Home LATEST NEWS ताजी बातमी तिरुपतीमध्ये अर्पण केलेल्या केसांमुळे कोट्यवधींची कमाई; हे केस कोण विकत घेतं?

तिरुपतीमध्ये अर्पण केलेल्या केसांमुळे कोट्यवधींची कमाई; हे केस कोण विकत घेतं?

1
0

Source :- BBC INDIA NEWS

तिरुपतीमध्ये अर्पण केलेल्या केसांमुळे कोट्यवधींची कमाई; हे केस कोण विकत घेतं?

फोटो स्रोत, TTD

तिरुपती येथे लाखो भाविक श्रद्धेने आपले केस अर्पण करतात. डोक्याचे मुंडण करून केस अर्पण करण्याची तिथे परंपरा आहे. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थानने दिलेल्या माहितीनुसार, तिरुपती येथे येऊन केस दान किंवा अर्पण करणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

देवस्थानने दिलेल्या माहितीनुसार, 27 मे 2026 पर्यंत 12 लाख 43 हजार 63 भाविकांनी केस अर्पण केले. तुलनेत, मे 2023 पर्यंत हा आकडा 10 लाख 18 हजार 370 होता, तर मे 2024 पर्यंत 10 लाख 65 हजार 729 भाविकांनी केस अर्पण केले होते.

अलीकडच्या काळात उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि आठवड्याच्या शेवटी तिरुमलामध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. 18 ते 23 मे या सलग 6 दिवसांत दररोज 50 हजारांहून अधिक भाविकांनी केस अर्पण केले. त्यापैकी 23 मे रोजी या एकाच दिवशी 57 हजार 580 भाविकांनी मुंडन करून केस अर्पण केले.

अशा प्रकारे टनांच्या प्रमाणात जमा होणाऱ्या या केसांचं पुढे काय होतं? तिरुमला तिरुपती देवस्थान या केसांचं नेमकं करतं काय?

भाविकांनी अर्पण केलेल्या केसांचं पुढे काय होतं?

तिरुमला येथे भाविकांकडून अपर्ण म्हणून मिळणाऱ्या केसांना मोठी मागणी असते. केसांच्या व्यापारातील कंपन्या ऑनलाइन (ई-लिलाव) प्रक्रियेद्वारे या केसांची खरेदी करतात.

या केसांपासून बनवलेल्या विग आणि हेअर एक्स्टेंशन्सना जगभरातून मोठी मागणी असते.

तिरुपतीच्या केसांना (तिरुपती हेअर) आंतरराष्ट्रीय बाजारात वेगळी ओळख आहे. गडद काळा रंग, चांगली लांबी आणि चमकदारपणा यामुळे या केसांना पॅरिस आणि लंडनसारख्या शहरांतील फॅशन उद्योगामध्ये मोठी मागणी असल्याचं तिरुमला तिरुपती देवस्थानानं सांगितलं.

केस अर्पणपासून ते लिलावापर्यंतचा प्रवास

तिरुमला येथे भाविकांनी अर्पण केलेले केस आधी तेथेच गोळा करून साठवले जातात. त्यानंतर ते लोअर तिरुपती येथील विशेष केंद्रात आणले जातात.

येथे केसांची गुणवत्तेनुसार वर्गवारी केली जाते आणि ते स्वच्छ केले जातात.

तिरुपती येथील अलीपिरीजवळ असलेल्या या केंद्रामध्ये तिरुमलातून आणलेल्या केसांचे गुणवत्तेनुसार 6 प्रकारांत वर्गीकरण केले जाते.

प्रकार 1 : 31 इंचांपेक्षा जास्त लांबीचे केस

प्रकार 2 : 16 ते 30 इंच लांबीचे केस

प्रकार 3 : 10 ते 15 इंच लांबीचे केस

प्रकार 4 : 5 ते 9 इंच लांबीचे केस

प्रकार 5 : 5 इंचापेक्षा कमी लांबीचे केस

प्रक्रार 6 : पांढरे किंवा राखाडी केस

Caption- सौंदर्यप्रसाधन उद्योगात तिरुपतीच्या केसांना जगभरात मोठी मागणी आहे.

फोटो स्रोत, Getty Images

तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या (टीटीडी) एका अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं की, पहिल्या श्रेणीच्या केसांना सर्वाधिक मागणी असते, तर पाचव्या श्रेणीतील केसांना सर्वात कमी मागणी असते.

ऑक्शन्स इंडिया या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, देवस्थानाच्या अलीकडील ई-लिलावात पहिल्या श्रेणीच्या केसांचा किमान भाव प्रतिकिलो 72,082 रुपये होता, तर पाचव्या श्रेणीच्या केसांचा भाव प्रतिकिलो 135 रुपये होता.

या लिलावात 600 किलो पहिल्या श्रेणीचे आणि 2 लाख 83 हजार किलो पाचव्या श्रेणीचे केस विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

लांब केसांना सर्वाधिक मागणी

लांब केसांना चांगली किंमत मिळते. इतर प्रकारच्या केसांची किंमत मात्र आंतरराष्ट्रीय मागणी आणि बाजारपेठेतील परिस्थितीनुसार ठरते.

सध्या युरोप, आशिया आणि अमेरिकेतील फॅशन उद्योगात तिरुमलातील केसांना (तिरुमलाई हेअर) मोठी मागणी आहे.

टीटीडीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, तिरुमलात दान केलेल्या केसांची लांबी, नैसर्गिक काळा रंग, चमक, नैसर्गिक कुरळेपणा आणि ‘रेमी’ दर्जा यामुळे या केसांना मोठी मागणी आहे.

या केसांचा वापर प्रामुख्याने युरोप आणि आशियातील विग आणि हेअर एक्स्टेंशन्स तयार करण्यासाठी केला जातो.

1938 ते 1985 या काळात तिरुपतीतील दान केलेले केस गोळा करणे आणि त्यांची विक्री हे काम खासगी कंपन्यामार्फत होत असत. 1985 पासून तिरुमला तिरुपती देवस्थानानेच केस अपर्ण केंद्रांचे व्यवस्थापन आणि केसांची विक्री थेट सुरू केली.

सुरुवातीला काही एजंटांच्या माध्यमातून लिलाव होत होते. परंतु, 2011 मध्ये ई-लिलाव सुरू झाल्यानंतर देवस्थानाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली.

तिरुपतीमध्ये अर्पण केलेल्या केसांमुळे कोट्यवधींची कमाई; हे केस कोण विकत घेतं?

फोटो स्रोत, TTD

तिरुमला तिरुपती देवस्थानाचे माजी संयुक्त कार्यकारी अधिकारी आणि निवृत्त आयएएस अधिकारी के. श्रीनिवास राजू यांनी बीबीसीला सांगितलं, “केसांच्या लिलावात काही व्यापारी कृत्रिमरीत्या दर कमी ठेवत होते. हा प्रकार थांबवण्यासाठी देवस्थानाने 2011 मध्ये एमएसटीसी मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन (एमएसटीसी) यांच्या सहकार्याने ई-लिलाव पद्धत सुरू केली.”

‘ई-ऑक्शन्स इंडिया’च्या अंदाजानुसार, यावर्षी तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या ई-लिलावात मोठी स्पर्धा होण्याची शक्यता आहे. या लिलावाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली ओळख आहे.

तसेच, भाविकांनी अर्पण केलेल्या केसांना जगभरातील सौंदर्यप्रसाधन आणि विग निर्मिती उद्योगात मोठी मागणी असल्याचंही कंपनीने म्हटलं.

गेल्या काही वर्षांत भाविकांनी अर्पण केलेल्या केसांमधून तिरुमला तिरुपती देवस्थानला मिळणारे उत्पन्न सातत्याने वाढताना दिसत आहे. 2020-21 मध्ये 67 कोटी रुपये असलेले उत्पन्न 2021-22 मध्ये 75 कोटी, 2022-23 मध्ये 135 कोटी आणि 2023-24 मध्ये 167 कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

एनडीटीव्हीच्या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, 2024-25 या आर्थिक वर्षात तिरुपतीतील केसांच्या विक्रीतून सुमारे 190 कोटी रुपये उत्पन्न मिळण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पुढील काळात हे उत्पन्न 200 कोटी रुपयांचाही टप्पा ओलांडू शकते, असंही या वृत्तात म्हटलं आहे.

दररोज किती भाविक केस अर्पण करतात?

तिरुपती येथील भगवान वेंकटेश्वरांच्या दर्शनासाठी दररोज 70 ते 90 हजार भाविक येतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि मोठ्या सणांच्या काळात हा आकडा आणखी वाढतो.

भाविकांची संख्या वाढली की, केस अर्पण करणाऱ्यांची संख्याही त्याच प्रमाणात वाढते.

तिरुमला तिरुपती देवस्थानाने दिलेल्या माहितीनुसार, 29 जून रोजी 95 हजार 498 भाविकांनी दर्शन घेतले. त्यापैकी 30 हजार 231 भाविकांनी केस अर्पण केले.

दररोज इतक्या मोठ्या प्रमाणात भाविक केस अर्पण करत असल्याने, टीटीडीने व्यापक व्यवस्था उभी केली आहे.

तिरुमला येथील मुख्य मुंडन केंद्राव्यतिरिक्त, भाविकांच्या सोयीसाठी आणखी 11 ठिकाणी ‘मिनी कल्याण कट्टा’ नावाची लहान मुंडन केंद्रेही उभारण्यात आली आहेत.

भाविकांसाठी मुंडनाची सेवा देण्यासाठी एकूण 1152 न्हावी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये 269 महिला न्हाव्यांचाही समावेश आहे.

स्वच्छता आणि भाविकांसाठीच्या सुविधा

प्रत्येक न्हावी 6 तासांच्या शिफ्टमध्ये सुमारे 40 भाविकांचे मुंडन करतो. भाविकांची गर्दी जास्त असलेल्या दिवशी अतिरिक्त 250 न्हावी या सेवेसाठी नियुक्त केले जातात.

टीटीडीच्या म्हणण्यानुसार, हजारो भाविक येणाऱ्या या ठिकाणी नेहमी स्वच्छता राखण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

भाविकांनी केस अर्पण केल्यानंतर ते केस त्वरीत गोळा करून सुरक्षितपणे साठवले जातात.

प्रत्येक मुंडनविधी केंद्रावर भाविकांसाठी आंघोळीची व्यवस्था करण्यात आली आहे. पुरेशा स्नानगृहांसह गरम पाण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC