Home LATEST NEWS ताजी बातमी टायगर कॅटच्या नव्या प्रजातीचा शोध, या प्रजातीतील एकमेव जीवंत सदस्याचा असा लागला...

टायगर कॅटच्या नव्या प्रजातीचा शोध, या प्रजातीतील एकमेव जीवंत सदस्याचा असा लागला शोध

3
0

Source :- BBC INDIA NEWS

मांजर

फोटो स्रोत, Paola Nogales-Ascarrunz / Julie Van Collie

बोलिव्हियाच्या जंगलात आढळणाऱ्या ठिपकेदार मांजराची एक नवीन प्रजाती असल्याचे स्पष्ट झालं आहे.

हे लहान आकाराचं मांजर साधारण घरगुती म्हणजे पाळीव मांजराएवढंच आहे.

अंगावरील ठिपके आणि पट्टे इतर जंगली मांजरांसारखे असल्यामुळे ती वेगळी प्रजाती असल्याचं आतापर्यंत लक्षात आलं नव्हतं.

परंतु, डीएनए चाचण्यांमधून ही मांजर इतर मांजरांपेक्षा वेगळ्या प्रजातीचं असल्याचे स्पष्ट झाले.

यामुळे जगातील काही दुर्मीळ आणि सहज न सापडणाऱ्या सस्तन प्राण्यांबद्दल अजूनही आपल्याला किती कमी माहिती आहे, हे समोर आले आहे.

या शोधामुळे टायगर कॅट्सच्या संवर्धनाकडे लोकांचं लक्ष वेधलं जाईल, अशी शास्त्रज्ञांना आशा आहे.

दक्षिण आणि मध्य अमेरिकेत आढळून येणाऱ्या या लहान जंगली मांजरांकडे सिंह, बिबट्या आणि वाघांसारख्या त्यांच्या मोठ्या प्रजातींच्या तुलनेत फारच कमी लक्ष दिलं जातं.

अनेक प्रजाती समोर येणं बाकी?

टायगर कॅट्स लहान आकाराच्या, अंगावर ठिपके असलेल्या जंगली किंवा रानटी मांजरी आहेत. त्या मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील कोस्टा रिका ते बोलिव्हिया आणि अर्जेंटिनापर्यंतच्या भागात आढळून येतात.

या मांजरी दिसायला एकमेकांसारख्याच असल्यामुळे तज्ज्ञांनाही त्यांच्यातील फरक ओळखणं अनेकदा कठीण जातं.

बोलिव्हियातील ला पाझ येथील युनिव्हर्सिदाद मायोर दे सॅन आंद्रेसच्या पाओला नोगालेस-अस्कारुन्स म्हणाल्या, “जगाला एका नवीन प्रजातीची ओळख झाली आहे, ही खूपच आश्चर्यकारक गोष्ट आहे. या प्रजातीचं नाव लिओपार्डस टिलकायो आहे.”

“आजही अनेक नवीन प्रजाती शोधायच्या बाकी आहेत, ही खूपच आश्चर्याची गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याला ज्वालामुखी, एखादं बेट किंवा खोल समुद्रात जाण्याची गरजही नाही.”

टिग्रिनो

फोटो स्रोत, Paola Nogales-Ascarrunz / Julie Van Collie

या प्रजातीचा सध्या केवळ एकच जिवंत सदस्य असल्याचे खात्रीलायकपणे समजलं आहे. तो बोलिव्हियातील एका निवारा केंद्रात आहे. परंतु, या प्रजातीचा आणखी सदस्य जंगलात असण्याची शक्यता शास्त्रज्ञांना वाटत.

‘टिग्रिनो’ नावाच्या या 10 वर्षांच्या मांजरामुळेच शास्त्रज्ञांना या नवीन प्रजातीचा शोध लागला.

बोलिव्हियातील शास्त्रज्ञ डॉ. नोगालेस-अस्कारुन्स अभयारण्यात स्वयंसेवक म्हणून काम करत होत्या. त्यावेळी त्यांना हे मांजर इतर मांजरांपेक्षा वेगळं दिसत असल्याचं लक्षात आलं.

हे मांजर एका स्थानिक व्यक्तीला जंगलामध्ये सापडलं होतं. सुरुवातीला त्याला ते पाळीव मांजराचं पिल्लू वाटलं होतं. मात्र, ते जसजसं मोठं होत गेलं तसतसं ते पाळीव मांजरासारखं वागत नसल्याचं स्पष्ट झालं.

डॉ. नोगालेस-अस्कारुन्स यांनी देशातील युंगास भागातील घनदाट जंगलांमध्ये अशाच लहान रानटी मांजरांना पाहिल्याच्या घटना ऐकल्या होत्या. परंतु, या घटनांचा शास्त्रज्ञांनी अद्याप कोणताही तपास केला नव्हता.

ऑन्सिला किंवा नॉर्दर्न टायगर कॅट

फोटो स्रोत, Getty Images

हे गूढ उलगडण्यासाठी त्यांनी जगभरातील इतर संशोधकांसोबत काम सुरू केलं. त्यांनी जिवंत मांजरं आणि संग्रहालयात ठेवलेल्या नमुन्यांच्या डीएनएचा अभ्यास करून टायगर कॅट्सचा वंश आणि त्यांचा इतिहास तपासून पाहिला.

ब्राझीलमधील पॉन्टिफिकल कॅथोलिक युनिव्हर्सिटी ऑफ रिओ ग्रांडे डो सुल येथील संवर्धन आनुवंशिकतज्ज्ञ एडुआर्डो एझिरिक म्हणाले, “या मांजराबद्दल फार कमी नोंदी किंवा फोटो उपलब्ध होते. संग्रहालयातही त्याचा एकही नमुना नव्हता. त्यामुळे त्याचा शोध लागला नाही, कारण त्याला कोणी शोधतही नव्हतं.”

‘करंट बायोलॉजी’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासातून आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली. यानुसार, टायगर कॅट्सच्या 3 नव्हे तर 5 प्रजाती आहेत. यामध्ये बोलिव्हियातील नव्याने ओळख पटलेल्या टिलकाया कॅट या प्रजातीचाही समावेश आहे.

बोलिव्हियातील घनदाट जंगलं

फोटो स्रोत, Getty Images

परंतु, या प्रजातीची ओळख पटवणं ही केवळ पहिली पायरी आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील वाइल्डलाइफ कन्झर्वेशन रिसर्च युनिटच्या सह-संशोधक डॉ. कॅरोलिन सार्टर यांनी सांगितलं की, या शोधामुळे संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती मिळाली आहे. एखादी प्रजाती नेमकी कोणती आहे आणि ती कुठे आढळून येते, हेच माहिती नसेल तर तिचे संरक्षण करणं अशक्य असतं.

त्या म्हणाल्या, “हे प्राणी आकाराने पाळीव मांजराएवढेच आहेत. त्यामुळे आतापर्यंत आपल्याला त्यांच्याबद्दल सगळी माहिती असेल, असं वाटू शकतं. परंतु, या शोधामुळे जगातील काही कमी अभ्यासलेल्या भागांमध्ये अजूनही किती जैवविविधता शोधायची बाकी आहे, हेही स्पष्ट झालं आहे.”

जंगलतोड, अधिवास नष्ट होणे आणि अवैध शिकारीमुळे टायगर कॅट्सच्या प्रजाती नामशेष होण्याच्या धोक्यात आहेत. पण, नव्याने सापडलेली ही प्रजाती यापूर्वीच्या मूल्यांकनांमध्ये समाविष्ट झाली नव्हती.

मांजर

फोटो स्रोत, Getty Images

या शोधाचा जगभरातील मांजरांच्या प्रजातींबाबतही व्यापक परिणाम होऊ शकतो.

जंगली आणि पाळीव मांजरं ही दोन्ही फेलिडे या जैविक कुटुंबाचा किंवा कुळाचा भाग आहेत. या कुटुंबात घरात पाळल्या जाणाऱ्या छोट्या मांजरांपासून ते मोठ्या आकाराच्या वाघांपर्यंत जगातील सर्व जिवंत मांजरांच्या प्रजातींचा समावेश होतो.

सध्या मांजरांच्या कुटुंबातील 41 प्रजातींना अधिकृतपणे मान्यता आहे. परंतु, या नवीन शोधामुळे आणि टायगर कॅट्सच्या आणखी काही प्रजाती असण्याची शक्यता असल्याने ही संख्या 44 किंवा त्याहून अधिक होऊ शकते.

या संशोधनात सहभागी नसलेले स्कॉटलंडच्या नॅशनल म्युझियम्समधील सस्तन प्राण्यांचे तज्ज्ञ अँड्र्यू किचनर म्हणतात की, टायगर कॅट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण अमेरिकेतील या लहान ठिपकेदार मांजरांच्या प्रजाती ओळखणं आणि त्यांची विभागणी करणं शास्त्रज्ञांसाठी नेहमीच ‘खूप गुंतागुंतीचे राहिलं आहे’.

ते म्हणाले, “या मांजरी दिसायला खूप सारख्या असल्यामुळे त्यांना ओळखणं कठीण आहे. संग्रहालयांमध्येही त्यांचे फार कमी नमुने आहेत. त्यामुळे डीएनए चाचण्यांमधून नवीन प्रजाती समोर येत असताना, त्यांना एकमेकांपासून वेगळं कसं ओळखायचं, हे आम्ही अजूनही शिकत आहोत.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC