Home LATEST NEWS ताजी बातमी फ्लाइट 901 : आकाशात विमानाचे तुकडे झाले, पण अपघाताचं खरं कारण आजही...

फ्लाइट 901 : आकाशात विमानाचे तुकडे झाले, पण अपघाताचं खरं कारण आजही गूढ

4
0

Source :- BBC INDIA NEWS

अलास चिरिकानासच्या फ्लाइट 901 विमानाचा कोलोन विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच आकाशात स्फोट झाला होता.

फोटो स्रोत, Cortesía Ministerio Público de Panama

होसे अँटोनियो गोन्झालेसला वाटलं होतं की, 19 जुलै 1994 च्या सायंकाळी फ्लाइट 901 मधून त्यांचा विमान प्रवास सुरू होतोय आणि यापुढेही असे अनेक विमानप्रवास करता येतील.

त्याची आई मार्ता मार्केझ सांगतात, “त्या वर्षी मे महिन्यातच तो 19 वर्षांचा झाला होता. काही दिवसांपूर्वीच त्याने अमेरिकेत पायलटचं प्रशिक्षणही पूर्ण केलं होतं. त्याला आपल्या वडिलांसारखं पायलट व्हायचं होतं. त्याने फ्लाइट सुपरवायझरचं प्रशिक्षणही सुरू केलं होतं. यामुळे तो खूप उत्साही होता.”

दुसरीकडे, 35 वर्षीय व्यावसायिक साउल श्वार्ट्झ यांच्यासाठी हा नेहमीसारखाच एक सामान्य विमानप्रवास होता. ते पनामातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहरात, कोलोनच्या फ्री झोनमध्ये व्यवसाय करत असत.

हा छोटा विमानप्रवास त्यांना कोलोनहून पनामा सिटीमधील त्यांच्या घरी घेऊन जाणारा होता. विमानातील 18 प्रवाशांपैकी बहुतांश जणही या मार्गावरून नियमित प्रवास करत असत.

उड्डाणानंतर 10 मिनिटांतच विमानाचा आकाशात स्फोट

कोलोन हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं मुक्त व्यापार क्षेत्र (फ्री ट्रेड झोन) आहे. लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांना वस्तूंचा पुरवठा करण्याचं हे एक मोठं केंद्र आहे.

परंतु, फ्रान्स फील्ड विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांतच विमानाचा हवेतच स्फोट झाला. विमानाचे तुकडे सांता रीटा पर्वताच्या उतारावर विखुरले गेले. या दुर्घटनेत एकही व्यक्ती वाचू शकली नाही.

या घटनेला आता तीन दशकांहून अधिक काळ झाला आहे. इतक्या वर्षांपासून या दुर्घटनेचं गूढ कायम होतं आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली नव्हती. परंतु, आता या घटनेमागचं खरं कारण समोर येण्याची शक्यता वाढली आहे.

अलीकडेच व्हेनेझुएलाने या प्रकरणातील एका आरोपीला पनामाच्या ताब्यात दिलं आहे. इस्रायलच्या मते, या व्यक्तीचे हिज्बुल्लाहशी संबंध आहेत.

पनामाचा सरकारी वकील विभाग आता या घटनेमागे दहशतवाद्यांचा हात होता का, या शक्यतेचा तपास करत आहेत.

जर हे सिद्ध झालं, तर पनामाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आणि सर्वाधिक जीवितहानी झालेला दहशतवादी हल्ला ठरेल.

या प्रकरणातील सरकारी वकील गेओमारा ग्वेरा यांनी बीबीसी मुंडोला सांगितलं, “आम्हाला काही नवीन पुरावे मिळाले आहेत. सत्य समोर आणण्यासाठी हे पुरावे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आम्ही योग्य दिशेने पुढे जात आहोत.”

सुरुवातीच्या तपासात ठोस पुरावा नाही

त्या दुर्दैवी दिवशी आपल्या नातेवाईकाचा शोध घेण्यासाठी सांता रिटा पर्वतावर सर्वात आधी पोहोचणाऱ्यांमध्ये अब्नेर बेनाइम हे देखील होते. ते पनामातील चित्रपट निर्माते आणि साउल श्वार्ट्झ यांचे भाचे आहेत.

त्यांनी बीबीसी मुंडोला सांगितलं, “त्यावेळी पाऊस पडत होता आणि सर्वत्र चिखल होता. मी बरंच अंतर चालत गेलो होतो. नेमकं किती चाललो, हे आजही मला माहीत नाही. काही जण सांगतात की, आम्ही एक नदीही पार केली होती. शेवटी आम्ही त्या शेतात पोहोचलो, जिथे विमान कोसळलं होतं.”

पोलीस आधीच घटनास्थळी पोहोचले होते. एका पोलिस अधिकाऱ्याने अब्नेर यांना आत जाण्यापासून रोखलं.

अब्नेर तो प्रसंग आठवून सांगतात, “मी त्यांना म्हटलं की, मी विमानातील एका प्रवाशाचा नातेवाईक आहे आणि मला मदत करायची आहे. त्यावर तो म्हणाला, ‘नाही, नाही… सर्वांचा मृत्यू झाला आहे.'”

याच घटनेनंतर अब्नेर यांच्या मनात या विषयावर डॉक्युमेंटरी म्हणजेच माहितीपट बनवण्याचा विचार आला. अनेक वर्षांनी त्यांनी ही डॉक्युमेंटरी पूर्ण केली.

ही घटना अब्नेर यांच्यासाठी अत्यंत वैयक्तिक आहे. त्याचबरोबर, या घटनेबाबत आजपर्यंत अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचाही हा एक प्रयत्न आहे.

याच वर्षी प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘ट्रॉपिकल पॅराडाइज’ या डॉक्युमेंटरीतील एका दृश्यात अब्नेर त्यांच्या मानसोपचारतज्ज्ञाला म्हणतात, “1994 मध्ये माझ्या मामांसोबत अचानक काय घडलं, हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा प्रश्न बनला. त्या विमानाचा जणू माझ्याच अंगावर स्फोट झाला आहे, असं मला वाटलं.”

खरंतर त्या दिवशी नेमकं काय घडलं? यामागे कोण होतं? त्यांना कुणी मदत केली? कोणाला लक्ष्य करण्यात आलं होतं? आणि ही घटना पनामामध्येच का घडली?

या स्फोटात एकही व्यक्ती जिवंत राहिला नव्हता.

फोटो स्रोत, Cortesía Ministerio Público de Panama

काळ जसजसा पुढे गेला, तसतशी काही प्रश्नांची उत्तरं मिळत गेली. परंतु, अनेक प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत. या घटनेचं गूढ आजही पावसाळ्यात कॅरिबियन किनाऱ्यावरील डोंगरांवर पसरलेल्या धुक्यासारखंच कायम आहे.

या दुर्घटनेनंतर काही वेळातच समोर आलं की, मृत्यू झालेल्या 21 (क्रू सदस्यांसह) जणांपैकी 12 जण पनामातील ज्यू समुदायातील होते. या 12 जणांमध्ये साउल श्वार्ट्झ यांचाही समावेश होता.

मृतांमध्ये 3 अमेरिकन नागरिकांचाही सहभाग होता.

काही दिवसांनी एका मृतदेहाव्यतिरिक्त उर्वरित सर्व मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

त्या मृतदेहावर गंभीर जखमांच्या खुणा होत्या. इतर पुराव्यांची तपासणी केल्यानंतर फॉरेन्सिक तपास करणाऱ्यांना वाटलं की, हा मृतदेह कदाचित विमानात स्फोटक घेऊन आलेल्या व्यक्तीचा असावा.

याच स्फोटकांमुळे विमानाचा आकाशात स्फोट झाला असावा, असं मानलं जातं.

नंतर या व्यक्तीची ओळख ‘लिया जमाल’ किंवा ‘अली हवा जमाल’ अशी करण्यात आली. तो सहाव्या क्रमांकाच्या सीटवर बसला होता. त्याने एका वायरलेस उपकरणात लपवलेल्या बॉम्बचा स्फोट घडवून आणल्याचं सांगितलं जातं.

ही घटना अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्समधील ज्यू मदत केंद्र ‘आमिया’ येथे झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर अवघ्या 24 तासांनी घडली होती.

आमिया केंद्रावर झालेल्या कार बॉम्बस्फोटात 85 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याशी संबंधित प्रकरणाचा अद्याप अंतिम निष्कर्ष मिळालेला नाही.

या दोन्ही घटना अत्यंत कमी अंतराने घडल्या होत्या. त्यामुळे फ्लाइट 901 चा तपास अधिकच कठीण झाला.

या प्रकरणात दोन शक्यता समोर

पहिली शक्यता अशी होती की, हा हल्ला ज्यू समुदायाला लक्ष्य करून करण्यात आला असावा. हा हल्ला हुती बंडखोरांनी केला असण्याची शक्यता आहे. हुती ही येमेनमधील शिया ‘अन्सार अल्लाह’ ही चळवळ असून, तिचे हिजबुल्लाहशी संबंध असल्याचे मानले जाते.

दुसरी शक्यता अशी होती की, एखाद्या व्यक्तीचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला असावा. या व्यक्तीचे कोलंबियातील ड्रग कार्टेलशी संबंध असल्याचा संशय होता.

पनामातील तपासाची दिशा अनेकदा बदलली. अखेर ठोस निष्कर्ष किंवा मोठं यश न मिळताच हे प्रकरण बंद करण्यात आलं.

बीबीसी मुंडोने त्यावेळी या प्रकरणाचे सरकारी वकील असलेल्या हुआन अँटोनियो तेहादा यांना मुलाखतीसाठी विनंती केली. पण, त्यांनी या प्रकरणाबाबत सध्याच्या सरकारी वकिलांशी बोलण्यास सांगितलं.

दरम्यान, अर्जेंटिनाच्या न्याय यंत्रणेनेही या प्रकरणाचा स्वतंत्र तपास केला. या तपासाचे निष्कर्ष एका गोपनीय फाईलमध्ये नोंदवलेले आहेत.

अनेक वर्षांनंतर इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणा आणि अमेरिकेच्या एफबीआयने या प्रकरणाबाबत काही माहिती दिली.

यानंतर 2018 मध्ये पनामा सरकारने हे प्रकरण पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.

प्रकरणाचा पुन्हा तपास सुरू

हे प्रकरण पनामाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हुआन कार्लोस वरेला यांच्यासाठीही वैयक्तिक स्वरूपाचं होतं.

त्यांनी बीबीसी मुंडोला सांगितलं, “माझे कॉलेजमधील मित्र माउरिसियो हॅरोश हेही त्याच विमानात होते. आम्ही अटलांटामधील जॉर्जिया टेकमध्ये 4 वर्षे एकत्र शिकलो. आमच्या खोल्या एकमेकांच्या जवळ होत्या. शेवटच्या वर्षी तर ते माझ्यासोबतच राहत होते.”

वरेला सांगतात की, दोन्ही कुटुंबं पनामाला परतल्यानंतर त्यांची मैत्री आणखी दृढ झाली होती.

2009 मध्ये वरेला उपराष्ट्राध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची माहिती घेण्यास सुरुवात केली. ते बोगोटामधील इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या एजंट्सच्या संपर्कातही होते.

नंतर त्यांना एफबीआयच्या एका एजंटकडून या प्रकरणाबाबत आणखी माहिती मिळाली. त्या एजंटने या घटनेचा तपास केला होता. राष्ट्राध्यक्ष असताना वरेला यांची त्या एजंटशी भेट झाली होती.

इस्रायलच्या सरकारी दौऱ्यावर असताना वरेला यांना बेंजामिन नेतन्याहू यांचं एक पत्रही मिळालं. हे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरू करण्याची मागणी केली.

नेतन्याहू यांनी पत्रात लिहिलं होतं की, इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांकडे असे पुरावे आहेत, ज्यावरून विमानातील स्फोट हा ‘स्पष्टपणे एक दहशतवादी हल्ला’ होता.

यानंतर मे 2018 मध्ये हुआन कार्लोस वरेला यांनी पत्रकार परिषद घेतली.

ते म्हणाले, “आम्ही पनामा सरकारच्या अधिकाऱ्यांची आणि आंतरराष्ट्रीय संस्थांची भेट घेणार आहोत. अलास चिरिकानास प्रकरणाचा अधिकृतपणे पुन्हा तपास सुरू करण्याची मागणी करणार आहोत. या हल्ल्यामागे कोण होतं, हे समोर यावं आणि दोषींवर कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा आहे.”

पनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष बीबीसी मुंडोला म्हणाले, “माझ्या मित्राला न्याय मिळवून देणं हेच माझं ध्येय बनलं होतं.”

वरेला यांनाही ओडेब्रेक्ट प्रकरणात चौकशीसाठी न्यायालयात बोलावण्यात आलं होतं. हे लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठ्या आणि वादग्रस्त भ्रष्टाचाराच्या प्रकरणांपैकी एक आहे.

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण ब्राझीलमधील एका बांधकाम कंपनीशी संबंधित होतं. या प्रकरणात सुमारे 10 देशांतील अनेक नेते, सरकारी अधिकारी आणि व्यावसायिकांची नावं समोर आली होती. हे प्रकरण 2005 ते 2014 या काळातील होतं.

हुआन कार्लोस वरेला यांनी त्यावेळी ओडेब्रेक्ट किंवा इतर कोणत्याही सरकारी कंत्राटदाराकडून ‘बेकायदेशीर पद्धतीने पैसे घेतल्याचा’ आरोप फेटाळला होता.

ते म्हणाले होते की, या खटल्यात ‘जो काही निर्णय होईल, त्याला सामोरं जाण्यास ते तयार’ आहेत.

मध्य अमेरिकन संसदेचे सदस्य असल्यामुळे त्यांच्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार होती.

एफबीआय आणि इस्रायलचा तपास

2018 मध्ये पनामाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हुआन कार्लोस वरेला यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना पत्र लिहून या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची मागणी केली.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

पनामातील तपासासोबतच एफबीआयनेही ‘अलास प्रकरणाचा’ (अलास केस) तपास सुरू ठेवला.

एफबीआयने 29 मे 2024 पासून आपल्या वेबसाइटवर या प्रकरणाशी संबंधित माहिती देण्याचं आवाहन लोकांना केलं आहे.

एफबीआयच्या वेबसाइटवर संशयित हल्लेखोर अली हवा जमाल याच्या चेहऱ्याचं रेखाचित्रही प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

यासोबतच सुरक्षा कॅमेऱ्यातून टिपलेले तीन ब्लॅक-अँड-व्हाइट फोटोही आहेत. या फोटोंमध्ये काही अनोळखी पुरुष दिसत आहेत. त्यांचा या घटनेशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एफबीआयच्या माहितीनुसार, 27 आणि 28 मे 1994 रोजी मध्यपूर्वेकडील वंशाच्या एका अज्ञात व्यक्तीने एका अमेरिकन नागरिकाचं चोरीला गेलेलं क्रेडिट कार्ड वापरलं होतं.

त्या कार्डचा वापर करून पनामा सिटीमध्ये दोन एसयूव्ही गाड्या आणि दोन लाईन असलेली टेलिफोन यंत्रणा भाड्याने घेण्यात आली होती.

नंतर ही दोन्ही वाहनं टोकुमेन विमानतळाजवळ सापडली.

अहवालात म्हटलं आहे, “या छायाचित्रांमध्ये दिसणारे अनोळखी पुरुष अली हवा जमालचे साथीदार होते की नाही, हे स्पष्ट झालेलं नाही.”

“असं मानलं जातं की, त्याने कोलंबिया, व्हेनेझुएला, कोस्टा रिका आणि लेबनॉनचा प्रवास केला होता. तसेच, त्याचे शस्त्रांची तस्करी करणाऱ्या काही लोकांशी संबंध असल्याचंही सांगितलं जातं.”

या प्रकरणाबाबत माहिती देणाऱ्याला अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने 50 लाख डॉलरपर्यंतचं बक्षीस जाहीर केलं आहे, असं एफबीआयने सांगितलं.

हे बक्षीस अशा माहितीसाठी आहे, ज्यामुळे फ्लाइट 901 मध्ये स्फोट करणारे, त्याचा कट रचणारे किंवा त्यांना मदत करणारे लोक पकडले जाऊ शकतील किंवा त्यांना दोषी ठरवता येईल.

एफबीआयने पोस्टर जारी केलं

एफबीआयच्या वेबसाइटवरील या पेजवर एका व्यक्तीला शोधण्यासाठी त्याचे अनेक फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, FBI

2020 मध्ये एफबीआयने आणखी एक पोस्टर जारी केलं. त्यात अली झाकी जलील नावाच्या व्यक्तीबद्दल आणि तो सध्या कुठे आहे, याबाबत माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

त्यावेळी त्याचं वय सुमारे 52 वर्षं असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्याचं वजन 91 किलो आणि उंची 180 सेंटीमीटर असल्याचं नमूद करण्यात आलं होतं.

त्याला स्कायडायव्हिंगची आवड होती. तो खूप प्रवास करायचा. व्हेनेझुएलातील मार्गारिटा बेटावर त्याचे अनेक बार आणि रेस्टॉरंट्स होती.

एफबीआयच्या मते, या प्रकरणाशी संबंधित ‘अत्यंत महत्त्वाची माहिती’ अली झाकी जलील याच्याकडे असण्याची शक्यता आहे.

बीबीसी मुंडोच्या प्रश्नाला उत्तर देताना एफबीआयच्या प्रसिद्धी विभागाने सांगितलं की, त्यांच्याकडे सध्या सार्वजनिक करण्यासारखी दुसरी कोणतीही माहिती नाही.

मात्र, एफबीआयने हेही स्पष्ट केलं की बक्षीस अजूनही लागू आहे.

मियामीतील एफबीआयच्या दहशतवादविरोधी पथकातील माइक बेनहॅम यांनी डॉक्युमेंटरी बनवणाऱ्या अब्नेर बेनाइम यांना हे प्रकरण अजूनही सुरू आहे, असं सांगितलं.

त्यांनी सांगितलं की, वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करून तपास अद्यापही सुरू आहे. तपास यंत्रणांना तीन व्यक्तींबद्दल आणखी माहिती हवी आहे.

हिज्बुल्लाहवर संशय

एफबीआयचे एक वेबपेज, चार फोटोज आणि काही परिच्छेदांचा समावेश असलेला एक लेख.

फोटो स्रोत, FBI

अब्नेर बेनाइम यांना या प्रकरणाशी संबंधित जास्तीत जास्त लोकांशी बोलायचं होतं. त्यासाठी ते तेल अवीवमध्येही गेले होते.

त्यांच्या डॉक्युमेंटरीमध्ये शब्ताई शावितही दिसतात. ते 1989 ते 1996 या काळात मोसादचे प्रमुख होते.

शावित यांनी कॅमेऱ्यासमोर सांगितलं की, ते या विषयावर बोलू शकत नाहीत. कारण हा विषय ‘निषिद्ध’ मानला जातो.

मात्र, इस्रायलच्या अंतर्गत सुरक्षा संस्था शिन बेटचे माजी प्रमुख याकोव्ह पेरी आणि इस्रायलमधील इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल सिक्युरिटी स्टडीजच्या दहशतवाद अभ्यास कार्यक्रमाचे संचालक योराम श्वाइट्झर यांना या हल्ल्यामागे हिज्बुल्लाहचा हात असल्याचा संशय होता.

श्वाइट्झर म्हणतात, “सुरुवातीला हा दहशतवादी हल्ला आहे, हे कोणालाही माहीत नव्हतं. त्यामुळे त्याचा तपासही दहशतवादी हल्ला मानून केला गेला नाही.”

“संशयित आत्मघाती हल्लेखोराचा मृतदेह आणि इतर फॉरेन्सिक पुरावे मिळाल्यानंतर खरं काय घडलं, हे समोर आलं आणि त्यानंतर तपास सुरू झाला. परंतु, तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. त्यामुळे पुरावे शोधणं कठीण झालं. अशा प्रकरणांमध्ये वेळ खूप महत्त्वाची असते.”

याकोव्ह पेरी म्हणाले, “जगात कुठेही झालेला दहशतवादी हल्ला इस्रायलच्या गुप्तचर संस्थांसाठी खूप महत्त्वाचा असतो. पण या प्रकरणाचा तपास पनामाच्या अधिकाऱ्यांकडे होता. त्यांनी अर्जेंटिनाच्या अधिकाऱ्यांसोबत एकत्रित मिळून समन्वय साधत योग्य पद्धतीने तपास केला आहे.”

आरोपीचं प्रत्यार्पण आणि ‘गुंतागुंतीचं प्रकरण’

लेबनानी वंशाचा कोलंबिया-व्हेनेझुएलाचा नागरिक अली हज जलील याला नोव्हेंबर 2025 मध्ये मार्गारीटा बेटावरून अटक करण्यात आली. त्याच्या अटकेनंतर या प्रकरणाचा पुन्हा नव्याने तपास सुरू झाला.

यावर्षी एप्रिलमध्ये व्हेनेझुएलाने त्याला पनामाच्या हवाली केले.

यानंतर त्याला या प्रकरणात आरोपी करण्यात आलं. या घटनेत त्याचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा दहशतवादी हल्ला होता का, याचा पनामाचे सरकारी वकील तपास करत आहेत.

त्यावेळी अमेरिकेचे राजदूत केविन मरिनो कॅब्रेरा म्हणाले, “या प्रत्यार्पणातून एक स्पष्ट संदेश जातो. डोनाल्ड ट्रम्प प्रशासन अनेक वर्षांनंतरही गोष्टी विसरत नाही आणि त्यावर कारवाईही करू शकतं.”

ते म्हणाले, “आम्हाला आशा आहे की न्यायालयीन प्रक्रिया आणि तिचा अंतिम निकाल, यामुळे गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ न्यायाची वाट पाहत असलेल्या कुटुंबांना दिलासा मिळेल.”

सरकारी वकील गेओमारा ग्वेरा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची टीम आता जुन्या तपासातील त्रुटी तपासत आहे आणि नवीन पुरावे गोळा करत आहे.

कोलंबिया-व्हेनेझुएलाचा नागरिक अली झाकी हज जलील याला एप्रिलमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत व्हेनेझुएलाने पनामाच्या ताब्यात दिलं.

फोटो स्रोत, EPA/Shutterstock

त्या म्हणाल्या, “बॉम्ब घेऊन आलेली व्यक्ती घटनेपूर्वी ज्या ठिकाणी गेली होती, ती काही ठिकाणं शोधण्यात आम्हाला यश आले आहे. आम्ही आणखी दोघांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचं शोधून काढलं आहे.”

परंतु, तीन दशकांहून अधिक काळ उलटल्यामुळे तपास करणं आता कठीण झालं आहे, असं त्या मान्यही करतात.

त्या म्हणाल्या, “आम्ही मोठ्या पातळीवर तपास करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु आता अनेक पुरावे उपलब्ध नाहीत. त्यात लोक एकमेकांच्या संपर्कात कसे होते आणि त्यांच्यात काय बोलणं झालं, याची माहितीही नाही.”

या घटनेनंतर लॅटिन अमेरिकेतील इतर देशांमध्ये असलेल्या कट्टरवादी संघटनांच्या नेटवर्ककडेही पुन्हा लक्ष गेलं आहे.

अमेरिका आणि या भागातील अधिकारी अनेक वर्षांपासून सांगत आहेत की, हिज्बुल्लाहसारख्या संघटनांनी लॅटिन अमेरिकेतील काही भागांमध्ये पैसे आणि वस्तू पोहोचवण्यासाठी नेटवर्क तयार केलं आहे.

या संघटना अनेकदा व्यावसायिक कंपन्या आणि परदेशातून आलेल्या समुदायांच्या माध्यमातून काम करतात.

एप्रिलमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान अली हज जलीलने आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर केला आणि कोणत्याही प्रश्नांची उत्तर देण्यास नकार दिला.

त्यांच्या वकिलांनीही हे प्रकरण बंद करण्याची मागणी केली.

वकिलांनी असा युक्तिवाद केला की, या घटनेला 20 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. घटनेच्या वेळी लागू असलेल्या कायद्यानुसार, या प्रकरणासाठी 20 वर्षांची कायदेशीर मुदत होती.

जूनच्या सुरुवातीला सरकारी वकिलांच्या मागणीनंतर पनामाच्या सर्वोच्च फौजदारी अपील न्यायालयाने हे ‘गुंतागुंतीचं प्रकरण’ असल्याचं जाहीर केलं.

या निर्णयानुसार सरकारी वकिलांना तपास पुढे नेण्यासाठी आणखी 12 महिन्यांचा वेळ मिळाला आहे. त्यानंतर ते आरोपपत्र दाखल करू शकतील.

ग्वेरा म्हणतात, “याचा अर्थ असा नाही की आम्हाला पूर्ण एक वर्ष लागेलच. आम्ही शक्य तितक्या लवकर तपास पूर्ण करून निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू.”

हिंसाचाराचा खोलवर परिणाम

“पण 32 वर्षांनंतर आणि एवढा तपास झाल्यानंतरही आता काही नवा पुरावा मिळू शकतो का?”, असा सवाल फ्लाइट 901 मध्ये मृत्यू झालेल्या तरुण पायलट होसे अँटोनियो गोन्झालेसची आई मार्ता मार्केझ विचारतात.

“एखाद्याला अटक होईल किंवा हे प्रकरण पुन्हा उघडलं जाईल, असं मला कधीच वाटलं नव्हतं,” असं त्या म्हणतात.

त्या म्हणतात, “मला वाटत होतं की हे प्रकरण असंच सोडून दिलं जाईल. त्यामुळे या प्रकरणाच्या जुन्या फाईल्स पुन्हा उघडल्या आहेत आणि आता कदाचित न्याय मिळेल, हे ऐकून मला खूप आनंद झाला.”

“जरी आमची माणसं पुन्हा परत येणार नसली तरी, यामुळे आम्हाला थोडा दिलासा मिळेल.”

अब्नेर बेनाइम म्हणतात की, अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत. “हे का करण्यात आलं? यामागचा उद्देश काय होता? आणि पनामालाच का निवडलं गेलं?”

19 जुलै 1994 रोजी हवेत स्फोट झाल्यानंतर विमानाचे अवशेष पनामाच्या सांता रिटा पर्वतावर विखुरले गेले.

फोटो स्रोत, Cortesía Ministerio Público de Panama

ते सांगतात की, त्यांची डॉक्युमेंटरी लोकांना दाखवल्यानंतर त्यांना जाणवलं की या घटनेच्या दुःखातून लोक अजूनही पूर्णपणे सावरलेले नाहीत.

ही गोष्ट त्या लोकांनाही लागू होते, ज्यांना ही घटना चांगली आठवते. या घटनेचा परिणाम अशा पुढच्या पिढ्यांवरही झाला आहे, ज्यांनी या घटनेबद्दल कधी ऐकलंही नव्हतं.

अब्नेर म्हणतात, “माझा उद्देशही हाच होता. हे का घडलं, हे मला समजून घ्यायचं होतं.”

“यासोबतच, अशा घटनांचा लोकांच्या आयुष्यावर किती खोलवर परिणाम होतो, हेही मला दाखवायचं होतं. अनेक दिवसांनंतरही त्यांचा परिणाम लोकांच्या आयुष्यावर राहतो आणि तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडेही हस्तांतरित होऊ शकतो.”

ते म्हणतात, “मोठमोठ्या गोष्टी सांगणं, विधानं करणं किंवा लगेच निष्कर्ष काढणाऱ्यांपैकी मी नाही.”

“हिंसाचाराचा आपल्या सर्वांवर परिणाम होतो, हे जरी ऐकायला नेहमीसारखं साचेबद्ध वाक्य वाटत असलं तरी, ही गोष्ट खरी आहे.”

“जोपर्यंत तुम्ही स्वतः हिंसाचाराचा सामना करत नाही, तोपर्यंत त्याचा समाजावर किती मोठा परिणाम होतो, हे तुम्हाला खऱ्या अर्थाने समजणार नाही.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC