Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Randhokarve.com
‘अश्लीलता हा कोणत्याही लेखाचा, चित्राचा किंवा इतर वस्तूचा गुण नसून तो फक्त तसा आरोप करणाऱ्यांच्या मनाचा गुण होय.’
एका चौकटीत हे वाक्य लिहिलेले असायचे आणि खाली मग पुढचा मजकूर असायचा. वरची चौकट वाचूनच वाचकाला आपल्यासमोर काय वाढून ठेवलं याची कल्पना आली नाही तर दोष कुणाचा? ही चौकट असायची र. धों. कर्वेंच्या ‘समाजस्वास्थ’ मासिकावर.
लोकानुनयाची चिंता न करता समाजाला जे गरजेचे आहे ते छापणाऱ्या, आरोग्यविषयक ‘समाजस्वास्थ’ मासिकावर हा संदेश असायचा.
जसं सौंदर्य हे बघणाऱ्यांच्या दृष्टीत आहे असं म्हटलं जातं तसं अश्लीलता देखील त्या व्यक्तीच्या मनाच्या दृष्टिकोनातूनच आली आहे याची जाणीव करुन देणारं हे वाक्य होतं. पण असं असून देखील या मासिकावर अश्लीलतेचे आरोप झाले, खटले झाले.
या सर्व अडचणींचा सामना करत ‘समाजस्वास्थ’ मासिक तब्बल 27 वर्षं चालले. आजही चार-चौघात ज्या विषयावर बोलणं ‘पाप’च समजलं जातं, त्याविषयाची सुमारे शंभर वर्षं आधी काय स्थिती असेल याची कल्पना आपण करू शकतो. पण र. धों. कर्वे यांनी हे शर्थीने हे शिवधनुष्य पेललं होतं.
फोटो स्रोत, ARUN JAKHADE PADGANDHA PRAKASHAN
रघुनाथराव धोंडो कर्वे हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र होते. महर्षी कर्वे यांनी आयुष्यभरासाठी स्त्री शिक्षणाचे व्रत जसे हाती घेतले तसे रघुनाथरावांनी लैंगिक शिक्षणाचे व्रत घेतले होते. आपल्या वडिलांप्रमाणेच ते देखील गणिताचे प्राध्यापक होते.
गणिताचे प्राध्यापक म्हणून जरी र. धों. यांनी आपली करिअर सुरू ठेवले असते तरी ते नावाजलेले प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ झाले असते यात शंकाच नाही. पण त्यांनी आपली स्वतंत्र वाट निवडली. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याचा हा परिचय.
रधोंचे शिक्षण
रधोंचा जन्म 14 जानेवारी 1882 ला झाला. ते लहान असताना त्यांच्या आई राधाबाई यांचे निधन झाले होते. रधोंचा स्वभाव लहानपणापासूनच अंतर्मुखी होता. ते गणितात लहानपणापासूनच हुशार होते पण इतिहास-भूगोलात त्यांना फार गती नव्हती असं महर्षी कर्वेंना वाटायचं.
म्हणून त्यांनी या दोन्ही विषयाची तयारी करून घेतली आणि गणितावर विशेष लक्ष म्हणून रघुनाथरावांकडून गेल्या 10-12 वर्षांचे पेपर सोडवून घेतले. याचा परिणाम म्हणजे 1899 साली रधों हे दहावीला पहिले आले. ‘याचे बक्षीस म्हणून आपल्याला फर्ग्युसन कॉलेज हॉस्टेलमध्ये राहण्याची परवानगी मिळाल्याचे’ रधों सांगत. पुढील पाच वर्षं ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकले आणि बीए झाले.
फोटो स्रोत, Randhokarve.com
नंतर लगेच त्यांनी एमए ला प्रवेश घेतला पण शिष्यवृत्ती बंद झाल्यामुळे शिक्षणात खंड पडला. पुढे मुंबईत त्यांनी एमए ला प्रवेश घेतला.त्यांनी 1911 ला एम. ए. पूर्ण केले. मधल्या काळात त्यांनी फ्रेंचवर प्रभुत्व मिळवलं. 1919 ला ते पॅरिसला गणिताच्या उच्चशिक्षणासाठी गेले आणि त्यांनी ही पदविका 1921 ला पूर्ण केली.
फर्ग्युसनमध्ये असल्यापासूनचे ते लैंगिक शिक्षण, संततिनियमन या विषयांकडे आकर्षित झाले आणि तेथील ग्रंथालयात बसून या विषयाचा अभ्यास करू लागले होते. त्या काळात त्यांनी असे तरुण पाहिले होते ज्यांना दरवर्षी मुलं होत असत किंवा त्यांना गुप्तरोग होत असे. म्हणजेच लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि गर्भनिरोधक साधनांच्या वापराबाबत असलेल्या अजाणतेपणामुळे हे प्रश्न निर्माण होत असल्याची त्यांना जाणीव झाल्याचे लक्षात येते असे निरीक्षण रधोंचे चरित्रकार डॉ. अनंत देशमुख नोंदवतात.
फोटो स्रोत, Getty Images
रधोंनी सोलापूर हायस्कूलमध्ये नोकरी केली. नंतर एलफिन्स्टन कॉलेज, धारवाड येथील कर्नाटक कॉलेज अशा वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या केल्या. 1921 मध्ये मुंबईतील भटवाडीत ‘राइट एजन्सी’ नावाने संततिनियमन विषयक सल्ला केंद्र देखील सुरू केले होते. या कामात त्यांच्या पत्नी मालतीबाई यांची साथ मिळाल्याचे रधों सांगतात.
संततिनियमन विषयक जागृती करणे हे त्या काळात अनीतीचे, अधार्मिक आणि अश्लील मानले जात होते पण मालतीबाईंनी त्यांना या कार्यात साथ दिली असे दिवाकर बापट यांनी रधोंवर लिहिलेल्या ‘उपेक्षित द्रष्टा’ या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.
1922 मध्ये त्यांनी मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये नोकरीस सुरुवात केली. या नोकरीवर रूजू होण्याच्याच आधी त्यांनी संततिनियमनवर पुस्तिका काढली होती. पण कुणी प्रकाशकच मिळेना. तेव्हा आपल्याकडे असलेली रक्कम त्यांनी यावर खर्च केली आणि 1923 मध्ये त्यांनी स्वतःच ही पुस्तिका छापली. रधोंचे काम करायचे अर्थातच ते तेथील व्यवस्थापनाच्या डोळ्यात भरणारेच होते.
पण ते आपल्या नोकरीचा वेळ सोडून जी कामं करतात त्यात व्यवस्थापनाला हरकत नव्हती. पण त्यांच्या या कामाबद्दल त्यांच्या विरोधातील मत असलेल्या लोकांकडून व्यवस्थापनाकडे तक्रारी येऊ लागल्या. शेवटी व्यवस्थापनाने त्यांना कळवलं एक तर हे काम सोडून द्या किंवा नोकरी सोडून द्या. त्यांनी 1925 मध्ये नोकरी सोडली.
नोकरी सोडल्यावर कठीण परिस्थितीत घर चालवले
नोकरी सोडल्यानंतर त्यांच्याजवळ स्थिर उत्पन्नाचा स्रोत नव्हता. विल्सन कॉलेजातली नोकरी ही त्यांची शेवटची स्थिर नोकरी होती.
रधोंनी टॅक्सी चालवली. ट्युशन्स घेतल्या, कंगवे, साबण इत्यादी गोष्टी विकल्या, असं त्यांच्या एकेकाळच्या सहकारी शकुंतलाबाई परांजपे यांनी लिहिले आहे.
पण हे सारं करताना संततिनियमनावर ते काम करतच राहिले. केवळ लोकांना सल्ला देणेच नाही तर लोकांना ते गर्भनिरोधकसंबंधी सामग्री उपलब्ध करून देत असत.
फोटो स्रोत, Randhokarve.com
आपल्या वैयक्तिक आयुष्यात अर्थातच ते या साऱ्या गोष्टींचे पालन करत होते. मूल होऊ नये म्हणून त्यांना स्वतःचे ऑपरेशन करुन घ्यायचे होते. पण भारतात ते करण्यास तेव्हा कुणीच तयार नव्हते. रधोंचे भाऊ हे नैरोबीत डॉक्टर होते. त्यांनी तिथे जाऊन आपल्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतली.
महर्षी कर्वे हे विधवा पुनर्विवाहाचा प्रसार करत असत. त्यांची प्रथम पत्नी (रधोंच्या आई) वारल्यानंतर महर्षी कर्व्यांनी विधवेसोबत विवाह केला होता. त्यांची ही कृती ‘बोले तैसा चाले…’ या उक्तीप्रमाणेच होते. र. धों. कर्वे देखील याच उक्तीप्रमाणे वागले.
‘समाजस्वास्थ’ सुरू केलं
समाजस्वास्थ सुरू करण्याआधी रधों हे विविध नियतकालिकांमध्ये लेखन करत असत. पण त्यांचे विचार इतके पुरोगामी होते की अनेक ठिकाणाहून ते लिखाण परतच यायचं. त्यावेळी ‘किर्लोस्कर खबर’ हे पुरोगामी नियतकालिक म्हणून प्रसिद्ध होते.
त्यांनी लिहिलेला ‘अमर्याद संतती’ हा लेख ‘किर्लोस्कर खबर’मध्ये प्रसिद्ध झाला होता. नंतर त्यांनी ‘विनय म्हणजे काय’ हा लेख पाठवला. पण संपादकांनी तो परत पाठवला. त्यांच्यासाठी हा अनुभव काही नवीन नव्हता. मग त्यांनी स्वतःच आपले नियतकालिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण नियतकालिक सुरू करायचे म्हणजे त्यासाठी अनेक गोष्टी पाहाव्या लागणार होत्या. त्यांनी साधनांची जमवाजमव सुरू केली आणि 15 जुलै 1927 ला ‘समाजस्वास्थ’ सुरू केले. त्यानंतर एक नवीन पर्व सुरू झाले.
“व्यक्तीच्या व समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची व संबंधी उपायाची चर्चा करणे हा या मासिकाचा उद्देश आहे. विशेषतः ज्या विषयांसंबंधीं लेख छापण्यास इतर पत्रकार लाजतात किंवा भितात असे विषय कितीही महत्त्वाचे असले तरी त्यासंबंधीं माहिती मिळवण्यास सामान्य वाचकांस अतिशय अडचण पडते, व ही अडचण दूर करण्याचा आमचा विचार आहे. यांत केवळ तत्त्वज्ञानाचा खलच न करतां व्यवहारोपयोगी माहितीही दिली जाईल,” असे ते या मासिकाच्या उद्देशिकेत म्हणतात.
फोटो स्रोत, Randhokarve.com
या अंकातला पहिला लेख ‘विनय म्हणजे काय’ हाच आहे. जो लेख परत आल्यामुळे रधोंनी आपले स्वतःचे नियतकालिक सुरू करण्याचा विचार केला, ते वर्तुळ हा लेख प्रसिद्ध झाल्यावर पूर्ण झाले असे म्हणण्यास हरकत नाही.
समाजस्वास्थातील वैविध्य
समाजस्वास्थाच्या लेखांच्या यादी पाहिली तर आपल्या लक्षात येऊ शकतं की जरी आकाराने हे लहान नियतकालिक असले तरी त्यात विषयांचे वैविध्य किती होते आणि खोली किती होती.
सामान्य माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असलेल्या ‘स्वयंपाक घराच्या स्वच्छते’पासून ते आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकांत छापून आलेल्या संशोधनापर्यंत त्यात सारं काही असायचं.
फोटो स्रोत, Arun Jakhade Padmagandha Prakashan
ते केवळ प्रश्नांकडे आरोग्याच्या दृष्टीनेच पाहायचे नाही तर एकूणच समाज प्रबोधनाच्या दृष्टीने पाहायचे. त्यांच्या पूर्ण कार्याचा पायाच बुद्धिप्रामाण्यवाद होता. विज्ञानाच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून पाहिल्याशिवाय कोणतीही गोष्ट स्वीकारायची नाही हाच संदेश त्यांनी आपल्या व्यक्तित्वातून आणि साहित्यातून दिला.
दिवाकर बापट आपल्या पुस्तकात लिहितात की, “…अन् तरीही ‘समाज-स्वास्थ’ हा एकखांबी तंबूच होता. समाज-स्वास्थचे लेख लिहिणे. लिहवून घेणे ; मुद्रणप्रत तयार करणे ; प्रुफे तपासणे ; अंक तयार झाल्यावर वर्गणीदारांच्या नावाच्या चिठ्ठ्या डकवून ते पोस्टात टाकणे ; निरनिराळ्या विक्रेत्यांकडे त्यांच्या त्यांच्या प्रती पोहोचविणे अन् हे सारे ठरलेल्या वेळापत्रकाबरहुकूम पार पाडणे, हे सरावाने रघुनाथरावांच्या अंगवळणी पडले होते.”
‘समाजस्वास्थ’ विरोधातला खटला
समाजस्वास्थाचा फायदा होत असल्याची अनेक पत्रं रधोंना येत असत. आपल्या शंकाचे समाधान समाजस्वास्थातून करावे अशी लोकांची इच्छा असे पण समाजस्वास्थवर टिप लिहिलेली असे की कायदेशीर अडचणींमुळे सर्व गोष्टी यात लिहू शकत नाही, तुम्ही ऑफिसच्या पत्त्यावर वेगळे पत्र पाठवा.
तत्कालीन साहित्यिक आणि समाजसुधारक मामा वरेरकर, रियासतकार गो. स. सरदेसाई, श्रीपाद कृष्ण कोलटकर यांनी त्यांच्या कार्याला पाठिंबा दर्शवला होता.
त्या काळातील रूढीवादी लोकांनी मात्र रधोंना कडाडून विरोध केला.
त्यांच्यावर अश्लीलतेचा खटले भरण्यात आले. व्याभिचाराचे प्रश्न हा लेखासाठी त्यांच्यावर पहिल्यांदा खटला भरण्यात आला. त्यात त्यांना 100 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
त्यानंतर त्यांच्यावर पुन्हा खटला भरण्यात आला होता. दुसऱ्या खटल्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे वकीलपत्र घेतले होते. यावेळी रधोंना 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
बीबीसी मराठीने या खटल्याविषयी स्वतंत्र लेख लिहिला आहे तो तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. या खटल्यावर अजित दळवींनी लिहिलेली आणि अतुल पेठेंनी दिग्दर्शित केलेले नाटक रंगामंचावर येऊन गेले आहे.
फोटो स्रोत, Kumar Gokhale
र. धों. यांचे निधन 14 ऑक्टोबर 1953 रोजी वयाच्या 71 व्या वर्षी झाले. त्यांच्या निधनानंतर ‘समाजस्वास्थ’ बंद पडले. त्यांनी लिहिलेले विपुल साहित्य आजही तितकेच प्रसंगानारूप आहे असे वाटते.
र. धों. कर्वे यांचे विचार काळाच्या पुढे तर होतेच पण याही काळात त्यांचे विचार मार्गदर्शक ठरू शकतात असं अनेकांना वाटतं. इंटरनेटच्या महाजालात सेक्सविषयक माहिती, काँटेट मोठ्या प्रमाणात उपलब्ध असूनही गैरसमज देखील तितक्याच प्रमाणात आहेत. रधों यांच्या तर्कशुद्ध विचारांच्या आधाराने आपण यावर मात करू शकतो असं लेखिका डॉ. अंजली जोशी यांना वाटतं.
र.धों. कर्वे डॉट कॉम साठी लिहिलेल्या आपल्या लेखाचा समारोप करताना त्या म्हणतात, “शंभर वर्षांपूर्वी आपण जिथे होतो तिथेच आहोत. उलट काही पावले मागेच गेलो आहोत. आजही तसाच काळोख आहे. उलट तो अजून मिट्ट झाला आहे.
“त्यातून माग काढत पुढे जायला रधोंच्या समर्थ लेखणीचे हात मात्र आज नाहीत. विवेकवादाची मशाल दिवसेंदिवस क्षीण होत चालली आहे. ती पेटती ठेवण्यासाठी 100 वर्षांपूर्वीच्या समाजाला रधोंची जितकी गरज होती त्याहीपेक्षा जास्त गरज आजच्या समाजाला आहे,” असं डॉ. जोशी म्हणतात.
संदर्भ
1. आर. डी. कर्वे – द चॅम्पियन ऑफ इंडिव्हिज्युअल लिबर्टी, पेंग्विन प्रकाशन, अनंत देशमुख, अनुवादक- नदीम खान
2. र. धों. कर्वे – व्यक्तित्व आणि कर्तृत्व – मैत्रेय प्रकाशन, अनंत देशमुख
3. उपेक्षित द्रष्टा, लेखक – दिवाकर बापट
4. शकुंतला परांजपे यांचा साधना साप्ताहिकातील लेख
SOURCE : BBC




