Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
-
Published
-
वाचन वेळ: 2 मिनिटे
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आता अख्खा महाराष्ट्र व्यापल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं आहे. राज्यात सध्या मान्सून अगदी सक्रीय असल्याचं दिसतंय.
हवामान विभागानं काय म्हटलं आहे आणि कुठल्या जिल्ह्यांमध्ये काय अलर्ट दिले आहेत, पाहूयात.
गेल्या 24 तासांत राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे, विशेषतः कोकण आणि घाट प्रदेशात तुरळक ठिकाणी अतीमुसळधार पाऊस झाला.
मुंबईत तर जून महिन्याच्या सरासरीपेक्षा निम्मा पाऊस एकाच दिवसात झाला आहे. पुढच्या 24 ते 48 तासांतही या प्रदेशात जोरदार पावसाची शक्यता आहे.
तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वीजा आणि गडगडाटासह ताशी 60-80 किलोमीर वेगानं वाहणारा सोसाट्याचा वारा अनुभवायला मिळाला. तुरळक ठिकाणी वाऱ्याच्या झोतांचा वेग ताशी 81 ते 135 किलोमीटर एवढा प्रचंड होता. पुढच्या चोविस तासांतही राज्याच्या अंतर्गत भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारा वाहू शकतो.
मान्सूनच्या आगमनासोबतच राज्यात विदर्भ वगळता बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात चांगली घट झाली आहे.
फोटो स्रोत, Getty Images
हवामान विभागाच्या भारत फोरकास्टिंग मॉडेलचा नकाशा पाहूयात. यात पुढच्या 24 ते 48 तासांत राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. किनाऱ्यालगत जोरदार पावसाची शक्यता आहे, तर अंतर्गत भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो.
विशेषतः सोलापूर, जालना, वाशिम अकोला आणि अमरावती परिसरात आज जोरदार सरी बरसू शकतात. उद्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या घाट प्रदेशात अतीजोरदार पावसाची शक्यता आहे. तर लातूर, बीड, नाशिक, सातारा, पुण्याचा आणि अहिल्यानगरचा काही भाग इथे पावसाची शक्यता आहे.
24 तारखेसाठी हवामान विभागानं पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरीमध्ये इथे जोरदार पावसासाठी तर नाशिक, जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूरमध्ये वादळी पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे. राज्यात इतर सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला आहे आहे.
फोटो स्रोत, Getty Images
25 जूनसाठी पुणे आणि साताऱ्याचा पठारी प्रदेश, तसंच धाराशीव, लातूर, यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड, नांदेड इथे जोरदार सरींसाठी यलो अलर्ट आहे, तर राज्यात इतर बहुतांश भागांत वादळी हवामानासाठी यलो अलर्ट दिला आहे.
अर्थात हा इशारा पुढच्या 24 तासांतील एकूण पावसासाठीचा आहे. यात बदलही होऊ शकतात, त्यामुळे हवामान विभागानं वेळोवेळी जारी केलेल्या इशाऱ्यांकडे नक्की लक्ष द्या. पाऊस आणि हवामानाविषयीच्या ताज्या माहितीसाठी बीबीसी न्यूज मराठीला फॉलो करत राहा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




