Home LATEST NEWS ताजी बातमी डॉक्टर, पोलीस, इंजिनिअर… 1000 जणांना हनीट्रॅपमध्ये अडकवणारा कसा सापडला?

डॉक्टर, पोलीस, इंजिनिअर… 1000 जणांना हनीट्रॅपमध्ये अडकवणारा कसा सापडला?

2
0

Source :- BBC INDIA NEWS

डॉक्टर, पोलीस, इंजिनिअर...1000 जणांना हनीट्रॅपमध्ये अडकवलं; पण आरोपी कसा पकडला गेला?

डॉक्टर, पोलीस, व्यावसायिक, सरकारी अधिकारी, सॉफ्टवेअर इंजिनिअर, प्राध्यापक… या सर्वांमध्ये काय सारखं असू शकतं?

हैदराबाद पोलिसांच्या मते, 23 वर्षीय पवन कुमारनं मुलींच्या नावानं बनावट सोशल मीडिया खाती तयार करून अशा सुमारे 1,000 जणांना हनीट्रॅपमध्ये अडकवलं.

चारमिनार विभागाचे डीसीपी किरण खरे सांगतात, “गेल्या चार वर्षांपासून तो कोलकात्यातील एका मॉडेलसह अनेक मुलींचे फोटो वापरून हनीट्रॅप रॅकेट चालवत होता आणि लोकांकडून पैसे उकळत होता. त्याच्या जाळ्यात भारतातील विविध राज्यांतील तसेच परदेशातील लोकही अडकले.”

पोलिसांनी त्याच्याकडून तीन मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि 16 जीबीचा पेन ड्राइव्ह जप्त केला आहे.

मुलींच्या फोटोच्या आधारे बनावट खाती

कोंडाबाथुला पवन कुमार हा भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील तेकुलपल्ली मंडलचा रहिवासी आहे.

पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, त्यानं हैदराबादमधील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टूल डिझाईन (CITD) येथे डिप्लोमाचा अभ्यासक्रम दुसऱ्या वर्षातच मध्येच सोडला होता.

डीसीपी सांगतात, त्यानं कुटुंबीयांना आपण मल्लारेड्डी कॉलेजमध्ये बीटेक करत असल्याचं सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात तो हैदराबादमध्ये छोटी-मोठी कामं करून उदरनिर्वाह करत असे आणि सध्या बेरोजगार होता.

“तो मुलींचे फोटो वापरून इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर बनावट खाती तयार करायचा. त्यानंतर लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट किंवा फॉलो रिक्वेस्ट पाठवून आपण मुलगी असल्याचं भासवत संवाद सुरू करायचा. हळूहळू तो सेक्स चॅटकडे वळायचा आणि संबंधित व्यक्तींकडून नग्न फोटो व व्हीडिओ मिळवून ते सेव्ह करायचा,” असं पोलिसांनी सांगितलं.

संशय येऊ नये म्हणून तो काही मॉडेल्सचे अर्धनग्न फोटोही पोस्ट करत असे.

या प्रकरणातील पीडितांचं वय 22 ते 70 वर्षांदरम्यान असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

नग्न फोटो-व्हीडिओ मिळवल्यानंतर खंडणी

पोलिसांच्या माहितीनुसार, नग्न फोटो आणि व्हीडिओ मिळवल्यानंतर पवन खंडणी उकळण्यास सुरुवात करत असे.

डीसीपी किरण खरे म्हणाले, “खंडणी उकळताना तो आतापर्यंत ज्या मुलीच्या नावाने चॅट करत असे, तिचा मोठा भाऊ असल्याचं सांगायचा. फोन, व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तो संबंधित व्यक्तींशी संपर्क साधून पैसे मागायचा. माझ्या बहिणीनं आत्महत्या केली आहे किंवा मी पोलिसांत तक्रार करीन, अशी धमकीही द्यायचा.”

डॉक्टर, पोलीस, इंजिनिअर...1000 जणांना हनीट्रॅपमध्ये अडकवलं; पण आरोपी कसा पकडला गेला?

पोलीस सांगतात, पवननं यासाठी कोलकात्यातील एका मॉडेलचे अनेक फोटो वापरले होते. या संदर्भात त्या मॉडेलशी संपर्क साधून तिला सावध करण्यात आलं आहे.

यात पोलीस अधिकारी, प्राध्यापक, सरकारी कर्मचारी, सॉफ्टवेअर इंजिनिअर, डॉक्टर आणि इतर विविध व्यवसायांतील सुमारे 1,000 जणांशी त्याने अशा प्रकारे सेक्सचॅट केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय.

किरण खरे म्हणाले, “या लोकांचं वय 22 ते 70 वर्षांदरम्यान आहे. त्यांच्यापैकी 82 जणांचे नग्न फोटो आणि व्हीडिओ आमच्या हाती लागले आहेत.”

पीडितांमध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, पंजाब यांसह सौदी अरेबिया, तुर्की, पाकिस्तान आणि कॅनडातील नागरिकांचाही समावेश आहे.

पोलिसांच्या मते, पवनला आतापर्यंत या कारवायांमधून 25.16 लाख रुपये मिळाले होते.

27 बनावट आयडी आणि पेज

तपासादरम्यान पवनने 13 बनावट इन्स्टाग्राम आयडी आणि 14 बनावट फेसबुक पेज तयार केल्याचं उघड झालं.

डॉक्टर, पोलीस, इंजिनिअर...1000 जणांना हनीट्रॅपमध्ये अडकवलं; पण आरोपी कसा पकडला गेला?

डीसीपींनी नागरिकांना या खात्यांकडून संदेश आल्यास सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने पोलिसांत तक्रार करण्याचंही त्यांनी सांगितलं.

पोलिसांनी त्याची बनावट फेसबूक आणि इन्स्टाग्राम खाती जाहीर केली आहेत.

हा प्रकार उघडकीस कसा आला?

या प्रकरणाचा उलगडा पवन कुमारनं स्वतःच्या मित्रालाच फसवल्यानंतर झाला.

रमेश (नाव बदललेलं) या मित्राने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. रमेशच्या म्हणण्यानुसार, CITD मध्ये शिक्षण घेत असताना त्याची पवनशी ओळख झाली होती.

सप्टेंबर 2021 मध्ये त्याला ‘Moon Baby 5973’ या इन्स्टाग्राम खात्यावरून फ्रेंड रिक्वेस्ट आली.

“मला या खात्यावर संशय आला. हे खाते पवननंच तयार केलं असावं असं वाटलं. मी त्याला विचारलं तेव्हा त्यानंच ते बनावट खाते असल्याचं कबूल केलं. त्यानंतर मला त्याच्याशी मैत्री ठेवायची नव्हती,” असं रमेशने सांगितलं.

डॉक्टर, पोलीस, इंजिनिअरसह 1000 जणांना हनीट्रॅपमध्ये अडकवणारा आरोपी कसा पकडला गेला?

रमेशच्या म्हणण्यानुसार, नंतर तो दुसऱ्या वसतिगृहात राहू लागला. मात्र पवननं त्याला पुन्हा आपल्या सोबत राहायला येण्यास सांगितलं.

तक्रारीनुसार, या काळात दोघांमध्ये लैंगिक संबंध निर्माण झाले. रमेशचा आरोप आहे की पवन त्याच्यावर दबाव टाकत होता आणि ब्लॅकमेल करून संबंध ठेवण्यास भाग पाडत होता.

तक्रारीत पुढे म्हटलं आहे की, पवननं व्हीडिओ रेकॉर्डिंगची धमकी देत त्याच्याकडून ऑनलाइन पद्धतीनं 1.50 लाख रुपये आणि रोख 2.50 लाख रुपये असे एकूण 4 लाख रुपये उकळले.

17 ऑक्टोबर रोजी सैदाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यानंतरच्या तपासात हे संपूर्ण हनीट्रॅप रॅकेट उघडकीस आलं.

पोलिसांचा सल्ला

डीसीपी किरण खरे सांगतात, “सोशल मीडियावर एखाद्या खात्याकडून फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास त्या खात्याची पडताळणी करा. विशेषतः अनोळखी खात्यांमधून संदेश आल्यास सावध राहा. सुरुवातीला मैत्रीपूर्ण संवाद केला जातो आणि नंतर नग्न फोटो किंवा व्हिडीओ मिळवून फसवणूक केली जाते. अशा परिस्थितीत पीडितांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल करावी.”

आत्महत्येसंबंधी विचार मनात येत असतील तर मदत घ्या.

  • भारत सरकारच्या ‘जीवन साथी’ हेल्पलाइनचा क्रमांक: 18002333330
  • सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाची 13 भाषांमधील हेल्पलाइन: 18005990019
  • राष्ट्रीय मानसिक आरोग्य व मेंदूविज्ञान संस्था (NIMHANS) हेल्पलाइन: 08026995000.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC