Home LATEST NEWS ताजी बातमी फेमोस्फिअर : प्रेमसंबंधांना नकार देत महिला ‘हाय व्हॅल्यू’ पुरुषांकडे का वळत आहेत?

फेमोस्फिअर : प्रेमसंबंधांना नकार देत महिला ‘हाय व्हॅल्यू’ पुरुषांकडे का वळत आहेत?

2
0

Source :- BBC INDIA NEWS

ऑस्ट्रेलियन इन्फ्लुएन्सर कनिका बत्रा या 'फेमोस्फिअर'मधील एक गुरु मानल्या जातात.

फोटो स्रोत, Getty Images

‘पुरुषाने सभ्य, सज्जन असावं आणि त्यानेच स्त्रीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करावा.’

‘स्त्रीने छान दिसावं, तर बिल पुरुषाने भरावं.’

‘नात्यामध्ये पुढाकार पुरुषाने घ्यावा आणि महिलेने सहज होकार देऊ नये, थोडासा भाव खावा.’

‘आधी नातं किंवा ठोस बांधिलकी नसताना शारीरिक संबंध (सेक्स) ठेवू नयेत.’

असे सल्ले अनेक महिलांनी यापूर्वी ऐकले आहेत.

पुढे स्त्री मुक्ती चळवळीमुळे अनेक गोष्टी बदलल्या खऱ्या, पण सल्ले देण्याची पद्धत काही थांबली नाही.

उदाहरणार्थ, एलेन फेन आणि शेरी श्नायडर यांच्या 1995 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द रूल्स ऑफ एंगेजमेंट’ या पुस्तकाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. स्वप्नातील जोडीदार मिळवण्यासाठी या पुस्तकात काही नियम सांगण्यात आले होते.

त्यामध्ये पुरुषांशी स्वतःहून आधी बोलू नका, त्याला फोन करू नका, बिल भरू नका आणि भेटीगाठींच्या सुरुवातीच्या काळात साधं चुंबनही टाळा, अशा सल्ल्यांचा समावेश होता.

पण आता आपण इंटरनेटच्या आणि वाढत्या निराशा आणि अस्वस्थतेच्या काळात जगत आहोत.

आता सर्व काही अधिक टोकाचं आणि थोडं अधिक कटू झालं आहे.

आजीच्या जुन्या सल्ल्यांची इंटरनेटच्या अल्गोरिदम्सशी आणि सामूहिक निराशा किंवा भ्रमनिरास यांची सांगड घातली, तर काय उरतं?

‘फेमोस्फिअर’ म्हणजे इन्फ्लुएन्सर्स, ऑनलाइन फोरम, पॉडकास्ट आणि विविध सल्ल्यांचं एक जग आहे. यात महिलांना प्रेमाकडे नव्या नजरेनं पाहण्याचा सल्ला दिला जातो. प्रेमाबद्दलच्या सर्व रोमँटिक कल्पना बाजूला ठेवून, नात्यांकडे पाहण्याची आणि ती निभावण्याची पद्धत बदलण्यास प्रवृत्त केलं जातं.

इतकच नाही, तर महिलांना ‘पिंक पिल’ म्हणजेच ‘गुलाबी गोळी’ घेण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. हा शब्द ‘द मॅट्रिक्स’ या चित्रपटातील ‘रेड पिल’च्या संदर्भातून आला आहे. चित्रपटात ‘रेड पिल’ म्हणजे लपलेलं वास्तव समोर आणणं, असा त्याचा अर्थ होता.

‘पिंक पिल’च्या बाबतीत हे वास्तव लपलेलं नसून त्यावर पडदा टाकलेला आहे किंवा आवरणाखाली झाकलेलं आहे, असं मानलं जातं.

त्यांच्या मते, स्त्री-पुरुषांमधील नात्यांमध्ये पुरुषांच्या बाजूने झुकलेला असमतोल असतो. त्यामुळे पुरुषांच्या वर्तणुकीतील विशिष्ट पद्धत म्हणजेच पॅटर्न ओळखायला शिकावं, स्वतःच्या अपेक्षा उंच ठेवाव्यात आणि हानीकारक नात्यांपासून दूर राहावं.

या चित्रपटातील ‘पिल’ची कल्पना आधीच ‘मॅनोस्फिअर’ने वापरायला सुरुवात केली होती. ‘मॅनोस्फिअर’ म्हणजे महिलांमुळे आपल्याला धोका आहे, असं मानणाऱ्या पुरुषांचा एक ऑनलाइन समूह. हे पुरुष अनेकदा महिलांविरोधात आक्रमक विचार आणि वक्तव्यं करतात.

त्यांच्या मते, ‘रेड पिल’ म्हणजे अशा पुरुषांच्या जागृतीचं प्रतीक आहे, ज्यांना महिलांकडून केल्या जाणाऱ्या कथित हेराफेरीचा आणि पुरुषांच्या विरोधात काम करणाऱ्या व्यवस्थेचा ‘खरा’ चेहरा दिसला आहे, असं ते मानतात.

फेमोस्फिअरकडून (स्त्री-केंद्रित विचारविश्व) अशा प्रकारे शब्दांचा अर्थ बदलून ते स्वतःच्या बाजूने वापरणं काही नवीन नाही. कारण हा प्रवाह काही अंशी पुरुषांच्या या आक्रमक आणि गोंधळलेल्या ऑनलाइन जगाला दिलेली प्रतिक्रियाच आहे.

त्यामुळे या दोन्ही प्रवाहांकडे पाहिलं, तर त्यांच्यात काही साम्य दिसून येतं; पण त्यांच्यातील फरकही खूप मोठे आहेत.

त्यांच्या मते, प्रेमाच्या भावनेत वाहून न जाता पुरुषांकडे सावधपणे पाहायला हवं, त्यांच्यापासून होणारा धोका लक्षात घ्यायला हवा आणि पूर्ण खात्री पटल्याशिवाय कोणालाही संधी देऊच नये.

फोटो स्रोत, Getty Images

‘फेमोस्फिअर’ हा संज्ञा सर्वात आधी वापरणाऱ्या डॉ. जिली के यांच्या मते, दोघांमधील सर्वात मोठा फरक असा आहे की ‘फेमोस्फिअर’मुळे ‘मॅनोस्फिअर’सारखा “सामाजिक धोका किंवा प्रत्यक्ष जीवनातील हिंसाचाराचा धोका निर्माण होत नाही.”

डॉ. जिली के यांनी बीबीसी मुंडोला सांगितलं की, “फेमोस्फिअरमधील काही समूह ‘मॅनोस्फिअर’मधील काही पद्धती आणि भाषा वापरतात म्हणजेच त्याचं अनुकरण करतात. काही वेळा ते पुरुषांबद्दलही अमानवी पद्धतीने बोलतात, जसं मॅनोस्फिअरमधील काही लोक महिलांबद्दल बोलतात. पण त्यामुळे हे दोन्ही प्रवाह एकसारखे ठरत नाहीत.”

लॉफबरो विद्यापीठातील स्त्रीवादी संस्कृती आणि मीडिया अभ्यासातील तज्ज्ञ सांगतात की, ‘मॅनोस्फिअर’ म्हणजे महिलांविरोधातील पुरुषांच्या हिंसक विचारांचं अधिक टोकाचं रूप आहे. महिलांवरील पुरुषांचा हिंसाचार ही समाजातील गंभीर आणि जुनी समस्या आहे.

“महिलांकडून पुरुषांविरोधात मोठ्या प्रमाणावर हिंसा होण्याइतकी सामाजिक परिस्थिती ‘फेमोस्फिअर’मध्ये अस्तित्वात नाही.”

के यांच्या मते, सोशल मीडियामुळे महिलांना आपले अनुभव एकमेकींसोबत शेअर करता आले. वेगवेगळ्या ठिकाणी राहूनही अनेक महिलांचे अनुभव सारखेच असल्याचे त्यांना जाणवलं.

त्यातून काही महिलांनी असा निष्कर्ष काढला की, “सर्व पुरुष मुळातच वाईट असतात आणि त्यांना बदलणं शक्य नाही.” त्यामुळे महिलांनी एकत्र यावं, आपापल्या योजना आखाव्यात आणि स्वतःच्या फायद्याचा विचार करून स्वार्थीपणाने वागावं.

महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या आणि डिजिटल माध्यमांच्या अभ्यासक ओनिन्येची इझेनोवी यावर भर देतात की, “मॅनोस्फिअरसारखा महिलांचा समांतर गट नाही. महिलांनी इतर महिलांना पुरुषांवर अत्याचार करायला किंवा त्यांच्याविरोधात हिंसक होण्यासाठी शिकवावं, असं सांगणाऱ्या कोणत्याही महिला आमच्यात नाहीत.”

बीबीसी आफ्रिकेशी बोलताना त्या म्हणतात की, “आम्ही महिलांना सक्षम बनण्यास, स्वतःचं रक्षण करण्यास आणि आपल्या हक्कांसाठी व समानतेसाठी कसा लढा द्यायचा हे शिकवत आहोत.”

इझेयानोवी ‘फेमोस्फिअर’च्या अनेक विचारांशी स्वतःला जोडून पाहत नाहीत. पण, हा प्रवाह नेमका कोणत्या दिशेने जात आहे, हे त्यांना समजतं.

बीबीसी मुंडोनेही हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.

धक्कादायक वास्तव

‘पिंक पिल’ घेतल्यावर सर्वात आधी एक गोष्ट जाणवतं की, महिलांनी अनेक वर्षे संघर्ष करूनही, आजही जग पुरुषांच्या बाजूनेच अधिक झुकलेलं आहे.

महिला आणि पुरुषांच्या वेतनातील तसेच पेन्शनमधील फरक अजूनही मोठा आहे. अनेक क्षेत्रांमध्ये महिलांना आजही उच्च पदांपर्यंत पोहोचता आलेलं नाही. घरगुती हिंसाचीर, बलात्कार, छळ आणि अत्याचाराच्या प्रकरणांमध्येही न्यायव्यवस्था योग्य प्रतिसाद देण्यात अपयशी ठरत आहेत.

फेमोस्फिअरच्या (महिला विश्व) मते, याशिवाय आधीच्या काळातील स्त्रीवादी चळवळींनी महिलांना पुरुषांसारखं वागण्यास प्रोत्साहन दिलं. त्याचा फायदा शेवटी पुरुषांनाच झाला, असं या प्रवाहातील लोक मानतात.

उदाहरणार्थ, त्यांचं म्हणणं आहे की महिलांना सहज आणि बांधिलकी नसलेलं लैंगिक नातं (कॅज्युअल सेक्स) हवं असतं, असा समज असतो. तसेच, महिला नोकरी करत असल्या तरी घरातील कामं आणि कुटुंबाची भावनिक जबाबदारी आजही प्रामुख्याने त्यांच्यावरच असते. त्यामुळे महिला सक्षम होण्याऐवजी थकून जातात.

यात पारंपरिक स्त्रीवादाचे विचार दिसत असतील, तर ते बरोबर आहे. खरंतर, ‘फेमोस्फिअर’मधील अनेक महिला स्वतःला स्त्रीवादी मानतात. पण, सध्याच्या परिस्थितीला सामोरं जाण्याची त्यांची पद्धत आणि त्यासाठीच्या रणनीती, कार्यपद्धती वेगवेगळ्या आहेत.

के सांगतात की, “फेमोस्फिअरमधील महिला समानतेचे विचार नाकारतात. कारण त्यांच्या मते समानतेमुळे त्यांना अपेक्षित फायदा झालेला नाही. त्यामुळे वास्तववादी राहणं हीच त्यांच्या विचारांची मुख्य भूमिका आहे. या कठोर वास्तवाची जाणीव महिलांना करून देणं, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे.”

जर लैंगिक समानता मिळणं हे केवळ एक अशक्य स्वप्न असेल, “तर पारंपरिक विचार स्वीकारण्याशिवाय तुमच्यासमोर पर्याय नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच, समाजात पुरुष आणि महिलांच्या भूमिका वेगळ्या आणि ठरावीक आहेत, हे मान्य करावं लागेल.”

जिली के या तरुण महिलांमध्ये होत असलेल्या बदलाचा अभ्यास करत आहेत. सध्याच्या परिस्थितीला महिलांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नवीन ऑनलाइन व्यासपीठ आणि समुदाय तयार झाले आहेत.

फोटो स्रोत, Cortesía de Jilly Kay

मॅनोस्फिअरप्रमाणेच, फेमोस्फिअरमध्येही पुरुष आणि महिलांमध्ये शारीरिक आणि मानसिक फरक आहेत, असं मानलं जातं. परंतु, या दोन्ही प्रवाहांचा निष्कर्ष वेगळा आहे. मॅनोस्फिअरमध्ये या फरकांचा आधार घेऊन महिलांना कमी दर्जाचं मानलं जातं, तर फेमोस्फिअरमध्ये पुरुष हीच एक समस्या असल्याचं मानलं जातं.

पण, पूर्वीप्रमाणेच राजकीय पातळीवर ही व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, फेमोस्फिअर महिलांना स्वतःच्या पातळीवर या व्यवस्थेचा फायदा कसा करून घ्यायचा, हे कौशल्य शिकवते.

यामागचा उद्देश असा आहे की, प्रत्येक महिलेनं स्वतःची काळजी घेतली आणि चुकीच्या नात्यांपासून दूर राहिलं, तर परिस्थिती नक्कीच बदलू शकते. कारण महिलांना त्रास देणाऱ्या किंवा ‘कमी दर्जाच्या’ पुरुषांना सहजपणे त्यांचा गैरफायदा घेता येणार नाही.

इथे आपल्याला या जगात वापरल्या जाणाऱ्या अशा अनेक शब्दांपैकी एका शब्दाची ओळख होते. हे जग प्रामुख्याने सोशल मीडियावर आहे, पण त्याचे विचार पुस्तकांच्या माध्यमातूनही मांडले जातात.

शब्दांमागचे नवीन अर्थ

फेमोस्फिअर हे एकसारखं विचार करणारं जग नाही, हे एक वैविध्यपूर्ण क्षेत्र आहे हे लक्षात घ्यायला हवं. वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करणारे किंवा ‘फिमेल डेटिंग स्ट्रॅटेजी’सारखे पॉडकास्ट ऐकणारे सर्वचजण एकाच विचारांचे किंवा एकाच पद्धतीने वागणारे नसतात.

परंतु, या जगात नेमकं काय चालतं हे समजून घेण्यासाठी, तिथे वापरले जाणारे काही विशिष्ट शब्द आणि वर्गीकरण समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. या समुदायांमध्ये या शब्दांचा अर्थ इतका सर्वमान्य आहे की, त्यासाठी वेगळं स्पष्टीकरण देण्याची गरजच भासत नाही.

फेमोस्फिअरमध्ये महिलांना स्वतःला अधिक चांगलं घडवण्याचा किंवा होण्याचा सल्ला दिला जातो. त्यासाठी जिममध्ये जाणं, शिक्षण घेणे, नीटनेटके कपडे घालणे आणि जुन्या मानसिक त्रासातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे, असं सांगितलं जातं.

याशिवाय, महिलांनी स्वतःला केंद्रस्थानी ठेवावं, असा सल्लाही दिला जातो. म्हणजे प्रेम किंवा पुरुषांना आयुष्याचा केंद्रबिंदू न बनवता, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यावर आणि मनःशांतीवर लक्ष द्यावं.

यामागचं महत्त्वाचं उद्दिष्ट हे ‘हाय व्हॅल्यू वुमन’ म्हणजेच ‘उच्च मूल्य असलेली महिला’ बनणं आहे. यासाठी स्वतःचा विकास हा इतरांसाठी केलेला त्याग न मानता, स्वतःची एक ताकद आणि गुंतवणूक मानावी. त्याचबरोबर नात्यात पुरुषानेही त्याच प्रमाणात प्रयत्न आणि गुंतवणूक करावी, अशी अपेक्षा ठेवावी.

पण इतकं सर्व करूनही जर एखादी महिला प्रेमाच्या नावाखाली तुटपुंज्या गोष्टींवर समाधान मानत राहिली किंवा प्रेमासाठी विनवण्या, याचना करत राहिली, तर फेमोस्फिअर तिला ‘पिक-मी’ किंवा भोळी-भाबडी महिला मानते.

या विचारसरणीनुसार, जर एखादा पुरुष अपेक्षेप्रमाणे नसेल तर त्याला लगेच नकार द्यावा. प्रेमाकडे अतिशय व्यावहारिक नजरेने पाहिलं जात असल्याने, अशा ठिकाणी दुसरी संधी देण्याला फारसा वाव नसतो.

फोटो स्रोत, Getty Images

फेमोस्फिअरच्या मते, ‘हाय व्हॅल्यू वुमन’ म्हणजे अशी महिला जी स्वतःचं सौंदर्य, सामाजिक स्थान आणि मानसिक क्षमता यांचा विचार करून स्वतःचं मूल्य ओळखते. त्यामुळे डेटिंगच्या जगात ती स्वतःचा गैरफायदा किंवा शोषण होऊ देत नाही.

असे ‘एमएव्ही’ना ‘हाय व्हॅल्यू मॅन’ म्हणजेच उच्च मूल्य असलेला पुरुष हवा असतो.

त्यांच्या मते, तो आदर्श पुरुष असा असावा; तो कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घेणारा, आर्थिकदृष्ट्या स्थिर, भावनिकदृष्ट्या समजूतदार, आदर करणारा, विश्वासू, संरक्षण देणारा आणि उदार वृत्तीचा असावा.

याउलट, ‘कमी मूल्य असलेला पुरुष'(एलव्हीएम) म्हणजे कंजूष किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेला पुरुष. त्याच्यात भावनिक स्थैर्य किंवा महिलेला आधार देण्याची वृत्ती नसते. तो स्वतःची प्रगती करण्याचा प्रयत्न करत नाही आणि स्वतः काहीही न देता स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याची अपेक्षा ठेवतो.

या सर्व व्याख्यांमध्ये आणखी काही अनेक गोष्टी आणि शब्द आहेत. परंतु, शेवटी या विचारसरणीचा साधा नियम असा आहे- नात्यात पुरुषाने महिलेला फायदा करून द्यावा, अडचणी वाढवू नयेत.

थोडंसं विरोधाभासी वाटत असलं तरी, महिलांना सक्षम बनण्याचा सल्ला देणाऱ्या या अनेक ऑनलाइन समुदायांमध्ये सर्वाधिक चर्चा जोडीदार कसा मिळवायचा, याच रणनीतींवर होते.

पण हे करताना फक्त काळजी घ्यावी.

पाळायचे काही नियम

फेमोस्फिअरमधील काही विचारांवर अनेकवेळा प्रश्न उपस्थित केले जातात. उदाहरणार्थ, “सर्व पुरुष सारखेच असतात” हा त्यातील एक विचार आहे.

यावर त्यांचं उत्तर असं आहे: “सर्व पुरुष सारखे नसतात, हे आम्हालाही माहीत आहे. परंतु समजा, मी तुम्हाला मिठाईची एक पिशवी दिली आणि सांगितलं की त्यातील 10 टक्के मिठाई विषारी आहे. तर ती खाण्याआधी तुम्ही प्रत्येक मिठाई काळजीपूर्वक तपासणार नाही का?”

फेमोस्फिअरमध्ये महिलांना अगदी याच पद्धतीने पुरुषांकडे अत्यंत सावधपणे आणि दयामाया न दाखवता पाहण्याचा सल्ला दिला जातो.

उदाहरणार्थ, काही नियमांमध्ये तडजोड करू नये, असं सांगितलं जातं. एमएव्हीमध्ये कोणालाही दुसरी संधी मिळत नाही, असं मानलं जातं.

एखाद्या पुरुषाने पहिल्या भेटीसाठी (फर्स्ट डेट) साधं आणि कमी खर्चाचं ठिकाण, जसं फिरायला जाणं किंवा कॉफी प्यायला जाणं सुचवलं, किंवा खर्च अर्धा-अर्धा करण्याचं सांगितलं, तर त्याला लगेच नकार द्यावा, असं फेमोस्फिअरमध्ये मानलं जातं.

पुरुषानेच खर्च का करावा?

यामागे अनेक कारणं दिली जातात. पुरुषांची कमाई साधारणपणे जास्त असते, असं मानलं जातं. शिवाय, त्या भेटीसाठी महिलेनं मेकअप, हेअर रिमूव्हल, कपडे आणि हेअरस्टायलिंगवर केलेला खर्चही यामध्ये धरला जातो.

हे सगळं खूप हिशोबी वाटतंय? त्यांचं उत्तर आहे- हो, मग काय झालं? त्यांचा हाच विचार आहे. त्यांच्या मते, महिलांनी यापुढे प्रेम आणि भावनांवर विसंबून राहून नात्यांमध्ये उतरू नये.

भावनिक अलिप्तता आणि स्वतःच्या भावनांवर नियंत्रण हे त्यांचं एक महत्त्वाचं कवच किंवा ढाल आहे. इतरांनी आपल्याला मान्यता द्यावी किंवा एकटं राहण्याची भीती वाटावी, या भावनेतून त्यांनी निर्णय घेऊ नयेत.

पुरुषाने प्रयत्न कमी केले किंवा त्याचं वागणं संशयास्पद वाटलं, तर ‘हाय-व्हॅल्यू वुमन’ कोणताही गोंधळ न करता, स्पष्टीकरण न देता आणि भावूक न होता त्या नात्यातून बाहेर पडते. तिच्यासाठी स्वतःचा वेळ आणि लक्ष हे खूप मौल्यवान असतं.

प्रेमात पडायचं तर नाहीच आणि कोणाच्या बोलण्यालाही भुलायचं नाही.

हे जरी व्यवहारावर आधारित कठोर आणि स्वार्थी खेळासारखं वाटत असलं, तरी या नियमांमुळे महिलांना भावनिक धक्का बसण्यापासून काही प्रमाणात संरक्षण मिळू शकतं. त्याचबरोबर, ज्या पुरुषासोबत त्या नातं जोडू पाहत आहेत, तो स्वार्थी, फसवणूक करणारा किंवा त्रास देणारा नाही ना, हे तपासण्यासही मोठी मदत होऊ शकते.

डेटिंगच्या बाबतीत थोडं अंतर ठेवून म्हणजे अलिप्त आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावा. खोट्या आश्वासनांना बळी पडता कामा नये.

फोटो स्रोत, Getty Images

उदाहरणार्थ, स्वार्थी, आत्ममग्न किंवा त्रास देणारे पुरुष ‘लव्ह बॉम्बिंग’ करतात. म्हणजे नात्याच्या पहिल्याच आठवड्यात ते महिलेला ‘तूच माझ्या आयुष्यातील खरं प्रेम आहेस’ असं सांगतात. सतत कविता, प्रेमळ मेसेज, खूप लक्ष आणि खोटी आश्वासनं देऊन ते तिच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असतात.

अनेक महिला कंटेंट क्रिएटर्स याबाबत सावध करतात. त्या त्यांच्या फॉलोअर्सना भावनिकदृष्ट्या थोडं अंतर ठेवण्याच्या सूचना, सल्ला देतात. पुरुष काय बोलतो यापेक्षा तो प्रत्यक्षात काय करतो आणि त्याचं वागणं कसं आहे, हे पाहिलं तर फसवणूक किंवा भावनिक दबावापासून वाचता येऊ शकतं.

पुरुषाने दिलेली आश्वासनं तो दीर्घकाळ आदरपूर्वक आणि जबाबदारीने वागून पाळत नसेल, तर महिलेला त्याच्याशी जास्त भावनिक किंवा मानसिकरित्या गुंतण्याआधीच त्याच्यापासून दूर व्हावं, असं या विचारसरणीत सांगितलं जातं.

या महिलांनी पहिल्या डेटसाठी सांगितलेले काही नियम पाहिले, तर ते पोलीस आणि पीडितांना मदत करणाऱ्या संस्थांनी दिलेल्या लैंगिक अत्याचारापासून बचावाच्या सूचनांसारखेच आहेत.

सुरुवातीच्या काही महिन्यांत पुरुषाच्या घरी जाऊ नये आणि त्यालाही आपल्या घरी बोलवू नये. तसेच, पुरुषाने त्यांना गाडीने घ्यायला येऊ नये. महिलांनी स्वतःच्या वाहनाने किंवा इतर मार्गाने गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी भेटायला जावं, असं सांगितलं जातं.

हे नियम ‘भाव खाण्यासाठी’ असले तरी त्याचा फायदा होतो. महिलेला स्वतःच्या येण्या-जाण्यावर नियंत्रण राहते. त्यामुळे एखाद्या खासगी ठिकाणी अडकण्याचा आणि लैंगिक किंवा शारीरिक अत्याचार होण्याचा धोका कमी होतो.

निराशा आणि हताशा

एकाच वेळी दोन वेगवेगळ्या गोष्टी असणं, हे फेमोस्फिअरचे एक वैशिष्ट्य असल्याचे दिसते.

प्रेमाबद्दल त्यांची भाषा खूप कठोर वाटते, परंतु कधी कधी त्यांचं एखादं म्हणणं आपल्याला पटतं. ते पुरुषांकडे एखाद्या वस्तूसारखं पाहतात. त्याच वेळी, महिलांनाही महत्त्व आणि आदर मिळावा, अशी त्यांची अपेक्षा असते.

ते कदाचित तुम्हाला दूर करतील, पण त्यांच्या काही गोष्टी ऐकून खळखळून हसूही येऊ शकतं.

के यांच्या मते, फेमोस्फिअर एका वास्तविक गोष्टीला प्रतिसाद देते. महिलांसाठी पुरुषांसोबत डेटिंग करणं खरंच कठीण आहे. यामागे महिलांचा अपमान करणारी पॉर्नोग्राफी, लोकांचं वाईट वर्तन वाढवणारे डेटिंग अ‍ॅप्स आणि लैंगिक अत्याचाराचा सततचा असलेला धोका ही कारणं आहेत.

परंतु समस्या अशी आहे की, या विचारसरणीने या समस्येवर जो उपाय सांगितला आहे, तो चुकीचा ठरू शकतो. त्यांच्या मते, काही पुरुषांमध्ये बलात्कार आणि लैंगिक हिंसेची प्रवृत्ती जन्मजात असते. त्यामुळे अशा ‘कमी मूल्य किंवा दर्जाच्या’ पुरुषांपासून दूर राहणं हाच उपाय असल्याचं ते मानतात.

समाज बदलू शकतो किंवा पुरुषांचं वर्तन बदलू शकतं, या विचाराला इथे फारसा वाव नाही. त्यामुळे लैंगिक हिंसा ही बदलता न येणारी म्हणजे अपरिहार्य आणि कायमची गोष्ट असल्यासारखी मांडली जाते.

के यांच्या मते, “फेमोस्फिअरमध्ये काही स्त्रीवादी विचार आहेत, जे चुकीचे वाटत नाहीत. परंतु या समस्यांवर ते जे उपाय सांगतात, ते मात्र जुन्या आणि प्रतिगामी विचारांचे आहेत.”

“मला वाटतं, फेमोस्फिअरसाठी ‘गोंधळात टाकणारे’ हा शब्द योग्य आहे.”

के यांना या गोष्टीची खंत आहे की, ‘फेमोस्फिअरचा विचार वास्तववादी वाटतो, पण शेवटी तो निराशावादी आहे. म्हणजे समाज बदलण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी राजकारण आणि बदलाची आशाच सोडून द्यावी, असा यामागचा अर्थ होतो.’

आणि तरुण मुलींना स्त्रीवाद म्हणजे हाच विचार आहे, असं वाटू लागेल, याची के यांना चिंता वाटते.

पण, के सांगतात की, काही समुदाय पुरुष आणि महिला कायम एकमेकांविरोधातच असतील किंवा त्यांच्यात संघर्ष होत राहील असं मानत नाहीत. त्यांच्या मते, परिस्थिती बदलू शकते.

पण त्या असा निष्कर्ष काढतात की, ‘सध्या सोशल मीडिया किंवा डिजिटल माध्यमांमध्ये अशा जुन्या आणि टोकाच्या विचारांना बळ मिळत असल्याचं दिसून येतं.’

आणि इथेच फेमोस्फिअरची गोष्ट येते. यात स्वतःला कशापद्धतीने जपायचं, नात्यांमध्ये कसं सावध राहायचं, याबद्दल सांगितलं जातं. मन दुखावलं जाऊ नये, यासाठी भावनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, शेवटी त्यांचीही इच्छा तीच असते, आपल्याला योग्य वाटणारा चांगला जोडीदार मिळावा.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC