिथे हिऱ्यांना पैलू पाडले जायचे

1518 ते 1687 या काळात कुतुबशाहीच्या सुलतानांनी हैदराबादमधून गोलकोंडा साम्राज्याचा कारभार हाकला.

पश्चिमेला आताच्या गुजरातमधील सुरत आणि पूर्वेला आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम या दोन टोकांपर्यंत हे अफाट साम्राज्य पसरले होते.

प्राचीन काळापासूनच ही दोन्ही शहरं जागतिक व्यापाराची मुख्य बंदरे आणि मोठी केंद्रं मानली जायची. आणि या दोघांच्या बरोबर मध्यभागी होते हैदराबाद. हे शहर गोलकोंडा साम्राज्याचं मुख्य हृदय आणि व्यापारी केंद्र बनलं होते.

आजच्या हैदराबादमधल्या जुन्या शहरातला ‘कारवान’ परिसर एकेकाळी हिऱ्यांवर पैलू पाडण्यासाठी, त्यांना चकाकी देण्यासाठी आणि खरेदी-विक्रीसाठी जगभर गाजला होता.

या व्यापारासाठी देशभरातून गुजराती, मारवाडी आणि इतर अनेक व्यापारी येऊन कारवानमध्येच स्थायिक झाले. इथं परदेशी लोकांचीही सतत ये-जा सुरू असायची.

कोल्लूरमध्ये आजही लोक हिऱ्यांच्या शोधात जमीन खणताना दिसतात.

नानिसेट्टी शेरीश सांगतात, “फ्रेंच प्रवासी थेव्हनॉटनं तर आपल्या नोंदींमध्ये लिहिलं होतं की, गोलकोंडा साम्राज्य म्हणजे हिऱ्यांची खाणच आहे. 17 व्या शतकापर्यंत एकट्या गोलकोंडाच्या अखत्यारीत हिऱ्यांच्या 23 आणि विजापूरच्या राजवटीत 15 मोठ्या खाणी होत्या. या खाणींमधून हजारो लोकांना हक्काचा रोजगार मिळत होता.”

“औरंगजेबानं गोलकोंड्यावर केलेल्या हल्ल्यामागे इथला हिऱ्यांचा अफाट खजिना हेसुद्धा एक मोठं कारण मानलं जातं”

शेरीश यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, “त्या काळी राजे हिरे शोधण्यासाठी मजुरांना एक ठराविक रक्कम देत असत. त्यातही नियम कडक होते. एखाद्याला एक कॅरेट किंवा त्यापेक्षा कमी वजनाचा हिरा सापडला तर त्याला थेट अटकही होऊ शकत होती. पण जर हिरा एका कॅरेटपेक्षा मोठा असेल तर तो हिरा थेट राजाकडे जमा करावा लागत होता.”

“त्यामुळेच मोठ्या खाणींमध्ये काम करणारे कामगार जेव्हा संध्याकाळी घराकडे निघायचे तेव्हा त्यांचे कपडे उतरवून त्यांची अत्यंत बारीक झडती घेतली जायची. कोणी गुपचूप अंगावर हिरा लपवून तर नेत नाहीये ना, यावर कडक नजर असायची.”

“खाणीत जेवढे मजूर राबायचे जवळजवळ तेवढेच सुरक्षारक्षक त्यांच्यावर पहारा देण्यासाठी उभे केलेले असायचे.”

शेरीश सांगतात, “पुढं विजयनगर साम्राज्य लयास गेल्यानंतर हिऱ्यांच्या खरेदी-विक्रीचं आणि व्यापाऱ्यांचं सर्वात मोठं केंद्र म्हणून गोलकोंडा राज्य नावारूपाला आलं.”

कोहिनूर नेमका इथेच सापडला होता का?

कोहिनूर हिरा नेमका कुठे सापडला, याचा कोणताही स्पष्ट आणि ठोस पुरावा उपलब्ध नाही.

तरीही, बहुतांश इतिहासकार आणि भूवैज्ञानिक असे मानतात की हा हिरा कोल्लूरच्या खाणीतूनच मिळाला होता.

कोहिनूर शाहजहान बादशहाच्या हाती आल्यानंतरचा इतिहास मात्र स्पष्टपणे नोंदवलेला आढळतो.

हा हिरा कसा एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे फिरत राहिला आणि अखेर ब्रिटनच्या राजघराण्याच्या मुकुटावर जाऊन बसला याचा रंजक इतिहास सगळ्यांनाच ठाऊक आहे.

पण हा हिरा शहाजहानच्या खजिन्यात नेमका कसा पोहोचला, याचे पक्के पुरावे आज उपलब्ध नाहीत.

शेरीश म्हणतात, “कोहिनूरबाबत अनेक प्रकारच्या समजुती प्रसिद्ध आहेत.”

“माझ्या अभ्यासानुसार, हा हिरा कोल्लूरच्या खाणीतून थेट गांडीकोटाचा सुभेदार मीर जुमला याच्याकडे पोहोचला होता. पुढे मीर जुमलानं बादशहाशी असलेली आपली निष्ठा दाखवण्यासाठी तो शाहजहानला भेट म्हणून दिला.”

इतिहास संशोधक आणि पत्रकार नानिसेट्टी शेरीश

ते सांगतात, “मुघलकालीन नोंदींमध्ये हिऱ्याचा रंग, त्याचा आकार, पाण्यासारखी नितळ चकाकी, पारदर्शकता आणि लाल मखमली कपड्यात ठेवलेल्या त्याच्या डबीचं जे बारकाव्यानं वर्णन दिलं आहे, ते कोहिनूरशी तंतोतंत जुळणारंच आहे. “त्या काळात एवढे महाकाय आणि वजनदार हिरे सापडणारी कोल्लूर ही जगातली एकमेव खाण होती.”

“मीर जुमलाकडे जाईपर्यंत या मौल्यवान हिऱ्याला कसलंही नाव नव्हते. पुढे मुघल सम्राट शाहजहाननं त्याला ‘कोहिनूर’ असं नाव दिलं. फारसी भाषेत ‘प्रकाशाचा पर्वत’ किंवा ‘तेजाचा डोंगर’, असा त्याचा अर्थ होतो.”

फ्रेंच प्रवासी जाँ-बातीस्त तावर्नियेनं मीर जुमलाच्या खजिन्यातील हिऱ्यांवर सविस्तर नोंदी केल्या आहेत. त्याच्या मते, मीर जुमलाकडे हिऱ्यांचे अथांग साठे आणि ढीगच्या ढीग पडून होते.

जीएसआयचे (भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण) निवृत्त शास्त्रज्ञ एस. व्ही. सत्यनारायण यांचंही नेमकं हेच मत आहे.

ते सांगतात, “कोहिनूर साधारण 1656 किंवा अगदी आधीच्या काळात गेलं तर 1304 च्या सुमारास कोल्लूरमध्ये सापडला असावा.”

शेरीश पुढं म्हणतात, “कोहिनूर सापडण्याचं अचूक साल आणि त्यावेळी त्याचं वजन किती होतं, याबद्दल शंका किंवा मतभेद असू शकतात. परंतु, तो कृष्णा नदीच्या खोऱ्यातच सापडला होता, याबाबत तिळमात्रही शंका नाही.”

कुठे गेल्या हिऱ्यांच्या त्या ऐतिहासिक खाणी?

आजच्या आंध्र प्रदेशात येणाऱ्या अनंतपूर, कुर्नूल, कृष्णा आणि गुंटूर या जिल्ह्यांतून एकेकाळी हिऱ्यांचा प्रचंड मोठा खजिना बाहेर पडायचा.

याशिवाय आजच्या तेलंगणालं मेहबूबनगर, कर्नाटकातला रायचूर, महाराष्ट्रातला वैरागड आणि आंध्र प्रदेशातील सध्याचं प्रकाशम आणि कडप्पा या जिल्ह्यांमध्येही मौल्यवान हिरे सापडत होते.

जीएसआयचे निवृत्त शास्त्रज्ञ एस. व्ही. सत्यनारायण

जीएसआयचे निवृत्त शास्त्रज्ञ एस. व्ही. सत्यनारायण यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, हेन्री हॉवर्ड यांनी 1677 मध्ये या हिऱ्यांच्या खाणींवर एक सविस्तर दस्तऐवज लिहून ठेवला होता.

याच जुन्या नोंदींवरून ही ठिकाणं म्हणजे एकेकाळच्या हिऱ्यांच्या प्रसिद्ध खाणी होत्या हे स्पष्ट होतं.

पण हिरे याच विशिष्ट भागात का सापडायचे?

यामागचे शास्त्रीय कारण म्हणजे, हिरे प्रामुख्यानं किंबरलाइट, लॅम्प्राईट, विविध खडकांच्या तुकड्यांनी बनलेले खडक आणि गारगोटी-खड्यांच्या थरांमध्येच तयार होतात आणि सापडतात.

जीएसआयचे निवृत्त वैज्ञानिक एस. व्ही. सत्यनारायण सांगतात, “या सगळ्या ऐतिहासिक खाणी प्रामुख्यानं नद्यांचा गाळ, विशिष्ट खडक, किंबरलाइट, लॅम्प्राईट आणि सुपीक मातीचा वरचा थर असणाऱ्या पट्ट्यातच पसरलेल्या होत्या. कृष्णा आणि तुंगभद्रा नद्यांचा जिथे संगम होतो तिथपासून ते थेट विजयवाड्यापर्यंतचा जवळपास 300 किलोमीटरचा भूभाग या खाणींनी व्यापलेला होता.”

“आजचा विचार केला तर कृष्णा, गुंटूर, मेहबूबनगर, कुर्नूल, प्रकाशम, कडप्पा आणि अनंतपूर हे जिल्हे याच पट्ट्यात मोडतात. इथे सर्वात जास्त हिऱ्यांचं उत्खनन कोल्लूर ते परिताला या भागात झाले होते.”

“कोहिनूर, ग्रेट मोगल, पिट (किंवा रीजंट), ओर्लॉफ, निजाम आणि होप डायमंडसारखे जगातले सर्वात अमूल्य हिरे याच पट्ट्यातून बाहेर आले.”

“थोडक्यात, तुंगभद्रा-कृष्णेच्या संगमापासून ते कोल्लूर-परितालापर्यंतचा हा संपूर्ण परिसर म्हणजे हिऱ्यांचा एक अथांग खजिनाच होता.”

सत्यनारायण सांगतात, कुर्नूल जिल्ह्यातलं रामल्लाकोटा, बनगानपल्ले, वज्रगिरी आणि मुनीमडुगू, गुंटूरमधलं कोल्लूर आणि कृष्णा जिल्ह्यातल्या मल्लवेल्ली भागात ‘कॉन्ग्लोमरेट’ प्रकारचे विशिष्ट खडक अस्तित्वात आहेत.

अनंतपूर आणि कुर्नूल जिल्ह्यांच्या हद्दीतील वज्रकरूर आणि जोन्नागिरी या गावांमध्येही एकेकाळी हिऱ्यांच्या खाणी होत्या.

शिवाय, अनंतपूरच्या वज्रकरूरमधील किंबरलाइट खडक आणि कुर्नूलच्या चेलिमामधील लॅम्प्राईट खडक हिऱ्यांच्या साठ्यांसाठीच प्रसिद्ध आहेत.

थोडक्यात याच जमिनीच्या गर्भातून एकेकाळी मौल्यवान हिरे बाहेर पडत होते.

“सत्यनारायण पुढे सांगतात, “कृष्णा जिल्ह्यातल्या खडी-गारगोटीच्या खाणी आणि विजयनगर साम्राज्यातल्या वज्रकरूर भागातल्या उत्खननातून प्रचंड प्रमाणात हिरे हाती लागले होते.”

“हॉवर्डने 1677 मध्ये नोंदवून ठेवलं होतं की, साधारण 1610 च्या आसपास एका पोर्तुगीज प्रवाशाला वज्रकरूरमध्ये तब्बल 400 कॅरेटपेक्षा जास्त वजनाचा अवाढव्य हिरा सापडला होता.”

“गार्सिया दा ओर्ता याच्या नोंदीनुसार, 1534 मध्ये विजयनगर भागात कोंबडीच्या लहान अंड्याच्या आकाराचा एक हिरा मिळाला होता. याशिवाय जवळपास 150, 175 आणि 312 कॅरेटचे आणखी तीन मौल्यवान हिरेही तिथं सापडले होते.”

“एवढंच नाही तर कोणता हिरा कुठल्या वर्षी कोणत्या राजाच्या खजिन्यात पोहोचला याची बारकाव्यानिशी नोंदही त्यांनी लिहून ठेवली होती.”

मग आता तिथं खोदकाम का थांबलं?

कोल्लूरसारख्या भागांमध्ये 13 व्या ते 18 व्या शतकापर्यंत, म्हणजे तब्बल 600 वर्षे अहोरात्र खोदकाम सुरू होतं.

एवढंच नाही, तर आसपासच्या इतर अनेक खाणींमधूनही शेकडो वर्षे मौल्यवान हिरे बाहेर काढले जात होते.

शेरीश स्पष्ट करतात की, “कोणत्याही हिऱ्यांच्या खाणीतून मुबलक प्रमाणात हिरे हाती लागले तरच तिथं व्यावसायिक उत्खनन करणे फायदेशीर ठरते. तसे झाले नाही तर तिथे औद्योगिक पातळीवर उत्खनन करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही.”

इथल्या खाणींच्या बाबतीतही नेमकी हीच अडचण निर्माण झाली. या काळच्या राजांच्या राजवटीत या सगळ्या खाणींमधून मोठ्या प्रमाणावर हिरे आधीच उपसून काढण्यात आले होते.

आता तिथे फारसं काही शिल्लक उरलेलं नाही. याचा अर्थ इथे हिरे पूर्णपणे संपलेत असा नाही.

अजूनही कधीतरी कुठे ना कुठे कोणाच्या तरी हाती एखादा हिरा लागतोच. पण मोठे उद्योग किंवा यंत्रसामग्री लावून खोदकाम चालवावं, एवढा मोठा साठा आता उरलेला नाही.

कोहिनूर हिरा

एस. व्ही. सत्यनारायण म्हणतात, “1725 नंतर ब्राझीलमध्ये हिऱ्यांच्या नव्या खाणी सापडल्या. इथली जुनी साम्राज्यं संपुष्टात येणं आणि सर्वात मुख्य म्हणजे हिऱ्यांच्या व्यापारात आलेली मंदी या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून इथल्या ऐतिहासिक खाणी कायमच्या बंद पडल्या. असं असलं तरी आजही इथे अधूनमधून हिऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरूच असतो.”

“1890 ते 1894 या काळात हैदराबाद डेक्कन कंपनीनं आजच्या परितालाजवळ नव्यानं हिरे शोधायला सुरुवात केली होती. पण यातून काही विशेष हाती लागलं नाही आणि हा शोध फायदेशीर न ठरल्यानं तो कायमचा बंद करावा लागला.”

“1825 मध्येच व्हॉयसीने लिहून ठेवलं होतं की, कृष्णा आणि पेन्ना नद्यांच्या खोऱ्यातल्या खाणी आधीच जवळपास रिकाम्या पडल्या होत्या. तिथे आता मोठ्या प्रमाणावर हिरे मिळणं अशक्य झाले होते आणि लोक फक्त काही छोट्या-मोठ्या खाणींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते.”

सत्यनारायण यांनी सांगितलं की, “वर्ष 1950 नंतर भारत सरकारने भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या (GSI) मार्गदर्शनाखाली या भागांमध्ये हिऱ्यांच्या खाणी सुरू करण्याचे प्रयत्न करून पाहिले होते.”

“गुंटूर आणि कृष्णा जिल्ह्यातल्या कोल्लूर, चंद्रलपाडू आणि परिताला भागात प्रत्यक्ष खोदकामही झालं.”

“ज्या खडकांमध्ये हिरे सापडतात त्या किंबरलाइट आणि लॅम्प्राईट खडकांचा कसून शोध घेतला गेला. पण हाती काही खास लागले नाही. इथे सापडणारे हिरे आकाराने खूपच लहान होते. त्यामुळे मोठ्या यंत्रांद्वारे व्यवसाय म्हणून उत्खनन करणे अजिबात न परवडणारे असल्याने अखेर हे प्रयत्न थांबवण्यात आले.”

मग आज इथे हिऱ्यांचा शोध कोण घेतं?

आज या भागात सामान्य माणसं, गरीब कुटुंबं आणि निम्न मध्यमवर्गातील लोक नशीब फळफळण्याच्या आशेने हिरे शोधताना दिसतात.

पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांत इथे हिरे सापडण्याची शक्यता जास्त असते, असा इथल्या लोकांचा समज आहे.

कुर्नूलमधलं जोन्नागिरी, अनंतपूरमधलं वज्रकरूर, कृष्णा जिल्ह्यातलं परिताला आणि गुंटूरमधलं कोल्लूर… या गावांमध्ये मे महिन्याच्या शेवटापासून ते जुलैअखेरपर्यंत दोन्ही तेलुगू राज्यांमधून शेकडो लोक हिऱ्यांच्या शोधात दाखल होतात.

काही लोक घरातूनच तांदूळ, तेल, मीठ आणि मिरचीसारखा शिधा सोबत बांधून आणतात.

इथे आल्यावर ते स्थानिक पातळीवर मासे पकडतात किंवा आठवडे बाजारातून भाजीपाला आणतात. त्यानंतर इथेच तंबू ठोकून दिवसभर हिऱ्यांचा शोध सुरू राहतो.

यातले काही जण सहकुटुंब येतात तर काही जण कुटुंबाला घरीच सोडून एकटेच नशीब आजमावायला पोहोचतात.

अनेक जण मित्र आणि नातेवाइकांचे गट करून येतात, तर काही लोक असेही आहेत जे आठवडाभर आपापली कामं करतात आणि फक्त सुट्टीच्या दिवशी हिरे शोधायला इथं दाखल होतात.

बीबीसीने इथं हिरे शोधत फिरणाऱ्या अनेक लोकांशी संवाद साधला. पण ‘मला स्वतःला हिरा सापडला आहे’, असं ठामपणे एकही जण म्हणाला नाही.

मात्र ‘एका माणसाला अमुक एका जागी हिरा गवसला, तो मौल्यवान होता आणि त्याने तो दुसऱ्या एका व्यक्तीला विकला’, अशा ऐकीव कथा मात्र प्रत्येक जण रंगवून सांगतो.

अशा अनेक गोष्टी इथं कानावर पडत असतात. यातील किती कथा खऱ्या आहेत आणि किती केवळ काल्पनिक, हे ठरवणं कठीण आहे.

कोल्लूरसारख्या पट्ट्यात तब्बल 600 वर्षे अहोरात्र हिऱ्यांचे खोदकाम सुरू होते.

पिडुगुराल्ला येथील रहिवासी असलेल्या विजयम्मा यांना मात्र मिरची आणि कापसाच्या शेतीत मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं.

डोक्यावरचा कर्जाचा डोंगर हलका व्हावा आणि एखादा तरी हिरा हाती लागावा या आशेनं त्यांनी महिनाभर कोल्लूरचा परिसर पिंजून काढला.

विजयम्मा सांगतात, “नशिबात ज्याच्या हिरा मिळायचा असेल त्यालाच तो गवसतो. पण इथं कोणाला काही सापडलं, तरी कोणी तोंड उघडत नाही. उलट मला तर अशी भीती वाटते की, एखाद्याला हिरा सापडल्याचे लोकांना कळलं तर ते त्या व्यक्तीचे काय हाल करतील. आम्ही तर साध्या लोणच्यासोबत घास खाऊन कसेबसे दिवस ढकलतो.”

एर्रागोंडापालेमच्या नरसम्मा यांचीही अशीच कहाणी आहे. त्या तब्बल 7 महिने कोल्लूरमध्ये ठाण मांडून बसल्या होत्या.

दर महिन्याला फक्त पेन्शनचे पैसे आणण्यासाठी त्या गावी जायचं आणि बाकी सगळे दिवस नवऱ्यासोबत इथे रानावनात हिरा शोधत फिरत असत. त्या सांगतात, “डोक्यावरचं कर्ज कसं तरी फिटावं, म्हणून आम्ही ही सगळी मेहनत करत आहोत.”

विशेष म्हणजे इथले अनेक स्थानिक रहिवासी आता हिऱ्यांचे एजंट किंवा दलाल झाले आहेत. त्यांच्याकडे हिऱ्यांची गुणवत्ता तपासणारी आधुनिक उपकरणेही उपलब्ध आहेत.

कोणालाही हिऱ्यासारखा भासणारा एखादा दगड सापडला, की ती व्यक्ती सरळ या दलालाकडे जाते. दलाल मशिन्सद्वारे त्याचा दर्जा तपासतो. हिऱ्यांच्या मोठ्या व्यापाऱ्यांशी बोलून किंमत ठरवतो आणि तो विकून देतो. अर्थात, पडद्याआड चालणारे हे सगळे व्यवहार कायद्याच्या नियमांत बसणारे असतातच, असे मात्र अजिबात नाही.

हिऱ्यांबद्दल काय लिहून ठेवलं आहे?

महाभारतासारख्या महाकाव्यापासून ते कौटिल्याच्या अर्थशास्त्रापर्यंत, प्राचीन भारतीय साहित्यातल्या अनेक पानांवर हिऱ्यांचे संदर्भ वाचायला मिळतात.

पण हे हिरे नेमके ज्या जमिनीतून किंवा खाणींतून बाहेर काढले गेले त्या ठिकाणांची बारकाईने केलेली वर्णने मात्र दुर्मिळच आहेत.

इथल्या ऐतिहासिक खाणींची खरी माहिती मिळते ती भारतात आलेल्या परदेशी प्रवाशांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि युरोपीय अधिकाऱ्यांच्या नोंदींतून.

13 व्या शतकात आजच्या प्रकाशम जिल्ह्यातल्या मोटुपल्ली बंदरावर आलेल्या जगप्रसिद्ध प्रवासी मार्को पोलोने या खाणींबद्दलच्या नोंदी आपल्या पुस्तकात करून ठेवल्या होत्या.

असं म्हटलं जातं की, त्यांनी कृष्णा नदीच्या खोऱ्यातल्या हिऱ्यांच्या खाणींना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती.

मोटुपल्लीच्या आसपास कृष्णा खोऱ्यात असणारं ते ठिकाण दुसरं-तिसरं काही नसून कोल्लूरच असावं, असं अनेक संशोधकांचं मत आहे.

मार्को पोलोनं स्वतःच्या नोंदीत लिहिलेलं, “या राज्याचा अपवाद वगळता जगात इतर कुठेही हिरे मिळत नाहीत. इथे तुम्हाला एकापेक्षा एक दर्जेदार हिरे पाहायला मिळतील.”

भारतात आलेल्या या सर्व प्रवाशांमध्ये फ्रान्सचे प्रवासी जाँ-बातीस्त तावर्निये यांनी सविस्तर आणि सखोल माहिती लिहून ठेवली.

तावर्निये स्वतः हिऱ्यांचा मोठा व्यापारी असल्यामुळे त्यानं हिऱ्यांच्या खाणी, उत्पादन, उद्योग, खरेदी-विक्रीचा व्यापार, हिऱ्यांना पैलू पाडण्याची पद्धत, तसेच त्यांचे वजन आणि दर्जा या सर्व गोष्टींचे सूक्ष्म विश्लेषण आपल्या नोंदींमध्ये मांडलं होतं.

1890 ते 1894 या काळात हैदराबाद डेक्कन कंपनीने आजच्या परितालाजवळ हिरे काढण्यासाठी उत्खनन सुरू केले होते खरे,पण तोटा होऊ लागल्याने काम बंद पडले.

युरोपातील लेखकांनी या भागातील खाणींचे विविध प्रकार आणि त्यांमधून सापडणाऱ्या हिऱ्यांविषयीही नोंदी करून ठेवल्या होत्या. यापैकी कोल्लूरच्या खाणीला सर्वाधिक लोकांनी भेटी दिल्या होत्या आणि त्याच खाणीबद्दल अतिशय सविस्तर लिहिलं गेलं.

यासुद्धा हिऱ्यांच्या प्रचंड मोठ्या खाणी होत्या, असा उल्लेखही त्यांनी केला आहे.

वर्ष 1814 मध्ये हेनी नावाच्या एका लेखकानं नोंदवून ठेवलं, कोडवतीकाल इथं इतक्या प्रचंड प्रमाणावर हिरे सापडले होते की ते बैलगाड्यांमध्ये भरून वाहून न्यावे लागत असत.

त्यांनी पेन्ना, कुंडेरु आणि हिंद्री नद्यांच्या खोऱ्यात वसलेल्या गावांसह रायलसीमा पट्ट्यातील अनेक भागांविषयी सविस्तर लिहून ठेवलं होतं.

कोल्लूरचं अस्तित्व आज केवळ इतिहासाच्या पानांपुरते मर्यादित राहिलं असलं आणि काळाच्या ओघात हे ठिकाण प्रत्यक्ष नकाशावरून लुप्त झालं असलं तरीही सामान्यांसाठी हे ठिकाण आजही नशीब पालटवून टाकणाऱ्या आशेचा किरण आहे.

इथं जर चुकूनमाकून एखादा हिरा गवसला, तर आपलं संपूर्ण आयुष्य एका क्षणात बदलून जाईल, असा ठाम विश्वास त्यांना आजही वाटतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC