Source :- BBC INDIA NEWS

लिव्हरचे आजार उशिरा का लक्षात येतात?

फोटो स्रोत, Getty Images

  • Published

  • वाचन वेळ: 8 मिनिटे

दारू आणि धूम्रपान या दोन सवयी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसतात. त्यातही पुरुषांमध्ये याचं प्रमाण जास्त आढळतं. पण या सवयी आणि बैठ्या आधुनिक जीवनशैलीमुळे लिव्हर म्हणजे यकृताचे आजार वाढल्याचं दिसतं. फॅटी लिव्हर, हेपेटायटिस, सिऱ्होसिस असे आजार यामुळे होताना दिसतात.

लिव्हर म्हणजे यकृत हा शरीरातला अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. तो एक डिटॉक्स ऑर्गन म्हणजे नको असलेले पदार्थ बाजूला करणाऱ्या अवयवांपैकी एक आहे. त्यामुळेच अल्कोहोलचं विघटन करताना त्यातून तयार होणारे हानिकारक पदार्थ यकृताच्या पेशींनाही हानी पोहोचवतात.

लिव्हरच्या आजारांचा एक मोठा धोका म्हणजे त्याची लक्षणं अगदी शांतपणे वाढत असतात. सुरुवातीला ती स्पष्ट दिसत नाहीत. किंवा नेहमीचा थकवा, अपचन अशी वरवरची साधी वाटतात. त्यामुळे पुरुष त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्याचं निदानही उशिरा होतं. तोपर्यंत आजार पुढच्या पातळीवर गेलेला असतो.

जागतिक आकडेवारीनुसार, लिव्हरशी संबंधित मृत्यूंपैकी सुमारे दोन-तृतीयांश मृत्यू पुरुषांमध्ये होतात. तसेच, दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये पुरुषांची संख्या मोठी आहे, असं WHO च्या अहवालात नमूद आहे.

याशिवाय बदलती जीवनशैली, प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं, कमी व्यायाम आणि तरुण वयात वाढलेलं धूम्रपान आणि मद्यपान यामुळे 20–30 वयोगटातही लिव्हरच्या समस्यांचं प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जाते.

लिव्हरचे आजार उशिरा का लक्षात येतात?

लिव्हर हा अत्यंत लवचिक असा अवयव आहे. तो बराच काळ नुकसान सहन करूनही काम करत राहतो. हीच त्याची ताकद आहे. पण त्यामुळेच नुकसानही होतं. कारण सुरुवातीच्या टप्प्यात फॅटी लिव्हर किंवा थोडासा दाह (माइल्ड इन्फ्लमेशन) असताना रुग्णाला काहीच त्रास जाणवत नाही.

पण जेव्हा लक्षणं दिसायला लागतात, जसं की सतत थकवा, भूक कमी होणं, पोटाच्या उजव्या बाजूला दुखणं, त्वचा किंवा डोळे पिवळे होणं सुरू होतं तेव्हा अनेकदा आजार पुढच्या टप्प्यात गेलेला असतो.

लिव्हरचे आजार उशिरा का लक्षात येतात?

फोटो स्रोत, Getty Images

सतत दारू प्यायल्यास लिव्हरमध्ये मेद म्हणजे फॅट साठणं, इन्फ्लमेशन सुरू होणं आणि शेवटी फायब्रोसिस आणि सिऱ्होसिस असा प्रवास सुरू होतो. धूम्रपानामुळे इन्फ्लमेशन आणि ऑक्सिडेटिव्ह ताण यामुळे हा प्रवास वेगानं होऊ शकतो.

त्यामुळेच सुरुवातीच्या टप्प्यावरच जीवनशैलीत बदल करणं, दारू बंद करणं, चांगला चौरस संतुलित आहार घेणं, वजनावर नियंत्रण ठेवणं आणि नियमित तपासण्या केल्यास लिव्हरचे आजार कमी करता येतात.

दारू आणि धूम्रपानामुळे नक्की काय त्रास होतो?

महिलांपेक्षा लिव्हरबाबत पुरुषांच्या तक्रारी जास्त असल्याचं दिसतं. यामागे अनेक कारणं आहेत. अनुवंशिकता, लिंग, हार्मोनमधला फरक तसेच जीवनशैलीसंबंधित सवयी यामागे असतात.

महिलांना मेनोपॉझपर्यंत काही प्रमाणात जेनेटिक प्रोटेक्शन म्हणजे अनुवंशिक संरक्षण मिळतं. अर्थात दुसरीकडे ऑटोइम्युन हेपेटायटिससारख्या प्रतिकारशक्ती संबंधित कारणांमुळे आणि अगदी कमी प्रमाणात अल्कोहोल घेतलं तरी महिलांना अल्कोहोलिक लिव्हर डिसिज होण्याची शक्यता जास्त असते.

पुरुषांमध्ये मात्र फॅटी लिव्हर डिसिज आणि लिव्हर कॅन्सर होण्याचा धोका लहान वयापासून वृद्धत्वापर्यंत अधिक आढळतो. यामागे अनेक कारणं असतात. अनुवंशिकता, बैठी आणि व्यग्र जीवनशैली आणि दारू-धूम्रपान अशी कारणं असतात.

दारू आणि धूम्रपानामुळे नक्की काय त्रास होतो?

फोटो स्रोत, Getty Images

आता दारू आणि धूम्रपान लिव्हरचं नक्की नुकसान कसं करतात हा प्रश्न आम्ही डॉ. राजन गर्ग यांना विचारला. ते मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातच्या एचपीबी सर्जरी, पेडिॲट्रिक अँड ॲडल्ट लिव्हर ट्रान्सप्लांटेशन विभागात कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत.

ते सांगतात, “अल्कोहोल आणि दारूचा लिव्हरवर थेट परिणाम होतो. पण लिव्हरचे आजार सुरू होणं आणि वाढणं यासाठी अनुवंशिकता, दारू, सिगारेट, बीएमआय, व्यायामाचा अभाव, अयोग्य आहार अशा घटकांचा परिणाम होतो. धूम्रपानाचा थेट फॅटी लिव्हरशी संबंध आहे. तसेच त्यामुळे फायब्रोसिस आणि हेप्टोसेल्युलर कार्किनोमासारखे आजार होतात. दारूचाही त्याच्याशी संबंध आहेच.”

दारू आणि धूम्रपानामुळे नक्की काय त्रास होतो?

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. गर्ग सांगतात, “धूम्रपानामुळे लिव्हरच्या आजारांची प्रगती आणखी वेगाने होते. याचं कारण म्हणजे शरीरात ऑक्सिजन फ्री रॅडिकल्स तयार होतात, ज्यामुळे अल्कोहोल रिलेटेड फॅटी लिव्हर डिसिज जलद वाढतो, अल्कोहोलिक हेपेटायटिसचे प्रमाण वाढते. तसेच लिव्हर फायब्रोसिसची गती वाढते आणि हेप्टोसेल्युलर कार्किनोमा (लिव्हर कॅन्सर) होण्याचा धोका वाढतो.”

असं असलं तरी डॉ. गर्ग एक काळजीची गोष्ट सांगतात. ती म्हणजे “दुर्देवाने लिव्हरचे शेवटच्या टप्प्यातल्या मानल्या गेलेल्या आजारात यकृताचं प्रत्यारोपण झाल्यावरही रुग्ण धूम्रपान सुरू करतात. त्यामुळे फायब्रोसिस होऊन प्रत्यारोपित यकृताचंही नुकसान होतं.”

लिव्हरचे आजार वाढताहेत; पुरुष सर्वाधिक धोक्यात
दारूची

फोटो स्रोत, Getty Images

कोणत्याही प्रमाणात दारू लिव्हरसाठी घातकच असते. अल्कोहोल हे शरीरासाठी टॉक्सिन म्हणजेच विषपदार्थ म्हणूनच समजलं जातं. अर्थात अल्कोहोल न घेताही लिव्हरचे आजार होऊ शकतात.

थोडीशी दारू प्यायली तर चालेल का, मी कधीतरीच दारू पितो ते चालेल का? असे प्रश्न विचारले जातात.

डॉ. आभा नागराल यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. त्या जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये गॅस्ट्रोएंटेरॉलॉजी विभागाच्या संचालक आहेत. त्या या रुग्णालयात मुख्य हेपॅटॉलॉजिस्ट आणि लिव्हर ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत.

कोणत्या लक्षणांकडं दुर्लक्ष होतं?

फोटो स्रोत, Getty Images

त्या सांगतात, “डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार दारू पिण्याची सुरक्षित अशी कोणतीही पातळी नाही. त्यातही भारताच्या संदर्भात हे जास्तच ठळकपणे सांगितलं जातं. भारतामध्ये उपाशीपोटी दारुचं सेवन केलं जातं त्यामुळे ती शरीरात जास्त शोषली जाते आणि यकृताचा त्रास तितकाच वाढतो. अनेकदा दारू कार्बनयुक्त पेयांबरोबर मिसळून यायली जाते, त्यामुळेही अल्कोहोल वेगानं शोषलं जातं. भारतामध्ये आधीच फॅटी लिव्हरचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पाश्चिमात्य देशात मॉडरेट म्हणवली जाणारी पातळीही भारतीय पुरुषांच्या यकृताचं नुकसान करण्यासाठी पुरेशी आहे.”

कोणत्या लक्षणांकडं दुर्लक्ष होतं?

बहुतांश पुरुष याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करत असतात. ते हे त्रास अनेकदा ‘जास्त कामामुळे आलेली ताण’ म्हणून मानतात किंवा जवळपास प्रत्येक पोटदुखी किंवा त्रासाला ‘ॲसिडिटी’ किंवा ‘गॅस’ हिच कारणं असल्याचं मानतात.

  • लिव्हरच्या आजारांची दुर्लक्ष केली जाणारी काही सुरुवातीची लक्षणं अशी असतात-
  • सतत थकवा आणि ऊर्जा कमी जाणवणं कामाच्या तणावाला कारणीभूत मानणं
  • पोटाच्या उजव्या बाजूला हलका त्रास किंवा जडपणा
  • पोट फुगणं आणि भूक कमी होणं ‘ॲसिडिटी’ किंवा ‘गॅस’ म्हणून समजणं
  • सकाळी मळमळ, विशेषतः दारू पिणाऱ्यांमध्ये
  • हळूहळू पोटाचा घेर वाढणं हे मध्यम वयात वजन वाढल्याचं समजणं
  • लघवीचा रंग थोडा गडद होणं
  • सहज निळे डाग पडणं

जेव्हा कावीळ दिसू लागते, पोटात पाणी साचून सूज येते रुग्णाला रक्ताची उलटी होते तेव्हा अनेक रुग्ण पहिल्यांदाच हेपॅटॉलॉजिस्ट कडे येतात. पण दुर्दैवाने, तोपर्यंत आजार बराच पुढे गेलेला असतो.

पुरुषांमध्ये वाढतायत लिव्हरचे आजार; दारू‑धूम्रपान किती धोकादायक?

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. राजन गर्ग सांगतात, “यकृत शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवावर परिणाम करत असल्यामुळे, यकृताच्या आजारांची लक्षणे शरीराच्या कोणत्याही भागात दिसू शकतात. यकृताच्या आजाराचे सर्वात स्पष्ट आणि धोकादायक लक्षण म्हणजे कावीळ (जॉन्डिस) आणि पोटाच्या उजव्या वरच्या भागात होणारी वेदना. तेव्हाच बहुतेक रुग्ण यकृत तज्ज्ञांकडे येतात. ही लक्षणे बहुधा नव्याने सुरू झालेल्या (acute) यकृताच्या आजाराची चिन्हे असू शकतात.”

“परंतु अधिक चिंतेची बाब म्हणजे दीर्घकाळ असणाऱ्या म्हणजे क्रॉनिक आजाराच्या लक्षणांची त्यांना जाणिव नसते. जेव्हा यकृताच्या निर्मिती (synthetic) आणि चयापचय (metabolic) कार्यांपैकी मोठा भाग कमी झालेला असतो, तेव्हा ही लक्षणं दिसतात. अशा वेळी पायांमध्ये सूज येणे, पोट फुगणे (अॅब्डॉमिनल डिस्टेन्शन) अशी लक्षणे दिसू शकतात.”

ते पुढं सांगतात, “याशिवाय काही लक्षणे अशीही असतात जी थेट यकृताशी जोडलेली वाटत नाहीत, पण तपासणीदरम्यान यकृताचा आजार आढळून येतो. उदाहरणार्थ थकवा (lethargy), दिवसा जास्त झोप येणे, झोपेचा बिघडलेला पॅटर्न, ताप, संसर्ग, अचानक पोटदुखी, मूत्रमार्गाचा संसर्ग किंवा लघवीचे प्रमाण कमी होणे इत्यादी.”

जीवनशैलीत बदल करुन लिव्हरचे आजार कमी करता येतील?

जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. डॉ. राजन गर्ग सांगतात, खाण्याच्या अयोग्य पद्धती बदलल्या, दारू बंद केली आणि व्यायाम सुरू केला तर लिव्हरच्या आजारांचा वेग कमी करता येतो.

डॉ. गर्ग सांगतात, “सर्वांनी कर्बोदकांचं प्रमाण अतिशय कमी ते मध्यम पातळीवर आणलं पाहिजे. तसेच प्रथिनांचं आहारातलं प्रमाण वाढवलं पाहिजे. तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्ससाठी हिरव्या भाज्या, फळं खाल्ली पाहिजेत. तसेच मल्टिव्हिटॅमिन, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, ओमेगा-3 या पुरक औषधांचा विचार करावा. दरवर्षी आरोग्य तपासणी करावी त्यामुळे आजार असेल तर सुरुवातीच्या टप्प्यात समजेल. दररोज व्यायाम केल्यामुळे शरीरातला मेद कमी करता येतो. असं सारासार विचार करुन नियोजन केलं तर यकृताचं आरोग्य सुधारेल किंवा होऊ घातलेले आजार कमी होतील, एकूणच शारीर-मानसिक आरोग्य चांगलं राहिल.”

दारू‑धूम्रपानाच्या सवयींमुळे पुरुषांमध्ये लिव्हरचे आजार का वाढताहेत?
लिव्हरचे आजार शांतपणे वाढतात... पुरुषांमध्ये धोका जास्त का?
फॅटी लिव्हर ते सिऱ्होसिस: दारू आणि जीवनशैलीचा यकृतावर नेमका कसा परिणाम?

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. आभा नागराल सांगतात, भारतातलं पारंपरिक अन्नसेवन करण्याची पद्धत अतिशय यकृतस्नेही आहे. मात्र शहरी लोक यापासून दूर गेले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यातला फॅटी लिव्हर पूर्णपणे बरा करता येतो. वजनामध्ये सात ते दहा टक्के घट झाल्यास यकृतातील मेद आणि दाह कमी होतो असं दिसून आलं आहे.”

डॉ. आभा यासाठी काही उपाय सुचवतात. त्या सांगतात

  • मैद्याच्या पदार्थांऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी, ब्राऊन राईसला प्राधान्य द्या.
  • पाकिटबंद ज्यूस, कोल्ड्रिंक्स, साखरेचा चहा किंवा शर्करायुक्त पेयं कमी करता येईल,
  • दारू पिणं पूर्णपणे बंद करावं.
  • दररोज 45 मिनिटं चालावं आणि स्ट्रेन्ग्थ ट्रेनिंग व्यायाम करावेत.
  • डायबेटिस आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवावेत.

त्या सांगतात, यकृत हा स्वतः दुरुस्त होऊ शकतील अशा अतिशय कमी अवयवांपैकी एक अवयव आहे. त्यासाठी वेळीच उपाय करावे लागतात.

20-30 या वयोगटातल्या तरुणांनी काय करायचं?

इंटरनेटमुळे दोन दशकांपूर्वी जग बदललं आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि बदलती जीवनशैली ही पुढची मोठी क्रांती ठरत आहे. अन्नाची उपलब्धता गरजेपेक्षा अधिक आहे, आणि जनरेशन Z कडे दशकभरापूर्वी ज्याची स्वप्नंही पाहता येत नव्हती अशा अनेक गोष्टींची सहज उपलब्धता आहे. यामुळे जीवनमानही निश्चितच उंचावलं आहे.

पण या ‘उत्तम जीवनमानाचे’ काही दुष्परिणामही दिसून येतात. अति खाणं, मद्यपान, धूम्रपान आणि अपुरा किंवा चुकीचा व्यायाम हे सगळे आरोग्यासाठी धोक्याचं ठरत आहे.

20-30 या वयोगटातल्या तरुणांनी काय करायचं?

फोटो स्रोत, Getty Images

त्याचवेळी, 20 ते 30 वयोगटातील लोक 40 वयोगटातील लोकांच्या तुलनेत शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत अधिक जागरूक आहेत. ते आरोग्य विमा घेण्याइतकेच नव्हे, तर आजार टाळण्यासाठी (preventive healthcare) पावले उचलण्याइतकेही सजग आहेत.

म्हणजेच, सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रवाह एकाच वेळी सुरू आहेत. त्यामुळे पुढील दशकात यकृताशी संबंधित आजारांचे चित्र कसे बदलते, हे लक्षपूर्वक पाहणे आवश्यक ठरणार आहे.

डॉ. आभा नागराल या वयोगटातल्या यकृताच्या आजारांबद्दल सांगतात, “मुंबईतील माझ्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये मला दिसणाऱ्या सर्वात चिंताजनक ट्रेंडपैकी हा एक आहे. आता आम्ही नियमितपणे उशिरच्या 20 वयोगटातील आणि 30 च्या सुरुवातीच्या पुरुषांमध्ये लक्षणीय फॅटी लिव्हर आणि अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील फायब्रॉसिसही निदान करत आहोत. हे एका पिढीपूर्वी क्वचितच दिसत असे. किशोरवयीनांमध्येही फॅटी लिव्हर ही सर्वात सामान्य म्हणावी अशी यकृताची समस्या बनत आहे.”

उशीर होण्याआधी लक्ष द्या: लिव्हरचे हे शांतपणे वाढणारे आजार
थकवा, पोटदुखी… साधं वाटतंय? लिव्हरचं नुकसान सुरू असू शकतं
दारू आणि धूम्रपान: नकळत लिव्हरला कसं खातायत?

फोटो स्रोत, Getty Images

त्या सांगतात, “IT आणि कॉर्पोरेट कामकाजाची संस्कृती, लांब कामाचे तास, सतत बसून करावी लागणारी नोकरी, उशिरा रात्री जास्त कॅलरी असलेलं अन्न मागवण्याची सवय, ग्राहक मीटिंग्स आणि टीम आउटिंगमध्ये मद्यपान या सगळ्यामुळे शहरांमधील तरुण भारतीय पुरुषांमध्ये कमी वयातच फॅटी लिव्हर होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. उशिरापर्यंत काम केल्यामुळे झोपही विस्कळीत होते आणि त्यामुळे यकृताचे आजार अधिक वेगाने वाढू शकतात.”

डॉ. आभा सांगतात, “भारतात ‘लीन MASH’ (मेटाबोलिक लिव्हर डिसीज) ही देखील एक स्पष्टपणे दिसणारी समस्या आहे. म्हणजे बाहेरून लठ्ठपणा दिसत नसला तरी शरीरात चयापचयाशी संबंधित यकृताचा आजार विकसित होतो. उदाहरणार्थ, 72 किलो वजनाचा एखादा तरुण भारतीय पुरुष पाश्चात्य निकषांनुसार “नॉर्मल” दिसू शकतो, पण त्याच्या यकृतासह महत्त्वाच्या अवयवांमध्ये चरबी साचलेली असू शकते.”

उशीर होण्याआधी लक्ष द्या: लिव्हरचे हे शांतपणे वाढणारे आजार
थकवा, पोटदुखी… साधं वाटतंय? लिव्हरचं नुकसान सुरू असू शकतं
दारू आणि धूम्रपान: नकळत लिव्हरला कसं खातायत?

फोटो स्रोत, Getty Images

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्याची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे. आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC