Source :- BBC INDIA NEWS

कान्स 2026 मधील 'अम्फार गाला'मध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचल्या ताबिंदा सनपाल. 'देसी ब्लिंग' शोमध्ये त्यांची सर्वात जास्त चर्चा

फोटो स्रोत, NETFLIX

“जेव्हापासून मी माझे पती सतीश यांच्यासोबत आहे, तेव्हापासून मी रोज सकाळी त्यांचे पाय चेपून देते. ते एखाद्या राजकुमारासारखे जागे होतात. एक हिंदू म्हणून ते असं मानतात की जर रोज पत्नीने पतीच्या पायाला स्पर्श केला तर घरात लक्ष्मी येते.”

नेटफ्लिक्सच्या नव्या रिअ‍ॅलिटी शो ‘देसी ब्लिंग’च्या सुरुवातीलाच एक दृश्य दिसतं. त्यात दुबईमध्ये राहणारे भारतीय अब्जाधीश उद्योगपती सतीश सनपाल सकाळी आपल्या पत्नी ताबिंदांकडून पाय चेपून घेताना दिसतात.

प्रेक्षकांना पहिल्याच सीनला एक आश्चर्याचा धक्का बसतो. दुबईत राहणाऱ्या श्रीमंत भारतीयांचे जग, त्यांचे ऐशोरामी जीवन, त्यांचे नातेसंबंध, सोशल सर्कलमधील पार्टी, राजकारण आणि गुंतागुंत दाखवण्यात आली आहे.

या शोमध्ये टीव्ही सेलिब्रिटी तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा आहेत. सोबतच जबलपूरचे सतीश सनपाल आणि त्यांची पत्नी ताबिंदा सुद्धा आहेत.

ताबिंदा या मूळच्या पाकिस्तानी-ब्रिटिश आहेत. पण हीच केवळ त्यांची ओळख नाहीये. कोणी त्यांना फक्त एका मोठ्या बिझनेसमनची पत्नी म्हणून बघतं, तर कोणी एक यशस्वी बिझनेस-वुमन म्हणून.

कुणी त्यांना सोशल मीडियावर एक प्रसिद्ध ‘सोशलाईट’ म्हणून पाहतंय तर काही जणांना मात्र त्यांची विधानं आक्षेपार्ह आणि पितृसत्ताकवादी वाटतात.

शोमध्ये जेव्हा ताबिंदा यांच्या मैत्रिणी त्यांना सांगतात की, त्यांच्या नवऱ्याला इतर मुलींसोबत फिरताना पाहिलं गेलंय तेव्हा एकदम शांत राहतात.

आणि त्या पुढे म्हणतात, “सतीशला मुलींसोबत वेळ घालवायला आवडते. मला कधीकधी हे पाहून हेवा वाटतो पण माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. जर ते प्रत्येक पार्टीमध्ये वेगवेगळ्या मुलींसोबत असतील तर मला कोणतीही अडचण नाही. अडचण तेव्हाच येईल जेव्हा ते एकाच मुलीला वारंवार भेटू लागतील. कारण जेव्हा तुम्ही एकाच व्यक्तीला पुन्हा पुन्हा भेटता तेव्हा प्रेम होऊ शकतं.”

अशाच काही गोष्टींमुळे ताबिंदा व्हायरल झाल्या आहेत.

पुरुषप्रधान मानसिकता

मानसशास्त्रज्ञ निशा खन्ना यांनी यापूर्वी रिअ‍ॅलिटी शोमधील स्पर्धकांसोबत काम केले आहे आणि त्या मॅरेज काउन्सिलिंगही करतात.

निशा खन्ना म्हणतात, “यावरून हे स्पष्ट होते की, ताबिंदा यांचा स्वतःवरच विश्वास नाही. त्यांनी पुरुषप्रधान मानसिकतेचे वास्तव स्वीकारले आहे. शोमध्ये ताबिंदा यांच्या पतीला हा प्रश्न विचारला गेला का, जर ताबिंदा अशाच प्रकारे पार्ट्यांमध्ये जाऊन इतर मुलांना भेटल्या तर त्यांना चालेल का?”

यावर चित्रपट निर्मात्या लक्ष्मी अय्यर यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे, “एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये पाहिले की, एका पत्नीला तिचा नवरा धोका देतोय असं वाटत नाही जोपर्यंत तो वेगवेगळ्या महिलांसोबत आहे.”

“अशा (फालतू) गोष्टींना नॉर्मलाईज करणे थांबवा. एकनिष्ठ आणि प्रामाणिक असणे हा आजही एक आकर्षक गुण आहे. विचार करा, पातळी किती खालावली आहे की ओटीटीवर हे सहज स्वीकारले जात आहे.”

‘देसी ब्लिंग’वर टीका होत आहे, त्याच वेळी हा शो आवडणारा वर्गदेखील आहे.

देसी ब्लिंग' या शोवर जशी टीका होत आहे तसेच त्याचे कौतुक करणारे देखील आहेत.

फोटो स्रोत, NETFLIX

फेसबुकवर दुबईत राहणाऱ्या अनिली ब्रिजलाल लिहितात, “मी हे स्वीकार करते की हा शो पाहून मला मजा आली. शोमध्ये भरपूर ड्रामा आहे… प्रत्येक जण दुसऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसतोय. पुढचा सीझन घेऊन या.”

एंटरटेनमेंट ब्लॉगर मरिया मोट्स यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, हा शो दुर्घटनाग्रस्त रेल्वेसारखा आहे. शेवटपर्यंत पाहणं भागच आहे असं वाटतं.

शो पाहिल्यानंतर निशा खन्ना म्हणतात की ‘देसी ब्लिंग’मध्ये पुरुषप्रधानता आहे, कौटुंबिक राजकारण आहे, असे नाते आहेत जे फक्त पैसा आणि आपल्या स्वार्थासाठी बनतात.

“पण हा शो मनोरंजक आहे. श्रीमंत लोक नेमके कसे राहतात, कोणते कपडे घालतात, त्यांच्या पार्ट्या कशा असतात, तेव्हा लोक हा शो पाहतीलच.”

गोल्ड क्वीन’ की ‘गोल्ड डिगर’?

‘देसी ब्लिंग’ या शोमधील महिला पात्रांची चर्चा होतीये पण पुरुष पात्रांबद्दल प्रश्न विचारले जात आहे.

उदाहरणार्थ, जेव्हा ताबिंदा या करण कुंद्राला सल्ला देतात की तेजस्वी त्याच्यासाठी योग्य जोडीदार नाही, तेव्हा करण त्यांच्या पाठीमागे म्हणतो, “मी फक्त अशाच लोकांकडून सल्ला घेतो ज्यांनी आयुष्यात काहीतरी मिळवले आहे. ताबिंदा वहिनींची ओळख केवळ सतीशची पत्नी एवढीच आहे.”

करणचे हे विधान विचार करायला भाग पाडते. कारण एवढ्या मोठ्या व्यवसायाचे साम्राज्य उभे करण्यात ताबिंदा यांनी आपल्या पतीला साथ दिली आहे. त्या स्वतःची कंपनी चालवतात तसेच घर आणि मुलीची जबाबदारीही सांभाळतात.

मग हे कर्तृत्व नाही का? मात्र, तेजस्वीबाबत इतर स्पर्धकांचा विरोध असूनही करण शेवटी तिच्या पाठीशी खंबीरपणे तो उभा राहिलेला दिसतो.

आपले पती सतीश सनवाल यांच्यासोबत ताबिंदा. हा शो 'पॅट्रिआर्की' म्हणजेच पितृसत्तेला खतपाणी घालत असल्याचे म्हटले जात आहे.

ताबिंदा, ज्यांना शोमध्ये सगळेजण ‘बिंदा’ म्हणून ओळखतात, त्या या शोमधील सर्वांत चर्चित चेहरा बनल्या आहेत. अगदी तसंच जसं ‘फॅब्युलस वाईव्ह्स व्हर्सेस बॉलिवूड वाईव्ह्स’ या रिअ‍ॅलिटी शोमधून शालिनी पस्सी चर्चेत आल्या होत्या.

शोमध्ये ताबिंदा यांना बहुतेक वेळा केवळ एका श्रीमंत उद्योगपतीची पत्नी म्हणूनच दाखवण्यात आले आहे, ज्या पार्ट्यांमध्ये येतात-जातात आणि कोणताही किंतु मनात न ठेवता आपल्या श्रीमंतीचा शो ऑफ करतात.

तेजस्वी प्रकाशसोबतच्या पहिल्याच भेटीत ताबिंदा तिला सांगतात, “तुझा विश्वास बसणार नाही, पण माझ्याकडे 40 किलो सोनं आहे. माझ्या पतीने मुलीच्या जन्माआधीच तिच्यासाठी सोन्याची भांडी बनवून घेतली होती. तिचं सोन्याचं ताट, सोन्याचा चमचा आणि सोन्याचा ग्लास आहे.”

“माझी मुलगी दुबईतली सर्वात श्रीमंत बाळ आहे. तिच्या पहिल्या वाढदिवसाला तिला 24 कॅरेट सोन्याचा ड्रेस घालण्यात आला होता. सतीश माझ्यासाठी दरवर्षी तीन किलो सोनं खरेदी करतात.”

त्यांचे पती ताबिंदांना ‘गोल्ड क्वीन’ म्हणून हाक मारतात तर दुसरीकडे काही लोक मात्र ताबिंदा यांना ‘गोल्ड डिगर’ देखील म्हणतात.

ताबिंदा कोण आहेत?

ताबिंदांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर नजर टाकल्यास एक वेगळेच व्यक्तिमत्त्व समोर येते.

लिंक्डइनवर ताबिंदा या ‘एनेक्स कॅपिटल फायनान्शियल मार्केट्स’ कंपनीची संस्थापक आणि संचालक आहेत.

या कंपनीला 2025 मध्ये फायनान्शियल मार्केटमधील ‘फास्टेस्ट ग्रोइंग कंपनी’ (सर्वात वेगाने प्रगती करणारी कंपनी) चा पुरस्कार मिळाला होता.

ताबिंदा या व्यावसायिक नेतृत्व आणि महिला उद्योजिकांच्या प्रगतीबद्दल नेहमी आपले विचार मांडत असतात.

इन्स्टाग्रामवर ताबिंदाने आपली ओळख ‘मॉमप्रेन्योर’ आणि ‘एक दूरदर्शी नेतृत्व’ म्हणून करून दिली आहे.

या शोचे सूत्रसंचालन करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांनी केले आहे.

फोटो स्रोत, Prodip Guha/Getty Images

देसी ब्लिंग’ मध्ये ड्रामा, आपापसातले भांडण, गॉसिप, ग्लॅमर आणि कट-कारस्थाने सारंकाही आहे.

थोडक्यात सांगायचं तर, इतर शोच्या मानाने यातली श्रीमंती आणि भव्यता 10 पट जास्त आहे. पण तरीही, हा शो अजाणतेपणी काही प्रश्न देखील मनात उत्पन्न करतो.

निशा खन्ना म्हणतात की, ताबिंदा अनेक ठिकाणी पुरुषप्रधान मानसिकतेला खतपाणी घालत आहे आणि स्वतःही या गोष्टीच्या बळी ठरली आहे.

शोमध्ये ताबिंदा त्यांच्या संघर्षाबद्दलही बोलतात, जेव्हा त्या लग्नानंतर 8 वर्षे आई बनू शकल्या नव्हत्या.

त्या म्हणतात, “मुलाशिवाय आयुष्य खूप कठीण असते. तुम्हाला तर माहितीये की भारतीय कुटुंबांत कसं असतं?”

ताबिंदाने आपले एम्ब्रियो लंडनमध्ये फ्रीज करून ठेवले असून तिला आयव्हीएफ (IVF) तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा एकदा आई व्हायचंय.

परंतु, ताबिंदा यांच्यासाठी पुन्हा आई होणे, हे त्यांच्या पतीला परत मिळवण्याचा एक शेवटचा प्रयत्न असल्यासारखे आहे का? कारण त्या वारंवार म्हणतात की -जर आमच्या आयुष्यात आणखी एक मूल आले तर कदाचित सतीश पार्ट्यांमध्ये जाणे बंद करतील आणि आमचे प्रश्न सुटतील.

जर संपूर्ण शोचा विचार केला तर अफाट पैसा, मोठ्या गाड्या, आलिशान घरे, ग्लॅमर आणि दुबईतील पार्ट्या – ‘देसी ब्लिंग’ पाहून कोणाचेही डोळे दीपून गेले तर आश्चर्य वाटायला नको.

या शोमध्ये लक्झरी ब्रँड्सची नावं इतकी सहजपणे घेतले जातात जसं सामान्य माणसाच्या घरात भाजी आणली जाते.

‘ब्लिंग’ म्हणजे चकाकणाऱ्या, महागड्या आणि दिखाऊ गोष्टी.

‘देसी ब्लिंग’ हा शो फक्त चमक-धमक दाखवणारा नाही. तर तो माणसाच्या आतला एकटेपणा आणि रितेपणा दाखवणारा शो आहे, जो महागड्या वस्तू आणि दागिन्यांच्या आवरणाखाली लपवलेला आहे.

हे केवळ मनोरंजन नाही तर प्रेक्षक यातून शिकू देखील शकतात. ‘देसी ब्लिंग’ मध्ये काय दिखाऊपणा आहे आणि काय मूल्यवान आहे हा प्रेक्षकांच्या आपल्या दृष्टीकोनानुसार ठरवावे.

जसं की सतिश सनपाल म्हणतो, “मी हिंदीत जास्त बोलतो कारण मला इंग्लिश येत नाही. पण माझा पैसा मात्र बोलतो.”

हा पण या दरम्यान, ताबिंदाची मात्र धडाक्यात चर्चा सुरू आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC