Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, UGC
-
Published
-
वाचन वेळ: 4 मिनिटे
10 ऑक्टोबर 2026 ची गोष्ट. दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं. मात्र, जंतर-मंतरच्या दिशेनं येणाऱ्या प्रत्येक आंदोलकाला पोलीस ताब्यात घेत होते.
याचवेळी एका ‘परदेशी चेहरा’ असणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांना ताब्यात घेत असताना, माध्यमांचे बूम आणि कॅमेरे त्या व्यक्तीला प्रतिक्रिया विचारण्यासाठी पुढे सरसावले.
त्यातूनच एका पत्रकारानं ताब्यात घेतलेल्या त्या ‘परदेशी चेहऱ्या’च्या व्यक्तीला विचारलं, ‘…लेकीन आप कौन हो? आप कहाँ से आए है?’
आता तुम्ही म्हणाला, यात नवल काय? आंदोलनात शेकडो लोक सहभागी झाले होते. त्यांचं नाव-गाव कुणा पत्रकाराला माहित असणं शक्य कसं आहे?
पण नव्हे, इथेच मोठी गफलत झालीय. कारण ‘परदेशी चेहऱ्या’ची ही व्यक्ती कुणी साधी-सुधी नव्हती, तर ती होती ‘ज्याँ ड्रेझ’.
तर हे ‘ज्याँ ड्रेझ’ कोण आहेत, हेच आपण जाणून घेऊ.
बेल्जियममधून भारतात
ज्याँ ड्रेझ हे एक प्रख्यात अर्थतज्ज्ञ आहेत. ते मूळचे बेल्जियमचे असून गेल्या 45 वर्षांपासून ते भारतातच वास्तव्यास आहेत.
ते देशातील अत्यंत प्रतिष्ठित ‘डेव्हलपमेंट इकॉनॉमिस्ट’ एक आहेत. विशेषतः ‘भूक व लिंगाधारित असमानता’ या विषयांवरील त्यांच्या अत्यंत मूलभूत अशा कामासाठी ते ओळखले जातात.
फोटो स्रोत, Anuradha Roy
भारताच्या आर्थिक धोरण निर्मितीमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे.
1959 मध्ये बेल्जियममध्ये जन्मलेले ड्रेझ 1979 मध्ये भारतात आले आणि 2002 मध्ये भारतीय नागरिक बनले.
नोबेल विजेते अमर्त्य सेन यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्षे काम केलं आहे.
त्यांनी भारतातील काही अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक कल्याणकारी योजनांना आकार देण्यात मदत केली आहे.
इतकी वर्षे भारतात राहून प्रत्यक्ष मैदानावर जाऊन अभ्यास आणि संशोधन केल्यामुळे त्यांना अस्खलित हिंदी येतं. शिवाय, ते केवळ अभ्यासक नसून ऍक्टीव्हीस्टही राहिलेले आहेत.
अनेक मुद्द्यांवर त्यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळेच, या आंदोलनातही ते प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून निषेध करताना दिसले.
विशेष म्हणजे एका व्हायरल व्हीडिओत ते या मुद्द्यावरूनच असं म्हणताना दिसतात की, “जर तुम्हाला असं वाटतं की, आमच्यासारख्या लोकांना नागरिकता देऊ नये, तर तुम्ही भाजपकडे तक्रार करावी. त्यांनीच तर मला 2002 मध्ये नागरिकत्व दिलं होतं.”
कशी आहे कारकीर्द?
ज्याँ ड्रेझ यांनी एसेक्स विद्यापीठात गणितीय अर्थशास्त्राचा अभ्यास केला आणि नवी दिल्लीमधील इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमधून पीएच.डी. केली आहे.
त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यापन केलं असून, सध्या ते रांची विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक तसेच दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक आहेत.
फोटो स्रोत, Getty Images
ते सध्या झारखंडमध्येच वास्तव्यास आहेत.
त्यांनी भारताच्या संदर्भात ‘डेव्हलपमेंट इकॉनॉमी अँड पब्लिक पॉलिसी’ या क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे.
त्यांच्या संशोधनामध्ये ग्रामीण विकास, सामाजिक विषमता, प्राथमिक शिक्षण, बालपोषण, आरोग्यसेवा आणि अन्न सुरक्षा या विषयांचा समावेश आहे.
ज्याँ ड्रेझ यांनी अमर्त्य सेन यांच्यासोबत ‘हंगर अँड पब्लिक ॲक्शन’ (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, 1989) आणि ‘ॲन अनसर्टन ग्लोरी: इंडिया अँड इट्स काँट्रॅडिक्शन्स’ (पेंग्विन, 2013) या पुस्तकांचे सह-लेखन केलं आहे.
तसेच, ‘प्रोब रिपोर्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील मूलभूत शिक्षणावरील सार्वजनिक अहवालाच्या सह-लेखकांपैकीही ते एक आहेत.
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात त्यांच्यासोबत नक्की काय घडलं?
खरं तर त्यांना पोलिसांकडून ताब्यात असलेला व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर ते आता पुन्हा चर्चेत आले आहेत.
त्या व्हीडिओत असं दिसतं की, आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल पोलीस त्यांना पकडून घेऊन जात आहेत आणि माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्यासमोर माईक धरून आहेत.
ते बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही पत्रकारांकडून ‘तुम्ही कोण आहात’, ‘कुठून आला आहात?’ असे प्रश्न ऐकू येत आहेत.
खरं तर, यानंतरच त्यांचा हा व्हीडिओ व्हायरल झाला आणि पोलिसांसहित पत्रकारांना त्यांच्याविषयी माहिती नसावं, याविषयी आश्चर्य व्यक्त केलं जाऊ लागलं.
फोटो स्रोत, UGC
अर्थातच, या आंदोलनात ते ‘ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा,’ या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आले होते.
त्यादिवशी नेमकं काय घडलं, याविषयी स्वत: ज्याँ ड्रेझ यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हटलंय की, “आम्ही तिथं पोस्टर घेऊन उभे होतो आणि माध्यमांशी बोलत होतो, तेव्हा पोलिसांनी काहीही न बोलता आम्हाला उचलून नेलं.”
ड्रेझ म्हणाले की, त्यांनी यापूर्वी अशा प्रकारचा घटनाक्रम कधीही पाहिला नव्हता.
ड्रेझ म्हणाले की, ते दोन दिवसांपूर्वी झारखंडहून दिल्लीसाठी निघाले होते आणि शुक्रवारी सकाळी, रेल्वे सेवा रद्द होण्यापूर्वीच राजधानीत पोहोचले होते.
त्यांनी असाही आरोप केला की, आंदोलनाशी संबंधित नसलेल्या कारणांसाठी दिल्लीत आलेल्या अनेक लोकांनाही ताब्यात घेण्यात आलं. “अशा सुमारे 30 ते 35 लोकांना ताब्यात घेण्यात आलं. ते कामगार वर्ग आणि अल्पसंख्याक समुदायांचे आहेत. त्यांच्याशी गैरवर्तन आणि धक्काबुक्की करण्यात आली,” असंही ते ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हणाले.
‘मनरेगा’च्या आखणीत महत्त्वाचं योगदान
भारताच्या आर्थिक धोरण निर्मितीमध्ये ज्याँ ड्रेझ यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे.
ड्रेझ यांनी Right to Food मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
यासोबतच, त्यांचं उल्लेखनीय काम म्हणून नमूद करता येईल ते म्हणजे मनरेगा या योजनेच्या आखणीमध्ये त्यांनी दिलेलं योगदान.
फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्या या योगदानाविषयी लिहिताना, ज्येष्ठ पत्रकार सुजीत नायर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की, “त्यांनी MGNREGA (मनरेगा) ला आकार देण्यात मदत केली. ‘राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा’, जो आता MGNREGA म्हणून ओळखला जातो, या मोहिमेत महत्त्वपूर्ण बौद्धिक योगदान देणाऱ्यांमध्ये ड्रेझ यांचा समावेश होता. या कायद्यामुळे ग्रामीण कुटुंबांना मजुरीवर आधारित रोजगाराची मागणी करण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला आणि लाखो कुटुंबांसाठी एक महत्त्वाचं सुरक्षा कवच निर्माण झालं.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




