Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
पुरुषांपेक्षा महिला जास्त जगण्याची शक्यता असते. अगदी नेमकेपणानं बोलायचं झाल्यास आणि तेही जागतिक सरासरीचा विचार करता, तर एखादी महिला पुरुषापेक्षा जास्त जगण्याचा काळ पाच वर्षांपेक्षा जास्त असू शकतो.
महिला पुरुषांपेक्षा जास्त का जगतात, याचं ठोस असं काही कारण स्पष्ट नसलं, तरी शास्त्रज्ञांनी याबद्दल काही तर्क लावले आहेत. त्यांद्वारे यामागचं कारणांचा अंदाज लागू शकतो.
यातला प्रमुख तर्क म्हणजे, महिला आणि पुरुषांची भिन्न जैविक संरचना. अर्थात, त्यांचं राहणं, खाणं-पिणं, जीवनशैली यासह जोडीदाराच्या निवडीपर्यंत अनेक घटक त्यांच्या आयुष्याच्या काळावर परिणाम करत असतात.
या तर्कांवरुन निसर्गातही काही प्रजातींमध्ये नरापेक्षा माद्या जास्त काळ का जगतात, याचा अंदाज लावता येईल.
पुरुषांच्या अकस्मात मृत्यूमध्ये जीवनशैलीचा मोठा वाटा
युनायटेड किंग्डमच्या ऑक्सफर्ड इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन एजिंगमध्ये सारा हार्पर संचालक प्राध्यापक म्हणून काम करतात. त्या सांगतात, “साधारणतः प्रत्येक देशात पुरुषांच्या तुलनेत महिलाच जास्त काळ जिवंत राहिल्याचं दिसतंय.”
मात्र, हे परिस्थितीनुसार बदलू शकतं असंही त्या सांगतात.
रशिया, युक्रेन आणि व्हीएतनामचं उदाहरण देऊन या परिस्थितीत बदल होऊ शकतो असं त्या म्हणतात.
या देशांत पुरुषांपेक्षा महिला साधारणतः 10 वर्षं जास्त जगतात असं त्या सांगतात. तर नायजेरियासारख्या देशात पुरुष आणि महिला दोघांच्याही आयुष्यमानातील फरक कमी आहे.
‘अवर वर्ल्ड इन डेटा’ या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या एका संशोधनानंतर हे निष्कर्ष समोर आले आहेत.
यामागे सामाजिक आणि व्यावहारिक कारणं आहेत असं संशोधकांना वाटतं.
हार्पर सांगतात, “रशियामध्ये याचं महत्त्वाचं कारण दिसतं ते म्हणजे पुरुष करत असलेलं धूम्रपान आणि मद्यपान.”
त्या सांगतात, “जगभरात पुरुषांच्या या असल्या सवयींमुळे त्यांचं आयुष्य घटतं. पुरुषांची जीवनशैली साधारणतः कमी आरोग्यदायी असते. तसेच ते तब्येत बिघडल्यावर डॉक्टरकडेही फार कमीवेळा जातात.”
हार्पर सांगतात, “लग्न झालेल्या पुरुषांना मात्र इथं एक फायद्याची गोष्ट मिळते. कारण त्यांचा जोडीदार याबाबतीत जास्त गंभीर असतो आणि तेच या पुरुषांना डॉक्टरकडे घेऊन जातात.”
याबरोबर त्या म्हणाल्या, “अनेक समाजामध्ये पुरुष जास्त जोखमीचं काम करताना दिसतं. धोका पत्करण्याला पुरुषत्वाशी जोडल्यामुळेही हे दिसतं.”
त्या सांगतात, रस्ते अपघात, हिंसा, आत्महत्या यामुळे पुरुषांचं मृत्यूप्रमाण जास्त दिसतं.
मात्र, या स्थितीत बदल होताना दिसलाय. प्राध्यापक हार्पर सांगातात, युकेमध्ये 1960 आणि 70 च्या दशकात धूम्रपानाविरोधातील चळवळींमुळे पुरुष मृत्यूप्रमाण पूर्वीपेक्षा कमी नोंदलं गेलं होतं.
इस्ट्रोजेन हार्मोन : महिलांचं कवचकुंडल
हार्पर सांगतात, जागरुकता वाढल्यामुळे पुरुष जास्तकाळ जगू लागले तरी फक्त जीवनशैलीमुळेच हे अंतर मिटणार नाही. कारण महिला आणि पुरुषांमध्ये एक जैविक अंतर कायमचं राहाणार.
यातला एक घटक म्हणजे, इस्ट्रोजेन हार्मोन.
स्पेनच्या व्हेलेंन्सिया विद्यापीठात वयवृद्धीवर संशोधन करणाऱ्या फिजिऑलॉजिस्ट आणि प्राध्यापक कॉन्सुएलो बोर्रास यांनी याबद्दल माहिती दिली.
त्या सांगतात, “इस्ट्रोजेन महिलांच्या रक्षणासंदर्भात अनेक कार्य पार पाडत असतं.”
फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्या मते, या हार्मोनमुळे महिलांच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल मर्यादेत राहातं. तसंच रोगप्रतिकारक्षमतेचं संतुलन, मूत्रमार्गातला संसर्ग थांबवणं, मेंदू आणि हाडांच्या रक्षणातही त्याची मदत होते.
त्या सांगतात, “याचं मुख्य कारण इस्ट्रोजेन अँटिऑक्सिडंटप्रमाणं काम करत. शरीरातल्या फ्री रॅडिकल्सला आळा घालण्याचं ते काम करतं.”
या हार्मोनचा कसा परिणाम दिसून येतो हे सांगताना त्या एक उदाहरण देतात. त्या म्हणतात, “मेनोपॉझ म्हणजे मासिक पाळी थांबल्यावर शरीरातलं इस्ट्रोजेन कमी होतं. त्याचा शरीराच्या कार्यावर परिणाम होत असतो.”
इस्ट्रोजेनचं महत्त्व सांगण्यासाठी ते ऑस्टिओपोरोसिस म्हणजे अस्थिसुषिरतेचं उदाहरण देतात. या आजारात हाडांची घनता कमी होऊन ती पोकळ होतात.
त्या सांगतात, “वय वाढल्यामुळे आणि इस्ट्रोजेन कमी झाल्यामुळेही हा आजार होतो.”
त्या सांगतात, “मेनोपॉझच्या सुरुवातीच्या टप्प्यात महिलांना हार्मोन थेरपी दिली तर त्यांच्या शरीराच्या कार्य करण्याच्या क्षमतेत सुधारणा होते.”
टेस्टोस्टेरॉन : पुरुषांचं आयुष्यमान कमी करणारं संप्रेरक
आता पुरुषांचा विचार केला तर त्यांच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन हे मुख्य संप्रेरक असतं. जास्त जोखिम घेण्याच्या वृत्तीशी ते जोडलं जातं.
यामुळे शरीरात काही हानिकारक गोष्टीही घडत असतील असा संशय कॉन्सुएलो बोर्रास यांना येतो. पण त्याची कारण अद्याप स्पष्ट नाहीत.
फोटो स्रोत, Getty Images
2012 साली एका अभ्यासात कोरियन तृतीयपंथीयांच्या एका आयुष्य आणि पुरुषांच्या एका गटाचं आयुष्य यांची तुलना करण्यात आली.
तृतीयपंथीयांच्या शरीरात सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन तयार होत नव्हतं आणि ते पुरुषांपेक्षा 14ते 19 वर्षं जास्त जगत असल्याचं दिसलं.
अर्थात, या माहितीला मर्यादा आहेत.
काही प्राण्यांमध्येही प्रजननक्षमता नष्ट झाल्यावर नर जास्त काळ जगल्याचं दिसलं आहे. संप्रेरकं ही या कोड्याचा फक्त एक भाग आहेत असं बोर्रास सांगतात.
एकापेक्षा जास्त जोडीदार असणं घातक
महिलांपेक्षा पुरुष कमी का जगतात, हे समजून घेण्यासाठी वैज्ञानिक इतर प्राण्यांवरही संशोधन करत आहेत.
जर्मनीतील संशोधक जोहाना स्टार्क सांगतात, “मादी जास्त जगणारी आपली एकमेव प्रजाती नाही. सिंह, मेंढ्या, व्हेल आणि उंदरांमध्येही असंच दिसतं. पण पक्ष्यांमध्ये उलट परिस्थिती असते. तिथे नर जास्त जगतात. यामागे गुणसूत्रांचा (क्रोमोसोम) एक कारण असू शकतो.”
त्या पुढे सांगतात, “सस्तन प्राण्यांमध्ये मादीकडे दोन X गुणसूत्रं असतात, तर नराकडे एक X आणि एक Y असतो. एखाद्या X मध्ये बिघाड झाला, तरी दुसरं X त्याची भरपाई करू शकतं. मात्र, नराकडे फक्त एकच X गुणसूत्र असल्यामुळे त्यातील बिघाडाचा परिणाम अधिक गंभीर होऊ शकतो.”
त्या सांगतात की, पक्ष्यांमध्ये याउलट असतं नरांकडे दोन Z गुणसूत्रं असतात.
“यातून सस्तन प्राण्यांमध्ये माद्या जास्त आणि पक्ष्यांमध्ये नर जास्त का जगतात, याचा अंदाज लावता येतो.”
पण 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या संशोधनातून या मुद्द्याचा आणखी एक पैलू समोर आला आहे.
त्या सांगतात, “आम्ही पाहिलं की एकच जीवनसाथी असलेल्या (मोनोगॅमस) प्रजातींमध्ये नर-मादी आयुष्यातील फरक फार कमी असतो. पण गोरिला आणि सिंहांसारख्या प्रजातींमध्ये, जिथे नर अनेक जोडीदारांसाठी स्पर्धा करतात, तिथे आयुष्यातील हा फरक अधिक मोठा असतो.”
जोहाना स्टार्क यांच्यानुसार, “प्रजननासाठी नर आपली शक्ती वाढवण्यासाठी मजबूत शरीर किंवा शिंगं यांसारख्या गोष्टी विकसित करतात, ज्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च होते आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य कमी होऊ शकतं. दुसरीकडे, मादींसाठी पिल्लांची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. विशेषतः दीर्घायुषी प्रजातींमध्ये आईचं जास्त काळ जिवंत राहणं फायदेशीर ठरतं.”
तथापि, स्त्रिया जास्त जगतात म्हणजे त्यांचं आयुष्य अधिक सुखकर असतंच असं नाही. महिलांना अशा अनेक आजारांचा सामना करावा लागतो जे प्राणघातक नसले तरी त्रासदायक असतात. उदाहरणार्थ पाठदुखी, नैराश्य आणि डोकेदुखी.
प्रोफेसर हार्पर सांगतात, “महिलांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत असते, पण त्यामुळे दाहाशी संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते. तसेच त्यांच्या स्नायू आणि हाडांची रचना थोडी कमी मजबूत असते.”
त्यांच्या मते, “पुरुषांची जैविक रचना त्यांना मृत्यूच्या दृष्टीने अधिक संवेदनशील बनवते, तर महिलांची रचना त्यांना अपंगत्वाच्या दृष्टीने संवेदनशील बनवते.”
मात्र, तिन्ही तज्ज्ञ हे ठामपणे सांगतात की केवळ जैविक रचना सर्व काही ठरवत नाही.
प्रोफेसर बोर्रास म्हणतात, “जैविक फरकांवर पर्यावरण आणि जीवनशैलीचा मोठा प्रभाव असतो. स्त्री-पुरुष दोघांनीही आहार, व्यायाम, झोप आणि ताण-तणाव याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. फक्त दीर्घायुष्यासाठी नव्हे, तर चांगल्या आयुष्यासाठीही.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC







