Home LATEST NEWS ताजी बातमी डिलिमिटेशनवर विरोधक झाले ‘लिमिटेड’ आणि मतभेद झाले अनलिमिटेड

डिलिमिटेशनवर विरोधक झाले ‘लिमिटेड’ आणि मतभेद झाले अनलिमिटेड

2
0

Source :- BBC INDIA NEWS

डिलिमिटेशनवरून विरोधकांमध्ये लढाई; 'लोकशाहीची हत्या', 'पाठीत खंजीर' खुपसल्याच्या टीकेसह आरोप-प्रत्यारोप

वाचन वेळ: 5 मिनिटे

केंद्र सरकारने 30 नोव्हेंबरपासून संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केल्यानंतर डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे.

या विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याची चर्चा असताना विरोधकांमध्येच मतभेद उघडपणे समोर आले आहेत.

लोकसभेत दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असलेल्या या विधेयकावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) संभाव्य भूमिकेवरून काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्यांनी टीका केली आहे.

डिलिमिटेशन (पुनर्रचना) विधेयकाबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर टिका केली आहे.

समाजवादी पक्ष, पीडीपी आणि आम आदमी पक्ष यांच्यासह अनेक विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला आहे. पण द्रमुक आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्राच्या नव्या मसुद्याला पाठिंबा देऊन इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला आहे.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, “भाजपसाठी निवडणुका हाच सर्वात महत्त्वाचा विषय आहे, देश नाही. त्यामुळे त्यांना लोकसभा मतदारसंघांच्या सीमांची चिंता आहे, देशाच्या सीमांची नाही.”

मेहबूबा मुफ्ती यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं, “जम्मू-काश्मीरला वारंवार धोकादायक राजकीय प्रयोगांची प्रयोगशाळा बनवलं गेलं आहे.” त्यांनी म्हटलं की, जम्मू-काश्मीरमधील डिलिमिटेशन (पुनर्रचना) प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, तेव्हा देशाच्या इतर भागांनी मौन बाळगलं होतं.

त्या म्हणाल्या, “आज याच धोक्याची सावली देशाच्या उर्वरित भागांवरही आहे.” जम्मू-काश्मीरमध्ये आज जो प्रयोग केला जात आहे, तो उद्या संपूर्ण देशात लागू केला जाऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, आपचे खासदार संजय सिंह यांनी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना डिलिमिटेशन (पुनर्रचना) विधेयकाला “भाजपला जिंकून आणा विधेयक” असं संबोधलं. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर खरा खेळ सुरू होईल, असं ते म्हणाले.

संजय सिंह यांनी आरोप केला, “भाजपला आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये केलेला प्रयोग संपूर्ण देशात पुन्हा राबवायचा आहे.”

त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं, “पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने महिला आरक्षणाची अंमलबजावणी सुनिश्चित केली आहे. या ऐतिहासिक निर्णयाचं मी स्वागत आणि अभिनंदन करतो. विकसित भारताच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी हे पाऊल मोठं योगदान देईल.”

डिलिमिटेशनला आम्ही पाठिंबा देणार- जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नेत्यांच्या चर्चेनंतर पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, ही चर्चा पक्षाच्या अधिकृत भूमिकेबाबत नव्हती, मात्र डिलिमिटेशन ही घटनात्मक गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं होतं.

“डिलिमिटेशन प्रक्रिया ही घटनात्मक गरज आहे. डिलिमिटेशन प्रक्रियेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि आम्ही त्या निर्णयाला पाठिंबा देणार आहोत. डिलिमिटेशनला आम्ही निश्चितपणे समर्थन करू.

आव्हाड यांच्या या विधानानंतर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत

विजय वडेट्टीवार यांची शरद पवारांवर टीका

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.

“पवार साहेबांनी या वयात जो निर्णय घेतला आहे, तो पाहून आम्ही आश्चर्यचकित आहोत. त्यांनी आयुष्यभर पुरोगामी विचारसरणी पुढे नेण्यासाठी काम केलं आहे. अशा वयात त्यांना बाजूला ठेवणं योग्य नाही, असं आम्हाला वाटलं होतं.”

ते पुढे म्हणाले, “राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनाही तसंच वाटलं. त्यामुळे आमच्याकडे 36 आमदार असतानाही आम्ही त्यांना पाठिंबा दिला. मात्र तो पाठिंबा आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी दिलेला नव्हता. आता आमची चूक आमच्या लक्षात आली आहे.”

तसंच त्यांनी आणखी एक गंभीर आरोप करत म्हटलं, “आम्हाला माहिती मिळाली आहे की शरद पवार गटाकडून विरोधी पक्षांच्या बैठकीत कोणीही सहभागी होणार नाही. याचा अर्थ त्यांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाहीची हत्या करणाऱ्यांच्या यादीत त्यांचंही नाव घेतलं जाईल.”

महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही- संजय राऊत

शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनीही शरद पवार गटावर निशाणा साधला.

“शरद पवार गटाला महाराष्ट्र काय आहे हे दाखवून देऊ. शरद पवारांना राज्यसभेवर महाविकास आघाडीने निवडून आणलं आहे. अनेकांचा विरोध होता हे सुप्रिया सुळेंना माहिती आहे. आणि तुम्ही महाराष्ट्रविरोधी भूमिका घेणार असाल तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही.”

संजय राऊत

राऊत यांनी केंद्र सरकारवरही गंभीर आरोप केले.

“त्यांचे एजंट खासदारांची खरेदी-विक्री करण्यासाठी फिरत आहेत. क्रॉस व्होटिंगसाठी 150 कोटी रुपयांचा दर लावण्यात आला आहे. डिलिमिटेशन करण्यासाठी खासदारांची संख्या 860 पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे विधेयक राष्ट्रविरोधी आणि लोकशाहीविरोधी आहे. याच्या बाजूने मतदान करणाऱ्यांची इतिहास देशद्रोही म्हणून नोंद घेईल.”

आम्ही बैठकीला जाणार होतो-कोल्हे

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मुख्य प्रतोद खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, “आम्ही आज इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार होतो. मात्र काँग्रेस नेत्यांच्या शरद पवारांवरील बेजाबाबदार वक्तव्यामुळे आम्ही निषेध करत या बैठकीला आज आता उपस्थित राहणार नाही असा निर्णय घेतलाय.”

“आमच्याकडे डिलिमिटेशन बिलाचा ड्राफ्ट आलेला आहे त्यानुसार पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा याबाबत आमचे खासदार आणि नेते यावर अभ्यास करत आहेत. त्यावर सोमवारी सर्व खासदार एकत्रित बसून चर्चा करू आणि निर्णय घेऊ. पक्षाचा अधिकृत काहीही निर्णय झालेला नसताना काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतः काहीतरी ठरवून टीका करणे हे दुर्दैवी आहे.”

अमोल कोल्हे

केंद्रातील नेत्यांशी चर्चा करून अशा पद्धतीने टीका करणे योग्य आहे का याबाबत काँग्रेस राज्यातील नेत्यांनी विचार करावा अशी विनंती असल्याचंही कोल्हे म्हणाले.

आम्ही बैठकीला उपस्थित राहणार होतो, सुप्रियाताई स्वतः झूम कॉलद्वारे या बैठकीला उपस्थित राहणार होत्या. पण त्यापूर्वी अत्यंत बेजबाबदार आणि निषेध करावी अशी वक्तव्य महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी केली तर आम्ही का उपस्थित राहावे? यामुळे आम्ही न उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

संजय राऊतांना शिंदे गटाचं प्रत्युत्तर

शिवसेनेचे (शिंदे गट) नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.

“लोकांवर असे आरोप करणं योग्य नाही. मग याचा अर्थ असा घ्यायचा का की पाठिंबा दिल्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यावरही 150 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले जावेत?”

ते पुढे म्हणाले, “तुम्ही याच लोकांसोबत अडीच वर्षे सत्तेत होतात आणि आज तुम्ही त्यांच्यावरच प्रश्न उपस्थित करत आहात.”

सरकारच्या मसुद्याला द्रमुकचा पाठिंबा

केंद्रीय मंत्रिमंडळाने मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर, द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली आज अण्णा अरिवलयम येथे डीएमके खासदारांची बैठक झाली. त्यानंतर डीएमकेने डिलिमिटेशन विधेयकाच्या नव्या मसुद्याला पाठिंबा दर्शवला आहे.

सरकारच्या मसुद्याला द्रमुकचा पाठिंबा

याबाबत पत्रकारांशी बोलताना डीएमकेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा म्हणाले,

“1971 मध्ये डीएमकेसह सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लोकसभेतील जागांची संख्या निश्चित केली होती. त्यावेळी तामिळनाडूच्या दोन जागा कमी झाल्या होत्या. मात्र, राष्ट्रहित लक्षात घेऊन डीएमकेने तो निर्णय स्वीकारला होता. प्रत्येक राज्याला एक ठरावीक वाटा देण्यात आला आहे आणि त्यात कोणताही बदल होता कामा नये. आता दोन जागा कमी केल्या जाणार नाहीत, उलट अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहेत.”

ते पुढे म्हणाले, “गेल्या वेळी पुनर्रचना झाली तेव्हा तामिळनाडूचा वाटा 7.18 टक्के होता. निष्पक्ष डिलिमिटेशनचा अर्थ हा वाटा कायम राखला गेला पाहिजे, असा आहे. काँग्रेससह सर्व पक्षांची हीच मागणी होती. हा आज घेतलेला निर्णय नाही. डीएमके सत्तेत असताना पक्षाने यासंदर्भात एक ऐतिहासिक ठराव मंजूर केला होता, जो भारतासाठी मार्गदर्शक ठरू शकतो.”

डिलिमिटेशन विधेयकावरून वाढणार राजकीय संघर्ष?

सध्या लोकसभेत एनडीएकडे 319 खासदारांचं पाठबळ असल्याचं मानलं जात आहे. डिलिमिटेशनसारखं घटनादुरुस्तीचं विधेयक मंजूर करण्यासाठी 360 मतांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत डीएमके, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि इतर प्रादेशिक पक्षांची भूमिका निर्णायक ठरू शकते.

डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांबरोबरच विरोधी आघाडीतील पक्षांमध्येही राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC