Home LATEST NEWS ताजी बातमी पुण्यातील MPSC आंदोलनात आतापर्यंत काय-काय घडलं?- जाणून घ्या सविस्तर

पुण्यातील MPSC आंदोलनात आतापर्यंत काय-काय घडलं?- जाणून घ्या सविस्तर

2
0

Source :- BBC INDIA NEWS

या आंदोलनात सुरुवातीपासूनच विवेकानंद पाटील हा आंदोलक विद्यार्थी चर्चेत आहे.

पुण्यामध्ये सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. कथित औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरण, एमपीएससीच्या कारभारातील त्रुटी आणि एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागण्यासाठी आंदोलक विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

एमपीएससी परीक्षांचे विद्यार्थी विवेकानंद पाटील हे या आंदोलनाचे चेहरा बनले आहेत.

तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे आमदार रोहित पवार हे देखील यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा दिला आहे.

पुण्यातील एस.एम जोशी पुल हे आंदोलनाचं केंद्रबिंदू ठरलं आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षातील नेत्यांनी या आंदोलनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे.

राज ठाकरे, आदित्य ठाकरे, तसेच महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी, सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनी आंदोलनस्थळाला भेट दिली.

पुण्यातील एस.एम जोशी पुल हे आंदोलनाचं केंद्रबिंदू ठरलं आहे.

सत्ताधारी भाजपच्या काही नेत्यांनी हे आंदोलन म्हणजे राजकीय स्टंट असल्याचा आरोप केला आहे.

आंदोलक विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या असूनही हे आंदोलन सुरू असल्याचं भाजपचे काही नेते सातत्याने म्हणत आहेत. यात मंत्री नितेश राणे, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे आघाडीवर आहेत.

परंतु, आंदोलक हे विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत.

या आंदोलनात सुरुवातीपासूनच विवेकानंद पाटील हा आंदोलक विद्यार्थी चर्चेत आहे. मुळचा कोल्हापूरचा असलेला विवेकानंद पाटील हा आंदोलनाविषयी विद्यार्थ्यांच्या वतीने आपली भूमिका मुद्देसूद पद्धतीने मांडताना दिसतोय.

आपल्या भाषणात राजकीय मुद्दे खोडत विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त कशा आहेत, हे तो आपल्या भाषणात आणि प्रसार माध्यमांसमोर सांगतो.

मुख्यमंत्री संवेदनशीलता दाखवतील- विवेकानंद पाटील

विवेकानंद पाटीलने बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, सरकारने आंदोलनाकडे सकारात्मकतेनं पाहावं.

हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे याकडे संवेदनशीलतेने पाहिलं पाहिजे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगात पारदर्शकता आणली पाहिजे.

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची चिता घेऊन जाताना आंदोलक

“आम्ही मुख्यमंत्र्यांचं नाव घेणारच कारण ते राज्याचे प्रमुख आहेत. तेच यावर निर्णय घेतील. विद्यार्थी म्हणून आम्हालाही वाईट वाटतं की, आमच्या राज्याच्या प्रमुखाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यांना माझी विनंती आहे की, ‘साहेब तुम्ही लक्ष घाला आणि आयोगाच्या अध्यक्षांकडून राजीनामा घ्या.’ ते याबाबत संवेदनशीलता दाखवतील, त्यांचा तसा इतिहासही आहे,” असंही तो म्हणाला.

विवेकानंद पाटील सध्या ट्रोलही होत आहे. यावर तो म्हणाला की, मला ट्रोल करतायत तर करू द्या. रस्त्यावर अन्याय होईल आणि ज्यावेळी आवाज उठवायची वेळ येईल, त्या-त्यावेळी मी अन्यायाविरोधात आवाज उठवेन.

आज ट्रोलर्स मला ट्रोल करत आहेत. उद्या त्यांच्यावर जरी अन्याय झाला तरी देखील मी त्यांची बाजू मांडायला मैदानात येईल. हे सांगताना त्याने ज्ञानियाचा-तुकीयाचा आपला अंश आहे आणि तीच माझी विचारधारा असल्याचे म्हटले.

आंदोलक विद्यार्थ्यांशी बोलताना मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार

भीमनवार यांच्या राजीनाम्यावर फडणवीस काय म्हणाले?

आंदोलक विद्यार्थी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी मंगळवारी (6 ऑक्टोबर) आपली भूमिका स्पष्ट केली.

विद्यार्थ्यांच्या स्वप्नाची प्रतिकात्मक चिता जाळताना आंदोलक

एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना पदावरून हटवणं हा अधिकार राज्य सरकारला नाही. संविधानातील अनुच्छेद 317 नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर ज्या काळात फुटला, त्यावेळी भीमनवार हे अध्यक्षपदावर नव्हते, असे फडणवीस यांनी म्हटले. पेपरफुटीनंतर पदावर आलेल्या अध्यक्षांना थेट काढण्याची मागणी करणं कितपत योग्य आहे, असा सवालही यावेळी फडणवीस यांनी उपस्थित केला.

‘या’ नेत्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन दिला पाठिंबा

या आंदोलनात आमदार रोहित पवार हे सुरूवातीपासून सहभागी झाले आहेत. विविध राजकीय पक्षांचे नेत्यांनी आंदोलनस्थळी येऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. यात प्रामुख्याने मविआच्या घटक पक्षातील नेत्यांचा समावेश आहे. परंतु, सत्ताधारी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आंदोलनस्थळी येऊन भाषण केलं होतं.

विविध राजकीय पक्षांचे नेत्यांनी आंदोलनस्थळी येऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड.
  • मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार सतेज पाटील, विधासभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, आमदार अमीन पटेल, विश्वजित कदम.
  • मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके, तुषार गांधी.

या प्रमुख राजकीय नेते आणि सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला.

आंदोलनाविषयी कोण, काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. पण त्याचबरोबर काही मुद्दे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

आंदोलनस्थळी येऊन मोठे स्वप्न दाखवणाऱ्या राजकीय नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका आणि भ्रमात राहू नका, असा इशारा राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना दिला. राजकीय नेते आपल्या फायद्यासाठी तुमची जातींमध्ये विभागणी करतील, पण बेरोजगारीला कोणतीही जात नसते, असंही ते यावेळी म्हणाले.

आयोगाच्या अध्यक्षांना हटवणे राज्य सरकारच्या हातात नाही त्यामुळे घटनात्मक मार्गाने लढा देण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. महाराष्ट्रातील युवकांच्या नोकऱ्यांसाठी कोणाचेही पाय धरायला आपण तयार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटलं. त्याचबरोबर 70 हजार नोकऱ्या लगेचच देणं शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

आपण एमपीएससी परीक्षा रोजगारासाठी, प्रशासनात जाण्यासाठी, राज्य सुजलाम-सुफलाम करण्यासाठी देतोय. पण व्होट चोर, नोट चोर, चंदा चोर, पेपर चोर, भविष्य चोर अशा सर्व चोरांची टोळी आपल्या डोक्यावर बसली असेल तर आपला देश सुधारेल का? आपण आपलं राज्य सुधारु शकणार आहोत का, तुम्हाला जरी 70 हजार नोकऱ्या मिळाल्या तरी तुम्ही तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र बनवू शकाल का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

विवेक भीमनवार यांचा राजीनामा झाला नाही तर आपल्याला मुंबईत येऊन एमपीएसीच्या दारात येऊन बसावं लागेल, असंही त्यांनी म्हटलं.

लोकप्रिय लोकगीत गायिका नेहा राठोड

जर सरकारने वेळ काढूपणा केला, तर संतप्त विद्यार्थी संपूर्ण पुणे शहर बंद पाडू शकतात, असा थेट इशारा रोहित पवारांनी आंदोलनात दिला.

रोहित पवार यांनी संपूर्ण कारभाराच्या शुद्धीकरणाची मागणी केली आहे. पैशांच्या जोरावर स्पर्धा परीक्षांचे पेपर विकले जातात आणि गरीब व प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची होळी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर आम्ही भीमनवार यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले.

‘जोपर्यंत अध्यक्ष राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवा’

कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दिपके यांनी जोपर्यंत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन थांबवू नका आणि जागा सोडू नका, असं आवाहन केलं. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे महाराष्ट्रातील सुमारे 20 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितलं.

फडणवीस यांनी आपल्या मित्राची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती का केली? भीमनवार यांचची पात्रता काय होती? भ्रष्टाचाराचा फायदा करून घेणं हीच त्यांची एकमेव पात्रता होती का?, असा सवाल दीपके यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी आंदोलनकर्त्यांना विद्यार्थ्यांना पुणे बंद पाडण्याचे आवाहनही केले.

“हे आंदोलन करणारे सर्व विद्यार्थी हे ग्रामीण भागातील गरीब शेतकरी आणि कष्टकऱ्यांची मुले आहेत. ही मुलं मोठी स्वप्न घेऊन पुण्यात येतात. परंतु, सातत्याने पेपरफुटी होते. त्यामुळे ते आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने या विद्यार्थ्यांशी थेट आणि सकारात्मक संवाद साधून त्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा,” अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC