Source :- BBC INDIA NEWS

नंदिनी हरिनाथ यांनी परिधान केलेली साडी वॉशिंग्टनमधील स्मिथसोनियनच्या नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Smithsonian’s National Air and Space Museum

आयुष्यातील त्या सर्वात महत्त्वाच्या दिवशी नंदिनी हरिनाथ या लाल आणि निळ्या रंगाच्या आकर्षक रेशमी साडीमध्ये कार्यालयात आल्या होत्या.

आता त्यांची हीच साडी वॉशिंग्टनमधील स्मिथसोनियनच्या नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियममध्ये मानाच्या ठिकाणी ठेवली आहे.

भारताच्या पहिल्या मंगळयान मोहिमेत (मार्स ऑर्बिटर मिशन) डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर (उप-संचालन संचालक) म्हणून काम पाहणाऱ्या नंदिनी हरिनाथ यांनी 1 डिसेंबर 2013 रोजी ही साडी नेसली होती.

नंदिनी यांच्यासाठी साडी, विशेषतः वडिलांनी भेट दिलेली साडी, कामातील महत्त्वाच्या दिवसांसाठी किंवा भारताच्या अंतराळ एजन्सीचे (इस्रो) प्रतिनिधित्व करताना नेहमीची पसंतीची वेशभूषा असते.

हा ‘सर्वात महत्त्वाचा दिवस’ असल्याने नंदिनी यांनी या साडीची निवड केली होती. त्या दिवशी नंदिनी आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशनचे (इस्रो) इतर शास्त्रज्ञ नियंत्रण कक्षात उपस्थित होते.

तेथून त्यांनी यानाला पृथ्वीच्या कक्षेबाहेर पाठवून मंगळाकडे 300 दिवसांच्या प्रवासासाठी रवाना केले.

महिला शास्त्रज्ञांचा आनंद साजरा करतानाचा फोटो व्हायरल

2016 मध्ये मी नंदिनी यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या, “तो क्षण आमच्यासाठी करा अथवा मरा असा होता. अंतराळ यान कुठे, कसे आणि कधी पाठवायचे, हे आम्हालाच ठरवायचं होतं. त्या दिवशी आम्ही घेतलेल्या निर्णयांवर संपूर्ण मोहिमेचे यश अवलंबून होते.”

24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळयान यशस्वीरित्या मंगळाच्या कक्षेत पोहोचले. अशी कामगिरी करणारा भारत जगातील चौथा देश ठरला.

Caption- भारताच्या पहिल्या मंगळयान मोहिमेत नंदिनी हरिनाथ या डेप्युटी ऑपरेशन्स डायरेक्टर होत्या.

मंगळयानाच्या यशानंतर इस्रोमध्ये साडी नेसलेल्या महिला शास्त्रज्ञांचा आनंद साजरा करतानाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

त्यामुळे नंदिनी आणि इतर महिला शास्त्रज्ञांची जगभर चर्चा झाली होती. या फोटोने अंतराळ विज्ञान हे केवळ पुरुषांचे क्षेत्र असल्याची समजूतही खोटी ठरवली होती.

नंतर इस्रोनं स्पष्ट केलं की उत्सव साजरा करणाऱ्या महिला या प्रशासकीय कर्मचारी होत्या.

पण, मंगळयान मोहिमेत अनेक महिला शास्त्रज्ञांनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि यशाच्या त्या क्षणी त्या नियंत्रण कक्षात होत्या.

रॉकेट वुमनची गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं’

स्मिथसोनियन संग्रहालयातील अंतराळ इतिहास विभागाचे (स्पेस हिस्ट्री) क्युरेटर मॅट शिंडेल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, तो फोटो त्यांना ‘खूपच प्रभावी’ आणि लक्ष वेधून घेणारा वाटला.

ते म्हणाले, “या महत्त्वाच्या मोहिमेत आघाडीवर असलेल्या या ‘रॉकेट वुमन’ची गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचवणं खूप महत्त्वाचं आहे, असं मला वाटलं.”

2020 मध्ये शिंडेल यांनी नंदिनी यांच्याशी ई-मेलच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यानंतर भारताच्या मंगळयान मोहिमेचे आणि त्यातील नंदिनी यांच्या भूमिकेचे प्रतिनिधित्व कोणती वस्तू सर्वात चांगल्या प्रकारे करू शकेल, याबाबत दोघांमध्ये चर्चा सुरू झाली.

शिंडेल म्हणाले, “मी त्यांना विचारलं की, मोहिमेची आठवण म्हणून कोणती वस्तू त्या संग्रहालयाला देऊ शकतील. मंगळयान पृथ्वीच्या कक्षेतून निघाले, त्या दिवशी त्यांनी नेसलेल्या साडीवर आमचं एकमत झालं.”

साडी आणि तिचा निळ्या रंगाचा जुळणारा ब्लाऊज संग्रहालयात पोहोचल्यानंतर, ती पुतळ्यावर (मॅनिक्विन) योग्य पद्धतीने नेसवण्यासाठी वस्त्रसंवर्धन तज्ज्ञ (टेक्सटाइल काँझर्व्हेटर) बेथ नाईट यांनी यूट्यूबवरील व्हीडिओंची मदत घेतली.

शिंडेल म्हणतात की, ही साडी त्यांच्या संग्रहातील अशा अनेक वस्तूंशी मिळतीजुळती किंवा ‘कौटुंबिक साम्य’ असलेली आहे, ज्या महत्त्वाच्या मोहिमांदरम्यान ग्राउंड कंट्रोलमध्ये वापरल्या गेल्या होत्या.

उदाहरणार्थ, 1970 मध्ये अपोलो-13 मोहिमेदरम्यान अंतराळवीरांना सुरक्षित परत आणण्यासाठी मार्गदर्शन करणारे नासाचे फ्लाइट कंट्रोल प्रमुख जीन क्रॅन्झ यांनी घातलेला जॅकेट.

‘फ्यूचर्स इन स्पेस’ गॅलरीत साडी

दर आठवड्याला हजारो लोक भेट देणाऱ्या स्मिथसोनियन संग्रहालयात भारतातील अनेक वस्तू आहेत, पण त्यापैकी बहुतांश वस्तू या भारतीय हवाई दल आणि विमान कंपन्यांशी संबंधित आहेत.

इस्रोने 2007 मध्ये आर्थर सी. क्लार्क यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त दिलेला चांदीचा ट्रे देखील या संग्रहालयात आहे.

शिंडेल म्हणतात, “नंदिनी यांची साडी ही मी भारतातून आमच्या इंटरप्लॅनेटरी सायन्स कलेक्शनसाठी (अंतरग्रहीय विज्ञान संग्रह) घेतलेली पहिली वस्तू आहे आणि आमच्या संग्रहातीलही ही पहिलीच साडी आहे.”

ही साडी संग्रहालयात खेळणी, खेळ, चित्रपटांचे पोस्टर आणि अंतराळात गेलेल्या पहिल्या अमेरिकन महिलेनं घातलेल्या प्रसिद्ध निळ्या टी-शर्टसोबत ठेवण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Smithsonian’s National Air and Space Museum

ही साडी एअर अँड स्पेस म्युझियमच्या ‘फ्यूचर्स इन स्पेस’ गॅलरीत ठेवलेली आहे. तिथे खेळणी, खेळ आणि चित्रपटांचे पोस्टर अशा अनेक वस्तूंसोबत ती प्रदर्शित केली आहे.

ही साडी 1983 च्या शटल मोहिमेत अंतराळात गेलेल्या पहिल्या अमेरिकन महिला सॅली राइड यांनी परिधान केलेल्या प्रसिद्ध निळ्या टी-शर्टच्या अगदी जवळ ठेवली आहे.

शिंडेल म्हणतात की, “या प्रदर्शनामागचा उद्देश असा आहे की, भेट देणाऱ्या लोकांना अलीकडील अंतराळातील घडामोडी समजावून सांगणे आणि पुढे काय घडू शकतं याची माहिती देणे आहे.”

ते म्हणतात, “अंतराळाबाबत आपल्यासमोर अनेक प्रश्न असतात. हे प्रदर्शन लोकांना आजच्या मोठ्या प्रश्नांवर विचार करायला लावतात. अंतराळात कोण जाईल हे कोण ठरवतं? आपण अंतराळात का जातो? आणि तिथे गेल्यावर आपण काय करतो?”

हे प्रदर्शन आपण अंतराळात का जातो या प्रश्नावर आधारित आहे. आणि त्यात ठेवलेल्या वस्तू अंतराळात जाण्यामागची कारणे आणि प्रेरणा देतात, असं ते म्हणाले.

‘महिलांना विज्ञानात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन’

त्यांनी पुढे म्हटलं की, “नंदिनी यांची साडी दोन गोष्टी दर्शवते. पहिली म्हणजे भारताच्या पहिल्या मंगळयान मोहिमेचा आणि यशस्वी अंतराळ कार्यक्रमाचा राष्ट्रीय अभिमान.”

“दुसरी म्हणजे नंदिनी यांची वैयक्तिक प्रेरणादायी कहाणी, जी अधिक महिलांना विज्ञानात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन करू शकते.”

“ही साडी निवडण्यामागे तिचे सांस्कृतिक मूल्य आणि ती लगेच ओळखता येते हेही कारण आहे. या प्रदर्शनाला भेट देणारे लोक टचस्क्रीनचा वापर करून या वस्तूंबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात.”

“भेट देणारे लोक ही साडी पाहत आहेत आणि तिच्याबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित आहेत, याचा मला खूप आनंद आहे. ही आमच्या संग्रहात एक उत्कृष्ट वस्तू आहे,” असं शिंडेल यांनी म्हटलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC