Home LATEST NEWS ताजी बातमी मणका, हात, त्वचा, मेंदू ते डोळे; मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे शरीराच्या ‘या’ अवयांवर...

मणका, हात, त्वचा, मेंदू ते डोळे; मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे शरीराच्या ‘या’ अवयांवर होतात परिणाम

2
0

Source :- BBC INDIA NEWS

मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे शरीरात उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावरचे साधे उपाय

फोटो स्रोत, BBC/ Serenity Strull/ Getty Images

तुमचा मोबाईल फोन, कॉम्प्यूटर आणि इतर डिजिटल उपकरणांच्या सततच्या वापरामुळे तुमच्या शरीरात असे काही बदल घडू शकतात, ज्यांकडे खरंतर अनेक लोकांचं लक्षसुद्धा जात नाही.

पण योग्य उपाययोजना केल्यास हे परिणाम नक्कीच कमी करता येऊ शकतात.

जेव्हा लोक डिजिटल स्क्रीनच्या अतिवापराबाबत विचार करतात, तेव्हा ते त्यामुळे होणाऱ्या मानसिक परिणामांबाबतच अधिक विचार करताना दिसतात. त्याबाबतच त्यांना अधिक चिंता वाटते.

पण एके दिवशी, मला माझ्या हाताच्या करंगळीवर एक लहान आणि कडक अशी गाठ आली असल्याचं जाणवलं.

याच करंगळीचा वापर मी फोनचा वापर करताना मोबाईल धरण्यासाठी करत असे.

त्यामुळे, माझ्या मनात चटकन एक प्रश्न निर्माण झाला. स्मार्टफोनचा शरीराच्या इतर भागांवर आणखी काय परिणाम होऊ शकतो?

या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली. दुर्दैवानं, त्यांची उत्तरे फारशी उत्साहवर्धक नव्हती.

अलीकडील वैज्ञानिक अभ्यासांनुसार, स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणांमुळे आपल्या शरीरावर काही महत्त्वाचे परिणाम होऊ शकतात.

जसे की, आपल्या मानेची ठेवण हळूहळू बदलू शकते, दृष्टीवर परिणाम होऊ शकतो, शारीरिक हालचाल मंदावू शकते आणि स्नायू कमकुवत होऊ शकतात.

डिजिटल उपकरणांचा अतिवापर केल्याने त्वचेवर अकाली सुरकुत्या देखील पडू शकतात.

यातील काही शारीरिक बदलांमुळे कालांतराने गंभीर परिणाम घडून येऊ शकतात.

यामध्ये मेंदूच्या कार्यक्षमतेत घट होणं किंवा दीर्घकालीन इतर आरोग्यविषयक समस्यांचाही समावेश आहे.

हे निष्कर्ष चिंताजनक आहेत. कारण, स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवणं या गोष्टीशी संबंधित सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे दीर्घकाळ एकाच जागी बसून राहणं होय.

पण, तंत्रज्ञानाचा तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ नये, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर हे धोके कमी करण्यासाठी आणि तुमचे आरोग्य जपण्यासाठी तुम्ही काही व्यावहारिक अशा उपाययोजना नक्कीच करू शकता.

असेच काही उपाय आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बेढब झालेला मणका

सध्या जर तुम्ही हा लेख तुमच्या फोनवर वाचत असाल, तर अशी शक्यता नक्कीच आहे की, स्क्रीन पाहण्यासाठी तुमचं डोकं खाली झुकलेलं असेल.

याला ‘फॉरवर्ड हेड पोश्चर’ (मान पुढे झुकलेली असण्याची स्थिती) असं म्हणतात. या स्थितीमुळे तुमच्या मानेवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. या स्थितीमुळे तुमच्या मानेवर 27 किलोग्रॅमपर्यंतचा भार पडावा, इतका ताण पडू शकतो.

दीर्घकाळापर्यंत पडणाऱ्या या सततच्या दाबामुळे पाठीच्या कण्यातील चकत्यांना इजा होऊ शकते.

सांधे आणि स्नायूंची झीज होऊ शकते आणि श्वास घेताना फुफ्फुसे पूर्णपणे प्रसरण पावण्याची क्षमताही कमी होऊ शकते.

डिजिटल उपकरणांच्या वापरामुळे ही समस्या अत्यंत सामान्य झाली असल्याने, याला अनेकदा ‘टेक नेक’ असं म्हटलं जातं.

मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे शरीरात उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावरचे साधे उपाय

फोटो स्रोत, Getty Images

ही स्थिती अनेक वर्षे कायम राहिल्यास, तुमच्या शरीराचा नैसर्गिक आकार आणि ठेवण हळूहळू बदलू शकते. काही विशिष्ट व्यायाम प्रकार या स्थितीमध्ये सुधारणा करण्यास मदत करू शकतात.

मात्र, ते व्यायाम डॉक्टरांचा किंवा पात्र आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच केले पाहिजेत.

मात्र, काही साध्या सवयी आहेत ज्यांचं तुम्ही त्वरित पालन करू शकता.

सर्वात सोप्या उपायांपैकी एक म्हणजे, फोन पाहण्यासाठी खाली वाकण्याऐवजी तो थोडा वरच्या पातळीवर धरणं.

स्क्रीन तुमच्या डोळ्यांच्या पातळीवर आणि शक्य असल्यास चेहऱ्यापासून हाताच्या अंतरावर असावी. संगणक वापरतानाही हाच नियम लागू होतो.

म्हणजेच, संगणकाची स्क्रीनही डोळ्यांच्या पातळीवरच असावी.

काही तज्ज्ञ स्क्रीनच्या सततच्या वापरादरम्यान नियमितपणे विश्रांती घेण्याचा सल्लाही देतात. मान, डोळे आणि शरीरावरील ताण कमी करण्यासाठी, दर 30 मिनिटांच्या स्क्रीन वापरा नंतर 20 मिनिटांची विश्रांती घेणं, नक्कीच फायद्याचं ठरू शकतं.

त्वचेला खाज आणि मानेला सुरकुत्या

अलीकडच्या काळात आणखी एका गोष्टीची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. ती म्हणजे ‘टेक नेक’.

‘टेक नेक’ म्हणजेच मोबाईल फोन किंवा इतर उपकरणांकडे पाहण्यासाठी सतत मान खाली झुकवून ठेवण्याची सवय होय.

पण, या सवयीमुळे मानेवर सुरकुत्या पडू शकतात का?

ब्रिटनच्या ‘रॉयल ​​कॉलेज ऑफ फिजिशियन्स’चे सदस्य आणि सल्लागार त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. जस्टिन हेक्स्टॉल यांच्या मते, हे सैद्धांतिकदृष्ट्या शक्य आहे.

“सैद्धांतिकदृष्ट्या हे पटण्यासारखं आहे,” असं ते म्हणतात. त्यांच्या मते, त्वचेवर वारंवार पडणाऱ्या दाबामुळे सुरकुत्या पडू शकतात. त्यामुळे, मोबाईल फोन वापरताना वारंवार मान पुढे झुकवणं आणि ती तशाच स्थितीत ठेवणं यामुळे कालांतराने मानेवर सुरकुत्या पडू शकतात.

तरीही, डॉ. हेक्स्टॉल हे देखील स्पष्ट करतात की, या गोष्टीला दुजोरा देणारा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा सध्या उपलब्ध नाही.

मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे शरीरात उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावरचे साधे उपाय

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळे, ‘टेक नेक’च्या समस्येवर उपाय म्हणून विशेषतः विकल्या जाणाऱ्या स्किन केअर उत्पादनांवर पैसे खर्च न करण्याचा सल्ला ते देतात.

मोबाईल फोनचा वापर आणि मानेवरील सुरकुत्या यांचा संबंध अद्याप निश्चित झालेला नसला, तरी तंत्रज्ञानाशी संबंधित त्वचेच्या इतर समस्यांकडेही लोकांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे, असं ते सांगतात.

जे लोक दिवसभर स्मार्टवॉच वापरतात, त्यांच्यासाठी हे विशेषतः लागू होतं.

ते सांगतात की, स्मार्टवॉचच्या खालील भागातील त्वचा गरम, काळवंडलेली आणि ओलसर होऊ शकते.

त्यामुळे ‘यीस्ट’च्या (एका प्रकारची बुरशी) वाढीस पोषक वातावरण निर्माण होतं.

परिणामी, काही लोकांच्या त्वचेची जळजळ होऊ शकते किंवा ‘एक्झिमा’सारखा त्रास उद्भवू शकतो. या स्थितीत त्वचा खाजणारी, लाल आणि सुजलेली बनते.

जेव्हा त्वचा अशा प्रकारे प्रभावित होते, तेव्हा अशा टेक्नो उत्पादनांमध्ये सामान्यतः आढळणाऱ्या विशिष्ट घटकांबाबत ती अधिक संवेदनशील बनू शकते, असं डॉ. हेक्स्टॉल सांगतात.

या घटकांमध्ये निकेल, रबर, लेटेक्स आणि ‘ॲक्रिलेट्स’ (acrylates) नावाच्या रसायनांचा समावेश होतो. चांगली गोष्ट म्हणजे या समस्या टाळणं अत्यंत सोपं आहे.

डॉ. हेक्स्टॉल अशी शिफारस करतात की, तुम्ही तुमचं स्मार्टवॉच नियमितपणे काढावं आणि त्याखालील त्वचेचा भाग स्वच्छ धुवावा.

तसेच, जर तुम्ही दिवसभर स्मार्टवॉच वापरणार असाल, तर त्वचेची जळजळ टाळण्यासाठी ‘बॅरियर क्रीम’चा (संरक्षक क्रीमचा) वापर करण्याचा सल्लाही ते देतात.

तुमची दृष्टी खालावत चालली आहे का?

गेल्या अनेक वर्षांपासून जगभरात ‘मायोपिया’ (निकटदृष्टीदोष) असलेल्या लोकांची संख्या वेगानं वाढते आहे.

अनेक लोकांच्या मते, या वाढीचं मुख्य कारण तंत्रज्ञान हे आहे, कारण लोक आता फोन, संगणक आणि इतर डिजिटल उपकरणांचा वापर करण्यात अधिक वेळ घालवतात.

अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमधील नेत्ररोगशास्त्राचे प्राध्यापक डोनाल्ड मुट्टी यांच्या मते, यात तंत्रज्ञानाची भूमिका असली तरी, ती बहुतांश लोक विचार करतात तशी ती नाही.

याबाबत बोलताना मुट्टी म्हणाले, “आम्ही 20 वर्षांहून अधिक काळ मुलांच्या डोळ्यांच्या विकासाबाबत एक दीर्घकालीन अभ्यास केला. यामध्ये आम्ही मायोपियाची सुरुवात आणि त्याची तीव्रता वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा अभ्यास केला.”

त्यांना ज्या मुख्य प्रश्नांची उत्तरे शोधायची होती, त्यापैकी एक प्रश्न म्हणजे वाचन करणं किंवा स्मार्टफोन वापरणं यांसारख्या, चेहऱ्याच्या अगदी जवळून गोष्टींकडे लक्ष केंद्रित कराव्या लागणाऱ्या कृतींमुळे मायोपिया होतो का?

मुट्टी यांनी सांगितलं की, अभ्यासाचे निष्कर्ष याच्या उलट होते. त्यांच्या मते, केवळ जवळच्या अंतरावरील कामांमुळेच मायोपिया होतो, याचे फारसे पुरावे या अभ्यासात आढळलेले नाहीत.

मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे शरीरात उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावरचे साधे उपाय

फोटो स्रोत, Getty Images

मात्र, संशोधकांना आणखी एक महत्त्वाचं कारण सापडलं आहे. त्यांना असं आढळून आलं आहे की, घराबाहेर मोकळ्या वातावरणात अधिक वेळ घालवल्यानं मुलांची दृष्टी सुरक्षित राहण्यास मदत होते.

“याचं कारण असं मानलं जातं की, बाहेरचा प्रखर प्रकाश डोळ्यांच्या रेटिनामध्ये ‘डोपामाइन’ नावाच्या रसायनाच्या निर्मितीला चालना देतो,” असं मुट्टी यांनी स्पष्ट केलं.

जरी मोबाईल फोन आणि कॉम्प्यूटर्समुळे ‘मायोपिया’ (निकटदृष्टीदोष) थेट होत नसला, तरी तंत्रज्ञानाचा त्यावर अप्रत्यक्ष परिणाम होतो, असं मुट्टी यांना वाटतं.

आजकाल लोक डिजिटल उपकरणांचा वापर करत घरामध्ये जास्त वेळ घालवत असल्याने, नैसर्गिक सूर्यप्रकाशात बाहेर घालवल्या जाणाऱ्या वेळेत घट झाली आहे.

त्यांच्या मते, जीवनशैलीतील हा बदल ‘मायोपिया’च्या वाढत्या प्रसाराचं एक कारण असू शकतं.

“आनंदाची गोष्ट म्हणजे यावर उपाय अगदी सोपा आहे,” असं मुट्टी म्हणतात. ते दररोज घराबाहेर अधिक वेळ घालवण्याची शिफारस करतात.

त्यांच्या म्हणण्यानुसार, घराबाहेर वेळ घालवणं केवळ डोळ्यांसाठीच फायदेशीर नाही, तर त्यामुळे चांगली झोप लागण्यासही मदत होऊ शकते.

त्याच वेळी, सूर्यप्रकाश असताना त्वचेचे आणि डोळ्यांचे हानिकारक अतिनील किरणांपासून (UV rays) संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावणं आणि सनग्लासेस (गॉगल) वापरणं यांसारखी योग्य खबरदारी घेण्याचा सल्लाही ते देतात.

‘ग्रिप स्ट्रेंथ’ कमी होणं

‘ग्रिप स्ट्रेंथ’ म्हणजेच एखादी वस्तू किती घट्ट पकडता किंवा दाबता येते, हे व्यक्तीच्या एकूण आरोग्याचं एक महत्त्वाचे निदर्शक मानलं जातं.

वास्तविक, एका वैज्ञानिक अभ्यासात असं आढळून आलं आहे की, रक्तदाबापेक्षा ‘ग्रिप स्ट्रेंथ’ हे एखाद्या व्यक्तीच्या अकाली मृत्यूच्या धोक्याचं अधिक अचूक निदर्शक ठरू शकते.

तरीही, अनेक देशांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये, ग्रिप स्ट्रेंथमध्ये घट होत असल्याचं अभ्यासातून दिसून आलं आहे.

जर्मनीतील ‘मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ लॉझिट्झ’ (Medical University of Lausitz) येथील वैद्यकीय समाजशास्त्राचे प्राध्यापक जोहान्स बेलर यांच्या मते, हा कल चिंताजनक आहे.

ते म्हणतात की, “पिढ्यानपिढ्या होत असलेली ही घट केवळ हातांमधील कमकुवतपणापुरती मर्यादित नाही; तर ती तरुण पिढीच्या भविष्यातील आरोग्याबाबतचा एक धोक्याचा पूर्वसंकेतही असू शकते.”

मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे शरीरात उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावरचे साधे उपाय

फोटो स्रोत, Getty Images

“संगणकावर आधारित आणि बैठे काम करण्याच्या पद्धतीकडे झालेला बदल हे शारीरिक क्षमतेतील या घट होण्यामागचे एक प्रमुख कारण आहे,” असं सांगून ते पुढे म्हणतात की, याचा परिणाम ग्रिप स्ट्रेंथवर होऊ शकतो.

तज्ज्ञ तुमची ग्रिप स्ट्रेंथ तपासण्यासाठी एक सोपी पद्धत सुचवतात.

तुम्हाला टेनिस बॉल शक्य तितक्या जोरात दाबता आला पाहिजे आणि तो तसाच 15 ते 30 सेकंदांपर्यंत धरून ठेवता आला पाहिजे. जर हे करणं कठीण जात असेल, तर हात आणि हाताच्या पुढच्या भागाची ताकद वाढवण्यासाठी ‘रिस्ट कर्ल्स’सारखे व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.

मात्र, तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की, यात केवळ ग्रिप स्ट्रेंथ सुधारणं एवढाच उद्देश नाही. तर, तुमची एकूण शारीरिक तंदुरुस्ती सुधारणं हा याचा खरा उद्देश आहे.

थोडक्यात सांगायचं झालं तर, नियमित व्यायाम आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग (उदा. जिममध्ये जाणं किंवा व्यायामाचं योग्य वेळापत्रक पाळणं) यामुळे ग्रिप स्ट्रेंथ आणि एकूण आरोग्य या दोन्ही गोष्टी सुधारण्यास मदत होऊ शकते.

हात आणि डोळे यांच्यातील समन्वय

तज्ञांच्या मते, तंत्रज्ञानाचा आपल्या ‘मोटर स्किल्स’वर (हालचालींशी संबंधित कौशल्यांवर) परिणाम होत असावा. मोटर स्किल्स म्हणजे अशी कौशल्ये जी मेंदू आणि शरीराला अचूक हालचाली करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यास मदत करतात.

जर्मनीतील रेगेन्सबर्ग विद्यापीठातील ‘डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी अँड एज्युकेशन’ विभागाचे प्राध्यापक सेबॅस्टियन सुकेट यांच्या मते, डिजिटल उपकरणांचा वापर केल्यानं काही विशिष्ट कौशल्ये सुधारू शकतात; उदाहरणार्थ, माउस क्लिक करणे किंवा टचस्क्रीनवर स्वाइप करणे.

तरीही ते म्हणतात, “जर आपण व्यापक स्तरावरील मोटर डेव्हलपमेंटचा, आणि विशेषतः ‘फाईन मोटर डेव्हलपमेंट’चा (सूक्ष्म हालचालींशी संबंधित विकासाचा) विचार केला, तर उपलब्ध पुरावे नकारात्मक परिणामांकडे निर्देश करतात.”

संशोधकांना आता प्रौढांच्या तुलनेत मुलांवर होणाऱ्या या परिणामांबद्दल अधिक माहिती मिळाली आहे.

सुकेट यांच्या संशोधनात मुलांचा स्क्रीनसमोर घालवलेला अति-वेळ आणि त्यांची कमकुवत मोटर कौशल्ये यांच्यात संबंध असल्याचंही आढळून आलं आहे.

मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे शरीरात उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावरचे साधे उपाय

फोटो स्रोत, Getty Images

ही अत्यंत चिंतेची बाब आहे, असं ते म्हणतात. कारण, अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, “मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये चांगले मोटर स्किल्स आणि त्यांची विचार करण्याची क्षमता, शिकण्याची क्षमता व शैक्षणिक कामगिरी यांच्यात परस्पर संबंध असतो.”

या चिंता असूनही, सुकेट यांना असं वाटत नाही की लोकांनी घाबरून जावं किंवा स्क्रीनचा वापर पूर्णपणे थांबवावा. त्याऐवजी, ते दैनंदिन जीवनात हातांचा प्रत्यक्ष वापर करावा लागणाऱ्या (hands-on) अधिक कृतींचा समावेश करण्याचा सल्ला देतात.

त्यांच्या मते, स्वयंपाक करणं, चित्र काढणं, रंगकाम करणं किंवा इतर कला आणि हस्तकलेसारख्या, ज्यामध्ये बराच वेळ हातांचा वापर करावा लागतो, अशा कृतींमुळे मोटर कौशल्ये सुधारण्यास मदत होऊ शकते.

सुकेट सांगतात की, त्यांना स्वतःलाही लाकडाचं काम करण्यात रस आहे. तसेच, ते एखादे वाद्य वाजवायला शिकण्याचा किंवा टायपिंगऐवजी हातानं लिहिण्यात अधिक वेळ घालवण्याचा सल्ला देतात.

“ही काही जगाची समाप्ती नाही. हे परिणाम सूक्ष्म स्वरूपाचे आहेत.”

तरीही, ते एक महत्त्वाचा इशाराही देतात. जरी वैयक्तिक पातळीवर याचे परिणाम मर्यादित किंवा अल्प असले, तरीही एकंदरीत आणि पिढ्यानपिढ्याचा विचार करता, समाजाला बोधात्मक क्षमतेतील (cognitive function) घट आणि प्रत्यक्ष जगात विचार करण्याच्या क्षमतेचा ऱ्हास यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

कारण, जगाशी होणाऱ्या आपल्या संवादात हात हा एक अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू असतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC