Home LATEST NEWS ताजी बातमी ‘ग्लास स्किन’ खरंच अस्तित्वात असते का; नितळ त्वचेसाठी किशोरवयीनांना हमखास उपयोगी पडतील...

‘ग्लास स्किन’ खरंच अस्तित्वात असते का; नितळ त्वचेसाठी किशोरवयीनांना हमखास उपयोगी पडतील अशा 5 टिप्स

3
0

Source :- BBC INDIA NEWS

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

आजकाल सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये ‘फ्लॉ-लेस कॉम्प्लेक्शन’ आणि काचेसारख्या चकाकणाऱ्या ‘ग्लास स्किन’चं भलतंच वेड वाढलंय. यासाठी गुंतागुंतीचे स्किनकेअर रुटीन फॉलो करताना बरीच मुलं स्किन डॉक्टरांपेक्षा ‘गेट रेडी विथ मी’ (GRWM) व्हीडिओ बनवणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सच्या सल्ल्यालाच जास्त महत्त्व देताना दिसत आहेत.

पण खरंच किशोरवयीन मुलांना इतक्या सगळ्या स्टेप्स असलेल्या स्किनकेअरची गरज असते का?

त्वचारोगतज्ज्ञ डॉ. जोनाथन केंटली यांच्या मते, सोशल मीडियाची सर्वात चिंतेची बाब म्हणजे समोर सातत्याने दिसणारे “सौंदर्याचे अवास्तव आणि खोटे निकष”.

डॉ. केंटली म्हणतात, “मी आजवर हजारो रुग्ण पाहिले आहेत पण मला कोणाचीही त्वचा ‘काचेसारखी’ (ग्लास स्किन) कधीच दिसली नाही. अशी त्वचा खरोखर अस्तित्वात असते यावर माझा विश्वास नाही. फोटोवर प्रमाणाबाहेर फिल्टर्स लावून ती अशी दाखवली जाते. आणि त्यामुळेच मुलांना वाटते की आपणही अशी त्वचा मिळवू शकतो पण प्रत्यक्षात तसे अजिबात शक्य नसते.”

चेहऱ्यावरील पिंपल

फोटो स्रोत, Getty Images

चेहऱ्यावर छिद्रे दिसणे, ब्लॅकहेड्स, डाग, पिग्मेंटेशन, त्वचा लाल होणे किंवा व्रण उमटणे या किशोरवयीन मुलांच्या त्वचेसाठी अगदी स्वाभाविक गोष्टी आहेत, असे डॉ. केंटली यांचे म्हणणे आहे. पुढे ते म्हणतात की, प्रत्येकासाठी सामान्य असण्याची व्याख्या वेगळी असते: “माझ्या मते अ‍ॅबनॉर्मल असं काही नसतं.”

13 ते 18 वयोगटातील 80% पेक्षा जास्त किशोरवयीन मुलांना मुरुमांचा त्रास होतो.

त्वचारोगतज्ज्ञ डॉ. झैनब लफ्ताह सांगतात की, वयात येताना त्वचेवर दिसणाऱ्या बहुतांश समस्या या ‘टेस्टोस्टेरॉन’ हार्मोनमुळे उद्भवतात. हे हार्मोन त्वचेतील तेलाचे प्रमाण वाढवते त्यामुळे मुरुमे येतात.

मुलांमध्ये या समस्या जास्त प्रमाणात दिसू शकतात. पण मुलींच्या शरीरातही टेस्टोस्टेरॉन असल्यामुळे त्यांच्यातही अशीच लक्षणे आढळतात.

13 ते 18 वर्षे वयोगटातील 80% हून अधिक किशोरवयीन मुलांना मुरुमांचा त्रास होतो.

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. लफ्ताह म्हणतात, “या कारणाने, शिवाय केसांची मुळे बंद होणे आणि सूज निर्माण होणे यामुळे ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स आणि लालसर पुळ्या येतात. मुरुमे येणे ही अतिशय सामान्य आणि नैसर्गिक बाब आहे, तसेच ती उपचाराने बरी होऊ शकते.”

तेलकट त्वचेच्या छिद्रांमध्ये आतपर्यंत जाऊन अतिरिक्त तेल आणि मृत पेशी स्वच्छ करणारा ‘सॅलिसिलिक ॲसिड’ हा घटक “तेलकट किंवा पिंपल्स येणाऱ्या किशोरवयीन मुलांसाठी विशेष फायदेशीर ठरू शकतो,” असे डॉ. लफ्ताह सांगतात. पण याचा विनाकारण किंवा प्रमाणाबाहेर वापर केल्यास त्वचा कोरडी पडू शकते आणि जळजळ होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

जर तुम्हाला खूप जास्त पिंपल्स किंवा त्वचेचा तीव्र त्रास होत असेल तर या समस्येचे निवारण कसे करावे यावर सोशल मीडियावरील लोकांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या फॅमिली डॉक्टर किंवा त्वचारोगतज्ज्ञांकडून उपचार करून घ्या, असे डॉ. केंटली सुचवतात.

सोशल मीडियामुळे ‘एकही डाग नसलेला चेहरा’ आणि अनेक स्टेप्स असलेल्या ‘ग्लास स्किन’ पद्धतींचे फॅड वेगाने पसरत आहे.

आपले स्किनकेअर रुटीन त्वचेची समस्या आणखीच बिघडवत आहे का?

फोटो स्रोत, Getty Images

मग किशोरवयीन मुला-मुलींनीच्या त्वचेची योग्य काळजी कशी घ्यावी? तज्ज्ञ डॉ. झैनब लफ्ताह आणि डॉ. जोनाथन केंटली यांनी दिलेल्या 5 खास टिप्स खालीलप्रमाणे आहेत-

1. स्किनकेअर रुटीन अगदी सोपे ठेवा

तुम्हाला फक्त 3 बेसिक गोष्टी लागतात- एक सौम्य क्लीन्झर, सुगंध नसलेले मॉइश्चरायझर आणि SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेला ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन. बस इतकेच.

2. जास्त स्किनकेअर प्रॉडक्ट्स वापरणे नेहमीच फायदेशीर नसते.

वारंवार त्वचा स्क्रब करणे किंवा ॲसिड्स वापरणे अशा किचकट पद्धतींमुळे कोवळ्या त्वचेला जळजळ किंवा त्रास होऊ शकतो. किशोरवयीन मुलांच्या त्वचेचा नैसर्गिक संरक्षक थर अजूनही पूर्णपणे विकसित होत असतो. त्यामुळे अशाने त्याला हानी पोहोचू शकते.

त्वचेचा हा संरक्षक थर नष्ट करणाऱ्या एक्सफोलिएटिंग हायड्रॉक्सी ॲसिड्स आणि रेटिनॉईड्सच्या अतिवापरामुळे किशोरवयीन मुलांमध्ये ‘पेरिओरल डर्मेटायटिस’ या समस्येमध्ये मोठी वाढ झाल्याचे डॉ. केंटली सांगतात.

डॉ. लफ्ताह म्हणतात की, “वयस्क व्यक्तींप्रमाणे अनेक प्रकारचे सीरम, टोनर, मास्क आणि ॲक्टिव्ह घटक वापरण्याकडे मुलांचा कल वाढतो आहे. अशा घटकांमुळे त्वचेचे नैसर्गिक आवरण कमकुवत होऊन त्वचेचे विकार आणखी वाढू शकतात.”

3. पुरेशी झोप आणि संतुलित आहार गरजेचा आहे.

रिफाइंड किंवा व्हाईट कार्बोहायड्रेट्स, जास्त साखर असलेला आहार आणि अपुरी झोप यामुळे कॉर्टिसोल वाढून चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचा धोका असतो. डॉ. लफ्ताह शांत आणि पुरेशी झोप घ्यायचा सल्ला देतात. “झोप व्यवस्थित झाली नाही की शरीरात कॉर्टिसोल वाढते. हे एक स्ट्रेस हार्मोन असल्याने मुरुमांचा त्रास सुरू होऊ शकतो,” असे त्या सांगतात.

दुसरीकडे पांढरा भात आणि पास्ता यांसारखे जास्त कार्ब्स असणारे पदार्थ, अतिरिक्त साखर आणि प्रोटीन शेकमधील ‘व्हे प्रोटीन’मुळे पिंपल्सची समस्या उफाळून येते, असे अभ्यासात दिसून आल्याचे डॉ. केंटली नमूद करतात. तरीही प्रत्येकाची त्वचा वेगळी असते हे सांगताना ते स्पष्ट करतात की, “काही व्यक्तींच्या बाबतीत इतर गोष्टींमुळेही त्वचेचा त्रास वाढू शकतो.”

4. चेहऱ्यावरील मुरुमे किंवा पुळ्या फोडू किंवा दाबू नका

पिंपल्स फोडल्याने त्यातील घाण त्वचेच्या आत आणखी खोलवर जाण्याची भीती असते ज्यामुळे सूज वाढू शकते. आणि चेहऱ्यावर डाग, खड्डे किंवा त्वचेचा रंग उडण्याची समस्या उद्भवू शकते.

सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या ‘पिंपल हायड्रोकॉलॉइड स्टार पॅचेस’चा वापर चांगला असल्याचे डॉ. लफ्ताह सांगतात. त्या म्हणतात, “हे पॅचेस वरवरच्या पुळ्यांमधील पाणी शोषून घेतात आणि त्वचेवर संरक्षणाचा असा थर बनवतात ज्यामुळे वारंवार हात लावून पिंपल्स फोडण्यापासून रोखता येते.”

5- डॉक्टरांचा किंवा त्वचाविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्या

जर तुम्हाला वारंवार गाठींसारखे वेदनादायी मुरुम येत असतील किंवा चेहऱ्यावर डाग-खड्डे पडत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कारण अशा गंभीर समस्येवर बऱ्याचदा डॉक्टरांनी लिहून दिलेल्या विशिष्ट औषधांचीच गरज असते.

मुलांविषयी काय सांगता येईल?

किशोरवयीन काळातील अनेक समस्या या ‘अँड्रोजेन्स’ या हार्मोनशी संबंधित असतात. हे हार्मोन मुलींमध्येही असते. पण मुलांच्या शरीरात त्याचे प्रमाण जास्त असते.

“त्यामुळे मुलांची त्वचा कधीकधी थोडी जास्त तेलकट असू शकते आणि त्यांच्या चेहऱ्यावर मुरुमेही अधिक प्रमाणात येण्याची शक्यता असते. तसेच या वयात दाढी-मिशा येणे आणि शेव्हिंग करणे या गोष्टींशी जुळवून घेण्याची प्रक्रिया सुरू असते, ज्यामुळे त्वचेला जळजळ किंवा त्रास होऊ शकतो,” असे डॉ. केंटली स्पष्ट करतात.

“शेव्हिंग योग्य पद्धतीने केले नाही तर ‘फॉलिक्युलायटिस’ हा विकार मोठ्या प्रमाणावर उद्भवू शकतो जो एक प्रकारे मुरुमांसारखाच असतो. यामुळे त्वचेच्या नैसर्गिक संरक्षक थराला मोठी हानी पोहोचू शकते आणि खूप जळजळ किंवा सूज येऊ शकते.”

किशोरवयीन मुलं पिंपल

फोटो स्रोत, Getty Images

त्वचेची काळजी घेण्यासाठी डॉ. केंटली यांनी शेव्हिंगच्या काही खास टिप्स दिल्या आहेत-

  • नेहमी अंघोळ झाल्यानंतर शेव्ह करा. कारण त्यावेळी त्वचेला छान वाफ मिळालेली असते, ती गरम असते आणि शेव्हिंगसाठी पूर्णपणे तयार असते.
  • शेव्हिंग ब्रश वापरा. ज्यामुळे केस त्वचेपासून थोडे वर उचलले जातात.
  • शेव्हिंग फोम किंवा शॉवर जेलसारख्या गुळगुळीत आणि ओलावा देणाऱ्या गोष्टी लावूनच शेव्ह करा.
  • दाढी नेहमी केसांच्या वाढीच्या दिशेनेच करा.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC